मकरसंक्रात स्पेशल...

निर्मला देशपांडे
सोमवार, 10 जानेवारी 2022

फूड पॉइंट

खसखस तीळ लाडू

साहित्य ः वाटीभर भाजलेले तीळ, प्रत्येकी २ चमचे पिस्ता, बदाम व अक्रोड काप, १०-१५ काजू, अर्धी वाटी खसखस भाजून, १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून, ४ चमचे खारीक पूड, ४ चमचे फुलवलेला डिंक, सुके अंजीर तुकडे, १ वाटी मूग डाळीचे पीठ भाजून (तुपावर भाजावे), थोडेसे बेदाणे, चमचाभर गुलकंद, अर्धी वाटी चिरलेला गूळ, साजूक तूप. 
कृती : सुकामेवा, मूग डाळीचे पीठ सोडून इतर साहित्य मिक्सरवर थोडे बारीक करून घ्यावे व बाऊलमध्ये एकत्र करावे. सुकामेवा हलके भाजून घ्यावा व त्यात घालावा. मग त्यात खारीक पूड, डिंक, सुक्या अंजिराचे छोटे तुकडे, मूग डाळीचे पीठ, भाजलेली खसखस पूड घालून चांगले एकत्र करावे. गुलकंद घालावा, बेदाणे घालावेत व सगळे छान मिसळून घ्यावे. कढईत दोन चमचे साजूक तूप घालावे. त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा. गॅस मंद ठेवावा. गूळ वितळला की कढई खाली उतरवावी. त्यात तयार साहित्य घालून हलवावे. चांगले मिक्स करून लाडू वळावेत. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे पातळ केलेले तूप घालावे.

पाटीशॉप्ता
साहित्य : एक मोठी वाटी मैदा, तेवढीच तांदळाची पिठी, वाटीभर गूळ, ४ चमचे साखर.
सारणासाठी : चमचाभर तूप, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, ३ टेबलस्पून भाजलेल्या तिळाची पूड, २ चमचे वेलची पूड, कंडेन्स्ड  मिल्क.
कृती : कढईत २ वाट्या पाणी उकळावे, त्यात गूळ व साखर घालावी. ते विरघळल्यावर त्या गरम पाण्यात मैदा व पिठी घालून हलवावे, गुठळी होऊ देऊ नये. धिरड्याच्या पिठाप्रमाणे सरसरीत पीठ भिजवावे. आवश्यकतेनुसार थंड पाणी घालावे. नंतर दुसऱ्या कढईत चमचाभर तूप घालून त्यावर ओले खोबरे परतावे. त्यात चिरलेला गूळ, तिळाची पूड घालावी व हलवून सारण तयार करावे. गॅस कायम मंद ते मध्यम ठेवावा. दोन मिनिटे परतून सारण खाली उतरवावे. निर्लेप तव्यावर थोडे तूप घालून सगळीकडे पसरावे. त्यावर तयार पिठाचे धिरडे घालावे. झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ आणावी. तयार धिरड्यावर २ चमचे सारण घालून अलगद घडी घालावी. हे धिरडे उलटू नये. 
टीप : बंगालमध्ये संक्रांतीकरिता हा पाटीशॉप्ता करतात.

भोगीची मिसळीची भाजी
साहित्य : प्रत्येकी २ वाटी गाजर, वांगी, पावट्याचे दाणे, सोलाणे (हरभऱ्याचे सोललेले दाणे), घेवड्याच्या शेंगा, शेंगदाणे, रताळी, निवडलेल्या वालपापडीच्या शेंगा वगैरे भाज्या, २ चमचे तिळाची पूड, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, ३ चमचे शेंगदाणा कूट, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा धने जिरे पूड, कढीपत्ता, कोथिंबीर, अर्धी वाटी तेल, हिंग, मोहरी, हळद, चवीप्रमाणे गूळ.
कृती : सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. गाजर, वांगी, रताळी चिरून मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. मोठ्या पातेल्यात अगर कढईत अर्धी वाटी तेल घालावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. त्यात प्रथम मंद गॅसवर पावट्याचे दाणे, सोलाणे, शेंगदाणे वगैरे घालून परतावे. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवून वाफ आणावी. दोन मिनिटांनी झाकण काढून त्यात दोन-तीन चमचे लाल तिखट, गोडा मसाला, धने जिरे पूड घालून परतावे व लगेच भाजीच्या फोडी घालून हलवावे. दोन-तीन वाट्या गरम पाणी घालून, झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी हलवावी आणि शिजत ठेवावी. भाजी शिजत आल्यावर तिळाची पूड, दाण्याचे कूट, मीठ घालावे. खोबरा कीस भाजून कुठून घालावा. चवीप्रमाणे गूळ घालावा. भाजीला रस हवा असेल त्या प्रमाणात गरम पाणी घालावे. तयार भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. 
(येथे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात पाच-सहा जणांना पुरेल एवढी भाजी होते.)

तिळगुळाचे लाडू
साहित्य : अर्धा किलो तीळ खमंग भाजून, प्रत्येकी पाऊण वाटी पंढरपुरी डाळ, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, वाटीभर दूध, अर्धा किलो गूळ किसून, वेलची. 
कृती : कढईत कपभर दूध व चमचाभर तूप घालावे. मंद गॅसवर ते तापल्यावर त्यात चिरलेला गूळ घालून हलवावे व एकतारी पाक करावा. त्यात तीळ, डाळ, खोबऱ्याचे काप, वेलची पूड घालून दोन मिनिटे हलवून मिश्रण खाली उतरवावे. त्याचे लाडू वळावेत. मिश्रण घट्ट झाले तर थोडे कढत करून पटापट लाडू वळावेत. एवढ्या साहित्यात छोटे छोटे ४५ ते ५० लाडू होतील.

तिळगुळाचे मऊ लाडू

साहित्य : दोन वाट्या तीळ खमंग भाजून, २ वाट्या गूळ चिरून, अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट, ४ चमचे खोबरा कीस थोडासा भाजून, चमचाभर तूप, वेलची पूड.
कृती : मिक्सरवर तिळाचे कूट करावे. मिक्सरच्या भांड्याला थोडा तुपाचा हात पुसावा. त्यात चिरलेला गूळ व तिळाचे कूट घालून फिरवावे आणि थाळ्यात काढून घ्यावे. मग त्यात दाण्याचे कूट, खोबरे, वेलची पूड घालून चांगले मिसळावे व लाडू वळावेत. 

गुळाची पोळी

साहित्य : तीन वाट्या बारीक चिरलेला गूळ (खडा राहू देऊ नये), अर्धी वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी बेसन, चमचाभर वेलची पूड, तूप 
पारीसाठी : दोन वाट्या कणीक, १ वाटी मैदा, २ टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे पीठ), २ टेबलस्पून तांदळाची पिठी, ४ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, १ चमचा मीठ, तूप. 
कृती : कणीक, मैदा, डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ व मीठ एकत्र करावे. त्यावर गरम तेलाचे मोहन घालावे. थंड पाण्याने पीठ थोडे घट्टसर भिजवावे. तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. तीळ, खसखस, खोबरा कीस हलके भाजून घेऊन त्याची पूड करावी. त्यात वेलची पूड घालावी व हे मिश्रण गुळात घालून मळावे. पोळ्या करण्यापूर्वी थोडे अगोदर बेसन थोड्या तुपावर भाजून घ्यावे. हे पीठ गरम असतानाच त्यात तयार गूळ घालून मळावे. चिंचोक्याएवढा चुना गुळात घालावा म्हणजे पोळी फुटत नाही. नंतर कणकेच्या दोन पुऱ्या लाटाव्यात. गुळाची लिंबाएवढी चपटी गोळी करावी व एका पुरीवर ठेवावी. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा बंद कराव्यात. नंतर तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. लाटताना गूळ शेवटपर्यंत जाईल असे लाटावे. लाटताना पोळी एक दोनदा उलटून लाटावी. सपाट तव्याला थोडा तेलाचा हात फिरवावा व कपड्याने पुसून घ्यावे. तापल्या तव्यावर मध्यम आच ठेवून पोळी खमंग भाजावी. गुळाची पोळी गारच चांगली लागते, त्यामुळे या पोळ्या आधी करून ठेवू शकता. भरपूर तूप घालून गुळाची पोळी सर्व्ह करावी.
 (येथे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात  दहा-बारा  पोळ्या  होतील.)

तिळाची रेवडी
साहित्य : पाव किलो तीळ, ३०० ग्रॅम गूळ, अर्धा चमचा तूप, चिमूट खाण्याचा सोडा.
कृती : तीळ खमंग भाजावेत. ताटात काढून ठेवावेत. गूळ कढईत घालावा व २ चमचे पाणी घालावे. गॅस मंद ठेवावा व हलवावे. पाक झाल्यावर चाळणीतून गाळून घ्यावा. परत कढईत घालावा. त्यात तूप घालावे. मंद गॅसवर ३-४ मिनिटे परतावे. गोळीबंद पाक करावा. रंग बदलेल व पाक फुगून येईल. त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. दोन टप्प्यात तीळ घालावेत. तूप लावलेल्या पालथ्या ताटावर मिश्रण घालून पसरावे. तूप लावून लाटावे. लाटताना उरलेले तीळ घालावेत. मिश्रण खूप गरम असेल, पण त्याचेच छोटे गोळे हातावर घेऊन चपटे करावेत. थंड झाल्यावर या रेवड्या छान कडकडीत होतात.

तीळ वडी 

साहित्य : दोन मोठ्या वाट्या तीळ (मंद गॅसवर २-३ मिनिटे खमंग भाजलेला), २ वाट्या गूळ चिरून, चमचाभर तूप. 
कृती : गूळ कढईत घालावा. थोडे पाणी घालावे. पक्का पाक करावा. त्यात चमचाभर तूप घालावे. पाण्यात एक थेंब पाकाचा टाकून गोळीबंद पाक झाला का बघावे. त्यात तीळ घालावेत. गॅस बंद करून हलवावे. ताट पालथे घालून त्याला तूप लावून सगळीकडे पसरावे. त्यावर मिश्रण घालून लाटावे. सुरीने वड्या कापाव्यात आणि अर्ध्या तासाने काढाव्यात.

संबंधित बातम्या