वरी पॅटीस - चिकन रॅप

रोहिदास ह. ठाकूर, वडाळा, मुंबई
शनिवार, 8 डिसेंबर 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत. 

वरीचे पॅटिस
साहित्य : दोन वाट्या एक तास भिजवलेली वरी (वरई), २ उकडलेले बटाटे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, लहानसा चिरलेला तुकडा, १ वाटी राजगिरा पीठ, जिरे, तेल, मीठ, सर्व्हिंगसाठी खोबऱ्याची चटणी.
कृती : प्रथम बाऊलमध्ये वरी घेऊन, त्यात २ उकडलेले बटाटे कुस्करून घालावे. त्यात ३ ते ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेले आले, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, १ लहान वाटी राजगिरा पीठ टाकून आवश्‍यक तेवढे पाणी टाकून चांगले मळून घ्यावे. पॅनमधील गरम तेलावर मिश्रणाचे पॅटिस वळून खरपूस शॅलो फ्राय करून गरमागरम पॅटिस खोबऱ्याच्या चटणी बरोबर खायला द्यावे.

सिमला मिरची पॅटिस
साहित्य : तीन रंगाच्या सिमला मिरच्या पाव किलो, २ उकडलेले बटाटे, लहानसा आल्याचा तुकडा, २ चमचे मिरची कोथिंबीर पेस्ट, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, तेल, मीठ, १ वाटी टोमॅटो प्युरी, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस.
कृती : प्रथम सिमला मिरच्या कापून त्याची मिक्‍सरमधून भरड करून घ्यावी. भरड एका भांड्यात काढून त्यात उकडलेले बटाटे कुस्करून, २ चमचे आलं, मिरची, कोथिंबीर पेस्ट, कापलेले आल्याचे तुकडे, १ वाटी टोमॅटो प्युरी, २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणाचे पॅटिस वळून पॅनमधील तापलेल्या तेलावर खरपूस शॅलोफ्राय तळून घ्यावे. गरमागरम पॅटिस टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे.

आंब्याचे शंकरपाळे
साहित्य : दोन वाटी मैदा, १ वाटी आंब्याचा रस किंवा पल्प, २ ते ३ चमचे पिठी साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तूप, मीठ.
कृती : बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात आंब्याचा रस, २ ते ३ चमचे पिठी साखर व चिमूटभर मीठ टाकून थोडे तूप टाकून चांगले मळून घ्यावे. त्यात वेलची पूड टाकावी. परत मळून घ्यावे. मिश्रणाची पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्या कापून कढईतील गरम तुपावर खरपूस तळून खायला द्यावे.

सॅण्डविच उत्तप्पा
साहित्य : तयार डोसा पीठ, एक बाउल गोल कापलेले कांदे, टोमॅटो, सिमला मिरचीचे काप, पनीर, चिली फ्लेक्‍स, बटर, मीठ, तेल, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस.
कृती : पॅनमध्ये तेल टाकून त्यावर छोटा उत्तप्पा टाकावे. थोडा शिजल्यावर त्याला वरून बटर लावून वरून कांद्याचे काप व चिली फ्लेक्‍स पसरून झाकण ठेवून शिजवावे. दुसऱ्या पॅनमध्ये दुसरा उत्तप्पा टाकून त्यावर बटर पसरून टोमॅटोचे काप व सिमला मिरची काप ठेवून झाकण ठेवून थोडे शिजवावे. पॅनमध्ये तिसरा उत्तप्पा टाकून त्याला शिजवून बाजूला ठेवावे. पहिल्या दोन्ही उत्तप्पावर पनीर किसून टाकावे. पॅनमध्ये दोन्ही उत्तप्पा एकावर एक ठेवून, त्यावर तिसरा उत्तप्पा ठेवून वरून झाकण ठेवून थोडा वेळ शिजवावे. शिजलेले उत्तप्पा प्लेटमध्ये काढून त्याचे काप करून टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे.

प्रॉन्स कबाब 
साहित्य : दोन वाटी प्रॉन्स, ५० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम मैदा, हिरवी चटणी, लिंबाचा रस, २ चिरलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर, २ चमचे आलं, लसूण पेस्ट, मीठ, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस, हळद, कॉर्नफ्लॉवर, तेल.
कृती : प्रथम मिक्‍सरमधून प्रॉन्स बारीक करून घ्यावे. नंतर प्रॉन्स एका बाऊलमध्ये घेऊन त्यात किसलेले पनीर, २ चिरलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर, २ चमचे आलं लसूण पेस्ट, १ चमचा हिरवी चटणी, अर्धा चमचा हळद, २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करून घ्यावे. मिश्रणाचे कबाब वळून ते मैद्यात घोळवून पॅनमधील गरम तेलावर खरपूस शॅलोफ्राय करून घ्यावे. गरमागरम कबाब टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे.

स्टफ चिकन वडे 
साहित्य : तांदळाचे, ज्वारीचे, उडीद डाळीचे, चना डाळीचे पीठ प्रत्येकी १ लहान वाटी, शिजलेले बारीक तुकडे केलेले चिकन, लाल तिखट, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे आलं लसूण पेस्ट, २ चमचे गरम मसाला, तेल, मीठ, सर्व्हिंसाठी टोमॅटो सॉस.
कृती : प्रथम सगळी पीठे घेऊन एकत्र मळून घ्यावी. पॅनमध्ये तेल टाकून त्यात कांदा, लसूण टाकून परतावे. त्यात पीठाचे वडे करून एका वड्यावर चिकनचे मिश्रण पसरून त्यावर दुसरा वडा टाकून सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून कढईतील तेलावर खरपूस तळून घ्यावे. गरमागरम वडे टोमॅटोबरोबर खायला द्यावे.

फ्राइड चिकन रॅप
साहित्य : दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन, १ चमचा गरम मसाला, १ चमचा चिकन मसाला, हळद, तेल, आलं लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो सॉस, बटर, चीज, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ, तयार चपात्या, सर्व्हिंगसाठी टोमॅटो सॉस.
कृती : प्रथम पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, २ चमचे आलं लसूण पेस्ट व बोनलेस चिकनचे तुकडे टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात १ चमचा गरम मसाला, १ चमचा चिकन मसाला, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून चांगले परतून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. पॅनमध्ये बटर लावलेली चपाती ठेवून, त्यावर टोमॅटो सॉस पसरून त्यावर चिकनचे मिश्रण पसरून वरून चीज किसून घालावे व त्याचा रोल करून थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घ्यावे. गरमागरम रोल टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे.

सुक्‍या बोंबलाचा तेलकांदा
साहित्य : दहा सुके बोंबील, दोन मोठे कांदे, दोन चमचे लाल तिखट मसाला, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ व तेल.
कृती : प्रथम सुके बोंबील साफ करून त्याचे तुकडे करून पाण्यात टाकून ठेवावे. कांदे बारीक चिरून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून त्यात पाव चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मंद आचेवर थोडा वेळ शिजवावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. हे मिश्रण शिजेपर्यंत पाण्यात ठेवलेले बोंबील काढून त्यातील मधला काटा काढून टाकावा. हे साफ केलेल बोंबील शिजलेल्या कांद्यात घालावा. मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवावे. गरमागरम तेल कांदा चपाती किंवा भाकरीबरोबर द्यावे.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या