रव्याचे कबाब, चीज शंकरपाळी

मुग्धा बापट
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

येता-जाता टाइमपास म्हणून खाता येईल असे काही पदार्थ, बटाट्याच्या भाजीच्या वेगळ्या पाककृती आणि जेवताना तोंडीलावणे म्हणून करता येईल अशा वैविध्यपूर्ण पदार्थांच्या रेसिपीज... 

कोथिंबीर चिवडा  
साहित्य : आठपाव जाड पोहे (हे साधारण सव्वा ते दीड कप होतात), पाऊण मोठा चमचा पिठीसाखर, चिरलेली कोथिंबीर, पाव कप फुटाण्याचे डाळे, पाव कप खोबऱ्याचे काप, अर्धा कप दाणे, १ मोठा चमचा धने जिरे पूड, ८-१० हिरव्या मिरच्या, २ चमचे फोडणीसाठी तेल, फोडणीचे साहित्य (हळद घालू नये).
कृती : पोहे चाळणीतून तळून घ्यावेत. दाणे, डाळ, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर हे पदार्थही तळून घ्यावेत. त्यावर धने जिरे पूड आणि मीठ घालावे. फोडणीत मोहरी, मिरच्या, कढीपत्ता, हिंग घालावे. गरम असतानाच फोडणी चिवड्यावर घालावी. व्यवस्थित एकत्र करावे. शेवटी पिठीसाखर घालावी.

रव्याचे कबाब 
साहित्य : अर्धा कप दूध, १ कप जाड रवा, १ चीज क्युब, १ मोठा चमचा बटर, १०-१२ पुदिन्याची पाने, कोथिंबीर, १ चमचा मिरची (बारीक चिरलेली), १ इंच आल्याची पेस्ट, २ लहान चमचे टोमॅटो सॉस, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, ब्रेड क्रम्ब्स, मैद्याची पेस्ट, तळायला तेल.
कृती : दूध गरम करून त्यात रवा घालून थोडा वेळ भाजावा. गार झाल्यावर त्यामध्ये चीज, बटर, पुदिना, कोथिंबीर, मिरची, आले पेस्ट, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालावे. सर्व साहित्य मळून घ्यावे. मिश्रणाचे छोट्या आकाराचे कबाब तयार करावेत. हे कबाब मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून, ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवावेत व तळावेत. टोमॅटो सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.

चीज पनीर चिली बॉल्स
साहित्य : एक कप किसलेले पनीर, १ कप किसलेले चीज, २ मोठे चमचे मिरची पेस्ट, अर्धा चमचा मिरपूड, ३ मोठे चमचे मैदा, २ चिमूट बेकिंग पावडर, कोथिंबीर, मीठ, तळायला तेल.
कृती : मैद्यामध्ये पनीर, चीज, मिरची पेस्ट, मिरपूड, बेकिंग पावडर, कोथिंबीर व मीठ घालावे. हे सर्व साहित्य पाण्याचा हात लावून एकत्र करून मळून घ्यावे. या मिश्रणाचे बॉल्स करून मध्यम आचेवर तळावेत. 
चीजमध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ जपून घालावे.

ओनियन गार्लिक सॉस
साहित्य : दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, १ मोठा चमचा बारीक चिरलेली मिरची, मोठा अर्धा चमचा तिखट, १ मोठा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा सोया सॉस, २ लहान चमचे साखर, १ लहान चमचा मीठ, २ मोठे चमचे तेल, किंचित खाण्याचा लाल रंग.
कृती : बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची एकत्र करावी. त्यामध्ये तिखट, साखर, मीठ, व्हिनेगर, सोया सॉस, तेल आणि खाण्याचा रंग घालावा. हे सर्व पदार्थ एकत्र करून १ तास ठेवावे. एक तासानंतर लगेचच कशाबरोबरही वापरता येतो.

चीज शंकरपाळे  
साहित्य - एक वाटी मैदा, १ क्युब किंवा १ मोठा चमचा किसलेले चीज, पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा, चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ.
कृती : मैदा, चीज, मीठ व मिरपूड एकत्र करावे. त्यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावे. तासभर पीठ तसेच ठेवावे. तासाभराने मोठी पोळी लाटून सुरीने बारीक शंकरपाळे करावेत. कापलेले शंकरपाळे तेलात तळावेत. सॉसबरोबर सर्व्ह करावेत किंवा नुसतेही छान लागतात.

पहाडी आलू 
साहित्य : अगदी छोटे १०-१२ बटाटे (टोचून उकडलेले), २ सुक्या मिरच्या, १ लहान तुकडा आले, हळद, २ चमचे धने, १ मोठा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, १ बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा कप मटार, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप दही.
कृती : उकडलेले बटाटे सोलून तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. अर्धा कप दही घुसळून त्यात चिमूटभर हळद व मीठ घालून बटाटे त्यामध्ये मुरवत ठेवावेत. धने, जिरे, बडीशेप हे सगळे पाण्यात भिजवून बारीक वाटून घ्यावे. त्यात हिंग पावडर घालावी. नंतर २ चमचे तेलात कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. वाटलेला मसाला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावा आणि नंतर त्यात टोमॅटो घालावा. दह्यासह बटाटे व मटार घालावे. त्यानंतर १ कप पाणी व मीठ घालून उकळावे. पुरी किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करावे.

पंजाबी अचारी आलू  
साहित्य : चार-पाच बटाटे, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ मोठा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ मोठा चमचा मीठ, २ मोठे चमचे व्हिनेगर, पाव चमचा मोहरी, पाव चमचा बडीशेप, प्रत्येकी १ चमचा जिरे आणि मेथी, २ मोठे चमचे तेल.
कृती : बटाटे धुऊन घ्यावेत. मोठे तुकडे करून ते तेलामध्ये तळावेत. तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालावे. त्यातच आले लसूण पेस्ट घालावी. नंतर हळद घालावी. त्यानंतर बटाटे घालून तिखट घालावे व परतून घ्यावे. वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. शेवटी व्हिनेगर घालून कोथिंबीर पेरावी. ही भाजी पराठ्याबरोबर खावी.
ही भाजी प्रवासात २ दिवस टिकते.

दह्यातली मिरची  
साहित्य : एक वाटी घट्टसर दही, २ मोठे चमचे मोहरी, १ लहान चमचा मेथी दाणे, मीठ, हळद, चिमूटभर हिंग पूड, १२-१५ जाडसर हिरव्या मिरच्या.
कृती : मेथी कोरडी भाजून घ्यावी. नंतर मेथी व मोहरी पाणी घालून चांगली वाटावी. त्यात हळद हिंग घालून पुन्हा वाटावी. त्यानंतर दह्यात हे मिश्रण घालून चांगले फेसावे. मिरच्या बारीक चिरून त्यात एकत्र कराव्यात. अर्धा तास मुरवावे. मिरची मुरली की खमंग तोंडीलावणे होते. 
या मिरच्या ३-४ दिवस टिकतात. थोडे घट्ट वाटले तर दही व चिमूटभर मीठ घालून हलवून घ्यावे.

संबंधित बातम्या