आंब्याचा शिरा, साखरी भात

प्राजक्ता कुलकर्णी, पुणे
सोमवार, 8 एप्रिल 2019

फूड पॉइंट
सण-समारंभाला आपण गोडाचे पदार्थ आवर्जून करतो. त्यात गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष! त्यामुळे खास स्वयंपाक तर झालाच पाहिजे. पण नेहमी फक्त पुरणपोळी किंवा श्रीखंड-पुरी न करता, त्याबरोबरच जरा वेगळे, नैवेद्यालापण होतील असे पदार्थदेखील तुम्ही करू शकता. अशाच काही रेसिपीज खास गुढीपाडव्यासाठी...  

आंब्याचा शिरा 
साहित्य : एक वाटी मध्यम रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, अडीच वाटी दूध, मध्यम आकाराचा १ हापूस आंबा, अर्धा टीस्पून वेलची पावडर, काजू, बदाम आणि बेदाणे.
कृती : प्रथम एका कढईत तूप पातळ करून घ्यावे. त्यात रवा घालून मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. रवा भाजून झाल्यावर त्यात उकळते दूध घालून त्याला व्यवस्थित वाफ येऊ द्यावी. रव्याला वाफ आल्यानंतर त्यात साखर घालून वाफ आणावी. त्यानंतर आंब्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून त्यात घालाव्यात, तसेच अर्धा ते पाऊण चमचा वेलची पावडर घालून पुन्हा वाफ आणावी. वाफ आणताना २ चमचे तूप कडेने सोडावे. शिरा तयार झाल्यावर त्यावर काजू, बदाम, बेदाणे इत्यादींचे काप घालून सजावट करावी.
टीप : शिऱ्यात नेहमी उकळते दूधच घालावे. आंब्याच्या फोडींऐवजी आंब्याचा रस घातला तरी चालतो.

साखरी भात 
साहित्य : एक वाटी तांदूळ, ३ टेबलस्पून साजूक तूप, १ वाटी साखर, २-३ लवंग, अर्धा चमचा वेलची पूड, बदाम, बेदाणे, केशर, केशरी रंग.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन जरा वेळ चाळणीत निथळत ठेवावेत. नंतर एका कढईत तूप गरम करून, त्यात २-३ लवंग टाकून त्यात धुतलेले तांदूळ टाकून थोडे परतावेत. त्यानंतर त्यात २ वाट्या गरम पाणी घालावे आणि भात शिजवून घ्यावा. भात झाल्यावर एका परातीत पसरून ठेवावा. त्यानंतर तो भात कढईत काढून घेऊन त्यात केशर, केशरी रंग, साखर इ. घालून मंद आचेवर उलथण्याने हळुवारपणे परतावा. भात परतत असताना वरून २ चमचे तूप सोडावे. थोडा सैल असणारा भात घट्ट होईपर्यंत परतावा. नंतर त्यात वेलची पावडर, बेदाणे आणि काजू बदामाचे काप घालावेत.
टीप : साखर घातल्यावर भात सैल वाटला, तरी थोडासा परतला की घट्ट होतो. भात खूप वेळ परतल्यास तो आक्रसतो. परतत असताना भात खाली लागतोय असे वाटल्यास आवश्‍यकतेनुसार कडेने साजूक तूप सोडावे.

नारळी भात 
साहित्य : एक वाटी तांदूळ, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, ३ टेबलस्पून साजूक तूप, अर्ध्या नारळाचा खोवलेला चव, अर्धा चमचा वेलची पूड आणि २-३ लवंग.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवून जरा वेळ चाळणीत निथळत ठेवावेत. नंतर एका कढईत तूप गरम करून त्यात २-३ लवंग टाकाव्यात आणि त्यात धुतलेले तांदूळ टाकून थोडे परतावेत. त्यानंतर त्यात दुप्पट गरम पाणी घालावे आणि भात शिजवून घ्यावा. भात झाल्यावर एका परातीत पसरून ठेवावा. भात कोमट झाल्यावर तो भात कढईत काढून घेऊन त्यात चिरलेला गूळ घालून मंद आचेवर उलथण्याने परतावा. भात परतत असताना वरून २ चमचे तूप सोडावे. भात परतत आल्यावर त्यात नारळाचा चव घालावा आणि पुन्हा थोडा परतावा. भात तयार झाल्यावर त्यात थोडी वेलची पावडर आणि आवडीप्रमाणे बेदाणे आणि काजू बदामाचे काप घालावेत.

आंब्याचा भात 
साहित्य : एक वाटी तांदूळ, ३ टेबलस्पून साजूक तूप, १ वाटी साखर, १ मध्यम आकाराचा हापूस आंबा, २ वाट्या पाणी, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : एका पातेल्यात पाण्याला आधण आणावे. त्यानंतर त्यात तांदूळ स्वच्छ धुवून वैरावा. भात शिजत आला असता दोन वाफा येण्याआधी त्यात साखर आणि आवडीनुसार आंब्याचे मध्यम आकाराचे काप किंवा आंब्याचा रस, वेलची पावडर इ. घालून २-३ वाफा आणाव्यात. 
टीप : भात शिजत असताना झाकणावर पाण्याचे आधण ठेवावे, म्हणजे भात खाली लागत नाही.

गुलाबजाम
साहित्य : पाव किलो खवा, एक ते दीड टेबलस्पून मैदा, अर्धा किलो साखर, पाव किलो तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : प्रथम खवा पुरण यंत्रातून काढून घेऊन किंवा त्यातल्या गुठळ्या हाताने मोडून चांगला मळून घ्यावा. त्यानंतर त्यात मैदा घालून पुन्हा मळावा. खवा जेवढा जास्त मळला जाईल, तेवढा गुलाबजाम हलका होतो. नंतर मळलेला खवा अर्धा तास मुरत ठेवावा. अर्ध्या तासाने त्याचे लांबट गुलाबजाम वळावेत. सगळ्या खव्याचे गुलाबजाम वळून झाल्यावरच ते तुपात तळायला घ्यावेत. एका वेळी २ ते ३ गुलाबजामच तळावेत, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत. त्यानंतर एका पातेल्यात साखर घेऊन साखर व्यवस्थित भिजेल एवढे पाणी घालून त्याचा पाक कढत ठेवावा. साखर विरघळून त्याला बुडबुडे यायला लागले, की गॅस बंद करावा. पाक पातळच ठेवावा. एका पसरट भांड्यात सर्व गुलाबजाम घालून त्यावर गरम पाक ओतावा. पाक कोमट होईपर्यंत त्यावर कागद झाकून ठेवावा. ५-६ तासाने त्यातील पाक दुसऱ्या पातेल्यात काढून पुन्हा गरम करून गुलाबजामवर घालावा, म्हणजे तो अधिक मुरतो.
टीप : खवा सैल असल्यास परतून घ्यावा. गुलाबजाम तळताना एक गुलाबजाम आधी तळून पाहावा. जर तो फुटत, असेल तर गरजेप्रमाणे त्यात मैदा घालावा.

आम्रखंड
साहित्य : एक किलो मलई चक्का, पाऊण किलो साखर, १ टीस्पून वेलदोडा पूड, ३ मोठे हापूस आंबे.
कृती : आदल्या दिवशी चक्‍क्‍यात साखर घालून चमच्याने हलवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुरण यंत्र अथवा पिठाच्या चाळणीतून श्रीखंड गाळून घ्यावे. त्यात आवडीनुसार आंब्याच्या मध्यम आकाराच्या फोडी किंवा आंब्याचा रस आणि वेलची पूड घालावी. त्यानंतर हे मिश्रण हलवून घ्यावे. आम्रखंड घट्ट वाटल्यास त्यात थोडे दूध घालावे.
टीप : आम्रखंड खायच्या आदल्या दिवशी करून ठेवावे. म्हणजे ते जास्त मुरते आणि चविष्ट लागते. तसेच आम्रखंडात इतर कोणताही सुका मेवा घालू नये, म्हणजे आंब्याची चव राहाते.

ओल्या नारळाच्या करंज्या
साहित्य : दोन वाट्या रवा, पाऊण वाटी मैदा, ४ टेबलस्पून डालडाचे पातळ केलेले अथवा तेलाचे मोहन, १ मोठा नारळ, नारळाच्या चवाच्या निम्मी साखर, अर्धी वाटी साय, १ चमचा वेलदोडा पूड.
कृती : रवा आणि मैदा एकत्र करून त्यात मोहन घालावे. दुधात घट्टसर भिजवून घ्यावे. १ तास मुरत ठेवावे. त्यानंतर ते मिश्रण भरपूर मळून घ्यावे किंवा पाट्यावर कुटून घ्यावे. 
 सारण : नारळाचा चव आणि चवाच्या निम्मी साखर एकत्र करावी. त्यात साय घालून मध्यम होईतोवर मंद आचेवर ठेवावे. सारण तयार झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. त्यानंतर वरील पिठाच्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून करंजी बनवून घ्यावी. करंजीच्या कडा व्यवस्थित जुळवून त्या कातळाने कापून घ्याव्यात आणि एका ओल्या फडक्‍याखाली झाकून ठेवाव्यात. सर्व करंज्या लाटून झाल्यावर त्या गुलाबी रंग येईतोवर तळाव्यात. 
टीप : करंज्या मंद आचेवर तळाव्यात.

सांज्याच्या पोळ्या 
साहित्य : एक वाटी रवा, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, २ वाटी पाणी, अर्धा टीस्पून वेलची पूड, २ वाट्या कणीक, ३ टेबलस्पून तेलाचे मोहन.
कृती : दोन चमचे तेलावर रवा थोडासा भाजून घ्यावा. रवा जास्त भाजू नये. त्यात २ वाट्या उकळते पाणी घालून वाफ आणावी. त्यानंतर त्यात गूळ घालावा. मऊसर शिरा तयार होईल, त्यात अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडेसे जायफळ किसून घालावे. रवा जाड असल्यास पाणी जास्त घालावे. आता, कणकेत मीठ आणि तेलाचे मोहन घालून रोजच्या पोळीसाठी भिजवतो, त्याहून थोडीशी सैलसर कणीक भिजवावी. शिरा गार झाला, की मळून घ्यावा. त्यात गुठळ्या राहता कामा नयेत. नंतर कणकेची पारी करून त्यात सांज्याचे पुरण भरून उंडा करावा... आणि तांदळाच्या पिठावर पोळी लाटावी. पोळी दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्यावी.

संबंधित बातम्या