होळी  स्पेशल...

नंदिनी गोडबोले, नागपूर
सोमवार, 14 मार्च 2022

फूड पॉइंट

थंडाई

साहित्य : एक लिटर फुल फॅट दूध, 
पेस्टसाठी : एक छोटी वाटी काजू, बदाम, पिस्ता, वेलची, २ काळी मिरी, खसखस, शोप, मगज, खिरा बीज, केशर (हे सर्व साहित्य अर्धा तास भिजवून घ्यावे), रोज वॉटर.
कृती : एक लिटर दूध थोडे उकळून घ्यावे. वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. दुधात २ चमचे साखर घालून ढवळावे. मग वरील पेस्ट घालून थोडे उकळून घ्यावे. दूध पूर्णपणे थंड झाल्यावर एका ग्लासमध्ये थंडगार थंडाईचा आस्वाद घ्यावा. वरून गुलाब पाकळ्या घातल्या तर लज्जत अजून वाढते.

चटपटे चणे 

साहित्य : एक वाटी काळे चणे (भिजवलेले), तिखट, मीठ, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला, तूप, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर.
कृती : भिजवलेले चणे कुकरमध्ये घालून त्यात ते बुडतील इतपत पाणी घालावे व पाच ते सहा शिट्ट्या कराव्यात. कुकर थंड झाला की एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घ्यावे. त्यात धने पूड, जिरे पूड, तिखट घालावे व थोडासा मसाला परतल्यावर त्यावर कुकरमधील चणे घालावेत. थोडे मिक्स केल्यानंतर त्यावर मीठ घालावे. हवा असल्यास १ टीस्पून चाट मसाला घालावा. वरून कोथिंबीर घालावी. थोडा वेळ पाणी सुकेपर्यंत परतावे. सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेला कांदा घालावा. हे चटपटे चणे खायला अतिशय छान लागतात.

साखरेच्या गाठी

साहित्य : एक कप साखर, एक तृतीयांश कप पाणी, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, वेगवेगळे सिलिकॉन मोल्ड किंवा समान आकाराच्या छोट्या वाट्या.
कृती : सर्वप्रथम सर्व साचांना/वाट्यांना तुपाने ग्रिसिंग करून घ्यावे. मग  
एका जाड बुडाच्या पातेल्यात एक कप साखर घेऊन त्यात एक तृतीयांश पाणी घालावे. आता या पाण्याचा गोळीबंद पाक तयार करायचा आहे, म्हणजेच तीनतारी पाक तयार करायचा आहे. थोडा पाक उकळला की त्यात अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालावा, म्हणजे पाकाला चांगला फेस येऊन गाठी पांढऱ्याशुभ्र होतात. पाच ते दहा मिनिटांनंतर ताटावर एक ड्रॉप घालून पाहा. तो थेंब खाली उतरला नाही म्हणजे पाक झाला असे समजावे. पाक झाल्यानंतर तो ताबडतोब ग्रीस केलेल्या सिलिकॉन मोल्डमध्ये किंवा वाट्यांमध्ये भराभर ओतावा, कारण या पाकाची साखर होण्याची प्रक्रिया खूप लवकर होते. तत्पूर्वी ग्रीस केल्यानंतर त्यावर एक हाराचा जाड दोरा ठेवावा आणि त्यावर पाक ओतावा. पाच दहा मिनिटांनंतर त्या पाकाची घट्ट साखर होईल आणि मग ते साचे डी-मोल्ड केल्यावर इन्स्टट गाठीचा हार तयार होईल.

चौरंगी भेळ

साहित्य : एक पायली मुरमुरे फरसाण, मोठा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भरड शेंगदाणे, बारीक शेव, तिखट, मीठ, साखर, चिंचपाणी, हिरवी चटणी, जाड गाठिया, पाणीपुरीच्या पुऱ्या, तीन उकडलेले बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली कैरी.
कृती : एका मोठ्या पातेल्यात मुरमुरे घेऊन त्यावर सर्वप्रथम कोरडे जिन्नस घालावेत व चांगले मिक्स करून घ्यावेत. सर्व्ह करण्याच्यावेळी त्यात उकडलेले बटाटे, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कैरी घालावी आणि ऐनवेळी बाऊलमध्ये चिंचेचे पाणी घालावे. ही भेळ अतिशय चटपटीत आणि आंबट गोड तिखट अशी होते.

थंडगार पान शॉट

साहित्य : तीन मोठी कपुरी पाने, ७-८ किसमिस, ४-५ अक्रोडचे तुकडे, ४ टेबलस्पून साखर, हिरवा फूड कलर, २ टेबलस्पून डेसिकेटेड नारळ, आईस क्यूब, १ पेला दूध, गुलकंद, कोणताही आइस्क्रीम, २ चमचे साखर.
कृती : सर्वप्रथम मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये दूध आणि गुलकंद सोडून सर्व साहित्याची पेस्ट करून घ्यावी. ही हिरवी पेस्ट झाल्यानंतर त्यात थंडगार एक ग्लास दूध ओता. एक टेबलस्पून गुलकंद आणि एक स्कूप कोणतेही आइस्क्रीम घालावे आणि पुन्हा मिक्सर फिरवून घ्यावा. अतिशय थंडगार होळी स्पेशल पान शॉट तयार आहे. काचेच्या ग्लासमध्ये किंवा पान शॉटच्या छोट्या ग्लासमध्ये थंड सर्व्ह करावे.

खमंग पुरणपोळी

साहित्य : एक मोठा उभा पेला चण्याची डाळ, अर्धा पेला गूळ, अर्धा पेला साखर, जायफळ पूड, वेलची पूड, सैलसर भिजवलेली कणीक.
कृती : चण्याची डाळ स्वच्छ धुवावी. एका कुकरमध्ये ती बुडेल इतपत पाणी घालावे. त्यात अर्धा टीस्पून हळद व एक टीस्पून तेल घालून पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. पाणी निथळून घ्यावे. या पाण्याची कटाची आमटी करता येते. एका पॅनमध्ये पुरण शिजवून घ्यावे. त्यात अर्धा पेला साखर व अर्धा पेला गूळ घालून अगदी कोरडे होईपर्यंत पुरण शिजवून घ्यावे. वरून जायफळ पूड व वेलची पूड घालावी. पुरणाचा गोळा होईल इतपत पुरण शिजवायचे आहे. 
पोळ्या करताना कणकेचा सैलसर भिजवलेला गोळा घ्यावा. त्याच आकाराचा पुरणाचा गोळा घ्यावा. वाटीसारखा आकार करून पुरणाचा गोळा त्यात भरावा व अगदी चांगले बंद करून तांदळाच्या पिठीवर  पोळी हलकेच लाटून घ्यावी. तव्यावर मंद आचेवर ही पोळी खरपूस भाजून घ्यावी व वरून तूप सोडावे. अर्धा गूळ आणि अर्धा साखर अशा प्रमाणामध्ये पुरणाची पोळी अतिशय खमंग होते.

चंद्रपुरी वडे

साहित्य : एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ साल काढलेली, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मटकी, १ टेबलस्पून मेथीदाणा, धने पूड, जिरे पूड, तिखट, मीठ ,कढीलिंब आणि तळण्यासाठी तेल.
कृती : सर्व डाळी चार ते पाच तास भिजवल्यानंतर एक टेबलस्पून पाणी घालून मिक्सरमधून थोड्याशा भरड दळून घ्याव्यात. मग त्या बॅटरमध्ये सर्व मसाले घालावेत. हातावर पाणी लावून वडे थापावेत आणि अगदी गरम तेलामध्ये खुसखुशीत होईपर्यंत तळावेत. या वड्यांबरोबर चिंचेची चटणी द्यावी किंवा भाताबरोबर खाण्यास खूप उत्कृष्ट लागतात.

कच्चा चिवडा 

साहित्य : चार मुठी पातळ पोहे (जेवढ्या व्यक्ती तेवढ्या मुठी घ्याव्यात), २ कांदे, १ टोमॅटो, ३ मिरच्या, तेल, कोथिंबीर, मीठ, साखर, शेंगदाणे, तिखट.
कृती : पातळ पोहे थोडेसे भाजून घ्यावेत. नंतर ते थंड झाल्यावर परातीत काढून घ्यावेत व त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, साखर, भाजलेले शेंगदाणे, खायचे तेल घालावे. वरून भरपूर कोथिंबीर घालून छान मिक्स करावे. हा खास वऱ्हाडी पद्धतीचा कच्चा चिवडा आहे.

संबंधित बातम्या