तहान लाडू-भूक लाडू

निर्मला सु. देशपांडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष फूड पॉइंट
भटकायला बाहेर पडले, की पोटाला जपणेही फार महत्त्वाचे असते. जिथे स्वच्छ, गरम जेवण व शुद्ध पाणी मिळेल तिथे पोटपूजा करणे योग्य. अन्यथा आपल्या घरून नेलेले पौष्टिक, टिकाऊ पदार्थ खाणे बरे. म्हणून भूक लाडू-तहान लाडवांच्या पाककृती...

मेथी पालकाचा पराठा
साहित्य : तीन कप कणीक, अर्धा कप बेसन, एक कप प्रत्येकी मेथीची व पालकाची पाने, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा आल्याचा कीस, धने जिरेपूड १ चमचा, दोन चमचे दही, मीठ, गरम मसाला पूड पाव चमचा, तीळ १ चमचा, हळद आणि तेल व लाल तिखट.
कृती : मिरच्या व आले वाटून घ्यावे. मेथी अगदी बारीक चिरावी. पालक २ मिनिटे गरम पाण्यात टाकून लगेच काढून थंड पाण्यात ठेवावा व निथळून त्याची मिक्‍सरवर पेस्ट करावी. मग कणीक व बेसन एकत्र करून त्यावर गरम तेलाचे २ चमचे मोहन घालावे व कुस्करून घ्यावे. त्यात पालकाची पेस्ट, मेथी व इतर सर्व साहित्य घालावे व चांगले मिसळून घ्यावे. आवश्‍यक वाटले तर थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे व पराठे लाटून दोन्ही बाजूंनी तेल सोडून खमंग भाजावेत.

तैर साधमं (दहीभात)
साहित्य : ताजा शिजवलेला भात, दूध, मीठ, चवीपुरती साखर, अर्धा चमचा जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, फोडणीकरता साजूक तूप, हिंग, कोथिंबीर दही.
कृती : भात मोकळा करून गार करावा. शिजवतानाच 
त्यात थोडा आल्याचा कीस घालावा. गार भातावर दही, थंड दूध, मीठ, साखर, मिरचीचे तुकडे घालून कालवावे. कढल्यात तूप घालून जिरे, हिंग घालून खमंग फोडणी 
करावी. कढीपत्ता घालावा व ही फोडणी थंड झाल्यावर भातावर घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व भात स्टीलच्या डब्यात भरून घ्यावा. देताना घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालू शकता.

लावलेले पोहे (कर्नाटक)
साहित्य : पातळ पोहे, लाल तिखट, मीठ, पिठी साखर, फोडणीकरता मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, चार चमचे मेतकुट, भाजके दाणे.
कृती : कढई चांगली तापवून मंद गॅसवर तिच्यात पोहे घालून कुरकुरीत भाजावेत. भाजताना थोडे थोडे पोहे घालून भाजावेत व लगेच परातीत काढावेत. कढईत रिफाईंड तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. भाजके दाणे पांढरे करून घालावे व परतावे. मीठ, तिखट घालून हलवावे. त्यावर पोहे, चवीपुरती पिठीसाखर व अंदाजे ४-५ चमचे मेतकुट घालावे व पोहे परतावेत. पूर्ण गार झाल्यावर पोहे घट्ट झाकणाच्या डब्यात भरावेत. हे पोहे महिनाभर छान टिकतात व कुरकुरीत राहतात. प्रवासाला न्यायला छान.

मेथीचा ठेपला
साहित्य : दोन भांडी कणीक, अर्धे भांडे प्रत्येकी ज्वारी, बाजरीचे पीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, भांडेभर बारीक चिरलेली मेथी, पाव भांडे दही, एक टेबल स्पून तीळ, पाव चमचा बेकिंग पावडर, थोडी हळद, दोन चमचे आलं, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर, चिमूट ओवा, तेल.
कृती : कणीक व ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र करावे. दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून एकत्र करावे. त्यात बाकीचे सर्व पदार्थ घालावे. पाणी घालून घट्टसर भिजवावे. पातळसर बनवून तेल लावून भाजावेत. 

लेमन राइस
साहित्य : शिजवून गार केलेला भात दोन वाट्या, पाव वाटी भाजके शेंगदाणे, चिमूटभर उडीद डाळ, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, साखर, दोन चमचे तेल, हिंग, मोहरी, कढीपत्ता, सुकी लाल मिरची.
कृती : कढईत तेल तापवून मोहरी, हिंगाची फोडणी करावी. डाळ दाणे घालून परतावे. कढीपत्ता घालावा. सुकी मिरची घालावी. परतून कढई खाली घ्यावी. भातात मीठ, साखर, लिंबाचा रस घालून कालवावे. त्यावर तयार थंड फोडणी घालून कालवावे. हा भात एक दिवस टिकतो.

मठरी
साहित्य : दोन वाट्या मैदा, एक वाटी बारीक रवा, चार चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूट सोडा, आवश्‍यकतेप्रमाणे मीठ, दहा-बारा मिरे, तेल, जिरे.
कृती : सगळे एकत्र करून घट्ट भिजवून भरपूर मळावे. लहान पुऱ्या लाटून वर थोडे जिरे, मिरे भुरभुरुन हलके लाटणे फिरवावे व मंद गॅसवर चांगल्या तापल्या तेलात मठऱ्या तळाव्यात. या मठऱ्या महिनाभर टिकतात. प्रवासाला न्यायला उत्तम.

खजूर दाण्याची पोळी
साहित्य : एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, एक वाटी दाण्याचा कूट, एक वाटी बिया काढून बारीक चिरलेला खजूर, आवश्‍यक तर थोडा चिरलेला गूळ, पाव वाटी बेसन, दोन चमचे भाजलेली खसखस पूड, वेलची जायफळ पूड, एक टेबल स्पून तूप, तेल, तांदळाची पिठी.
कृती : कणीक, मैदा व मीठ एकत्र करावे. त्यात चार चमचे गरम तेलाचे मोहन घालून पीठ किंचित घट्ट भिजवून ठेवावे. खजूर मिक्‍सरमधून फिरवून अगदी बारीक करावा. त्यातच दाण्याचे कूट घालून पुन्हा फिरवावे व भांड्यात काढावे. बेसन तुपावर भाजून घ्यावे. मग दाणे, खजूर मिश्रण, खसखस पूड, वेलची, जायफळ पूड एकत्र करावे. आपल्या गोडीप्रमाणे यात खजुराचे प्रमाण वाढवू शकता. अगर गूळ किंवा पिठीसाखर घालू शकता. भिजवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. दोन पुऱ्या लाटून त्यात मध्यभागी सारण पसरून ठेवून कडा जुळवाव्यात व पिठीवर पोळ्या लाटाव्यात. तापल्या तव्यावर टाकून दोन्हीकडून खमंग भाजाव्यात. या पोळ्या २-३ दिवस टिकतात. शिवाय गड चढताना, रानावनात चालताना सहज हातात ठेवून खात खात गप्पा मारत मजेत चढणे होते. शिवाय दाणे, खजूर यामुळे पोळी पौष्टिक बनते.

खव्याची पोळी
साहित्य : अर्धा किलो मैदा, पाव किलो खवा, २ चमचे बेसन, वाटीभर चाळलेली पिठीसाखर, वेलची पूड, चिमूट केशर, वाटीभर तूप, दूध.
कृती : मैद्यात २ टेबल स्पून गरम तेलाचे मोहन व चिमूट मीठ घालून दूध घालून भिजवून झाकून ठेवावे. कढईत थोडे तूप घालून खवा थोडा परतून घ्यावा. नंतर थाळ्यात काढून घेऊन गार करावा. थोड्या तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावे. गार झाल्यावर खवा, बेसन, पिठीसाखर, केशर, वेलची पूड असे सर्व एकत्र करून मळून घ्यावे. भिजवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. पुरीपेक्षा थोडी मोठी लाटी करावी. दोन पाऱ्या कराव्यात. एका पारीवर सारण पसरावे व त्यावर दुसरी पारी ठेवावी. कडा जुळवाव्यात. नंतर तांदळाच्या पिठीवर मध्यम आकाराची पोळी लाटावी. कडेने हलके लाटणे फिरवावे. सारण शेवटपर्यंत पोचले नसल्यास कातण्याने कातावे व गोल आकार द्यावा. नंतर सपाट तव्यावर टाकून पोळी भाजावी. दुसऱ्या गॅसवर दुसरा तवा टाकून त्यावर ही भाजलेली पोळी टाकून कडेने थोडे तूप सोडावे. या पोळ्या ३-४ दिवस चांगल्या राहतात.

लाल भोपळ्याच्या पुऱ्या
साहित्य : दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, दीड वाटी चिरलेला गूळ, ४ वाट्या कणीक, छोटा डावभर बारीक रवा, तळण्याकरता तेल अगर तूप, मीठ.
कृती : कढईत थोडे तेल घालून रवा भाजावा. पाणी घालून पातळसर शिजवावा. कढईत थोडे तेल घालून भोपळा वाफवून घ्यावा व त्यात गूळ घालून अगदी एकच चटका द्यावा व खाली उतरवावा. कणकेत चार चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. मग त्यात थंड झालेला रवा व चवीपुरते मीठ घालून मिसळून घ्यावे. शेवटी थंड झालेले भोपळ्याचे मिश्रण घालून पीठ घट्ट शिजवावे. छोट्या पुऱ्या लाटून तापल्या तेलात मध्यम गॅसवर तळाव्यात. थंड झाल्यावर डब्यात भराव्यात. या पुऱ्या ७-८ दिवस छान टिकतात. तळण नको असल्यास याच पिठाच्या पोळ्याही छान होतात. २-३ दिवस टिकतात. कुठल्याही लोणच्या बरोबर खायला येतात. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या