ठंडा ठंडा कूल कूल

मनाली पालकर
सोमवार, 10 मे 2021

फूड पॉइंट

उन्हाळ्यामध्ये घराघरांत थंडगार कैरीचे पन्हे हमखास केले जाते. पण पन्ह्याबरोबरच आंबा आणि कैरीपासून इतरही अनेक थंड पेय पदार्थ करता येतात. अशाच काही ‘कूल ड्रिंक्स’च्या रेसिपीज...

समर मँगो शॉट

साहित्य ः दोन आंबे (फोडी करून), १ चमचा व्हॅनिला इसेन्स, २ चमचे साखर, १ वाटी बर्फाचे खडे, २ वाटी दूध.
कृत्री ः आंब्याच्या फोडी, व्हॅनिला इसेन्स, साखर, बर्फ हे सर्व दुधात घालावे. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घ्यावे. हे ड्रिंक बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी व बर्फ घालून सर्व्ह करावे.

मँगो लेमनेड
साहित्य ः    दोन कप आंब्याच्या फोडी, ३ चमचे लिंबाचा रस, पाव कप (चवीनुसार) साखर, १ कप थंड पाणी, १ कप साधा सोडा (फ्लेव्हर नसलेला).
सजावटीसाठी : पुदिन्याची पाने, बर्फाचे खडे.
कृत्री ः आंब्याच्या फोडी, लिंबाचा रस, साखर, थंड पाणी हे साहित्य मिक्सरमधून फिरवून एकजीव करून घ्यावे. हे ड्रिंक सर्व्ह करताना प्रथम ग्लासमध्ये पुदिन्याची पाने, बर्फाचे खडे घालावेत. त्यावर तयार ज्युस घालावा व शेवटी सोडा घालावा आणि सर्व्ह करावे.

पारंपरिक कैरीचे पन्हे 

साहित्य : दोन कैऱ्या, ४ वाट्या बारीक चिरलेला गूळ (चवीनुसार कमीजास्त), स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार थंड पाणी, केशराच्या काड्या, २ चमचे वेलची पूड.
कृत्री ः प्रथम कैऱ्या कुकरमधून उकडून घ्याव्यात (साधारण ५ शिट्ट्या कराव्यात). तीन ग्लास पाण्यात गूळ घालून तो विरघळवून घ्यावा. कैरी उकडून झाली की त्याची साले काढून गर काढून घ्यावा. हा गर गुळात घालून, थोडे पाणी घालून मिक्सरमधून एकजीव करून घ्यावा. आता एका पातेल्यात मिक्सरमधून फिरवलेला गर, गुळाचे पाणी, केशर, वेलची पूड, मीठ घालून एकजीव ढवळून घ्यावे. आता त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घालून नीट ढवळून पन्हे सर्व्ह करावे.

ट्रॉपिकल मॉकटेल
साहित्य ः दोन कप आंब्याच्या फोडी, १ कप अननसाच्या फोडी, १ चमचा लिंबाचा रस, २ चमचे साखर(गरजेनुसार), २ कप पाणी, साधा सोडा, थोडी पुदिन्याची पाने, बर्फाचे खडे, लिंबाच्या गोलाकार पातळ फोडी. 
कृत्री ः एका मिक्सर जारमध्ये आंबा व अननसाच्या फोडी, साखर, लिंबाचा रस, पाणी घालून एकत्र फिरवून घ्यावे. आता एका ग्लासमध्ये लिंबाच्या २ फोडी, ३ ते ४ पुदिन्याची पाने हाताने क्रश करून घालावीत. त्यात बर्फाचे खडे घालावेत व अर्धा ग्लास भरेल इतका एकत्र केलेला ज्युस घालावा. आता त्यात सोडा घालून एका चमच्याने हलकेसे ढवळावे व सर्व्ह करावे.

इन्स्टन्ट पन्हे
साहित्य ः एक कप कैरीच्या फोडी, २ कप पिकलेल्या साध्या आंब्याच्या फोडी, चवीनुसार साखर, दीड चमचा भाजलेले जिरे, अर्धा चमचा मिरी पूड, १ चमचा शेंदेलोण, मीठ चवीनुसार, २ कप पाणी, बर्फाचे खडे.
सजावटीसाठी : चाट मसाला, लाल तिखट. 
कृत्री ः कैरीच्या साली काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. आंब्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. मिक्सरमध्ये या फोडी, साखर, मीठ, शेंदेलोण, जिरे, मिरी पूड व पाणी घालून एकजीव वाटून घ्यावे. आता एका ग्लासमध्ये हा पल्प, बर्फाचे खडे व गरजेनुसार पाणी घालून ढवळून घ्यावे. वरून चिमूटभर लाल तिखट व चाट मसाला भुरभुरून पन्हे सर्व्ह करावे.

मँगो स्मूदी
साहित्य ः दोन आंबे, २ ते ३ चमचे मध, अर्धी वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, बर्फाचे खडे, २ चमचे फ्रेश क्रीम, १ चमचा चिया सिड्स.
कृत्री ः आंब्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढाव्यात. त्यात दही व मध, तसेच ३ ते ४ बर्फाचे खडे व दूध घालून फिरवून घ्यावे. (हे पातळ करायचे नाही, दाटसरच ठेवावे). एका ग्लासमध्ये दोन बर्फाचे खडे घालून त्यावर ही स्मूदी घालावी. वरून थोड्या बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी, क्रीम व चिया सिड्स घालून सर्व्ह करावी.

मँगो मस्तानी
साहित्य ः दोन आंबे, २ चमचे साखर, १ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, १ कप थंड दूध, १ स्कूप मँगो आइस्क्रीम, बदाम पिस्त्याचे काप, टुटीफ्रुटी.
कृत्री ः आंब्याच्या फोडी करून घ्याव्यात व त्या मिक्सर जारमध्ये घालाव्यात. त्यात साखर घालून एकदा फिरवून घ्यावे. मग त्यात दूध घालून पुन्हा फिरवून घ्यावे. आता व्हॅनिला आइस्क्रीम घालून फिरवावे. हा मँगो थिक शेक तयार झाला. आता एका ग्लासमध्ये पाऊण ग्लास भरेल इतका थिक शेक घालून वर एक स्कूप मँगो आइस्क्रीम ठेवावे. वरून थोड्या बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी व बदाम पिस्त्याचे काप आणि टुटीफ्रुटी घालून मँगो मस्तानी सर्व्ह करावी.

मँगो कोलाडा
साहित्य ः एक कप आंब्याचा रस, अर्धा कप नारळाचे दूध, २ चमचे नारळाचे पाणी, एका लिंबाचा रस, १ कप बर्फाचे खडे, थोड्या आंब्याच्या फोडी.
कृत्री ः आंब्याचा रस, नारळाचे दूध, नारळाचे पाणी, लिंबाचा रस हे सर्व जिन्नस मिक्सर जार मधून फिरवून घ्यावेत. एका ग्लासमध्ये दोन बर्फाचे खडे घालून त्यावर वरील शेक ओतावा. त्यावर आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून सर्व्ह करावे.

 

संबंधित बातम्या