मटार चटणी व मखाना खीर

प्रीती दबडे
सोमवार, 2 मार्च 2020

फूड पॉइंट
रोजच्या जेवणात तोंडी लावायला एखादी चटणी, गोडाचा शिरा किंवा खीर असेल, तर साधी भाजी-पोळीही आवडीने खाल्ली जाते...  
त्यासाठी आहेत या काही खास रेसिपीज...

सेलरी कॉर्न रायता
साहित्य : एक मक्याचे कणीस, चार चमचे दही, २ सेलरीची पाने, चवीनुसार मीठ (शक्यतो काळे मीठ), कोथिंबीर
कृती : मक्याचे कणीस सोलून घेऊन दाणे ५ मिनिटे पाण्यात उकडून घ्यावेत. सेलरीची पाने बारीक चिरून घ्यावीत. त्यात उकडलेले मक्याचे दाणे, दही, मीठ आणि कोथिंबीर घालावी. तयार सेलरी कॉर्न रायता सर्व्ह करावा.

पालक टोमॅटो सार
साहित्य : दोन टोमॅटो, १०-१२ पालकची पाने, आले, तिखट, मीठ, तेल, मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, पाणी.
कृती : टोमॅटो आणि पालकची पाने धुऊन टोमॅटोचे बारीक काप करावेत. पालक, टोमॅटोचे काप आणि आल्याचा छोटा तुकडा यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करावी. एका कढईमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घालावे. कढीपत्ता (५-६ पाने) व हळद घालावी. चवीनुसार तिखट आणि मीठ घालावे. यामध्ये टोमॅटो-पालकची पेस्ट घालावी आणि ४-५ वाट्या पाणी घालून उकळी येऊ द्यावी. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. गरमागरम पालक टोमॅटो सार तयार. एवढे प्रमाण ४ लोकांना सहज पुरते.

लसणाच्या पातीची चटणी
साहित्य : एक जुडी लसणाची पात, २ हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीर.
कृती : लसणाची पात निवडून घेऊन स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ, जिरे, थोडी कोथिंबीर आणि २ मिरच्या घालाव्यात. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. झाली चटणी तयार. सर्व्ह करताना चटणीत तेल घालावे, छान लागते.

मखाना खीर
साहित्य : एक वाटी मखाना, अर्धा लिटर दूध, १ वाटी साखर, ड्रायफ्रूट, चार चमचे तूप
कृती : प्रथम कढईत तूप गरम करून घ्यावे. त्या तुपात मखाना परतून घ्यावा. नंतर त्यात दूध, साखर आणि हवे ते, हवे तेवढे ड्रायफ्रूट्स घालावे आणि उकळी येऊ द्यावी. झाली मखाना खीर तयार. ही खीर उपवासाला चालते.

चॉकलेट व कलिंगड शिरा
साहित्य : एक वाटी रवा, ४ चमचे तूप, पाऊण वाटी साखर, वेलदोड्याची पूड, अडीच वाट्या पाणी, २ चमचे कोको पावडर (चॉकलेट शिऱ्यासाठी) किंवा २ छोट्या कलिंगडाच्या फोडींचा ज्यूस (कलिंगड शिऱ्यासाठी)
कृती : प्रथम एका कढईत रवा तुपात लालसर भाजून घ्यावा. त्यात कोको पावडर घालून मिक्स करावी. मग पाणी घालून थोडी वाफ काढावी. नंतर साखर आणि वेलदोड्याची पूड घालावी. झाला चॉकलेट शिरा तयार.  कलिंगडचा शिरा करताना पद्धत तीच फक्त कोको पावडरऐवजी कलिंगडचा ज्यूस घालायचा. झाला कलिंगड शिरा तयार.

मटार चटणी
साहित्य : एक वाटी मटार, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा बडीशेप, १ छोटा तुकडा आले, कोथिंबीर, तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, पाणी.
कृती : प्रथम एका कढईमध्ये तेल घालावे. त्यात मटार घालून ते ५ मिनिटे गॅसवर परतून घ्यावे. नंतर त्यात मिरची, बडीशेप, आले, जिरे, कोथिंबीर, मीठ, अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता त्यावर फोडणी करून घालावी. चटणी छान दिसतेही आणि लागतेही.

रवा थालीपीठ
साहित्य : एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो (प्रत्येकी अर्धे कापलेले), २ बारीक चिरलेली सेलरीची पाने, तेल, पाणी आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम वरील सर्व साहित्य एकत्र करून थालीपीठ करता येईल असे पीठ भिजवावे. तव्यावर २ चमचे तेल घालून आधी थालीपीठ थापून घेऊन मग तवा गॅसवर ठेवावा. थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे. टोमॅटो केचप किंवा दह्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे, छान लागते.

धिरडे
साहित्य : एक वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी कणीक, २ चमचे रवा, ४ हिरव्या मिरच्या वाटून, मीठ, कोथिंबीर, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, नारळाचा चव आणि ४ वाट्या पाणी.
कृती : ज्वारीचे पीठ, कणीक, रवा, वाटलेली मिरची, मीठ, कोथिंबीर, ओवा, जिरे हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स करावे. त्यात लागेल तसे पाणी घालून जरासे घट्टसर पीठ तयार करावे. याची आपल्याला पाहिजे तशी धिरडी थापावीत व डोशाच्या तव्यावर भाजून घ्यावीत. गरमगरम धिरडे सर्व्ह करताना वरून थोडा नारळाचा चवदेखील घालावा. हे दिसायलाही छान दिसते आणि चवही वाढते.

डेट मिल्क
साहित्य : दहा-बारा डेट्स (खजूर), एक-दीड लिटर दूध.
कृती : खजुरातील बिया काढून त्यात १ वाटी दूध घालावे. १० मिनिटे पातेल्यात शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्यात राहिलेले दूध घालावे. अतिशय स्वादिष्ट लागणारे हे दूध हिमोग्लोबिनची कमी असणाऱ्यांनी जरूर प्यावे.

इराणी चहा
साहित्य : चार चमचे चहा पावडर, ४ कप पाणी, ४ चमचे साखर, २ वेलदोडे, १ लिटर म्हशीचे दूध, १०० मिली कंडेन्स्ड मिल्क. 
कृती : प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात चहा पावडर, ४ चमचे साखर आणि वेलदोडे घालावेत. झाकण ठेवून १० मिनिटे उकळावे. दुसऱ्या पातेल्यात ठरल्या प्रमाणात दूध घेऊन त्यात १०० मिली कंडेन्स्ड मिल्क घालून अर्धा तास उकळावे. चहा सर्व्ह करताना एका कपात अर्धा कोरा चहा आणि अर्धा कप उकळलेले दूध असे प्रमाण घ्यावे. इराणी चहा तयार आहे. या प्रमाणात ८ जणांना पुरेल एवढा चहा होतो.

संबंधित बातम्या