ॲव्होकॅडो व फणसाच्या रेसिपीज

मुग्धा बापट
सोमवार, 12 जुलै 2021

फूड पॉइंट

ॲव्होकॅडो ही फळभाजी खरेतर परदेशी. पण आता आपल्याकडे आठवडी बाजारात ॲव्होकॅडो मिळू लागले आहेत. या ॲव्होकॅडोच्या काही निराळ्या रेसिपीज देत आहोत. त्याशिवाय फणसाच्या भाजीच्या दोन पाककृतीही आहेत.

ॲव्होकॅडो पास्ता
साहित्य : एक कप पास्ता, १ ॲव्होकॅडो, १०-१२ पालकाची पाने, कोथिंबीर, अर्धा चमचा मिरपूड, ७-८ लसूण पाकळ्या, १ चमचा लिंबू रस, पाव चमचा चिली फ्लेक्स, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, मीठ.
कृती : नेहमीप्रमाणे पास्ता तेल व मीठ घालून पाण्यात शिजवून घ्यावा. ॲव्होकॅडोचे बी काढून गर काढून घ्यावा. त्या गरामध्ये लसूण, कोथिंबीर, पालक, लिंबू रस व पास्ता शिजवलेले पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. पॅनमध्ये १ चमचा तेल घ्यावे. मिक्सरमधून फिरवलेले मिश्रण तेलावर परतावे. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रणावर शिजवलेला पास्ता घालावा. पुन्हा ढवळून चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करावे.

ॲव्होकॅडो ग्वाकमोली 

साहित्य : एक टोमॅटो, १ कांदा, १ ॲव्होकॅडो , २ मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा लिंबू रस, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तूप.
कृती : ॲव्होकॅडो चिरून बी काढून टाकावी. गर काढून तो मॅश करून घ्यावा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ व लिंबू रस घालावा. तूप गरम करून मोहरी, जिरे व मिरची घालून फोडणी करावी. ही फोडणी मिश्रणात घालावी व नीट मिक्स करावे. ग्वाकमोली खाण्यासाठी तयार!

ॲव्होकॅडो आइस्क्रीम 
साहित्य : तीन ॲव्होकॅडो, पाऊण कप साखर, पाव कप क्रीम, १ चमचा लिंबू रस, 
१ चमचा व्हॅनिला इसेन्स, आवडणारे ड्रायफ्रूट्स.
कृती : ॲव्होकॅडो चिरून त्याची बी काढावी. नंतर त्याचा गर काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावा. नंतर त्यात क्रीम, साखर, लिंबू रस व इसेन्स घालून सर्व एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे. ड्रायफ्रूट्स घालून काचेच्या पॉटमध्ये घालून फ्रिझरमध्ये सहा तास सेट करायला ठेवावे. नंतर सर्व्ह करावे.

ॲव्होकॅडो स्मूदी  
साहित्य : ॲव्होकॅडो, केळे, १५-२० पालकाची पाने,  २ वाट्या नारळाचे दूध, १ वाटी पाणी, चवीपुरते काळे  मीठ.
कृती ः ॲव्होकॅडो चिरून बी काढून टाकावी. नंतर त्याचा गर व पालकाची पाने मिक्सरमधून फिरवून घ्यावे. केळे मॅश करून ॲव्होकॅडो आणि पालकामध्ये घालावा. थोडेसे मीठ, नारळाचे दूध व पाणी घालून ढवळावे. ढवळून मगच सर्व्ह करावे. केळ्याऐवजी स्ट्रॉबेरी किंवा सफरचंदही घालू शकतो.

ॲव्होकॅडो सलाड
साहित्य : एक टोमॅटो, १ कांदा, १ ॲव्होकॅडो, १ काकडी, १०-१२ पालकाची पाने, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा मिरपूड, १ चमचा लिंबूरस, कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल.
कृती : टोमॅटो, कांदा, काकडी, ॲव्होकॅडोच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात. पालक चिरून त्यात घालावा. त्यात लिंबू रस, मीठ, मिरपूड व ऑलिव्ह ऑइल घालून मिक्स करून सर्व्ह करावे.

फणसाच्या आठळ्यांची भाजी 

साहित्य : फणसाच्या साधारण २० आठळ्या, २ चमचे तूप, जिरे, २-३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी नारळ, पाव वाटी कोथिंबीर, १-२ अमसूल, गूळ, मीठ.
कृती : आठळ्या वाळलेल्या असल्या तर जरा बत्त्याने ठेचून त्याची पांढरी साले काढावीत. सोललेल्या आठळ्या थोडे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कढईत तूप गरम करावे. तूप गरम झाल्यावर जिरे, मिरची घालावी. ती तडतडली की शिजलेल्या आठळ्या घालाव्यात. रस हवा असेल तितके पाणी, गूळ, नारळ, अमसूल व मीठ घालून उकळी आणावी. उकळी आली की गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी. 
टीप ः ही भाजी उपवासाला चालते. तेलाची नेहमीसारखी फोडणी करून बिनउपवासाची रसभाजी पण करता येते. आठळ्या पौष्टिक असतात. थोडीशी भाजीपण पोटभर होते. यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.

फणसाच्या गऱ्यांची भाजी

साहित्य : एक जून फणस (कापा किंवा बरका), तिखट, मसाला, मीठ, गूळ, १-२ लाल मिरच्या, ओले खोबरे, वेसवार, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी.
कृती : फणस कापून गरे व आठळ्या सोलून घ्याव्यात. गरे फोडून त्याचे दोन भाग करावेत. आठळ्या ठेचून त्यांची साले काढून त्या पाण्यात टाकाव्यात. खळखळून धुऊन घ्याव्यात. नंतर त्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. आठळीवर टरफल राहू देऊ नये. फोडणीसाठी थोडे जास्त तेल वापरावे. फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे टाकावेत. गरे फोडणीला टाकून पाण्याचा हबका मारावा. चांगली वाफ आली की आठळ्या, मीठ, गूळ घालून पातेल्यातले गरे हासडावेत (म्हणजे वर-खाली हलवावेत). ओले खोबरे घालावे. लाल मिरचीमुळे भाजी जास्त खमंग लागते. गोडा मसाला व वेसवार घालावे. चविष्ट भाजी तयार.

माडगे
माडगे हे एक घरगुती पेय आहे. पावसाळा/थंडीत सर्दी, खोकला होऊ नये म्हणून हे पेय करून बघावे. 
साहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा सेंद्रिय गूळ, १ चमचा तांदूळ/तांदळाची कणी, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा मीठ, २ ग्लास पाणी. 
कृती : एका कढईमध्ये मध्यम आचेवर उडीद डाळ भाजून घ्यावी. डाळ भाजून झाली की थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. डाळीची पूड वाटीत घेऊन त्यात पाणी घालावे व त्याची पेस्ट करावी, गुठळ्या होऊ देऊ नयेत. तांदूळ धुऊन भिजवून घ्यावेत. मग कढईमध्ये २ ग्लास पाणी गरम करावे. पाणी गरम झाले की त्यात गूळ घालावा. गूळ वितळला की त्यात वेलची पूड, मीठ घालावे. मग भिजवून ठेवलेले तांदूळ घालून सगळे हलवून एकजीव करावे व शिजवावे. नंतर उडीद डाळेची पेस्टही त्यात घालावी. सगळे व्यवस्थित हलवून ५-७ मिनिटे उकळू द्यावे. उकळल्यावर ते दाटसर होईल. मग तयार झाले आपले गरमागरम माडगे. तूप घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या