पौष्टिक हातग्याच्या चविष्ट रेसिपीज

नीलिमा गाडगीळ
सोमवार, 27 मे 2019

फूड पॉइंट
हातग्याच्या पानांत, फुलांत ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. याच्या फुलांची भाजी ही नेत्रविकार व शरीर स्वास्थ्यासाठी गुणकारी असते. तसेच कवठात ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास त्याची मदत होते. अशा अनेक अर्थांनी पौष्टिक असणाऱ्या फुले आणि फळांपासून तयार केलेल्या काही रेसिपीज... 

हातग्याच्या फुलांची भाजी 
शेवग्याप्रमाणे हातग्याचे झाड असते. फुले मोठी असतात. या फुलांची भाजी छान होते.
साहित्य : हातग्याची १०/१२ फुले, पाववाटी हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ (दीड-दोन तास भिजवलेली), ३-४ मिरच्यांचे लहान तुकडे करून किंवा आवडीप्रमाणे मिरची पावडर, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, जिरे, कोथिंबीर व ओले खोबरे.
कृती : फुले निवडून घ्यावीत (फुलाच्या टोकाला म्हणजे हिरव्या भागात, देठाच्या खाली पुंकेसर असते. किंचित त्रिकोण टोक असलेला बारीक तंतू असतो, तो काढून टाकणे). नंतर स्वच्छ धुऊन कोबीप्रमाणे चिरून घ्यावीत. कढईत तेल तापल्यावर मोहरी-जिरे घालून, तडतडल्यावर हिंग, हळद, मिरचीचे तुकडे घालून चिरलेली भाजी घालावी. थोडी हलवून लगेच डाळ घालावी. थोडी परतल्यावर खोलगट थाळा घेऊन त्यात पाणी घालून तो थाळा झाकून ठेवावा. दोन-तीन मिनिटे चांगली वाफ आणावी. झाकण ठेवण्यापूर्वी चवीप्रमाणे मीठ घालावे. नंतर झाकण काढून खोबरे कोथिंबीर पेरावी. साधारण १०/१२ फुलांची भाजी तीन-चार जणांना पुरते.

हातग्याच्या फुलांची कोशिंबीर 
साहित्य : हातग्याची ३-४ फुले, पाऊण वाटी दही, २ चमचे साखर, २ मिरच्या, मीठ, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कोथिंबीर, ओले खोबरे.
कृती : वरीलप्रमाणेच हातग्याची फुले निवडून, धुऊन, चिरून घ्यावीत. नंतर कुकरमध्ये वाफवून घ्यावीत. गार झाल्यावर त्यात दही घालावे. मीठ, साखर, खोबरे घालून सारखे करावे. वरून कोथिंबीर पेरावी व वरून खमंग फोडणी घालून झाकण ठेवावे. सर्व्ह करतानाच मिक्‍स करावे. आवडत असल्यास दोन चमचे दाण्याचे कूट घातले तरी चालेल.

हातग्याच्या फुलांची भजी 
साहित्य : हातग्याची ७-८ फुले, १ वाटी डाळीचे पीठ, तिखट, मीठ, ओवा, हळद, हिंग, तळण्यासाठी तेल.
कृती : हातग्याची फुले वरीलप्रमाणे निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून भज्याच्या पिठासारखे पीठ भिजवावे. या पिठात गरम तेलाचे मोहन घालावे. नंतर हळद, हिंग, ओवा घालून एकजीव करून एकेक फूल त्या पिठात चांगले बुडवून तळावे. तांबूस रंग येईपर्यंत मंद गॅसवर तळावे.

शेवग्याच्या फुलांचे सांबार 
साहित्य : एक वाटी शेवग्याची फुले, ४ वाट्या ताक, २ मोठे चमचे डाळीचे पीठ (बेसन), २ इंचाचा आल्याचा तुकडा, २ मिरच्या, कढीलिंब, मीठ, अंदाजे साखर, वेलदोड्याची पूड (आइस्क्रीमचा चमचा भरून), फोडणीसाठी २ चमचे तूप, जिरे, एक-दीड चमचा हिंग, कोथिंबीर इ.
कृती : शेवग्याची फुले स्वच्छ धुऊन निथळत ठेवावीत. एक मिनिटभर वाफवून घ्यावीत. एका पातेल्यात चार वाट्या ताक घेऊन दोन चमचे डाळीचे पीठ घालून चांगले एकजीव करावे. त्यात साखर, मीठ, वेलदोड्याची पूड, आले किसून घालावे व गॅसवर गरम करायला ठेवावे. वाफवलेली शेवग्याची फुले त्यात घालावीत. कोथिंबीर घालून उकळी येण्यापूर्वी गॅस बंद करावा. छोट्या कढईत तूप घालावे. गरम झाल्यावर त्यात जिरे घालावेत. जिऱ्याचा रंग बदलला, किंचित काळपट झाल्यावर गॅस बंद करावा. फोडणीत हिंग, कढीलिंब व मिरचीचे तुकडे घालून बारीक गॅसवर दोन-तीन सेकंदासाठी कढई थोडी वर धरावी, म्हणजे कढीलिंबाची पाने कुरकुरीत होतील. कढीही एकीकडे गरम करत ठेवावी व त्यावरही गरम फोडणी घालावी. न हलविता त्यावर झाकण ठेवावे. सर्व्ह करतानाच हलवावे. गौरीच्या जेवणाच्या दिवशी आवर्जून हे सांबर केले जाते. शेवग्याच्या फुलांमध्ये भरपूर कॅल्शिअम असते.

कवठाची आमटी 
साहित्य : पिकलेले कवठ फोडून आतील गर काढून घ्यावा. जेवढा गर असेल, त्याच्या दुप्पट गूळ घ्यावा. १ चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे जिरे, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व हळद.
कृती : कवठाचा गर, गूळ, तिखट, मीठ, चमचाभर जिरे घालून एकत्र करावे. नंतर मिक्‍सरमध्ये चांगले एकजीव होईस्तोवर फिरवावे. चटणीसारखा गोळा घेऊन त्यात दोन-तीन वाट्या पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यावे. तीन-चार मिनिटे गॅसवर चांगले उकळून घ्यावे. खाली उतरवून चिरलेली कोथिंबीर घालावी व वरून फोडणी घालावी. ही आमटी भाताबरोबर छान लागते. त्याहीपेक्षा सोलकढीसारखी पिताही येते.

फोडणीची भाकरी 
साहित्य : ज्वारी, बाजरीचे १-१ वाटी पीठ व फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद व १ वाटी गरम पाणी.
कृती : गरम पाण्यात दोन्ही पिठे एकत्र करून भिजवावीत. भाकरीसाठी थोडे पीठ वगळावे (भाकर थापण्यासाठी). भाकरी थापून तव्यावर व नंतर गॅसवर भाजून घ्यावी. भाकरी फुगली पाहिजे, म्हणजे वरचा पापुद्रा छान निघतो. पापुद्रा मधोमध फोडून त्या मोकळ्या जागेत, फोडणीत चवीप्रमाणे तिखट-मीठ घालून फोडणी ओतावी. नंतर खाण्यापूर्वी फोडणी पूर्ण भाकरीवर पसरावी. ही भाकरी गरम गरम छान लागते.

कवठाची चटणी
साहित्य : पिकलेले कवठ फोडून आतील गर काढून घ्यावा. जेवढा गर असेल, त्याच्या दुप्पट गूळ घ्यावा. १ चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे जिरे, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व हळद.
कृती : कवठाचा गर, गूळ, तिखट, मीठ, चमचाभर जिरे घालून एकत्र करावे. नंतर मिक्‍सरमध्ये चांगले एकजीव होईस्तोवर फिरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी घालावे. छान मऊसर एकजीव झाले, की बाऊलमध्ये काढून घ्यावे. वरून छान चरचरीत फोडणी घालावी. ही चटणी तीन-चार दिवस अगदी छान टिकते. फार दिवस टिकण्यासाठी ती तशी उरतच नाही. म्हणजे चविष्ट लागते, म्हणून लवकर संपते.

खरवसाच्या वड्या 
साहित्य : चार वाट्या चिकाचे दूध, ४ वाट्या साखर, पावकप दूध, १ चमचा वेलची पूड, १ चमचा जायफळ पूड, एक-दीड वाटी नारळाचा चव, ताटाला लावायला तूप.
कृती : चिकाच्या दुधात पाव कप दूध घालून चांगले ढवळून घ्यावे. पातेल्यात किंवा गजात ओतून त्यावर झाकण ठेवून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून गॅस बंद करावा. झाकण पडल्यावर कुकरमधील भांडे काढून ताटात पालथे ठेवावे. थोड्यावेळाने पातेले काढून घ्यावे. चिकाचा घट्ट गोळा तयार होतो. हा गोळा थोडा गार झाल्यावर किसणीवर किसून घ्यावा. खोबऱ्याप्रमाणे चांगला किसला जातो. हा किस व साखर एकत्र करून कढईत गॅसवर ठेवावे. साखर विरघळतेय असे वाटताच त्यात नारळाचा चव घालावा व हलवत राहावे. कडा सुटू लागल्या व कढईच्या कडांना पांढरा थर दिसायला लागला, की मिश्रणाचा गोळा होत येतो आणि हालवताना हाताला जरा हलकेसे वाटते. मिश्रणात वेलची पावडर व जायफळाची पूड घालून एकजीव करून घ्यावे. ताटाला तुपाचा हात लावावा. मिश्रण ताटात ओतून गरम असताना शक्‍य झाल्यास हाताने किंवा वाटीने थापावे. पाच मिनिटांत वड्या कापून ठेवाव्यात. ताटातून लगेच काढू नयेत. गार झाल्यावर काढाव्यात. वड्या थापताना त्यावर बदाम, पिस्ते तुकडे करून घालावेत. या वड्या अतिशय छान होतात आणि खूप दिवस टिकतात. रंगीत हव्या असल्यास सात-आठ केशराच्या काड्या दुधात भिजत घालून नारळाचा चव घातल्यावर मिश्रणात घालाव्यात.

खोबरे, लसूण, तिळाची चटणी 
साहित्य : आठ-दहा लसूण पाकळ्या (लहान तुकडे करून), पाव वाटीपेक्षा कमी खोबऱ्याचा किस, २-३ चमचे तीळ, १ चमचा किंवा चवीप्रमाणे तिखट व अंदाजे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडे कमी मीठ. फोडणीसाठी तेल, मोहरी आणि १ चमचा जिरे. 
कृती : कढईत तीन-चार चमचे तेल घालावे (वरील साहित्याच्या अंदाजाने तेल घ्यावे), तेल गरम झाल्यावर प्रथम फोडणीत लसूण तळून घ्यावा. तांबूस रंगाचा कुरकुरीत झाला, की बाजूला काढून ठेवावा. नंतर जिरे-मोहरी घालून फोडणी करावी. त्यात तीळ व खोबऱ्याचा किस घालून तीळ तडतडायला लागल्यावर त्यात तिखट, मीठ घालून चांगले हलवावे. मंद गॅसवरच करावे. नाहीतर ही फोडणी पटकन जळते. मिश्रण बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यात तळून ठेवलेला लसूण घालावा व चमच्याने एकजीव करावे. नेहमीच्याच चटण्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा ही चटणी छान लागते. ज्वारी, बाजरी, मका कुठल्याही भाकरी किंवा पोळीबरोबरही छान लागेल. पराठे, थालीपीठ याबरोबरही खाता येते.

चिंचेचे सरबत
साहित्य : अर्धी वाटी नवीन निघालेली लालसर चिंच (नेहमीची आमटीची), चिंचेएवढाच गूळ, सैंधव मीठ, जिरेपूड.
कृती : चिंचोके काढून चिंच दोन वेळा स्वच्छ धुऊन थोड्या कोमट पाण्यात भिजत घालावी. अर्धातास भिजल्यावर त्यात तेवढाच गूळ घालून मिक्‍सरमधून फिरवावी. मधून मधून थोडे पाणी घालावे. नंतर हे मिश्रण पातेल्यात काढून घ्यावे. साधारण एक मोठा ग्लास पाणी घालावे. सारखे ढवळून घ्यावे किंवा मिक्‍सरच्या भांड्यात थोडे फिरवून घ्यावे. नंतर गाळणीने पातेल्यात गाळून घ्यावे. त्यात सैंधव मीठ पाव चमचा घालावे. थोडी जिरेपूड (चिमूटभर) घालावी. जास्त आंबट वाटल्यास थोडा गूळ घालून एकजीव करावे. चवीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी-जास्त करावे. ग्लासमध्ये ओतून सर्व्ह करावे. उन्हाळ्यात सुरुवातीला हे जास्त चांगले.

संबंधित बातम्या