रुचकर नॉनव्हेज

रेखा विनायक नाबर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

हरीभरी पापलेट करी 
साहित्य : पापलेटचे मध्यम आकाराचे तुकडे (अंदाजे दोन वाट्या), (हिरवी मिरची+आले+लसूण) पेस्ट ३ टेबलस्पून, खोबरे अर्धी वाटी, हळद पावडर, मीठ, चिंच, कोथिंबीर बारीक चिरून, खोबरेल तेल.
कृती : पापलेट धुवून त्याचे तुकडे करावेत. त्यांना हळद पावडर व मीठ लावून ठेवावे. जाड बुडाच्या भांड्यात तुकडे व बेताचे पाणी घालून वाफ काढावी. पेस्ट घालून हलकेच ढवळावे. खोबरे व चिंच एकत्र करून त्याच .....अंगाबरोबर पाणी घालून बारीक वाटावे. पापलेट शिजल्यावर खोबरेल तेल कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. 

कोळंबीची कोफ्ता करी 
साहित्य : दोन वाट्या सोललेली कोळंबी, २ कांदे (बारीक चिरून), २ टोमॅटो (बारीक चिरून), पाव वाटी दही, पाच हिरव्या मिरच्या, आले, कच्चा मसाला (धने, जिरे, लवंग, दालचिनी, मिरे, वेलदोडे) १ टेबलस्पून, १ अंडे, १ चमचा चण्याच्या डाळीचे पीठ, तेल, मीठ, हळद, कॉर्नफ्लॉवर.
कृती : कोळंबी साफ करून बारीक तुकडे करावे. बारीक चिरलेला कांदा २ टेबलस्पून घालून शिजवावी. कोरडी राहू द्यावी. हिरवी मिरच्या व आले एकत्र वाटून घ्यावे. त्यात शिजलेली कोळंबी घालून, मीठ घालून व्यवस्थित मिक्‍स करावे. अंडे चांगले फेटून घ्यावे. अंड्याच्या मिश्रणाचे लहान गोळे करावे. आवश्‍यकता असल्यास कॉर्नफ्लॉवर घालावे. गोळे अंड्यात बुडवून तळून घ्यावेत. हे झाले कोफ्ते. उरलेला कांदा, टोमॅटो, मसाल्याचे जिन्नस बारीक वाटून घ्यावेत. तापवलेल्या तेलात वाटलेला गोळा घालून परतून खरपूस करावी. दह्यात एक चमचा बेसन घालून चांगले मिक्‍स करावे. गुठळी होऊ देऊ नये. आवश्‍यकतेनुसार मीठ व पाणी घालावे. चांगले उकळल्यावर त्यात कोफ्ते सोडावे. नंतर थोडा वेळ मंद आचेवर ठेवावेत. कोफ्ते घातल्यावर जास्त उकळू नये. 

बांगड्याची उदामेथी 
साहित्य : बांगड्याचे मध्यम आकाराचे तुकडे. उडीद डाळ २ चहाचे चमचे. मेथी दाणे २ चहाचे चमचे, सुक्‍या मिरच्या, हळद पावडर, मीठ, खोबरे, चिंच, खोबरेल तेल, कांदा, तांदूळ १ चमचा.
कृती : बांगडे स्वच्छ करून त्याचे तुकडे करावेत. त्यांना हळद पावडर व मीठ लावून ठेवावे. १ चमचा तेलाने उडीदडाळ व मेथीदाणे खरपूस भाजून घ्यावेत. सुक्‍या मिरच्या पाण्यात भिजत घालाव्यात. जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा गरम खोबरेल तेलात बारीक चिरलेला कांदा परतून त्यावर बांगड्याचे तुकडे व बेताचे पाणी घालावे. सुक्‍या मिरच्या, भाजलेले मेथीदाणे, उडीदडाळ, खोबरे, ओले तांदूळ १ चमचा, चिंच व पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. बांगडे शिजल्यावर वाटण घालून उकळी आली, की गॅस बंद करावा. ही आमटी कोकणची खासियत आहे.

बांगड्यांचे हुमण
साहित्य : नारळाचा चव एक वाटी, पाच बांगडे, सुक्‍या मिरच्या, हळद, तिरफळ, ओल्या मिरच्या, कोकम, मीठ, खोबरेल तेल, तांदळाची कणी १ चमचा.
कृती : बांगड्याचे तुकडे स्वच्छ करून त्यांना मीठ व हळद लावून ठेवावे. नारळाचा चव, भिजवलेल्या सुक्‍या मिरच्या, तांदळाची कणी पाणी घालून बारीक वाटावे. तेल तापवून त्यात दोन ओल्या मिरच्या घालून फोडणी करावी. वाटण घालून चांगली उकळी आल्यावर त्यात बांगड्याचे तुकडे घालावेत. शिजताना ठेचलेली तिरफळे व कोकम घालावेत. आवश्‍यकतेनुसार पाणी व मीठ घालून उतरावे. तिरफळ हा गोव्यातील खास मसाल्याचा पदार्थ वापरून केलेले हुमण गोयकरांना खूप प्रिय आहे.

मुर्ग मसल्लम
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, अर्धी वाटी तेल, दालचिनी, १ मोठी वेलची, पाच बदाम, दोन लवंगा, पाव वाटी काश्‍मिरी मिरच्या, ४ मोठे कांदे, ४ मध्यम टोमॅटो, आले, लसूण पेस्ट, दही, हळद, बडीशेप, मीठ, कोथिंबीर.
कृती : चिकन स्वच्छ धुवून त्याला आले, लसूण पेस्ट, दही व हळद पावडर लावून ठेवावे. कांदा, टोमॅटो बारीक कापावे. कांदा, टोमॅटो, धने, लवंग, बदाम, काश्‍मिरी मिरची, वेलचीचे दाणे, दालचिनी, बडीशेप बारीक वाटावे. पॅनमध्ये तेल तापवून त्यात वेलचीची साले घालावीत. वाटलेला मसाला घालून चांगला परतून खरपूस करावा. नंतर त्यात चिकन घालून आवश्‍यकतेनुसार पाणी घालून शिजवावे. शेवटी मीठ घालून कोथिंबीर भुरभुरावी. ही पाककृती मोगलाई पद्धतीची आहे.

मटण मसाला
साहित्य : पाऊण किलो मटण, २ टेबलस्पून (आले + लसूण + कोथिंबीर) पेस्ट, मीठ, हळद, २ कांदे व २ टोमॅटो बारीक चिरून, २ वाट्या किसलेले सुके खोबरे, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, २ मिरी, १ टेबलस्पून गरम मसाला पावडर, २ टेबलस्पून तेल.
कृती : टण धुवून त्याला पेस्ट लावून ठेवावी. नंतर ते कुकरमधून वाफवून घ्यावे. कढईत तेल तापवून कांदा लालसर परतून घ्यावा. त्यावर टोमॅटो, मसाल्याचे जिन्नस परतून सुके खोबरे घालावे. खोबरे लालसर होईपर्यंत भाजावे. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये वाटावे. शिजलेल्या मटणात गरम मसाला पावडर व पाणी घालून चांगल्या तीन चार उकळ्या काढाव्या. वरुन मटण घालावे. मीठ घालून गॅस बंद करावा. मालवणी झणझणीत मटण मसाला लाजवाब.

मटार मशरूम माखनी
साहित्य : पाव किलो मशरूम, पाव किलो मटार, तेल, १ चमचा लोणी, जिरे, दोन कांदे, आले, लसूण पेस्ट दोन टेबलस्पून, १ चमचा तिखट, दोन चमचे धनेपूड, एक चमचा मेथी, दोन टोमॅटो, कोथिंबीर, ताजे क्रीम, मीठ, किचनकिंग मसाला.
कृती : मशरुम्स स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करावे व लोणी एकत्र तापवावे. त्याच जिऱ्याची फोडणी करावी. कांदे व टोमॅटो बारीक चिरून परतावे. त्यात आले, लसूण पेस्ट, तिखट, धने पावडर टाकून व्यवस्थित मिक्‍स करावे. तेल सुटेपर्यंत परतत राहावे. कसूरी मेथी तव्यावर गरम करून टाकावे. त्यात मटार दाणे घालावे. पाणी घालून जरासे शिजवावे. नंतर मशरुम्स घालावे. मशरुम्स लवकर शिजतात. मटारला शिजायला वेळ लागतो. मशरुम्स शिजल्यावर मीठ घालावे. किचन किंग मसाला घालावा. फ्रेश क्रीम व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. यात कोणत्याही प्रकारचा मसाला घातला तरी पदार्थ लज्जतदार होतो.

मसालेदार वांगे
साहित्य : वांगी, बटाटे, कांदा उभा चिरून अर्धी वाटी, कांदा बारीक चिरून पाव वाटी, लवंग, खसखस, दालचिनी, धने, मिरे, शहाजिरे, लसूण, आले, ओले खोबरे, चिंच, गूळ, गरम मसाला पावडर, हळद, तिखट.
कृती : तव्यावर गरम तेलात आले, लसूण व मसाल्याचे जिन्नस परतावे. त्यात उभा चिरलेला कांदा परतून खोबरे घालावे. खोबरे लालसर होईपर्यंत भाजावे. वांग्याचे व बटाट्याचे (साले काढून) तुकडे करावे. तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून त्यावर वांगी व बटाट्याचे तुकडे घालावे. त्यात हळद, मिरची, गरम मसाला घालून जरुरी पुरते पाणी घालावे. भाजलेला मसाला चिंच व पाणी घालून बारीक वाटावा. वांगी, बटाटे शिजले की किंचित गूळ घालून वाटण व मीठ घालावे.

मुगा गाठी
साहित्य : एक वाटी मोड आलेले मूग, दोन लाल सुक्‍या मिरच्या, १ चमचा धने, अर्धी वाटी ओले खोबरे, हिंग, मोहरी, कढीपत्ता, मीठ, चिंच, गूळ, तेल, काजूगर, हळद.
कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात काजूगर टाकून लालसर करावे व बाजूला ठेवावे. त्याच तेलात लाल मिरच्या व धने भाजून बाहेर काढून ठेवावे. उरलेल्या तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता अशी फोडणी करून मूग घालावे. आवश्‍यकतेनुसार पाणी घालून त्यात हळद घालावी. ओल्या खोबऱ्यात भाजलेले धने, मिरची व थोडीशी चिंच घालून बारीक वाटावे. मूग शिजल्यावर त्यात किंचित गूळ, मीठ, काजू व वाटण घालून उकळी काढावी. हा पदार्थ कारवारची खासियत आहे. कोणत्याही देवकार्याला हवीच.

गोळ्याची आमटी
साहित्य : अर्ध्या नारळाचा चव, २ कांदे बारीक चिरून, १ कांदा उभा चिरून, मालवणी गरम मसाला, चण्याचे पीठ दीड वाटी, हळद, मीठ, हिंग, लसूण, चिंच, गूळ, तेल, तिखट.
कृती : तव्यावर तेल टाकून उभा चिरलेला कांदा, १० लसूण पाकळ्या भाजाव्यात. त्यावर नारळाचा चव टाकून खरपूस भाजावे. थंड झाल्यावर बारीक वाटावे. आवश्‍यकतेनुसार पाणी घालावे. चण्याच्या पिठात हळद, मीठ, बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्‍स करून घट्ट भिजवावे. लहान लहान गोळे करून ठेवावेत. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. हिंग घालून वाटलेले खोबरे घालावे. तेलावर परतून ४ वाट्या पाणी घालावे. त्यात मसाला, हळद, तिखट, मीठ, किंचित गूळ घालावे. चांगली उकळी आली, की अलगद गोळे सोडावे. गोळे शिजले, की गॅस बंद करावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या