गरम सूपची लज्जत न्यारी

मनाली पालकर, सातारा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

फूड पॉइंट
हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शस असणाऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचे सूप आवर्जून असतेच... अशा हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शस असणाऱ्या खवय्यांसाठी सूप्सच्या काही रेसिपीज... 

गोल्डन सूप
साहित्य : पाव कप लोणी, २ रताळी, ३ गाजर, १ सफरचंद, १ पांढरा कांदा, अर्धा कप मसूर डाळ, प्रत्येकी अर्धा चमचा किसलेले आले, काळी मिरीपूड, जिरेपूड, मिरचीपूड, चिली फ्लेक्स, ४ कप व्हेजिटेबल स्टॉक, चवीनुसार मीठ. 
कृती : प्रथम एका पातेल्यात लोणी वितळवून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा,  रताळे, गाजर, सफरचंद सोलून, फोडी करून घालावे व चांगले परतून घ्यावे. आता यामध्ये मसूरडाळ आणि सर्व मसाले व मीठ घालून परतून घ्यावे. त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर अर्धा तास उकळून घ्यावे. आता हे मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावे. ही प्युरी पुन्हा एकदा पातेल्यात घालून त्यात हवे तेवढे पाणी घालून एक उकळी काढावी व गरम गरम सर्व्ह करावे. 

टोमॅटो  बेसिल 
साहित्य : तीन मोठे टोमॅटो, ३ लसूण पाकळ्या, १ छोटा कांदा, २ चमचे लोणी, १ दालचिनीचा तुकडा, २ चमचे किसलेले बीट, पाव वाटी चिरलेली बेसिलची पाने, मिक्स हर्ब्ज, चवीनुसार मीठ, १ चमचा काळी मिरीपूड, १ चमचा मिरचीपूड, ३ चमचे साखर, आवश्यकतेनुसार पाणी. 
कृती : एका पातेल्यात लोणी वितळवून त्यात दालचिनी, क्रश केलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्यावे. आता यामध्ये टोमॅटोच्या फोडी, किसलेले बीट घालून झाकण ठेवून वाफ आणावी. टोमॅटो शिजल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड करून वाटून घ्यावे. आता पुन्हा एका पातेल्यात वरील मिश्रण, सर्व मसाले, मिक्स हर्ब, बेसिलची पाने, साखर व मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले उकळून घ्यावे.

रोस्टेड शिमला मिरची टोमॅटो
साहित्य : दोन चमचे लोणी, ३ लाल शिमला मिरच्या, २ टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, ४ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा काळी मिरीपूड, १ चमचा ऑरेगॅनो , १ चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : लाल शिमला मिरची, टोमॅटो, कांदा यांना लोणी लावून गॅसवर भाजून घ्यावे. भाजल्यानंतर त्यांची साले काढून वाटून घ्यावे. आता एका पातेल्यात लोणी वितळवून त्यात क्रश केलेला लसूण, वरील वाटण घालून चांगले परतून घ्यावे. त्यात मिरी पावडर, मीठ, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स व पाणी घालून चांगले उकळून घ्यावे.

हॉट अँड सोअर
साहित्य : प्रत्येकी अर्धी वाटी चिरलेला कोबी, गाजर, पातीचा कांदा, फ्रेंच बीन्स, ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ हिरवी मिरची, २ चमचे प्रत्येकी सोया सॉस, व्हिनेगर आणि रेड चिली सॉस, आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, अर्धा चमचा साखर, १ चमचा काळी मिरीपूड, २ चमचे तेल, २ चमचे कॉर्नफ्लोअर. 
कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, आले, मिरची परतून घ्यावी आणि मग त्यात सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर परतून घ्याव्या. त्यात सर्व सॉस, साखर, मीठ, व्हिनेगर, काळी मिरीपूड घालून परतून घ्यावे आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून चांगले उकळून घ्यावे. २ चमचे कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण सूपमध्ये घालून एक उकळी आणावी. वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

कॉर्न पालक 
साहित्य : एक जुडी पालक, अर्धी वाटी शिजवलेले मक्याचे दाणे, १ कप दूध, १ चमचा बटर, १ चमचा मैदा, दीड चमचा काळी मिरीपूड, २ चमचे क्रीम, २ चमचे चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, पाणी 
कृती : प्रथम पालक उकळत्या पाण्यात घालून ३-४ मिनिटे ठेवून बाहेर काढून बर्फाच्या पाण्यात घालावा व नंतर त्याची पेस्ट करून घ्यावी. आता व्हाइट सॉस करण्यासाठी पातेल्यात बटर घालून त्यावर मैदा घालून मिसळून घ्यावे व त्यात दूध घालून मिश्रण (सॉससारखे घट्ट होईपर्यंत) ढवळत रहावे. त्यात मीठ, काळी मिरीपूड घालून मिसळून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे. आता पातेल्यात पालकाची प्युरी व व्हाइट सॉस घालून थोडे पाणी घालावे व एक उकळी आणावी. नंतर त्यात वाफवलेले कॉर्नचे दाणे, चिली फ्लेक्स व क्रीम घालून सूप सर्व्ह करावे.

क्रीम ऑफ मशरूम
साहित्य : तीन कप चिरलेले बटण मशरूम, दीड कप चिरलेला पांढरा कांदा, १ चमचा लसूण पेस्ट, १ कप क्रीम, अर्धा चमचा काळी मिरीपूड, १ चमचा काळे मीठ, २ चमचे रेड चिली फ्लेक्स, २ चमचे लिंबूरस, २ चमचे बटर, १ चमचा मैदा, २-३ कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, मीठ चवीनुसार.
कृती : पातेल्यात बटर वितळवून त्यात मैदा घालून मिसळून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा व लसूण पेस्ट घालून खमंग परतून घ्यावी. नंतर त्यात चिरलेले मशरूम, काळी मिरीपूड, रेड चिली फ्लेक्स, लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे व झाकण ठेवून मध्यम आचेवर मशरूम शिजवून घ्यावे. आता या मिश्रणाची प्युरी करून घ्यावी (काही मशरूम न वाटता तसेच ठेवावेत). पुन्हा एकदा हे मिश्रण पातेल्यात घेऊन त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून चांगले उकळून घ्यावे. शेवटी त्यात क्रीम घालून ते एकजीव करून सर्व्ह करावे.

ब्रोकोली पोटॅटो
साहित्य : दोन कप चिरलेली ब्रोकोली, १ कप चिरलेले बटाटे, १ कप नारळाचे दूध, २ चमचे फ्रेश क्रीम, अर्धा चमचा काळी मिरीपूड, १ चमचा रेड चिली फ्लेक्स, १ चमचा आल्याची पेस्ट, १ चमचा बटर, २-३ कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी.
कृती : प्रथम एका पातेल्यात  ब्रोकोली व बटाट्याचे काप, थोडेसे पाणी व मीठ घालून १५-२० मिनिटे वाफवून घ्यावेत आणि थंड झाल्यावर त्याची प्युरी करून घ्यावी. नंतर एका पातेल्यात बटर वितळवून त्यात आल्याची पेस्ट, वरील प्युरी, काळी मिरीपूड, रेड चिली फ्लेक्स व व्हेजिटेबल स्टॉक घालून चांगली उकळी आणावी. नंतर त्यात नारळाचे दूध घालून सूप एकजीव करून घ्यावे व लगेच गॅस बंद करावा. तयार सूपमध्ये क्रीम घालून ते सर्व्ह करावे.

प्रोटिन्स सूप
साहित्य : पाव किलो भिजलेले हरभरे, १ वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी तीळ, ३ चमचे किसलेले खोबरे, २ वाट्या नारळाचे दूध, १ चमचा काळी मिरी, ५-६ लवंग, ३-४ वेलदोडे, १ दालचिनीचा तुकडा, १ स्टारफूल, २-३ चमचे तेल, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी
कृती : प्रथम हरभरा, तीळ, खोबरे, कांदा वाटून घ्यावे. नंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात खडे मसाले घालून परतून घेऊन त्यात वरील वाटण घालून खमंग भाजून घ्यावे. आता त्यात नारळाचे दूध घालून नीट ढवळून घ्यावे व लगेच लागेल तेवढे गरम पाणी घालावे आणि एक उकळी आणावी. नंतर मीठ घालून चांगले उकळून घ्यावे (मीठ नंतर घातल्याने दूध फाटत नाही).

लेमन कोरिअँडर सूप
साहित्य : एक चमचा लिंबूरस, प्रत्येकी पाव कप - चिरलेली कोथिंबीर, कांदा, गाजर, कोबी, ८-१० लसूण पाकळ्या, २ चमचे चिरलेली मिरची, २ चमचे तेल, २ चमचे कॉर्नफ्लोअर व ३ चमचे पाणी घालून केलेली पेस्ट, ३ कप व्हेजिटेबल स्टॉक, अर्धा चमचा काळी मिरीपूड, मीठ चवीनुसार.
कृती : प्रथम एका पातेल्यात तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण व मिरची मोठ्या आचेवर परतून घ्यावे. त्यात कांदा, कोबी, गाजर परतून घ्यावे. त्यात व्हेजिटेबल स्टॉक, लिंबाचा रस, काळी मिरीपूड, मीठ घालून चांगली उकळी आणावी. आता त्यात कॉर्नफ्लोअर पेस्ट हळूहळू घालून ढवळावे (यामुळे गुठळी होणार नाही). एक उकळी आली की चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे व लगेच गॅस बंद करावा.

रागी सूप (नाचणीचे सूप) 
साहित्य : तीन चमचे नाचणीचे पीठ, १ वाटी ताक, ४-५ लसूण पाकळ्या, १-२ हिरव्या मिरच्या, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, ३-४ कप पाणी, १ चमचा जिरेपूड, सैंधव मीठ.
कृती : प्रथम नाचणीचे पीठ आणि ताक यांचे एकजीव मिश्रण करून घ्यावे आणि अर्धा तास भिजत ठेवावे. नंतर एका पातेल्यात पाणी चांगले उकळून त्यात हळूहळू नाचणी आणि ताकाचे मिश्रण घालावे (गुठळी होऊ देऊ नये). नंतर यात ठेचलेला लसूण आणि मिरची, जिरेपूड, मीठ घालून चांगली उकळी आणावी (हे मिश्रण पातळ ठेवावे). वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या