टेस्टी स्नॅक्स

प्रिया शहा, कराड 
सोमवार, 4 जुलै 2022

फूड पॉइंट

१. रोटी कोन 
साहित्य - एक वाटी गव्हाचे पीठ, मध्यम आकाराचे ५-६ बटाटे, आले-लसूण-मिरची पेस्ट, १ चमचा मैदा, फोडणीचे साहित्य. 
कृती - गव्हाचे पीठ, मीठ, १ चमचा तेल, पाणी घालून कणीक मळावी. कणकेचे गोळे करून लाटावेत व तव्यावर दोन्ही बाजूंनी पोळी हलकीशी भाजून घ्यावी. आतील सारण तयार करण्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करावेत. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, आले-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, हळद, हिंग घालावे. त्यावर बटाटे घालावेत. वरून कोथिंबीर घालावी. थोडासा मैदा व पाणी मिसळून पेस्ट करावी. पोळी अर्धी कापून तिला कोनाचा आकार द्यावा. त्यात सारण भरावे. त्याचा वरील भाग मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवावा व खालचा कोनाचा भागही हलकासा पेस्टमध्ये बुडवावा. नंतर कोन तेलामध्ये तळावा. शेव व सॉसबरोबर सर्व्ह करावा. 
दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण १०-१२ रोटी कोन होतील. 

२. डाळ-तांदूळ ढोकळा 
साहित्य - अडीच वाटी उकडा तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, २ चमचे उडीद डाळ, ताक, हळद, मीठ, मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे. 
कृती - तांदूळ, मूग डाळ व उडीद डाळ वेगवेगळे मिक्सरला रवाळ (थोडेसे) वाटून घ्यावे किंवा जास्त प्रमाणात साहित्य घेऊन गिरणीतून रवाळ दळून आणावे. ढोकळ्यासाठी १ वाटी पीठ, साधारण पाव वाटी ताक, हळद, मीठ व पाणी घालून ५-६ तास पीठ भिजवावे. ढोकळा करताना ताटाला तेल लावून घ्यावे. पिठात पाणी घालून (साधारण ताटात पीठ ओतले असता ते पसरेल इतके) थोडासा सोडा घालावा व ढोकळा २० मिनिटे शिजवावा. फोडणी करण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून ती फोडणी ढोकळ्यावर घालावी. वरून कोथिंबीर व शेव घालावी. 
या प्रमाणामध्ये साधारण ३-४ व्यक्तींसाठी ढोकळा होईल. 

३. कढी वडा 
साहित्य - मध्यम आकाराचे ५-६ बटाटे, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, १ वाटी डाळीचे पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी ताक, १ कांदा, गोडा मसाला, हळद, हिंग, तिखट, मीठ, धने-जिरे पूड व पाणी. 
कृती - बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटा उकडून स्मॅश करावा. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. नंतर बटाटा व मीठ घालून वाफ आणावी. थोडासा गोडा मसाला घालावा. कोथिंबीर घालून त्याचे गोळे करावेत. नंतर बेसन पीठ, तांदळाचे पीठ, २ चमचे तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, धने-जिरे पूड व पाणी घालून बॅटर करावे. गोळे पिठात कालवून तेल गरम करून त्यात वडे तळावेत. नंतर कढी तयार करण्यासाठी ताक व १-२ चमचे बेसन पीठ त्यामध्ये गोळे न करता व्यवस्थित मिक्स करावे. पॅन गरम करून तेल, मोहरी, जिरे, हिंग, मेथी दाणे, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, आले किसून घालावे. फोडणी करावी. ही फोडणी गार झाल्यावर ताकात ओतावी. नंतर गॅसवर ठेवून उकळी आणावी. मीठ व थोडासाच गूळ घालावा (ही कढी थोडीशी पातळ असते.). 
दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण १२-१३ वडे होतील. 

४. दही वडा 
साहित्य - दोन वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, दही, बारीक शेव, कोथिंबीर, पाव वाटी सुके खोबरे, मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पूड, मीठ, दही, चिंचेची चटणी. 
कृती - उडीद डाळ व मूग डाळ ३-४ तास वेगवेगळी भिजवावी. नंतर मिक्सरला वेगवेगळी वाटावी व नंतर एकत्र करावी. डाळ वाटली की लगेच तळावी नाहीतर वडे तेलकट होतात. पीठ जास्त पातळ नसावे. तेल गरम करून वडे तळून घ्यावेत. नंतर साधारण अर्धे पातेले पाणी गरम करावे व त्यात हे वडे टाकावेत. साधारण ७-१० मिनिटे वडे पाण्यात ठेवावेत. नंतर वडे हलकेसे दाबून पाणी काढून टाकावे. दह्यामध्ये थोडीशी पिठीसाखर घालून मिक्स करावी. वडे सर्व्ह करताना प्लेटमध्ये वडे त्यावर दही, बारीक शेव, कोथिंबीर, मीठ, धने-जिरे पूड, तिखट, चिंचेची चटणी घालावी. खोबऱ्याची चटणी घालावी. ती चटणी करण्यासाठी पॅनमध्ये पाव चमचा तेल गरम 
करून त्यात मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पूड, सुक्या खोबऱ्याचा कीस, साखर, मीठ घालून २-३ मिनिटे परतावे व सर्व्ह करावे. 
दिलेल्या प्रमाणात ३-४ व्यक्तींकरिता पुरेसे वडे होतील. 

५. हांडवा 
साहित्य - एक वाटी रवा, पाऊण वाटी ताक, १ कांदा, लिंबाचा रस, १ चमचा साखर, चिमूटभर सोडा, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, तीळ. 
कृती - रव्यात ताक, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, १ चमचा साखर व पाणी घालून मिक्स करावे. अर्ध्या लिंबाचा रस घालावा. त्यात सोडा व पाणी घालून मिक्स करावे. नंतर एक पसरट पॅन गरम करून त्यात तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावा व वरील बॅटर घालावे. वरून तीळ घालून झाकण ठेवावे. १५ मिनिटांनी खालची बाजू पलटावी व परत १५ मिनिटे शिजवावे. 
दिलेल्या प्रमाणात ३-४ व्यक्तींकरिता हांडवा होईल. 

६. मटार कचोरी 
साहित्य - एक वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी वाटाणा, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, पाव वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, कोथिंबीर, लिंबू रस, हळद, तिखट, मीठ, धने-जिरे पूड, गरम मसाला, मिरची पेस्ट, आले पेस्ट. 
कृती - मैदा, गव्हाचे पीठ, ३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन, मीठ व पाणी घालून कणीक मळावी. सारण करण्यासाठी पॅन गरम करून १ चमचा तेल घालावे. वाटाणा १-२ मिनिटे परतावा. गार झाल्यावर मिक्सरला फिरवावा. जास्त बारीक करू नये. नंतर त्यामध्ये दाण्याचे कूट, तिळाचे कूट, पिठीसाखर, लिंबू रस, हळद, तिखट, मीठ, धने-जिरे पूड, गरम मसाला, मिरची पेस्ट, आले पेस्ट, कोथिंबीर घालावी. कचोरी करण्यासाठी गोळे काढून हलकेसे लाटून घ्यावेत. त्यात सारण भरावे. मोदकाला करतो त्याप्रमाणे त्याच्या कडा एकत्र करून गोळा करावा. हलकासा दाब द्यावा किंवा लाटावे. तेल गरम करून त्यात तळून घ्यावे. 
दिलेल्या प्रमाणात साधारण ३-४ व्यक्तींकरिता पुरतील एवढ्या कचोऱ्या होतील. 

७. रगडा पॅटिस 
साहित्य - एक वाटी पांढरा वाटाणा, ४-५ माध्यम आकाराचे बटाटे, कोथिंबीर, कांदा, बारीक शेव, चिंचेची चटणी, पाणीपुरीची पुरी, पुदिना, पाणीपुरी मसाला, दही, हिरवी चटणी. 
कृती - वाटाणा ७-८ तास भिजवावा. नंतर कुकरला ५ -६ शिट्या करून शिजवावा. हाताने दाबून शिजला असल्याचे तपासावे. बटाटे उकडून त्याचे तुकडे करावेत. पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला घालावा. आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी. वाटाणा, बटाट्यात पाणी घालून उकळी आणावी. थोडेसे दाटसर ठेवावे. मीठ, धने-जिरे पूड घालावी. हिरवी चटणी करण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, शिंदेलोण, पादेलोण, मीठ घालून मिक्सरला फिरवावे. नंतर त्यात पाणी व १-२ चमचा पाणीपुरी मसाला घालावा. सर्व्ह करताना प्लेटमध्ये हा रगडा घालावा, त्यावर पाणीपुरीची पुरी चुरा करून घालावी. चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कोथिंबीर, शेव, कांदा, दही घालावे. 
दिलेल्या प्रमाणात साधारण ३-४ व्यक्तींकरिता रगडा पॅटिस होते. 

८. पालक भजी आणि चटणी 
साहित्य - एक जुडी पालक, १ वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी दाण्याचे कूट, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, हिंग, तिखट, मीठ, साखर, धने-जिरे पूड. 
कृती - पालक पाने धुऊन चिरावीत. त्यात हळद, हिंग, तिखट, मीठ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, १-२ चमचे कडकडीत तेल, थोडेसे पाणी घालावे आणि मिक्स करावे. तेल गरम करून त्यात भजी घालावी व तळावी. चटणी करण्यासाठी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यावेत. त्यात साखर, मीठ, धने-जिरे पूड, हिरवी मिरची सगळे मिक्स करून मिक्सरला फिरवावे (जास्त बारीक करू नये). फोडणी करण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरे, हळद घालावी व ती फोडणी चटणीत घालावी. थोडेसे ताक किंवा पाणी घालावे. 

संबंधित बातम्या