गावाकडची चव

निर्मला देशपांडे
सोमवार, 6 डिसेंबर 2021

फूड पॉइंट

रोजच्या स्वयंपाकात चवबदल म्हणून करता येतील अशा काही पदार्थांच्या पाककृती...

मायाळूची भाजी

साहित्य : अर्धी वाटी मूग डाळ, वाडगाभर मायाळूची पाने, ४ चमचे तेल, ४-५ लसूण पाकळ्या ठेचून, मोहरी, हळद, मीठ, ४-५ हिरव्या मिरच्या.
कृती : मूग डाळीत गरम पाणी घालून शिजत ठेवावी. त्यात चिमुटभर हळद घालावी. मायाळूची पाने स्वच्छ धुऊन, तोडून डाळीत घालावीत. चांगली शिजल्यावर भाजी डावाने हटावी. कढईत तेल, मोहरी, लसूण, मिरचीचे तुकडे घालून परतावे. त्यात भाजी घालावी. मीठ घालावे. आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवावे. ही भाजी फार पातळ नसते.

भरली उकड वांगी

साहित्य : आठ-दहा ताजी, मध्यम आकाराची वांगी, १०-१२ लसूण पाकळ्या, चमचाभर भरड जिरे पूड, कोथिंबीर, २ वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, २ चमचे भाजलेल्या तिळाची पूड, ४ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, १ मोठा चमचा गोडा मसाला, १ चमचा तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ, चवीपुरता गूळ.
कृती ः वांग्याला काटे असतील तर काढून घ्यावेत. मग त्याला चार चिरा देऊन ती मिठाच्या पाण्यात टाकावीत. जिरे पूड, लसूण व वाटीभर कोथिंबीर एकत्र वाटून घ्यावी. दाण्याचे कूट, तिळकूट, तिखट, मसाला, कुटलेला खोबरे कीस, मीठ, वाटलेला मसाला, चिरलेला गूळ सगळे एकत्र करून कालवावे. त्यात चमचाभर तेल घालावे आणि एकत्र करावे. वांगी पाण्यातून काढून निथळून घ्यावीत. त्यात तयार मसाला घट्ट दाबून भरावा. मोदकपात्राच्या चाळणीला तेलाचा हात पुसून त्यात भरली वांगी ठेवावीत. झाकण घट्ट लावून १५-२० मिनिटे वाफवून घ्यावीत. (मोदकपात्र नसल्यास मोठ्या पातेल्यात २ तांबे पाणी घालून त्यात वांग्याची चाळणी ठेवावी व १५-२० मिनिटे उकडावी, झाकण घट्ट लावावे.) वांगी चांगली वाफवल्यावर चाळणी खाली काढावी. कढईत अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात थोडा मसाला, लाल तिखट घालून परतावे. वांगी भरून उरलेला मसालाही घालावा व परतावे. मग त्यात तयार वांगी घालावीत. गॅस मध्यम ते मंद असावा. एकदोन वेळा हलकेच  वांगी हलवावीत. पाणी अजिबात घालू नये. खाली उतरवून गरम भाकरीबरोबर भाजी वाढावी. 
टीप ः फक्त तेलावर केल्याने ही भाजी २-३ दिवस टिकते.

शेवग्याच्या पानांची भाजी 

साहित्य : एक जुडी शेवग्याची ताजी व कोवळी पाने, ४ हिरव्या मिरच्या, १ मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा, वाटीभर ओले खोबरे, ४-५ लसूण पाकळ्या चिरून, अर्धी वाटी ३ तास भिजवलेली तूर डाळ, मीठ, चवीनुसार साखर, अर्धा डाव तेल.
कृती : भाजीकरता शेवग्याची फक्त पाने घ्यावीत. काड्या अजिबात नकोत. पाने २-३ वेळा स्वच्छ धुऊन घ्यावीत. फक्त पाने काढून पाणी निथळून घ्यावे. पिळून पाणी काढून टाकावे. अगदी घट्ट धरून पाने खूप बारीक चिरून घ्यावीत. लोखंडी खोल तवा अगर कढई तापवावी. त्यात अर्था डाव तेल घालावे. त्यात कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे व भिजलेली तूर डाळ घालून परतावे. आच मंद असावी. कढईवर झाकण ठेवावे व त्यात पाणी घालावे. पाच मिनिटांनी उघडून त्यात भाजी घालावी व परतावी. चवीनुसार मीठ व साखर घालावी. मग परत झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजू द्यावे मग हलवावे. पुन्हा झाकण ठेवून ५-७ मिनिटे भाजी शिजवावी. नंतर त्यात ओले खोबरे घालून भाजी वाढावी. या भाजीला शिजायला वेळ लागतो. पण चवीला खूप छान लागते.

मुगाचे मेदगे

साहित्य : एक वाटी मूग, ५-६ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, हिंग, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आल्याचा तुकडा. 
कृती : मूग कोरडेच भाजून घ्यावेत. धुऊन जास्त पाण्यात शिजत ठेवावेत व मऊसर शिजवून घ्यावेत. लसूण, आले, मिरच्या, चिमुटभर मीठ एकत्र कुटून घ्यावे. शिजलेले मूग डावाने हाटून घ्यावेत. कढईत २ मोठे चमचे तेल घालावे. मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. त्यात कुटलेला मसाला घालून थोडे परतावे. गॅस मंद ठेवावा. मग हाटलेले मूग घालून परतावे. त्यातले उरलेले पाणी घालावे. थोडे मीठ घालावे व आवश्यक वाटल्यास गरम पाणीही घालावे. हे मेदगे सरसरीतच असते. कोथिंबीर घालून हे पौष्टिक गमागरम मेदगे खायला द्यावे. 

हुलग्याचे माडगे
साहित्य : एक वाटी भाजून दळलेल्या हुलग्यांचे पीठ, चमचाभर तांदूळ, २-३ चमचे गूळ, चवीप्रमाणे मीठ, चिमुटभर सुंठ पूड.
कृती : एक तांब्याभर पाणी उकळत ठेवावे. त्यात तांदूळ घालावेत. गूळ, सुंठ पूड घालावी. चवीपुरते मीठ घालावे व हलवावे. आच मंद करून उकळत्या पाण्यात पीठ हलवत हलवत थोडे थोडे पीठ घालावे व शिजवून घ्यावे. गरमगरम खायला द्यावे.

बाजरीचे वडे
साहित्य : एक ग्लास बाजरीचे पीठ, अर्धा ग्लास मेथीची पाने, पाव कप दही, हिंग, मिरच्या, १ चमचा लसूण ठेचा, चवीप्रमाणे मीठ, चमचाभर तीळ, हळद, २ चमचे साखर, तळण्यासाठी तेल.
कृती : बाजरीच्या पिठात दोन चमचे गरम तेल व इतर सर्व मसाला घालावा. ते एकत्र कालवून थंड पाण्याने पीठ भिजवावे. केळीच्या पानावर वडे थापून तेलात खमंग तळावेत.

चिघळाची भाजी (राजभाजी) 

साहित्य : चार वाट्या चिघळाची भाजी, १ मध्यम चिरलेला कांदा, ५-६ लसूण पाकळ्या, सुक्या खोबऱ्याचा तुकडा, कोथिंबीर, चमचाभर जिरे, आल्याचा छोटा तुकडा, मीठ, ५-६ हिरव्या मिरच्या, तेल, मोहरी, हिंग. 
कृती : भाजी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. हिरव्या
मिरच्या, कांदा, लसूण, आले, कोथिंबीर, थोडे मीठ घालून वाटून घ्यावे. कढई ४-५ चमचे तेल घालावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून खमंग फोडणी करावी. मग त्यात वाटण घालून मिनिटभर परतावे. नंतर त्यात चिरलेली भाजी 
घालून मंद आचेवर हलवावे. आवश्यक तेवढे मीठ घालावे. झाकण ठेवून भाजी वाफवावी. गरम भाकरीबरोबर गरम भाजी द्यावी. 

रोडगे
साहित्य : दोन वाट्या डाळ्याचे पीठ, १ मध्यम कांदा बारीक चिरून, ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरून, कोथिंबीर, १ चमचा धने-जिरे पूड, तीळ, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल, २ वाट्या कणीक, तेल, मीठ, लाल तिखट.
कृती : पंढरपुरी डाळ्याचे पीठ, लसूण, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, धने-जिरे पूड, भाजलेले तीळ व २ चमचे तेल हे जिन्नस एकत्र करून मसाला तयार करावा. कणकेत तेल, मीठ घालून थंड पाण्याने ती भिजवावी व १०-१५ मिनिटे झाकून ठेवावी. नंतर तेलाचा हात लावून चांगली मळून घ्यावी. कणकेचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करावी. मसाल्याचा छोटा गोळा घ्यावा व त्याचा लाडू वाटीत ठेवावा व  कचोरी करावी चुलीतल्या निखाऱ्यावर भाजावी. गॅसवर भाजायचे असेल तर जरा जाडसर लाटून पाण्याचा हात लावून तव्यावर भाजावी व वरणाबरोबर गरमागरम रोडगा वाढावा.
साधे वरण : अर्धी वाटी मूग व तूर डाळ शिजवावी. त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे. तेल, हिंग, मोहरीची खमंग फोडणी द्यावी व रोडग्याबरोबर हे वरण द्यावे.

संबंधित बातम्या