म्हैसूरपाक, नाचणीचा चिवडा

नैना जैन
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

फूड पॉइंट

दिवसभरात अधेमधे लागलेली भूक शमवायची तर थोडंसंच काहीतरी खायला हवं असतं. त्यासाठी करता येतील अशा काही पदार्थांच्या रेसिपीज...

आवळा कँडी 

साहित्य ः पाच किलो आवळा, साडेतीन किलो साखर, मध्यम आकाराची अर्धी वाटी आल्याचा रस, मीठ चवीप्रमाणे. 
कृती ः आवळे स्वच्छ पाण्याने धुऊन आठ दिवस फ्रिझरमध्ये ठेवावेत. नंतर काढून रूम टेंपरेचरला येऊ द्यावेत. बर्फ निघाल्यावर कोमट पाण्यात घालून काढावेत. पातेल्यात पाणी गरम करून उकळी आल्यावर आवळे त्यात घालावेत. नंतर एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. चाळणीमध्ये आवळे गाळून घ्यावेत. थोडे थंड झाल्यावर त्याच्या फोडी कराव्यात, म्हणजेच बी वेगळे करून आवळ्याची जेवढी बाहेरची साल निघेल तेवढी काढून घ्यावी. एका पातेल्यात साखर घेऊन फोडी त्यात घालाव्यात. त्यातच आपल्या आवडीनुसार आल्याचा रस, काळी मिरी पावडर घालावी. नंतर तीन दिवस ते पातेले उन्हात ठेवावे. रोज एकदा चमच्याने ढवळावे. चौथ्या दिवशी आवळे पाकातून काढून प्लॅस्टिक पेपरवर पसरावेत. कडक उन्हात तीन दिवस ठेवावे. तीन दिवसांनंतर कँडी तयार!

पुदिना सरबत
साहित्य ः एक गड्डी पुदिना, ७५० ग्रॅम साखर, १ इंच किसलेले आले, ४ लिंबू, अर्धा टीस्पून साधे मीठ, अर्धा टीस्पून सैंधव, अर्धा टीस्पून पादेलोण.
कृती ः एका पातेल्यात साखर घ्यावी. ती भिजेल एवढे पाणी घालून ते उकळायला ठेवावे. त्यात आले, मीठ, पुदिना घालून चांगले उकळू द्यावे. उकळल्यावर त्यात लिंबाचा रस घालावा. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करून गार होऊ द्यावे. नंतर गाळून हिरवा रंग घालावा व काचेच्या बाटलीत भरावे.
टीप ः एक गड्डी पुदिन्यामध्ये अर्धा लिटर सरबत तयार होते.

सांभारवडी
साहित्य ः
मसाल्याचे साहित्य ः एक जुडी कोथिंबीर, १ कप सुके किसलेले खोबरे, अर्धा कप फुटाण्याची डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पाव वाटी खसखस, पाव वाटी गरम मसाल्याचे पाणी.
आवरणासाठी ः गव्हाचे पीठ, बेसन पीठ (समप्रमाणात), तेलाचे मोहन, मीठ, तळण्यासाठी तेल. 
कृती ः सर्वप्रथम कोथिंबीर निवडून, चांगली धुऊन घ्यावी. कापडावर पसरून कोरडी करावी. नंतर  एकदम बारीक 
चिरून घ्यावी. मिक्सरमध्ये प्रथम खोबरे बारीक करून घ्यावे. 
नंतर त्यातच फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची घालून परत फिरवून घ्यावे. कढईमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर घालावी व कोरडी होईपर्यंत परतावी. नंतर वाटलेले सगळे मिश्रण आणि  खसखस घालावी. जोपर्यंत कोथिंबीर कोरडी होत नाही, तोपर्यंत मिश्रण हलवावे. मग त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट स्वादानुसार घालावे. हा झाला मसाला तयार.
आवरणासाठी ः गव्हाचे पीठ, बेसन पीठ समप्रमाणात घेऊन त्यात तेलाचे मोहन, मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर पाणी घालून पीठ मळावे. या पिठाची जाडसर पोळी लाटावी व पोळ्या चारी बाजू कापून चौकोन तयार करावा. परत त्याचे दोन भाग करून गरम मसाल्याचे पाणी कडेला लावावे. कोथिंबिरीचा मसाला भरावा व तिन्ही बाजूंनी पक्के बंद करावे. कढईमध्ये तेल घेऊन तेल तापल्यावर वडी घालावी. तळताना वडी जास्त उलट सुलट करू नये. मंद आचेवर तळावे आणि काढून घ्यावे. दही आणि केचअपबरोबर सर्व्ह करावे.

न शिजवता केलेले लिंबाचे लोणचे
साहित्य ः पंचवीस लिंबे, जेवढा लिंबाचा लगदा त्याचा दीड पट साखर, मीठ चवीप्रमाणे, अर्धे पाकीट लिंबू लोणचे मसाला.
कृती ः एका लिंबाच्या आठ फोडी करून सर्व बिया काढून टाकाव्यात. या फोडी डब्यात भरून आठ दिवस फ्रिझरमध्ये ठेवाव्यात. आठ दिवसांनंतर बाहेर काढून पूर्ण बर्फ वितळू द्यावा. मिक्सरमध्ये त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्यात साखर, मीठ, अर्धे पाकीट लोणचे मसाला घालावा व कालवून लोणचे बरणीत भरून ठेवावे.
टीप ः लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास लोणच्याचा रंग टिकून राहतो .

काळ्या तिळाचे लाडू
साहित्य ः दोनशे ग्रॅम काळे तीळ, २०० ग्रॅम लाल गूळ.
कृती ः तीळ भाजून घ्यावेत. गूळ बारीक चिरून घ्यावा. भाजलेले तीळ आणि चिरलेला गूळ दोन्ही खलबत्यामध्ये चांगले एकजीव कांडून घ्यावे. कांडून झाल्यावर त्या मिश्रणाचे लाडू करावेत. हे लाडू इम्युनिटी बूस्टर असतात, त्यामुळे जरूर करून बघावेत.

काजूचा म्हैसूरपाक
साहित्य ः एक वाटी काजूचा बारीक चुरा, दीड वाटी साखर, सव्वादोन वाट्या तूप. 
कृती ः पातेल्यात साखर घेऊन साखर विरघळेल एवढे पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवून साखर पूर्ण विरघळून घ्यावी. नंतर त्यात काजूचा चुरा घालावा. मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात तूप गरम करायला ठेवावे. चांगले वाफ निघेल एवढे तापवावे. गरम झालेले तूप थोडे थोडे काजूच्या पाकात घालावे. जोपर्यंत जाळी येते तोपर्यंत थोडे थोडे घालत राहावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. तूप सुटायला लागले की तूप घालणे बंद करावे. एक सारखे हलवावे व गॅस बंद करावा.
थोडी उंच कड असलेली मध्यम आकाराची प्लेट घेऊन त्यात संपूर्ण मिश्रण ओतावे व थंड होऊ द्यावे. थोडे थंड झाल्यावर काप करावेत. प्लेट तिरकी ठेवून जास्तीचे तूप काढून घ्यावे.

नाचणी पापड चिवडा 

साहित्य ः शंभर ग्रॅम तळलेले नाचणी पापड (तळलेल्या पापडाचे एक-दीड इंच छोटे तुकडे करावेत), अडीच टेबलस्पून तेल, पाऊण टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, पाव कप शेंगदाणे, २ काड्या कढीपत्ता, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून मिरची, २ टेबलस्पून तीळ, २ टेबलस्पून फुटाण्याची डाळ, मीठ चवीनुसार, थोडासा लिंबू रस, १ टेबलस्पून पिठीसाखर.
कृती ः कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जिरा घालून नंतर कढीपत्ता, तीळ, शेंगदाणे, डाळ घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात सगळे मसाले घालून नाचणी पापडाचे तुकडे घालावेत. मंद आचेवर सगळे चांगले परतून घ्यावे. गॅस बंद करून गार झाल्यावर पिठीसाखर घालावी.

मखाना, ओट्सचे हेल्दी लाडू 

साहित्य ः शंभर ग्रॅम ओट्स, १०० ग्रॅम मखाना, १०० ग्रॅम पिस्ता व बदाम, २५ ग्रॅम बारीक डिंक (डिंक तुपामध्ये तळून काढावा), १ कप पिठीसाखर, १ कप साजूक तूप. 
कृती ः जाडसर तुपामध्ये साखर चांगली फेटून घ्यावी. ओट्स आणि मखाने जरा गरम करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. तसेच बदाम आणि पिस्तेसुद्धा हलके भाजून मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. फेटलेल्या तुपामध्ये डिंक आणि वरील सर्व साहित्य मिक्स करावे आणि त्याला चांगले मळावे. मळून झाल्यावर मग लाडू करावेत.

संबंधित बातम्या