नारळाचा गोडवा

मुग्धा बापट
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

नारळी पौर्णिमेला नारळी भात हमखास केला जातो. पण यावेळी भाताबरोबरच काही वेगळे आणि सगळ्यांनाच आवडतील असे पदार्थही करून पाहाच! 
त्यासाठीच या गोड गोड रेसिपीज... 

तिरंगी करंजी
साहित्य : 
सारणासाठी : दोन वाटी नारळाचा चव, १ वाटी साखर. 
पारीसाठी : एक वाटी रवा, १ वाटी मैदा, पाऊण वाटी कॉर्नफ्लोअर, खाण्याचे कोणतेही २ रंग, ४ चमचे तेल मोहनासाठी, अर्धी वाटी तेल, चवीपुरते मीठ, वेलची पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : नारळाचा चव व साखर एकत्र मंद गॅसवर ढवळत राहून सारण करावे. गार झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी.
पारीसाठी रवा व मैदा, गरम तेलाचे मोहन व चवीपुरते मीठ घालून घट्ट भिजवून तासभर झाकून ठेवावे. तासानंतर नीट मळून त्याचे ६ भाग करावेत. ४ भाग पांढरे ठेवावेत आणि १ भाग १ रंग व दुसरा भाग दुसरा रंग घालून मिक्स करून घ्यावे. सहाही भागाच्या पातळ पोळ्या लाटाव्यात. ताटात तेल व कॉर्नफ्लोअर फेसून घ्यावे. प्रथम पांढरी पोळी घेऊन त्यावर एकसारखे कॉर्नफ्लोअर पसरावे. त्यावर एक रंगीत पोळी पसरावी. तिला एकसारखे कॉर्नफ्लोअर लावून नंतर दोन पांढऱ्या पोळ्या एकावर एक कॉर्नफ्लोअर लावून पसराव्यात. नंतर परत एक रंगीत पोळी पसरावी. रंगीत पोळीला कॉर्नफ्लोअर लावून पांढरी पोळी पसरावी. पांढऱ्या पोळीला कॉर्नफ्लोअर लावून वळकटी करावी. वळकटी लांबीकडून उभी कापून २ भाग करावेत व ते पुन्हा आडवे कापून १ इंचाचे तुकडे करावेत. १ तुकडा घेऊन ज्या बाजूने पदर दिसतात, ती बाजू पोळपाटाकडे करून एकाच बाजूने पुरीसारखी लाटावी. त्यात वरील सारण भरून कातावी किंवा मुरड घालून मंद आचेवर तळावी.
सारण ओलसर किंवा कोरडे आवडेल तसे करू शकतो. कोरडे केल्यास १० दिवस करंजी टिकते.

कोकोनट आइस्क्रीम  
साहित्य : दोन कप निरसे दूध, १ कप साखर, १ कप मिल्क पावडर, १ कप टेंडर कोकोनटची मलई, १ कप साय किंवा रिच क्रिम किंवा अमूल फ्रेश क्रिम.
कृती : प्रथम दूध व साखर मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर दूध पावडर घालून फिरवावे. टेंडर कोकोनट घालावा व परत मिक्सर फिरवावा. नंतर मलई घालून अगदीच कमी वेळ मिक्सर फिरवावा. सेट करायला ठेवावे. २ ते अडीज तासांनी बिटरने मिक्स करावे किंवा मिक्सरवर फिरवावे व सेट करायला ठेवावे. 
५-६ तासांत आइस्क्रीम तयार होते.
सेट करायला ठेवताना शक्यतो काचेच्या भांड्यात काठोकाठ भरून त्यावर बटर पेपर चिकटवून झाकावे.

सेव्हन कप बर्फी 
साहित्य : एक कप नारळाचा चव, १ कप निरसे दूध, १ कप तूप, १ कप डाळीचे पीठ, ३ कप साखर.
कृती : नारळाचा चव, निरसे दूध, तूप, डाळीचे पीठ आणि साखर एकत्र करून चांगले ढवळावे. मोठ्या गॅसवर ठेवून तूप सुटेपर्यंत हलवावे. थाळीत किंवा वडीच्या ट्रेमध्ये ओतावे. १० मिनिटांत बर्फी तयार होते. त्याच्या लागलीच वड्या पाडाव्यात.

सांदण 
साहित्य : अर्धी वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी नारळ दूध, अर्धी वाटी तांदूळ रवा, १ वाटी आंबा पल्प, अर्धी वाटी साखर, इनो किंवा खाण्याचा सोडा.
कृती : नारळाचा चव, नारळ दूध, तांदूळ रवा, आंबा पल्प आणि साखर एकत्र करून तासभर झाकून ठेवावे. नंतर त्यात अर्धा चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा घालावा. भांड्यात काढून मोदकाप्रमाणे २० मिनिटे वाफवावे. विणायची सुई घालून पाहावी. सुईला चिकटले नाही की शिजले असे समजावे. पूर्ण गार झाले की वड्या पाडाव्यात.

पोळी  
साहित्य : दोन वाट्या कणीक, मीठ, तेल, अर्धी वाटी चिरलेला गूळ, १ वाटी नारळाचा चव, वेलची पूड.
कृती : कणीक ३ चमचे तेल व मीठ घालून पुरणाच्या पोळीला जशी भिजवतात तशी भिजवून घ्यावी. गुळात २ चमचे पाणी घालून गरम करावे. गूळ विरघळला की त्यात नारळ घालावा. पाणी पूर्ण आटले की गॅस बंद करावा. सारण गार झाल्यावर वेलची पूड घालावी.
ही पोळी पुरण पोळीप्रमाणेच लाटावी. (कणकेच्या गोळ्यापेक्षा सारणाचा गोळा थोडा मोठा असावा.)

साटोरी  
साहित्य : एक वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी साखर, २ चमचे दूध, १ चमचा मिल्क पावडर, वेलची पूड, १ वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, तूप, तेल.
कृती : मिल्क पावडरमध्ये २ चमचे दूध घालून पेस्ट करावी. साखर, नारळ आणि मिल्क पावडरची पेस्ट एकत्र करून १० मिनिटे ठेवून द्यावे. त्यानंतर शिजवून घ्यावे. किंचित सैल असताना गॅस बंद करावा म्हणजे गार झाल्यावर मिश्रण घट्ट होते.
रव्यावर ३ चमचे तेल गरम करून घालावे. नंतर त्यात मैदा व चवीला मीठ घालून थोडेसे सैल भिजवून अर्धा तास ठेवावे. त्यानंतर छोटी पारी करून त्यात सारण भरावे. पुरीपेक्षा थोडी मोठी साटोरी लाटून तुपावर खरपूस भाजावी. या साठोऱ्या अतिशय खुसखुशीत होतात व दोन-चार दिवस टिकतात.

पॅटिस 
साहित्य : एका नारळाचा चव, १ वाटी कोथिंबीर, १ लिंबाचा रस, ४ हिरव्या मिरच्या बारीक करून, १ चमचा आले पेस्ट, मीठ, ४ उकडलेले बटाटे, १ वाटी भिजवलेले पोहे, प्रत्येकी अर्धा चमचा धणे व जिरे पावडर, अर्धा चमचा तिखट.
कृती : नारळ, कोथिंबीर, लिंबाचा रस, आले पेस्ट, बारीक केलेली मिरची, मीठ घालून सगळे नीट एकत्र करून घ्यावे. बटाटा किसून त्यात भिजवलेले पोहे, मीठ, धणे जिरे पावडर व तिखट घालून मळून घ्यावे.
बटाट्याच्या सारणाची पारी करून त्यात नारळाचे सारण भरून गोल पॅटिस तयार करावेत. गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. सॉसबरोबर सर्व्ह करावेत. चविष्ट लागतात. मुलांना खूप आवडतात.

नारळाचे बॉल्स 
साहित्य : एक खोवलेला नारळ, १ छोटी गड्डी बारीक चिरून कोथिंबीर, २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, २ उकडलेले बटाटे, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, दीड वाटी तांदूळ पीठ.
कृती : एका मोठ्या बोलमध्ये नारळ, कोथिंबीर, कांदे, बटाटे, पेस्ट तांदूळ पिठामध्ये एकत्र करून चांगले मळून घ्यावे. मळतानाच त्यामद्ये लिंबाचा रस, मीठ, साखरही घालावी. तयार मिश्रणाचे छोटे बॉल्स करून बदामी रंगावर तळावेत. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या