बेरीचा केक, ड्रायफ्रूट्स ब्रेडरोल

मीना काळे
सोमवार, 19 एप्रिल 2021

फूड पॉइंट

स्वयंपाकघरात नेहमी असलेल्या पदार्थांपासून काही वेगळ्या पाककृती करता आल्या, तर करणाऱ्यालाही बदल होईल आणि खाणाऱ्यालाही! असेच काही पदार्थ...

कॅरट पुडिंग
साहित्य : एक मोठा बाऊल साले काढून उकडून 
बारीक केलेला गाजराचा पल्प, पाऊण वाटी 
साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ वाटी दूध, थोडी वेलची पूड, सजावटीसाठी क्रीम.
कृती : अर्धी वाटी थंड दुधात कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट करावी. ही पेस्ट मिल्क पावडर, गाजराचा पल्प, साखर व घट्ट वाटल्यास अर्धी वाटी दूध घालून एकत्र शिजवावी. थंड झाल्यावर वेलची पूड घालून आकर्षक बाऊलमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे. खायला देताना क्रीमने सजावट करावी.

गाजराचा साखरभात
साहित्य : दोन वाट्या सुवासिक तांदूळ, वेलची दाणे, ४ लवंगा, १ वाटी गजराचा कीस, १ वाटी नारळाचा चव, ३ वाट्या साखर, वेलची पूड, थोडेसे काजू.
कृती : तांदूळ धुऊन ठेवावेत. थोड्या तुपावर वेलची दाणे व लवंगा घालून त्यात तांदूळ घालावेत. थोडे परतून गरम पाणी घालून त्याचा मोकळा भात करून घ्यावा. दुसऱ्या पातेलीत गाजराचा कीस, नारळाचा चव व साखर सारखे हलवून शिजवून घ्यावे. नंतर त्यात मोकळा केलेला भात घालून एकत्र करावे. वरून दोन चमचे तूप घालून चांगली वाफ आणावी. नंतर वेलची पूड व काजूचे तुकडे घालावेत. मूद पाडून वर थोडे तूप आणि काजूच्या पाकळ्या लावून खायला अजून बहार येते.

तुपाच्या बेरीचा केक
साहित्य : एक ते दीड वाटी तुपाची बेरी, २ वाट्या बारीक रवा, २ वाट्या साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, १ वाटी दही, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, अंदाजे दूध.
कृती : बेरी, रवा, मिल्क पावडर, दही, साखर व थोडे दूध घालून चांगले ढवळून एक तास झाकून ठेवावे. नंतर केकच्या भांड्याला आतून तेलाचा हात लावून तळाशी त्या मापाचा बटर पेपर घालावा. केकच्या मिश्रणामध्ये बेकिंग पावडर व सोडा घालून ढवळावे. भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट होण्यासाठी आवश्यकतेनुसार दूध घालावे. हे मिश्रण केकच्या भांड्यात ओतून १८० डिग्रीला ४० मिनिटे ठेवावे. टुथपिक घालून केक तयार झाला की नाही ते पाहावे. गरज असल्यास अजून थोडा वेळ ठेवावे. या केकमध्ये इसेन्सची गरज नाही, तुपाचाच सुंदर वास येतो.

पालक कॉर्न टोस्ट
साहित्य : ब्रेडचे ८-१० स्लाइस, १५-२० पालकाची पाने, १-२ मिरच्या, अर्धी वाटी स्वीट कॉर्न, मीठ, बटर आणि चीज.
कृती : पालकाची पाने उकडून घ्यावी. मीठ आणि मिरची घालून ती उकडलेली पाने वाटून त्याची चांगली पेस्ट करावी. ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून पालकाची पेस्ट त्यावर लावावी. त्यावर स्वीट कॉर्नचे दाणे आणि चीज घालावे. दुसऱ्या स्लाइसला बटर लावून पहिल्या स्लाइसवर पालथे घालावे. अशी सर्व सँडविचेस करून घ्यावीत. नंतर टोस्टरमध्ये ग्रील करावे. सॉसबरोबर खायला द्यावे.

दुधी भोपळ्याचे रायते
साहित्य : पाव किलो दुधी भोपळा, १ वाटी दही, मीठ, साखर, तूप, जिरे, भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा सैंधव.
कृती : दुधी भोपळा साले काढून किसून घ्यावा. थोडे पाणी घालून कुकरमध्ये उकडावा. थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून तूप, हिंग, जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात घुसळलेले थंड दही आणि चवीप्रमाणे जिऱ्याची पूड, तिखट, मीठ, साखर आणि सैंधव घालावे. व्यवस्थित एकत्र करून वाढावे.

केळ्याचा चाट

साहित्य : एक वाटी चिंचेचा घट्ट कोळ, पाऊण वाटी गूळ, २ चमचे खारीक पूड, ४-५ लवंगा, ४-५ मिरीचे दाणे, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ मसाला वेलची (नसल्यास २ हिरव्या वेलच्या), पाव चमचा काळे मीठ, चवीपुरते साधे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, १ केळे, मूठभर बेदाणे.
कृती : वेलची, लवंगा, मिरी व दालचिनी यांची न भाजता एकत्र बारीक पूड करावी. चिंचेच्या कोळात बारीक चिरलेला गूळ घालून मिक्सरमधून काढावा. त्यात हा मसाला, तिखट आणि मीठ घालावे. त्यात केळ्याचे काप, खारीक पूड व बेदाणे घालावे. मिश्रण किंचित सैल होईल इतके पाणी घालावे. हा आंबट गोड चाट सामोसे किंवा छोल्याबरोबर छानच लागतो.

तुपाच्या बेरीचे लाडू
साहित्य : एक ते दीड वाटी बेरी, ४ वाट्या कणीक, अर्धी वाटी साजूक तूप, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खारीक पूड, वेलची पूड. 
कृती : कणीक खमंग वास येईपर्यंत तुपात परतून घ्यावी. आवश्यकता वाटल्यास थोडे तूप घालावे. बेरी हाताने कुस्करून बारीक करावी. कणीक कोमट झाल्यावर त्यात सर्व साहित्य घालून एकत्र करावे आणि लाडू वळावेत.

ड्रायफ्रूट्स ब्रेडरोल

साहित्य : ब्रेडचे ८-१० स्लाइस, अर्धी वाटी खवा, पाव वाटी पिठीसाखर, १ वाटी दूध, बदाम, काजू व पिस्त्याचे बारीक केलेले तुकडे, २ वाट्या साखर, वेलची, केशर, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती : दोन वाट्या साखरेत १ वाटी पाणी घालून पाक करून घ्यावा. त्यात वेलची आणि केशर घालावे. खवा गुलाबीसर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व सुकामेव्याचे तुकडे घालून चांगले मिश्रण करावे. ब्रेड स्लाइसच्या कडा काढाव्यात आणि स्लाइस दुधात भिजवून घ्यावेत. नंतर एकेक स्लाइस हाताने दाबून जास्तीचे दूध काढून टाकावे. त्यात खवा आणि सुकामेव्याचे मिश्रण घालून स्लाइस गुंडाळून रोल करावा. सर्व रोल झाल्यावर ते तेलात तळून घ्यावेत. नंतर पाकात घालावेत. डेझर्ट म्हणून खूप छान लागतात.

संबंधित बातम्या