रिफ्रेश करणारे इन्फ्युज्ड वॉटर

प्रीती सुगंधी
सोमवार, 10 जून 2019

फूड पॉइंट

शरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची शक्‍यताही जास्त असल्याने सतत पाणी प्यावे लागते. सतत साधे पाणी पिण्यापेक्षा निरनिराळी फळे आणि पदार्थ वापरून तयार केलेले पाणी प्यावे. यालाच ‘इन्फ्युज्ड वॉटर’ म्हणतात. विविध फळांपासून तयार केलेल्या ‘इन्फ्युज्ड वॉटर’च्या रेसिपीज इथे देत आहोत. 

सफरचंद 
साहित्य : एक सफरचंद, १ दालचिनीची छोटी कांडी, १ ग्लास पाणी, ४-५ पुदिन्याची पाने, १-२ लिंबाच्या फोडी.
कृती : साल न काढता सफरचंदाच्या फोडी कराव्यात. एका जारमध्ये सफरचंदाच्या फोडी टाकाव्यात. त्यात दालचिनीच्या कांडीचा छोटासा तुकडा टाकावा. नंतर त्यात पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या फोडी टाकून पाणी ओतावे. जारला झाकण लावून २-३ तास फ्रीजमध्ये ठेवावे. हे तयार झालेले पाणी हलवून प्यायला द्यावे.

कलिंगड  
साहित्य : कलिंगडाच्या २ फोडी, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ, ५-६ पुदिन्याची पाने.
कृती : कलिंगडाच्या फोडीचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. नंतर एका ग्लासमध्ये कलिंगडाचे तुकडे टाकून त्यात पाणी आणि गरजेनुसार बर्फ टाकावा. पुदिन्याची पानेही त्याबरोबरच टाकावीत. नंतर तो ग्लास किमान एक तास तरी तसाच पाणी मुरत ठेवावा. एका तासाभराने हे पाणी पिता येते. पाण्यात राहिलेले कलिंगडाचे तुकडेही खाऊ शकता.

काकडी-जिरा  
साहित्य : एका काकडीच्या फोडी, १ टीस्पून जिरेपूड, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.
कृती : एका ग्लासमध्ये काकडीच्या फोडी घ्याव्यात. त्यात जिरेपूड, लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकावी. नंतर त्यात पाणी ओतून गरजेनुसार बर्फ टाकावा. हे पाणी ढवळून एक तास तसेच ठेवावे. म्हणजे त्या पाण्यात सगळे फ्लेवर्स येतील. नंतर हे पाणी तुम्ही पिऊ शकता.

डाळिंब-गाजर  
साहित्य : एक टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, २-३ टेबलस्पून गाजराचे तुकडे, २-३ पुदिन्याची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, १ ग्लास पाणी.
कृती : एका ग्लासात पाणी घेऊन त्यात डाळिंबाचे दाणे, गाजराचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस टाकावा. ग्लास एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवावा. थंड झाल्यावर प्यायला द्यावे.

गाजर-लिंबू  
साहित्य : दोन टेबलस्पून गाजराचे बारीक तुकडे, १ टेबलस्पून आंब्याचे तुकडे, १ लिंबाची फोड, १ ग्लास पाणी, १ टीस्पून ओवा आणि गरजेनुसार बर्फ.
कृती : एका ग्लासमध्ये गाजर आणि आंब्याचे तुकडे टाकावेत. नंतर त्यात लिंबाचा रस, ओवा, बर्फ टाकून पाणी ओतावे. एक तास मुरत ठेवून नंतर प्यायला देऊ शकता. 

द्राक्ष 
साहित्य :  दहा-बारा चिरलेली द्राक्षे, लिंबाची १ फोड, अर्धा टीस्पून दालचिनी पूड, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.
कृती : एका ग्लासमध्ये चिरलेली द्राक्षे टाकावीत. त्यात लिंबाचा रस आणि दालचिनी पूड टाकावी. नंतर पाणी आणि गरजेनुसार बर्फ टाकावा. हे पाणी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता. 

संत्री-काकडी  
साहित्य : संत्र्याच्या पाच-सहा फोडी, काकडीच्या ५-६ फोडी, १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाची १ फोड, ५-६ पुदिन्याची पाने, १ ग्लास पाणी आणि गरजेनुसार बर्फ. 
कृती : संत्र्यामधील बिया काढून टाकणे. 
एका ग्लासमध्ये संत्री आणि काकडी घ्यावी. नंतर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिन्याची पाने टाकावीत. नंतर पाणी ओतून बर्फ टाकावा आणि सर्व्ह करावे.

खरबूज-तुळस  
साहित्य : खरबुजाच्या ५-६ फोडी, ४-५ तुळशीची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, ७-८ कापलेली काळी द्राक्षे, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.
कृती : एक ग्लास पाण्यात खरबुजाच्या फोडी, द्राक्षाचे तुकडे, तुळशीची पाने आणि लिंबाचा रस टाकावा. नंतर हवा तेवढा बर्फ टाकून ढवळून घ्यावे आणि थंड सर्व्ह करावे.   

नारळ  
साहित्य : एक ग्लास नारळाचे पाणी, १ टेबलस्पून ताजे किसलेले खोबरे, १ टीस्पून जिरेपूड, २-३ पुदिन्याची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, अर्धा ग्लास साधे पाणी.
कृती : एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी आणि साधे पाणी मिक्‍स करून घ्यावे. त्यामध्ये जिरेपूड, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि बर्फ टाकावा. नंतर ते पाणी ढवळून घ्यावे आणि प्यायला द्यावे. 
टीप : हे पाणी दोन तासांच्यावर ठेवू नये. 

पपई-लिंबू  
साहित्य : पपईच्या २-३फोडी, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून चिरलेली कोथिंबीर, २-३ काकडीच्या फोडी, १ ग्लास पाणी आणि गरजेनुसार बर्फ.
कृती : एका जारमध्ये पपई आणि काकडी घ्यावी. त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि बर्फ टाकावा. नंतर एक ग्लास पाणी ओतून ढवळून घ्यावे आणि प्यायला द्यावे.

 

संबंधित बातम्या