बीट स्पेशल रेसिपीज 

प्रतीक्षा खराडे, राजगुरूनगर
सोमवार, 13 जुलै 2020

बीट हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. शिवाय ते वर्षभर उपलब्धही असते. मात्र बीट खाण्यास मुलेच काय, तर घरातील मोठ्या व्यक्तीही टाळाटाळ करतात. अशावेळी बीटचे वेगवेगळे पदार्थ करता येतील. अशाच काही खास आणि झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज इथे देत आहोत... 

पॉकेट पराठा
साहित्य : गव्हाचे पीठ, तेल, बीट,कांदा, उकडलेला बटाटा, आमचूर पावडर, मीठ, साखर, मिरची-लसूण पेस्ट, साजूक तूप, कोथिंबीर.
कृती : प्रथम पोळीला  लागते तशी कणीक मळून १० मिनिटे भिजत ठेवावी. कांदा बारीक चिरून गुलाबी परतून घ्यावा. आता मिरची-लसूण पेस्ट, जिरे, मोहरी तडतडून घ्यावी. त्यात उकडलेला बटाटा आणि  बीट किसून घालावे. नंतर मीठ, किंचित साखर घालावी. आमचूर पावडर टाकून सगळे छान एकत्र करून घ्यावे. आता त्यावर ५ मिनिटे झाकण ठेवावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सारण थंड होऊ द्यावे. कणकेची पातळ पोळी लाटून खालच्या अर्धगोल भागावर चौकोनी आकारात सारण पसरवावे. वरचा अर्धा भाग त्यावर ठेवावा. फक्त मधला चौकोन कापून घेऊन बाजूची कणीक पुढच्या गोळ्यात वापरावी. कडा जराशा लाटून किंवा दाबून घेऊन साजूक तुपावर हळुवार भाजावे. झाला पॉकेट पराठा तया!.

नमकिन
साहित्य : रवा किंवा मैदा, बीट, ओवा-जिरेपूड, मीठ, तेल. 
कृती : सर्वप्रथम  मैद्यात चमचाभर तेल टाकून ते चांगले चोळून घ्यावे. आता त्यात ओवा-जिरेपूड घालावी. बीट बारीक चिरून मिक्सरला फिरवून घ्यावे. मीठ आणि बीटचे  मिश्रण  घालून जरासा घट्ट गोळा मळून घ्यावा. त्याला थोडे तेल लावून तो ५ मिनिटे मळत राहावा. १० मिनिटे कणीक भिजू द्यावी. पोळी लाटून त्याचे शंकरपाळ्याचे आकार, छोटुशा पुऱ्या, उभ्या पट्ट्या, चौकोनी आकार कापावेत व तळावेत. बीट नमकीन्स आर रेडी टू फिनिश!

केक
साहित्य : दोन वाट्या मैदा, १ वाटी पिठीसाखर, पाऊण वाटी तूप, ताक, १ बीट,  बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स. 
कृती : पिठीसाखर तुपात छान फेटून घ्यावी. त्यात मैदा, मिल्क पावडर टाकून पुन्हा सगळे चोळून घ्यावे. बीट चिरून मिक्सरला जरासे ताक घालून बारीक करून घ्यावे. आता हे मिश्रण आणि इतर सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. भजेघोळासारखा घोळ करावा. सर्वात शेवटी त्यात बेकिंग पावडर आणि सोडा घालून चांगले एकसारखे, एकाच दिशेने फेटत राहावे. मिश्रण छान फुलले की त्यात ड्रायफ्रूट्स घालून घ्यावे. आता हे मिश्रण केकच्या भांड्यात टाकावे. गरम कढईत वाळू पसरवून त्यात केकचे भांडे ठेवले,  तर ४५ मिनिटे केक बेक होण्यास लागतात. सो एंजॉय युअर ओन ट्रीट.

पनीर रोल
साहित्य : बीट, कांदा, टोमॅटो, पनीर, मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल, जिरे, मोहरी, (मिश्रणात आवडीनुसार सोयासॉस, चिलीसॉस,  टोमॅटोसॉस घालू शकता.) पोळीसाठी मैदा किंवा गव्हाचे पीठ.
कृती : सर्वप्रथम पोळीसाठी मळतो तशी कणीक मळून १० मिनिटे  भिजू द्यावी. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण बारीक कापून  घ्यावे. कांदा तेलावर जरासा परतून घ्यावा. त्यात लसूण आणि मिरची कच्चेपणा जाईल इतके परतावे. जिरे, मोहरी छान तडतडून घ्यावी. बारीक कापलेले बीट,  टोमॅटो आणि मीठ टाकून २ मिनिटे परतवून घ्यावे. त्यात कुस्करलेले पनीर घालून ४-५  मिनिटे  सगळे जिन्नस एकत्र करत चमच्याने हालवत राहावे. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून २ मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी. रोलसाठी लागणारे मिश्रण तयार. मुरलेल्या कणकेची गरमागरम पोळी करून घ्यावी. पोळीला भाजताना साजूक तूप लावले, तर अजून बेस्ट. आपल्या हवे ते सॉस जरासे  पोळीवर पसरवून घ्यावे. त्यावर भाजी ठेवून आवडीप्रमाणे रोल करावा. यम्मी बीट पनीर रोल रेडी!

आप्पे
साहित्य : बारीक रवा, ताक, सोडा, मीठ, बीट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट
कृती : प्रथम रवा ५ मिनिटे ताकात भिजवून घ्यावा. आता त्यात जमेल तितके बारीक केलेले बीट, कांदा आणि टोमॅटो घालावे. कोथिंबीर, मीठ, मिरची-लसूण पेस्ट घालून सगळे एकत्र करून घ्यावे. सर्वात शेवटी चिमूटभर सोडा घालून एकाच दिशेने एकसारखे फिरवावे. आप्पे पात्र गरम करून तेलाचा ब्रश फिरवून त्यात तयार मिश्रण चमच्याने ओतावे. आता झाकण ठेवून नंतर चमच्याने उलटे करावे व १-२ थेंब तेल  बाजूने  टाकावे.  एक वाफ आली की बीट आप्पे तयार!

सरबत
साहित्य : एक बीट, काळे मीठ, ओवा-जिरेपूड,लिंबू, साखर (आवडत असेल तर). 
कृती : सर्वप्रथम बीटचे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यावे. नंतर हे मिश्रण गाळणीतून गाळून घ्यावे. आता त्यात २ ग्लास पाणी ओतावे. बीटचा राहिलेला चोथा चांगला पिळून घ्यावा. (हा चोथा फेकून न देता, त्यात जरा तिखट मीठ घातले, की छान तोंडी लावणे होते.) आता बीटाच्या रंगीत पाण्यात आवडीनुसार लिंबू पिळावे. जिरे-ओवापूड, काळे मीठ टाकून छान ढवळून घ्यावे. अप्रतिम रंगासह, छान चवीचे बीट सरबत तयार!

वड्या 
साहित्य : दोन मध्यम आकाराचे बीट, अर्धी वाटी खवा, पाव वाटी साखर आणि साजूक तूप. 
कृती : बीट किसून घ्यावे. हा कीस तुपावर परतून घ्यावा. कीस जरासा कोरडा होत आला, की खवा आणि साखर घालून सगळे जिन्नस एकजीव होऊ द्यावे. मिश्रण सारखे खाली-वर करत राहावे. कढईच्या मध्यभागी याचा घट्ट गोळा होऊ लागेल. आता ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यात हा गोळा थापून घ्यावा. नंतर सुरीने आवडीच्या आकारात वड्या पाडाव्यात. हवे असेल तर काजू, बदाम लावून थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. झाली बीटची बर्फी रेडी.

कोशिंबीर
साहित्य : एक बीट, १ कांदा, चमचाभर दही, काळे मीठ, अर्धा चमचा साखर, जिरे, मोहरी, हिंग, मिरची, साजूक तूप.
कृती : सर्वप्रथम बीट आणि कांद्याचे छान बारीक तुकडे करून घ्यावे. आता यात दही घालावे. नंतर फोडणी पात्रात तुपात मिरची, जिरे, मोहरी, हिंग याची मस्त फोडणी करावी. ही फोडणी दही घातलेल्या बीट-कांद्याच्या मिश्रणावर घालावी. सर्वात शेवटी काळे मीठ आणि साखर टाकून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. थंड आवडत असेल, तर जेवणाआधी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यावी. लज्जतदार कोशिंबीर तयार.

चॉकलेट
साहित्य : बीट, खारीक  खोबऱ्याची  पावडर, गूळ, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स 
कृती : बीट चिरून  मिक्सरला बारीक करून घ्यावे. आता  तुपावर परतत कोरडे होऊ द्यावे. आता त्यात  खारीक  खोबऱ्याची पावडर आणि किसलेला गूळ घालत मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत चमच्याने हालवावे. गोळा घट्ट झाला की चॉकलेट मोल्डमध्ये हे मिश्रण चमच्याने टाकावे व त्यात मध्यभागी ड्रायफ्रूट्स पेरावे. आता २० मिनिटे फ्रिजरला  मोल्ड ठेवला, की टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट्स  तयार!

संबंधित बातम्या