सुटीतला खाऊ

रेवा कुलकर्णी, कोल्हापूर    
गुरुवार, 5 एप्रिल 2018

फूड पॉइंट

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

स्वीट कॉर्न दाबेली
साहित्य : स्वीटकॉर्न २, दाबेली ब्रेड २, भाजून सोलून शेंगदाणे पाव वाटी, दाबेली मसाला २ चमचे, तिखट २ चमचे, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार, लिंबू १, डाळिंबाचे दाणे २ वाटी, तेल २ चमचे, कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी, कांदा बारीक चिरून १ वाटी, बटर २ चमचे, बारीक शेव १ वाटी, टोमॅटो केचप.
कृती : स्वीटकॉर्न उकडून दाणे काढून घ्यावेत. काढलेले दाणे मिक्‍सरला फिरवून घ्यावेत व फिरवताना त्यात लिंबू पिळावे. वाटण कुंड्यांत काढून घ्यावे. कढईत तेल कोमट करून घ्यावे. त्यात कॉर्नचे वाटण घालावे व हलवून घ्यावे. त्यात तिखट, मीठ, साखर मिक्‍स करून घ्यावे. वरून दाबेली मसाला घालून एक हलकीशी वाफ द्यावी. तयार मिश्रण एका ताटात थापावे. आता भाजलेले शेंगदाणे (त्यावर तेल, तिखट व मीठ घालून शेंगदाणे परतून घ्यावेत.) डाळिंबाचे दाणे पसरावेत. वरून कोथिंबीर घालावी. मिश्रण थोडे थंड झाले, की ब्रेड मधोमध कापून घ्यावा. ब्रेडवर सुरीने बटर लावून आतून ब्रेड भाजून घ्यावा. त्यात दाबेलीचे मिश्रण भरावे. केचप वाटीत काढावा. त्यात ब्रेड बुडवावा. तव्यावर बटर टाकून बंद ब्रेड वरून व खालून भाजावा. केचपमध्ये ब्रेड बुडवावा. शेवेत व कांद्यात ब्रेड बुडवून दाबेली सर्व्ह करावी.
टीप : हे वाटण चार ते पाच जणांना पुरते.

झटपट चकली
साहित्य : गव्हाचे पीठ वाटीभर, तिखट १ चमचा, मीठ चवीनुसार, तीळ पाव वाटी, ओवा अर्धा चमचा, तेल तळण्यासाठी.
कृती : गव्हाचे पीठ सुती कापडात घेऊन त्याची  पुरचुंडी तयार करावी. ही पुरचुंडी कुकरला लावावी. तीन शिट्या करून कुकर बंद करावा. (लागोपाठ तीन शिट्या कराव्यात. कुकर बंद करावा.) कुकर गार होताच पुरचुंडी बाहेर काढावी. पीठ घट्ट झालेले दिसेल. हे पीठ व्यवस्थित लाटण्याने, वरवंट्याने एकजीव करून घ्यावे. पिठातील गाठी मिक्‍सरला फिरवून बारीक करून घ्याव्यात. पीठ चाळणीने चाळावे. आता या पिठात गार पाणी + तिखट + मीठ + ओवा घालावा. पीठ मळून घ्यावे. (मोहन घालू नये.) कढईत तेल गरम करायला ठेवावे. चकलीच्या सोऱ्याला पाणी लावून मळलेला गोळा सोऱ्यात भरावा. चकल्या पाडून घ्याव्यात. पाडलेल्या चकल्या हळूवार तेलात सोडून चकल्या खमंग तळून घ्याव्यात. दह्याबरोबर, चहाबरोबर सर्व्ह करावे.

अंकुरित बर्गर
साहित्य : बर्गर ब्रेड ४, मटकी, मूग, मसूर मोड आणून दीड वाटी वेगळे भिजवून वेगळे मोड आणावेत. हिरवी मिरची - ४ ते ५,  कोथिंबीर अर्धी वाटी, बटाटा - १ मोठा (उकडून सोललेला), बटर, चीज चमचाभर, लेट्यूस - ४ पाने (नसल्यास कोबीची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत.), काकडी, कांदा, टोमॅटो - गोल चकत्या प्रत्येकी २, मेयोनिज - १ चमचा (नसल्यास साय घेऊन त्यात तिखट + मीठ + साखर घालून फेटून मिश्रण तयार करावे.) तेल आवश्‍यकतेनुसार.
कृती : मोड आलेली कडधान्ये, मिरची, कोथिंबीर, साखर व मीठ घालून मिक्‍सरला फिरवून घ्यावे. तयार वाटण कुंड्यांत काढावे. त्यात बटाटा किसून घालावा. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. आता हाताला तेल लावून तयार मिश्रणाची हातावर पॅटी थापावी. लागेल तेवढ्या पॅटी थापून घ्याव्यात. गॅसवर पॅन गरम करावे. त्यात अर्धी वाटी तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात पॅटी घाला. दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करावे. (वाटल्यास डीप फ्राय करावे.) बर्गर ब्रेड दुसऱ्या गरम तव्यावर बटर टाकून भाजून घ्यावे. मेयोनिज किंवा सायीचे मिश्रण दोन्ही ब्रेडना लावून घ्यावे. लेट्यूसचे पान एका बनवर ठेवावे. त्यावर एक कांदा चकती ठेवावी. त्यावर बॅगर पॅटी ठेवावी. त्यावर कांदा, काकडी व टोमॅटोची चकती ठेवावी. चीज स्लाइस किंवा स्प्रेड चीज १ चमचा घालावे. त्यावर परत लेट्यूसचे पान ठेवावे. त्यावर दुसरा बन ठेवून टूथपिक लावावे व सर्व्ह करावे.

स्वीट कॉर्नचे उप्पीट
साहित्य : स्वीटकॉर्न ४ ते ५, मिरच्या २ ते ३, हळद - पाव चमचा, मीठ चवीनुसार, साखर १ चमचा, लिंबू १, कढीपत्ता पाव वाटी, कांदा १ मोठा बारीक चिरून, टोमॅटो २ बारीक चिरून, मटार अर्धी वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी, ओले खोबरे खोवून १ वाटी, तेल फोडणीसाठी + मोहरी + हिंग चीज - प्रोसेस १ तुकडा.
कृती : स्वीटकॉर्न किसून घ्यावेत. कढईत तेल गरम करावे. मोहरी टाकून ती तडतडल्यावर त्यात मिरची + कांदा परतावा. टोमॅटो, मटार घालून परतावे. हळद + हिंग घालावे. कढीपत्ता घालून परतावे. कांदा नरम होताच त्यात किसलेले कॉर्न घालावे. चांगले परतावे. मीठ + साखर घालावी. लिंबू पिळावे. चांगले परतावे. वरून चीज किसून पसरावे. खोबरे+ कोथिंबीर घालून गरम-गरम सर्व्ह करावे.
टीप : कॉर्नचा कीस परतून होताच झाकण ठेवून वाफ काढावी.

चीज फ्राईज
साहित्य : बटाटे ४-५ उकडून किसून घेतलेले, बारीक रवा १ वाटी, ओले खोबरे + मिरची + कोथिंबीर चटणी, मटार - वाफवलेले १ वाटी, चीज स्लाइस ४ ते ५, मीठ, साखर चवीनुसार, टोमॅटो केचप.
कृती : बटाटे व्यवस्थित मीठ घालून मळून घ्यावेत. हिरव्या चटणीतच मीठ व साखर घालून घ्यावे. चटणीत मटार मिक्‍स करावे. मिश्रण घट्ट ठेवावे. चीज स्लाइस घेऊन त्यात चटणीचे मिश्रण घालावे. स्लाइसची लांब सुरळी करावी. ही सुरळी बटाट्याची पॅटी हातावर थापून त्यात भरावी. बुलेटप्रमाणे लांब सुरळी करावी. बटाटा स्लाइसला नीट कव्हर करावे. अशाच सात ते आठ बुलेट करून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात हे बुलेट मंद आचेवर तळून घ्यावेत. टिश्‍यू पेपरवर काढून जास्तीचे तेल बाजूला करावे. टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

गुलकंदाच्या करंज्या
साहित्य : गव्हाचे पीठ - दोन वाटी, ओले खोबरे १ वाटी, गुलकंद - अर्धी वाटी, तेल तळण्यासाठी.
कृती : गव्हाचे पीठ चाळून घ्यावे. पाणी घालून नरमसर कणीक मळून घ्यावी खोबरे व गुलकंद मिक्‍स करून घ्यावे. मळलेली कणीक अर्धा तास झाकून ठेवावी. कणीक मुरून होताच त्याचे पेढ्याएवढे गोळे करावेत. गोल पारी लाटून घ्यावी. त्यात गुलकंदाचे सारण भरावे. करंजी तयार करावी. चिरण्याने चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करावे. गरम तेलात या करंज्या मंद आचेवर तळून घ्याव्यात. आवडत असल्यास काजू, बदाम, पिस्ते, इतर ड्रायफ्रूट घालावे किंवा डिंक तळून घालावा.

हेल्दी पाणीपुरी
साहित्य : डाळिंबाचे दाणे १ वाटीभर, पाणीपुरीच्या पुऱ्या (शक्‍यतो रव्याच्या), चाट मसाला, मीठ + साखर चवीनुसार, कांदा - १ मोठा चिरून, शेव - पाव वाटी (शेव जरुरीपुरती घालावी, डाळिंबाचा रस थंड करावा.)
कृती : डाळिंबाच्या दाण्यांचा रस काढावा. (तयार रस आणला तरी चालेल) रस गाळावा. त्यात मीठ + साखर + चमचाभर चाट मसाला घालावा. पाणीपुरीच्या पुरीला भोक पाडावे. त्यात डाळिंबाचा रस घालावा. अगदी थोडी शेव भुरभुरावी. कांदा घालावा व सर्व्ह करावे.

ॲपल शेक
साहित्य : सफरचंद १ (साल काढून), दूध - ग्लासभर, काजू २-३, पिस्ते २-३, बदाम २-३, गरम पाण्यात भिजत घालावेत. मध २ चमचे.
कृती : सफरचंदाचे बारीक तुकडे करावेत. मिक्‍सरमध्ये घालावेत. दूध घालावे. काजू + बदाम + पिस्ते मिक्‍सरमध्ये घालावेत. मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे. मध घालावा. मिक्‍सरला फिरवून घ्यावे. थंड करून सर्व्ह करावे.

फ्रूट पंच
साहित्य : डाळिंबाचा रस अर्धी वाटी, कलिंगडाचा रस अर्धी वाटी, संत्र्याचा रस - अर्धी वाटी, मोसंबीचा रस - अर्धी वाटी, मीठ + साखर + सैंधव + चाट मसाला, लागल्यास साखर, आल्याचा रस - २ चमचे.
कृती : सर्व रस एकत्र करून ढवळून घ्यावेत. त्यात मीठ + साखर चवीनुसार घालावी. पाव चमचा सैंधव व अर्धा चमचा चाट मसाला घालावा. आल्याचा अर्धा रस घालावा. ढवळा. गार करावे. सर्व्ह करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या