चमचमीत, चवदार!

मीना काळे
सोमवार, 19 जुलै 2021

फूड पॉइंट

पाऊस म्हटला की चमचमीत खाण्याची इच्छा होते. पावसाळ्यात भजी, वडे हे तर नित्याचेच. पण यावेळी काही वेगळे पदार्थ खाऊन जिभेचे चोचले पुरवता येतील.

ग्रीन बाईट्स

साहित्य : चार ब्रेड स्लाइस, अर्धी वाटी चणा डाळ, १ वाटी मेथीची पाने, २ हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे, मीठ आणि तेल.
कृती :  चणा डाळ २ तास पाण्यात भिजवून नंतर पाणी काढून टाकावे. या डाळीत मिरच्या, मीठ व जिरे घालून डाळ बारीक वाटून घ्यावी. मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून टाकाव्यात आणि सर्व स्लाइस तिरके कापून त्रिकोणी तुकडे करावेत. वाटलेल्या डाळीत मेथीची पाने घालून मिश्रण करावे. हे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांना एका बाजूने चिटकवून गरम तेलात तळावे. सॉस बरोबर खायला सुरेख लागतात.

पनीर स्टर फ्राय 

साहित्य : पनीरचे ८-१० चौकोनी तुकडे, २ सिमला मिरच्या, इटालियन हर्ब, मीठ, तेल.
कृती : सिमला मिरच्यांचे पनीरच्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. तेलावर पनीरचे तुकडे लालसर परतून घ्यावेत. पनीरचे तुकडे तेलातून काढून त्याच तेलात सिमला मिरचीचे तुकडे परतून एक वाफ आणावी. नंतर त्यात पनीरचे तुकडे मिसळून मीठ व हर्ब घालावे आणि परत थोडे परतून घ्यावे. टूथ पिक्स लावून ठेवल्यास खाताना वेगळी मजा येते! स्टार्टर डिश म्हणून सर्व्ह करावे.

मुगाच्या पुऱ्या

साहित्य : अर्धी वाटी हिरवे मूग, एक वाटी कणीक, तीन हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, मीठ, ओवा, तीळ, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल.
कृती : हिरवे मूग धुऊन पाणी घालून ७-८ तास भिजवावेत. त्यानंतर पाणी काढून त्यात मिरच्या व आले घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावेत. या मिश्रणात अर्धा चमचा ओवा, एक चमचा तीळ व चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे. नंतर त्यात मावेल तशी कणीक घालून घट्ट भिजवावे. वरून तेलाचा हात लावून ही कणीक अर्धा तास मुरू द्यावी. नंतर त्याच्या लहान लहान पुऱ्या करून तळाव्यात. हिरव्या चटणीबरोबर खूप छान लागतात. या पुऱ्या पातळ लाटल्यास ३-४ दिवस टिकतात व प्रवासातही नेता येतात.

चीज कॉर्न बॉल
साहित्य : ब्रेडचे ८-१० स्लाइस, १ सिमला मिरची, अर्धी वाटी उकडलेले स्वीट कॉर्न दाणे, २ चीज क्युब, १ हिरवी मिरची, मीठ, मिरपूड आणि तेल.
कृती : स्वीट कॉर्नचे दाणे वाफवून त्या दाण्यांमध्ये हिरवी मिरची व सिमला मिरची एकत्र बारीक चिरून घालावी. चीज किसून त्याबरोबर मीठ व मिरपूड घालून सर्व एकत्र करावे. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून टाकाव्यात. स्लाइसवर थोडे पाणी शिंपडून तो ओला करून घ्यावा. त्यात स्वीट कॉर्नचे सारण भरून त्याचा गोल बॉलसारखा आकार करावा. अशाप्रकारे सर्व बॉल तयार झाल्यावर तेलात तळून घ्यावेत. सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

भाजणीचे वडे

साहित्य : एक वाटी थालीपिठाची भाजणी, चवीप्रमाणे मीठ व तिखट, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल.   
कृती : एक वाटी भाजणीत १ चमचा गरम तेल आणि बाकीचे सर्व साहित्य घालून कोमट पाण्यात घट्ट भिजवून ठेवावे. तासाभराने हे पीठ थोडा पाण्याचा हात लावून पुन्हा मळून घ्यावे. प्लास्टिकच्या कागदावर लहान लहान वडे थापून घ्यावेत आणि तेलात तळावेत. दही आणि हिरव्या चटणीबरोबर खायला सुंदर लागतात.

पनीर चिली बेबी कॉर्न

साहित्य : पनीरचे ८-१० चौकोनी तुकडे, ३ बेबी कॉर्न, १ सिमला मिरची, १ कांदा, १ एक चमचा सोया सॉस, अर्धा चमचा पांढरे व्हिनेगर, २ चमचे टोमॅटो चिली सॉस, मीठ, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा कॉर्नफ्लोअर आणि तेल.
कृती : बेबी कॉर्न उकडून घ्यावेत आणि मधे चिरून दोन दोन तुकडे करून घ्यावेत. थोड्या तेलावर पनीरचे तुकडे लालसर परतून काढून घ्यावेत. त्याच तेलात दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालाव्यात. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा व उभी चिरलेली सिमला मिरची घालून परतावे. त्यात बेबी कॉर्न व सर्व सॉस घालून ढवळावे. कॉर्नफ्लोअरची तीन चमचे पाण्यात पेस्ट करून ती त्यात घालावी  आणि पनीरचे तुकडे घालून ढवळावे. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. स्टार्टर म्हणून सर्व्ह करावे. 

क्रिस्पी बेबी कॉर्न

साहित्य : दहा बारा बेबी कॉर्न, अर्धी वाटी मैदा, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ, काळी मिरपूड, पाव चमचा हळद, ब्रेड क्रम्ब्स आणि तेल. 
कृती : बेबी कॉर्नचे लांब दोन दोन तुकडे करावेत. मैद्यात तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ आणि मिरपूड घालावी व पाणी घालून भज्याइतपत पीठ पातळ भिजवावे. या पिठात बेबी कॉर्नचे तुकडे बुडवून नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून गरम तेलात तळावेत. खायला छान कुरकुरीत लागतात. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

बेडमी पुरी आणि भाजी
सारणाचे साहित्य : एक वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा हिंग, १ चमचा बडीशेप पूड, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा आमचूर, १ चमचा मीठ, हळद. 
पुरीचे साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, १ चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा ओवा, २ चमचे तूप, १ चमचा तेल आणि तळण्यासाठी तेल.  
भाजीचे साहित्य : तीन टोमॅटो, अर्धा इंच आले, अर्धा चमचा धने पूड, जिरे, तूप, तमालपत्र, २ लवंगा, १ चमचा भाजलेले बेसन, ४ उकडलेले बटाटे, हिंग, कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला पूड.
कृती : उडीद डाळ स्वच्छ धुऊन कापडावर पसरून वाळवावी. नंतर तिची मिक्सरवर रवाळ पूड करावी. तेल सोडून सारणाचे सर्व साहित्य घालावे. थोडे थोडे पाणी घालून कणकेपेक्षा थोडे सैल भिजवावे. हे झाले पुरीत भरायचे सारण. थोड्या वेळाने या सारणाचे छोटे छोटे गोळे करून ठेवावेत. पुरीचे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट कणीक भिजवावी. कणकेचा पुरीच्या आकाराचा गोळा घेऊन त्यात सारणाचा १ गोळा पुरणासारखा भरावा आणि जाडसर पुरी लाटावी आणि खरपूस तळावी. भाजीसाठी २ चमचे तुपात जिरे, तमालपत्र आणि लवंग घालून फोडणी करावी. हिंग, लाल तिखट, धने पूड घालून जरा परतावे. नंतर टोमॅटो व आले बारीक वाटून त्यात घालावे. टोमॅटोमधून तूप सुटेपर्यंत चांगले परतावे. त्यात बेसन, उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत. थोडे परतून २ भांडी पाणी घालावे. मीठ व कसुरी मेथी घालून उकळी आणावी. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. बेडमी पुरीबरोबर ही भाजी म्हणजे उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध आणि आवडता पदार्थ आहे. त्याबरोबर दही बुंदी असल्यास येणारी मजा न्यारीच!

संबंधित बातम्या