गरमागरम, चटपटीत पकोडे

पूनम  सूर्यवंशी-खंडागळे
मंगळवार, 21 जुलै 2020

पावसापाण्याच्या दिवसांत भजी, पकोडे खाण्याचा मोह कसा खरे आवरावा! त्यासाठीच घरच्या घरी करता येतील अशा पकोड्यांच्या रेसिपीज...

ब्रेड पकोडे
साहित्य : सहा  ब्रेडचे स्लाइस, दोन  उकडलेले बटाटे, एक  कांदा, दोन  हिरव्या मिरच्या, एक टेबलस्पून कोथिंबीर, चार-पाच  कढीपत्ता पाने, पाव टीस्पून  हळद, चिमूटभर  हिंग, पाव टीस्पून  मोहरी, एक टेबलस्पून  तेल, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून  लिंबाचा रस, १ कप  बेसन, अर्धा कप  पाणी, पाव टीस्पून  हळद, दोन चमचे  कोथिंबीर चिरून, चिमूटभर  हिंग, पाव टीस्पून  मीठ, अर्धा टीस्पून  तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम स्टफिंगसाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा घालून परतावे. कांदा लालसर झाला की त्यात हळद, कुसकरलेला बटाटा घालावा. त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. लिंबाचा रस घालावा व गार करावे. बॅटरसाठी सर्व साहित्य नीट एकत्र करून घ्यावे. ब्रेडच्या कडा काढून मधोमध कापून त्रिकोणी आकारात ब्रेड कापावा. एका स्लाइसवर स्टफिंग भरून दुसरी त्रिकोणी स्लाइस त्यावर ठेवून ते बॅटरमध्ये घोळवून घ्यावे. बॅटरमध्ये घोळवलेले ब्रेड तापलेल्या तेलात दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यावे. तयार ब्रेड पकोडे चटणी आणि टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

पनीर पकोडा
साहित्य :  अडीचशे ग्रॅम पनीर, एक कप बेसन (डाळीचे पीठ), लहान अर्धा चमचा बेकिंग पावडर, एक-दोन काळी मिरी, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल, कोथिंबिरीची चटणी.
कृती : बेसन, मीठ, बेकिंग पावडर, काळी मिरी व पाणी घालून भिजवावे. पनीरचे चौकोनी तुकडे करावेत. पनीरला मधोमध एक चीर मारून त्यात हिरवी चटणी लावावी. आता पनीरचे तुकडे डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडावेत. लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावीत. भजी खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा चटणीबरोबर गरम-गरम सर्व्ह करावीत.

कोबी पकोडा
साहित्य : अडीचशे-तीनशे ग्रॅम कोबी, १ कप बेसन, २ टेबलस्पून तांदळाचे पीठ, २-३ टेबलस्पून कोथिंबीर, २ छोटे चमचे कसुरी मेथी, छोटा पाव चमचा लाल मिरची पूड, १ छोटा चमचा आले पेस्ट किंवा १ इंच किसून घेतलेले आले, छोटा पाऊण चमचा किंवा गरजेनुसार मीठ, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तेल.
कृती : कोबी छान धुऊन घेऊन बारीक किसावा. एका छोट्या बोलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ घेऊन त्यात कसुरी मेथी, मिरची पूड, आले पेस्ट, हिरवी मिरची, मीठ घालून चांगले फेटून घ्यावे. त्यात आता किसलेला कोबी घालावा. चांगले एकत्र करून घेतल्यानंतर तेल गरम करावे. चमच्याने तेलात एक एक करून मिश्रण सोडावे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी तळाव्यात. एकावेळी जेवढ्या मावतील तेवढ्याच तळाव्यात. गरम गरम चहाबरोबर खाण्यासाठी पकोडे तयार.

पालक पकोडा
साहित्य : अर्धा कप चणा डाळ, १ कप पालक, बारीक कापून घेतलेल्या २ हिरव्या मिरच्या, १ इंच आले(किसलेले), एक छोटा चमचा धने पूड, आवश्‍यकतेनुसार मीठ, छोटा अर्धा चमचा जिरे, १ चमचा कसुरी मेथी,  छोटा पाव चमचा लाल मिरची पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : पालक पकोडा तयार करण्यासाठी पालक छान धुऊन घ्यावा. तसेच डाळसुद्धा छान धुऊन घेऊन ६-७ तास भिजवत ठेवावी. पालकाची देठे काढून पाणी निथळून पालक छान बारीक चिरून घ्यावा. डाळीचे मिश्रण करण्यासाठी : चणा डाळ मिक्सरमधून पाणी न घालता थोडी जाडसर वाटून घ्यावी. डाळीचे मिश्रण बोलमध्ये काढून त्यात सर्व मसाले, जिरे, मीठ, धने पावडर, आले पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, कसुरी मेथी आणि चिरलेला पालक घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. तेल गरम करून घ्यावे. मिश्रणाचे हवे त्या आकाराचे पकोडे करून सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत.

घोसाळ्याची भजी
साहित्य : दोन घोसाळी (२५० ग्रॅम), ८ हिरव्या मिरच्या, पाव कप कोथिंबीर, १ कप बेसन, तेल, गरजेनुसार पाणी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून पांढरे तीळ, १ टेबलस्पून रवा, चवीनुसार मीठ.
कृती : घोसाळी स्वच्छ धुऊन त्यांच्या पातळ गोल चकत्या कापाव्यात. चिरल्यानंतर लगेचच त्यांना थंड पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे काळे पडत नाहीत. बेसन मंद आचेवर भाजून घ्यावे, म्हणजे त्याला अजून खमंगपणा येईल. मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर घालून वाटण करावे. एका मोठ्या बोलमध्ये हे भाजलेले बेसन घालून त्यात रवा, वाटलेला हिरवा मसाला, चवीपुरते मीठ आणि ३ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून नीट एकत्र करावे. गरजेनुसार पाणी घालून भज्यांचे पीठ भिजवावे. बेसनाचे मिश्रण चांगले हलके होईपर्यंत फेटावे. मिश्रण झाकून  ठेवावे. तेल चांगले तापले, की आच मंद ते मध्यम ठेवावी आणि मगच घोसाळ्यांच्या तुकड्यांना बेसनात घोळवून तेलात अलगद सोडावे. दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भजी तळाव्यात.

कुरकुरीत कांदा भजी
साहित्य : एक मोठा कांदा, तिखट, गरजेपुरते मीठ, लागेल तितके बेसन, तळण्यासाठी तेल, किंचित हळद, चिमूटभर ओवा, थोडी कोथिंबीर.
कृती : कांदा अगदी बारीक उभा उभा चिरावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करून त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद लावून नीट मिसळून १० मिनिटे बाजूला ठेवावे. १० मिनिटांनंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात कांदा भिजेल इतपत पीठ घालावे. पाणी अजिबात घालू नये. कोथिंबीर घालून त्यावर एक चमचाभर गरम तेल घालावे. नीट चमच्याने मिसळून गरम तेलात दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळाव्यात.

नूडल्स पकोडा
साहित्य : एक कप बेसन, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ कप उकडलेले नूडल्स, अर्धा कप मध्यम आकारात चिरलेले मशरूम, १ कप बारीक उभा चिरलेला कोबी, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच उभे चिरलेले आले, २ चमचे कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा तेल.
कृती : एका भांड्यात बेसन आणि कॉर्नफ्लोअर घेऊन मिश्रण चांगले ४-५ वेळा फेटून घ्यावे. मिश्रणात मीठ, मिरची पावडर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, नूडल्स, कोबी, मशरूम घालून पुन्हा चांगले मिसळावे. थोडा वेळ मिश्रण बाजूला ठेवावे. एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की हव्या त्या आकारात पकोडे सोनेरी होईपर्यंत तळावेत. थोडे गार झाले की हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

मिरची पकोडा
साहित्य : आठ ते १० लांबड्या मिरच्या, पाऊण कप बेसन, १ चमचा तांदुळाचे पीठ, पाव चमचा हळद, चिमूटभर खायचा सोडा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल, स्टफिंगसाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी.
कृती : मिरच्या धुऊन घ्याव्यात. एका बाजूने चीर पाडून आतील सर्व बिया काढाव्यात.(पकोडे तिखट हवे असतील तर बिया न काढता करता येतील) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करावे. त्यात साधारण पाऊण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे. सोडा घालून एकत्र करावे. पीठ थोडे दाटसर भिजलेले असावे. मिरचीमध्ये बटाट्याची भाजी भरावी. तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात नीट बुडवून घ्याव्यात. मध्यम आचेवर तळाव्यात आणि गरमागरम सर्व्ह कराव्यात.

मूग डाळ पकोडा
साहित्य : दोन वाट्या मूग डाळ, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग, प्रत्येकी १ छोटा चमचा मिरे व धने, अर्धा इंच आले, १-२ हिरव्या मिरच्या, मीठ आवश्यकतेनुसार, तेल.
कृती : मूग डाळ रात्री भिजत घालावी. भिजलेली मूग डाळ पाणी निथळून त्यामध्ये मिरची, आले, हिंग घालून वाटून घ्यावी. घट्टसर मिश्रण तयार करून चवीनुसार मीठ घालावे. मिरे, धने जाडसर वाटून त्यात मिसळावे. कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. तेल तापवून भजी तळाव्यात. कोथिंबीर चटणी/चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह कराव्यात.

संबंधित बातम्या