झटपट नाश्ता!
फूड पॉइंट
आपण कितीही मोजून-मापून स्वयंपाक केला, तरी जेवण झाल्यानंतर काही पदार्थ शिल्लक राहतातच आणि रात्री केलेले पदार्थ सकाळपर्यंत खराबही होत नाहीत. त्यामुळे हे उरलेले पदार्थ टाकून न देता त्यापासून सकाळच्या नाश्त्यासाठी एखादा चांगला पदार्थ तयार करता येऊ शकतो. अशा शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून चटकन होतील अशा पदार्थांच्या चटपटीत रेसिपीज इथे देत आहोत...
पालक पुऱ्या
साहित्य : एक वाटी उरलेली पालकची भाजी, २ वाट्या कणीक, तळण्यासाठी तेल, २-४ चमचे तेलाचे मोहन, चवीनुसार मीठ, प्रत्येकी १ टीस्पून जिरेपूड, ओवापूड, तिखट.
कृती : प्रथम एका भांड्यात कणीक घ्यावी. त्यात पालकची भाजी घालावी. कणीक भिजवताना त्यात २-४ चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. नंतर दिलेल्या प्रमाणात जिरेपूड, ओवापूड, तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. पालकच्या भाजीमध्ये आधीच मीठ असल्याने या मिश्रणात नीट अंदाज घेऊन घालावे. आता मिश्रण व्यवस्थित घट्ट मळून घ्यावे. गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा हात लावावा. ५-१० मिनिटे मिश्रण भिजू द्यावे. नंतर छोट्या छोट्या पुऱ्या करून गरम तेलात खरपूस रंगावर तळाव्यात. टोमॅटो सॉस किंवा लोणच्या बरोबर सर्व्ह कराव्यात.
बटाटा रोल
साहित्य : दोन वाट्या बटाट्याची सुकी भाजी, अर्धी वाटी ओले खोबरे, १ टीस्पून मिरची-आले पेस्ट, चवीनुसार मीठ व साखर, अर्धा टीस्पून लिंबूरस, २-३ टेबलस्पून बारीक शेवया, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : प्रथम बटाट्याची भाजी कुस्करून घ्यावी. नंतर त्यामध्ये ओले खोबरे, मिरची-आले पेस्ट, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ व साखर घालावी. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लांबट गोल रोल्स करावेत. हे रोल्स बारीक शेवयामध्ये घोळवून घेऊन फ्रायपॅनमध्ये तेल घालून शालो फ्राय करावेत. गरमगरम रोल्स सॉसबरोबर सर्व्ह करावे.
कोबी कबाब
साहित्य : दोन वाट्या कोबीची भाजी, २ उकडलेले बटाटे, १ टेबलस्पून किसलेले चीज, १-२ टेबलस्पून रवा, १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून लिंबूरस, चवीनुसार मीठ व साखर, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. आता उकडलेले बटाटे कुस्करून घेऊन कोबीच्या भाजीत घालावेत. त्यात किसलेले चीज, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर घालावी. कोबीच्या मिश्रणाचे लहान लांबट रोल्स करावेत व ते रव्यामध्ये घोळवून घ्यावेत. नंतर फ्रायपॅनमध्ये शालो फ्राय करावेत किंवा डीप फ्राय करावेत. गरमगरम कबाब सॉसबरोबर सर्व्ह करावे.
टोमॅटो ऑम्लेट
साहित्य : दोन वाट्या पिठले, १ मोठा टोमॅटो, १ कांदा, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव टीस्पून खाण्याचा सोडा व तेल, पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी तांदळाचे पीठ.
कृती : पिठले जर घट्ट असेल, तर त्यात थोडे पाणी घालून पीठ सरबरीत करून घ्यावे. नंतर त्यामध्ये टोमॅटो व कांदा बारीक चिरून घालावा. चिरलेली कोथिंबीर घालावी. रवा व तांदळाचे पीठ घालावे. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. नंतर त्यामध्ये सोडा घालावा. फ्राय पॅनवर किंवा तव्यावर तेल टाकून छोटे-छोटे ऑम्लेट करून घ्यावेत. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावे.
भात वडे
साहित्य : दोन वाट्या भात, २ उकडलेले बटाटे, १ कांदा, चवीनुसार मीठ व साखर, मिरचीपूड, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळणीसाठी तेल.
कृती : प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. आता सोलून कुस्करून घ्यावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात भात घेऊन त्यामध्ये कांदा, बटाटा, मीठ, साखर, तिखट, कोथिंबीर हे सर्व पदार्थ घालून एकत्र करून घ्यावे. नंतर पाण्याचा हात लावून मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. आता त्याचे छोटे छोटे वडे करून तळून घ्यावेत व गरमगरम सर्व्ह करावेत.
ब्रेडचे पुडींग
साहित्य : ब्रेडच्या चार स्लाइस, अर्धा टीस्पून वेलची पूड, ३-४ वाट्या दूध, १-२ टेबलस्पून साखर, २ टीस्पून तूप, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : प्रथम दुधामध्ये साखर व कॉर्नफ्लोअर घालून घ्यावे व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मिश्रणात गुठळी होऊ देऊ नये. नंतर हे मिश्रण गॅसवर उकळण्यास ठेवावे. मिश्रण थोडे घट्ट होत आल्यावर गॅस बंद करावा. नंतर दुधाच्या मिश्रणात वेलचीपूड घालावी. नंतर तव्यावर तूप लावून ब्रेडच्या स्लाइस खरपूस भाजून घ्याव्यात. आता या स्लाइसचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. नंतर एका बोलमध्ये हे तुकडे घ्यावेत व त्यावर दूध घालावे. गार किंवा गरम आपल्या आवडीनुसार सर्व्ह करावे.
इडली उपमा
साहित्य : चार इडल्या, १ कांदा, चवीनुसार मीठ व साखर, २-३ मिरच्या, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, ४ चमचे तेल, अर्धे लिंबू, मोहरी-जिरे, हिंग, हळद.
कृती : प्रथम इडल्या कुस्करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे-मोहरी टाकावी. नंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हळद, हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यामध्ये इडलीचा चुरा घालावा. चवीनुसार मीठ व साखर घालावी. नंतर झाकण ठेवून वाफ आणावी. नंतर वरून कोथिंबीर घालून, लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करावे.
पावभाजी पराठे
साहित्य : शिल्लक राहिलेली पावभाजी, गव्हाचे पीठ व थोडासा मैदा, चवीनुसार मीठ (पावभाजीमध्ये मीठ असते. त्यामुळे लागत असेल, तरच मीठ घालावे).
कृती : एका भांड्यात पावभाजीची भाजी घ्यावी. आता त्यामध्ये मावेल एवढे गव्हाचे पीठ व थोडासा मैदा घालून मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे. मिश्रण घट्ट मळावे व त्याचे छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर तांबूस रंगात खरपूस भाजावेत. गरमागरम पराठा दही किंवा लोणीबरोबर सर्व्ह करावा.