पौष्टिक दुधी भोपळा

निर्मला देशपांडे
सोमवार, 6 जून 2022

फूड पॉइंट

दुधी भोपळ्याची भाजी 
साहित्य : पाव किलो दुधी भोपळा, चमचाभर लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ व गूळ, २ चमचे शेंगदाण्याचे कूट, २-३ चमचे टोमॅटो सॉस, ३ चमचे तेल, मोहरी, हिंग,हळद कढीपत्ता, कोथिंबीर
कृती : दुधी स्वच्छ धुवून घ्यावा. त्याची साल किसावी व फोडी करून पातेल्यात तेल घालावे. मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. गॅस मंद ठेवावा. हळद, कढीपत्ता घालावा. तिखट मसाला घालून एक मिनिट परतावे व लगेच दुधीच्या फोडी टाकाव्यात व हलवावे. गरम पाणी घालून झाकण घालावे, झाकणात पाणी घालावे. म्हणजे भाजीला आणखी पाणी हवे असल्यास हे गरम पाणी वापरता येते. १० ते १५ मिनिटे भाजी शिजवावी, भाजी शिजत आल्यावर मीठ, गूळ, दाण्याचे कूट व सॉस घालून हलवावे. भाजी पूर्ण शिजल्यावर गॅसवरून खाली उतरवावी व त्यावर कोथिंबीर भुरभुरावी.

दुधीचे ठेपले

साहित्य : अर्धा किलो दुधी, चार ते पाच लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा, दुधीच्या किसा इतकी कणीक, दोन चमचे बेसन, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चमचाभर गरम मसाला, दोन चमचे गरम तेल, थोडासा ओवा, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, एक टेबलस्पून दही, तेल. 
कृती: दुधीची साल किसून कीस बाजूला ठेवावा. मग दुधी बारीक किसून कीस मोजून घ्यावा. मिक्सरवर लसूण, हिरव्या मिरच्या, आले व थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करावी. परातीत दुधीच्या किसाइतकी कणीक घ्यावी, त्यात बेसन, तिखट, गरम मसाला, हळद,ओवा, कसुरी मेथी, दोन चमचे गरम तेल, चमचाभर पांढरे तीळ, कोथिंबीर व दुधीचा कीस, तयार पेस्ट व दही घालून एकत्र करावे. आवश्‍यक तरच थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. तेलाच्या हाताने मळावे व १० मिनिटे झाकून ठेवावे. १० मिनिटानंतर पुन्हा थोडा तेलाचा हात घेऊन मळावे. सैल वाटल्यास थोडी कणीक घालावी. मग त्याचे छोटे गोळे करून मध्यमसर  लाटावेत, तापल्या तव्यावर तेल लावून दोन्ही बाजुने खमंग भाजावेत. गरमागरम ठेपले कुठल्याही उसळी बरोबर घ्यावेत.

किसाची चटणी 

साहित्य : दुधीच्या सालाचा कीस, तेल मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता. थोडेसे पांढरे तीळ, दाण्याचे कूट, मीठ, साखर हिरवी मिरची 
कृती : एक वाटी दुधीच्या सालाचा कीस, कढईत एक चमचा तेल मोहरी, हिंग हळद घालावी व फोडणी करावी. कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत, मंद गॅसवर त्यात तीळ घालून परतावे, कीस घालून खमंग परतावे, मीठ साखर घालून थोडे परतून दोन मिनिटात चटणी काढून सटामध्ये भरावी.

दुधीचे मुटके

साहित्य : पाव किलो दुधी, ८- १० लसूण पाकळ्या चिमुटभर ओवा व जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, चमचाभर धने पूड चमचाभर पांढरे तीळ, तेल, फोडणीचे साहित्य, चवीपुरती साखर, आल्याचा छोटा तुकडा. 
कृती  : दुधीची साल काढून दुधी किसून घ्यावा.  लसूण, ओवा, जिरे, हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा या सगळ्याचे मिक्सरवर जाडसर वाटण करून घ्यावे. ज्वारीच्या पिठात दुधीचा कीस, तिखट, मीठ, हळद, वाटण, एक चमचा धनेपूड एक चमचा तीळ, दोन चमचे गरम तेल, चिमुटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळे एकत्र करावे, पीठ सैल वाटल्यास थोडे ज्वारीचे पीठ घालून पीठ तयार करावे. पाणी अजिबात घालू नये. तयार पिठाचा मुटके अगर रोल करून मोदकपात्रात वाफवून घ्यावेत. पंधरा मिनिटे उकडावेत. मग काढून ठेवावेत कढईत दोन टेबल स्पून तेल घालावे. त्यात मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी, कढीपत्ता घालावा, तीळ घालावेत, मुटके घालून मंद गॅसवर दोन मिनिटे हलके परतावे. रोल केले असल्यास सुरीने तुकडे करावेत. तुकडे करताना रोल थंड असावा. तुकडे फोडणीत टाकून दोन मिनिटे मंद गॅसवर हलके परतावे. ओलं खोबर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नाश्‍त्याला अगर जेवणात सर्व्ह करावेत.

कढीतली दुधीची भाजी
साहित्य : पाव किलो दुधी, पाव लिटर ताक, आल्याचा कीस, छोटा चमचा, एक मोठा डाव बेसन पीठ, २ ते ३ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसूणाच्या पाकळ्या, मीठ, साखर, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, डावभर दाण्याचे कूट 
कृती :  दुधीची साल काढावी वे तो बारीक चिरून घ्यावा. थोड्या ताकात बेसन मिसळून घ्यावे. गुठळी होऊ देऊ नये. दुधी मऊसर उकडून घ्यावा. ताक बेसनाचे मिश्रण सगळ्या ताकात ओतून हलवून घ्यावे. दोन ते तीन मिरच्या, लसूण, आले, मीठ एकत्र वाटून बारीक पेस्ट करावी. उकडलेला भोपळा डावाने हाटून घ्यावा. दाण्याचे कूट घालून परत थोडा हाटावा. पातेल्यात दोन चमचे तेल अगर तूप घालावे. तापल्यावर गॅस मंद करावा व त्यात मोहरी, जिरे, हिंग व भरपूर कढीपत्ता घालून फोडणी करावी. तिच्यात बारीक केलेली पेस्ट, चिमुटभर हळद घालावी. तयार ताक घालून सतत डावाने ढवळावे म्हणजे ताक फुटत नाही. भोपळा घालावा. चवीप्रमाणे साखर व आवश्यक तर थोडे मीठ घालावे, ही कढी उकळून घ्यावी, ही कढी थोडी पातळसर असते.

दुधी भोपळ्याची केरळी चटणी

साहित्य : दुधीचा कीस, सालसुद्धा दोन वाट्या, वाटीभर ओल्या खोबऱ्याचा कीस, तीन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, दोन चमचे दही, कढीपत्ता १०/१२ पाने, चमचाभर जिरे, एक चमचा उडीद डाळ, चिमुटभर चणाडाळ, फोडणीसाठी थोडे तेल, चिमुटभर साखर. 
कृती : कढईत दोन चमचे तेलावर दुधीचा कीस परतून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात खोबऱ्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, दही कढीपत्ता चिरून घालावे व मिक्सरवर बारीक चटणी वाटावी. कढल्यात दोन चमचे तेल गरम करावेत, त्यात जिरे, हिंग, उडीदडाळ व चणाडाळ घालून खमंग फोडणी करावी. चटणीत चिमुट साखर घालून हलवावे. वरून फोडणी घालून चटणी सर्व्ह करावी.

दालच्या
साहित्य : पाव किलो दुधी, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, चार ते पाच लसूण पाकळ्या, एक टोमॅटो, मीठ, दोन चमचे चिंचेचा कोळ, दोन, आवळे, छोटा चमचा कसुरी मेथी, चिमुटभर मेथी दाणे, तेल डावभर, मोहरी, जिरे, हिंग, गरम मसाला, चणा व मसूर डाळ अर्धा वाटी.
कृती : दुधीच्या सालासह मोठ्या फोडी कराव्यात. टोमॅटो चिरून घ्यावा दोन्ही एकत्र करावे. त्यात आवळे, मेथीदाणे, चणा डाळ मसूर डाळ (दोन्ही डाळी धुवून घ्याव्यात) घालाव्यात. थोडं तेल, हळद घालावी. पाणी घालावे व झाकण ठेवून शिजत ठेवावे. साधारण १५ ते२० मिनिटात भाजी शिजते. आले- लसूण वाटून घ्यावे. शिजलेल्या भाजीतले पाणी काढून ठेवावे व भाजी डावाने हाटावी. आवळ्यातले बी काढून टाकुन तोही भाजीत घालून हाटावा. मग त्यात चिंचेचा कोळ, चवीप्रमाणे गूळ, मीठ घालून सगळे एकत्र करून ठेवावे. कढईत डावभर तेल घालावे. मोहरी, जिरे, हिंग, कसुरी मेथी, दालचिनी तुकडा, एक तमालपत्र, कढीपत्ता, आले-लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर, चमचाभर गोडा मसाला, आवश्यक तर मीठ घालून मंद गॅसवर एक मिनिट परतावे. त्यात भाजी घालावी. भाजी उकडलेले पाणी घालून उकळावे. थोडी कोथिंबीर घालून तयार गरम भात अगर पोळी भाकरीबरोबर हा चवदार दालच्या द्यावा, बरोबर भाजलेला उडीद पापड द्यावा.

दुधीचे धिरडे

साहित्य : अर्धा किलो दुधी सालासुद्धा किसून, आले तुकडा, ५ व ६ हिरव्या मिरच्या, वाटीभर लसूण पात व थोडी कोथिंबीर वाटून, चवीप्रमाणे मीठ, आवश्यकतेनुसार थोडा रवा, दोन ते तीन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, थोडे लाल तिखट, अर्धा चमचा छोटा खाण्याचा सोडा, दोन चमचे गरम तेल 
कृती : सगळं साहित्य एकत्र करावेे, त्यात दोन चमचे गरम तेल घालून मिक्स करावे, सोडा घालावा. पाणी घालून मिश्रण सरसरीत भिजवावे. लापल्या तव्यावर तेल लावून धिरडी घालावीत.

संबंधित बातम्या