बोंबील व प्रॉन्सची मेजवानी

मीनाक्षी ठाकूर, मुंबई    
गुरुवार, 24 मे 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत. 

मिक्‍स डाळीचे अप्पे
साहित्य : एक वाटी मूगडाळ, १ वाटी सालवाली मूगडाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी बारीक कापलेली फरसबी, गाजर, सिमला मिरची, २ ते ३ हिरव्या मिरच्या, थोडासा हिंग, मीठ, तेल, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस
कृती : प्रथम तिन्ही डाळी वेगवेगळ्या भांड्यात अर्धा तास भिजवून ठेवाव्यात. पाणी काढून वेगवेगळ्या बारीक वाटून एका भांड्यात एकत्र करून घ्यावे. त्यात बारीक कापलेली फरसबी, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, थोडासा हिंग व चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण चांगले एकत्र करून १० ते १५ मिनिटे ठेवावे. गॅसवर अप्पे टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम अप्पे टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे.

प्रॉन्स स्टफ्ड बोंबील
साहित्य : पाच ते सहा ओले बोंबील, १ लहान बाउल कोळंबीचे तुकडे, ४ अंड्यांचा सफेद भाग, बटर, तेल, तांदळाचे पीठ, आलं - टरबूज - मिरची कोथिंबीर वाटण, चिंचेचा कोळ, लाळ तिखट, हळद
कृती : बाऊलमध्ये चिरा दिलेले बोंबील १ चमचा काळ तिखट अर्धा चमचा हळद, चिंचेचा कोळ, १ चमचा चवीप्रमाणे मीठ टाकून, एकत्र करून ठेवावे. पॅनमध्ये टाकून, त्यात कोळंबीचे तुकडे, आलं लसूण मिरची कोथिंबिरीचे वाटण चांगले शिजवून थंड करून घ्यावे. तयार मिश्रण बोंबलात भरून ते अंड्याच्या मिश्रणात घोळवून नंतर तांदळाच्या पिठात घोळवून पॅनमधील तेलावर खरपूस तळून खायला द्यावे.

खिमा अळुवडी
साहित्य : तयार शिजवलेला खिमा, आळूची पाने, बेसन, लाल तिखट, हळद, गूळ, चिंचेचा कोळ, तीळ, आलं लसूण पेस्ट, तेल, मीठ, कोंथिबीर, धने - जिरे पूड
कृती : बाऊलमध्ये बेसन टाकून त्यात २ चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, धने जिरे पूड, तीळ आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, गूळ व चवीप्रमाणे मीठ व आवश्‍यक असलेले पाणी टाकून जाडसर मिश्रण करून त्यात तयार खिमा टाकून एकजीव करावे. ते मिश्रण लाटलेल्या अळूच्या पानांवर लावून त्यावर दुसरे पान ठेवून त्याचा रोल करून वाफवून घ्यावे. वाफवलेला रोल कापून त्याच्या वड्या कापून तेलावर खरपूस तळून खायला द्याव्यात.

बोंबील भजी
साहित्य : सात ते आठ स्वच्छ केलेले बोंबील, आलं - लसूण - मिरची - कोथिंबीर पेस्ट, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, तेल, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस
कृती : प्रथम मिक्‍सरमधून बोंबील जाडसर वाटून घ्यावे. ते एका भांड्यात काढून त्यात ३ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, २ चमचे आले - लसूण - मिरची पेस्ट, पाव चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्या तेलावर मिश्रणाची छोटी भजी टाकून ती खरपूस तळून सॉसबरोबर खायला द्यावे.

प्रॉन्स बर्गर
साहित्य : सोललेले व हळद मीठात मुरलेले प्राॅन्स १ वाटी, २ उकडलेले बटाटे, तांदळाचे मीठ, आलं मिरची कोथिंबीर पेस्ट, बर्गर ब्रेड, चिरलेला कांदा, टोमॅटो, टोमॅटो सॉस, चीज, बटर
कृती : प्रथम भांड्यात मुरलेले प्रॉन्स, उकडलेले बटाटे, आलं मिरची कोथिंबीर पेस्ट, टोमॅटो सॉस कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. त्याच्या छोट्या टीकी वळून शॅलोफ्राय करून घ्यावे. बर्गर ब्रेडमधून कापून त्याला बटर लावावे. त्यावर गोल कापलेला कांदा, गोल कापलेला टोमॅटो व टीकी ठेवून टोमॅटो सॉस टाकून व चीज किसून टाकावे. दुसऱ्या बनच्या भागाला बटर लावून त्यावर ठेवावे. पॅनमध्ये बटर टाकून बर्गर व्यवस्थित गरम करून खायला द्यावे.

मेथीचा पराठा
साहित्य : बारीक मेथीच्या सात ते आठ जुड्या, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, हळद, मीठ, कणीक, तेल, सर्व्हिंगसाठी खोबऱ्याची चटणी
कृती : प्रथम मेथी स्वच्छ करून बारीक करून घ्यावी. कापलेली मेथी एका भांड्यात घेऊन त्यात बारीक कापलेल्या मिरच्या, आले, कोथिंबीर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ व मिश्रणात आवश्‍यक असेल एवढी कणीक टाकून आवश्‍यक वाटल्यास पाणी टाकून चांगले मळून घ्यावे. मिश्रणाचे पराठे लाटून दोन्ही बाजूंनी पॅनमध्ये तेलावर खरपूस शॅलोफ्राय करून घ्यावे. गरमागरम पराठा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

शेव बर्फी
साहित्य : एक वाटी मध्यम आकाराची शेव, १ वाटी खवा, अर्धी वाटी साखर, तूप, वेलची पूड, केशर, पिस्त्याचे काप, चांदीचे वर्ख
कृती : प्रथम पॅनमध्ये तूप टाकून, त्यात खवा टाकून परतावा व त्यात साखर व शेव टाकून मिश्रण चांगले एकजीव करावे. वेलची पूड टाकावी. पॅनला तूप लावून त्यावर शेवेचे मिश्रण पसरून थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून त्यावर पिस्ता काप व केशर टाकून चांदीचा वर्ख लावून खायला द्यावे.

कलेजी मसाला
साहित्य : कलेजी (कोंबडीची) पाव किलो, २ कांदे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट, २ चमचे मोठ्या टोमॅटोची पेस्ट, तेल, हळद, गोडा मसाला, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, सर्व्हिंगसाठी तांदळाच्या पिठाची भाकरी
कृती : प्रथम कलेजी स्वच्छ करून घेणे, पॅनमध्ये तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा लालसर परतून घेणे. परतलेल्या कांद्यात २ चमचे टोमॅटो पेस्ट, २ चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून त्यात स्वच्छ केलेली कलेजी १ चमचा गोडा मसाला, १ चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ टाकून व थोडे पाणी टाकून झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवावे. गरमा गरम कलेजी मसाला भाकरीसोबत खायला द्यावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या