चटकदार चवदार पौष्टिक नाश्‍ता

संपदा सुनिल बोकील, सातारा
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

फूड पॉइंट

सकाळी नाश्‍त्याला काय करावे हा रोजचा सतावणारा प्रश्न. त्यासाठी सोप्या आणि पौष्टिक पदार्थांच्या पाककृती...

चटका-पटका उत्तप्पा
साहित्य : चार वाट्या मूग डाळ, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर.
कृती : मूग डाळ थोड्या कोमट पाण्यात भिजत घालावी. तासाभराने मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्यावी. पाणी बेताने घालावे. पीठ तव्यावर बसेल या दृष्टीने वाटावे. पिठात थोडे मीठ घालून एकजीव करावे. नॉनस्टिक तव्यावर पीठ थोडेसे पसरावे. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शिमला मिरची घालावी. बाजूने थोडे तेल किंवा तूप सोडावे. नंतर सॉस किंवा चटणीबरोबर हा उत्तप्पा सर्व्ह करावा. चटकन आणि पटकन होणारा हा चटका-पटका उत्तप्पा छान लागतो.

स्प्राऊट पुरी

साहित्य : भिजवलेले मोड आलेले कडधान्य, कणीक, तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पूड, ओवा, तीळ, साखर.
कृती : हल्ली बाजारात सर्व प्रकारची मोड आलेली कडधान्ये मिळतात. ती मिक्सरमध्ये फिरवून घ्यावीत. फोडणी करून त्यात कडधान्ये, मिरची, मीठ, चवीपुरती साखर घालून उसळीसारखे करून घ्यावे. कणकेत हळद, मीठ, तिखट, धने-जिरे पूड, मीठ, चमचाभर साखर, थोडा ओवा, तीळ घालून कणीक किंचित घट्टसर भिजवावी. दोन लाट्या कराव्यात. त्यात उसळीचे सारण घालून पुरी करावी व गरम तेलात तळावी. गरमागरम स्प्राऊट पुरी सर्व्ह करावी.

दडपे पोहे

साहित्य : पातळ पोहे, २ कांदे, २ टोमॅटो, कोथिंबीर, खारातली किंवा तळणीची मिरची, २ काकड्या, मीठ, साखर, ओले खोबरे (असल्यास).
कृती : पातळ पोहे आधी चाळणीने चाळून घ्यावे. सर्वसाधारण दडपे पोहे म्हटले की नारळ पाहिजेच असा समज असतो, पण तसे काही नाही. साधारण माणशी १ मूठ पातळ पोहे घ्यावेत. प्रत्येकी २ कांदे, टोमॅटो, काकडी घ्यावे. कांदा, काकडी किसावी, म्हणजे त्या रसात पोहे भिजतील. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. तळणाची मिरची घालावी. मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी करावी. त्यात थोडा कढीपत्ता असल्यास घालावा. तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरे घालून डिश सजवावी.

पापड पोहे

साहित्य ः पातळ पोहे, आवडीचे पापड, तिखट, मीठ, पिठीसाखर, हळद, मेतकूट.
कृती ः पातळ पोहे घ्यावेत. कढईत थोडे तेल घेऊन थोडी हळद घालून मंद आचेवर पोहे भाजून घ्यावेत. आपल्याला आवडतील ते पापड तळून त्याचा चुरा करून त्यात मिक्स करावेत. थोडे तिखट, मीठ, १ चमचा पिठीसाखर आणि थोडे मेतकूट मिसळावे. हे पापड पोहे ऐनवेळीही खाता येतात आणि करून ठेवले तर साधारण आठ दिवस टिकतात.

मेथी पराठा

साहित्य : एक मेथीची जुडी, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, तेल, डाळीचे पीठ, हिंग, मोहरी, हळद, कणीक.
कृती : प्रथम मेथी निवडून धुऊन घ्यावी. नंतर बारीक चिरून चांगली वाळू द्यावी. शक्यतो जास्त पाणी नको. नेहमीप्रमाणे मोहरीची फोडणी करावी. त्यात आले, मिरची, लसूण, कोथिंबीर याचे वाटण घालावे. नंतर मेथी घालून वाफ आणावी. त्यानंतर साधारण १ वाटी डाळीचे पीठ घालून भाजी मंद आचेवर कोरडी होईपर्यंत परतावी. थोडे चवीपुरते मीठ आणि साखर घालावी. भाजी ताटात काढून थंड होऊ द्यावी.
कणकेत थोडी हळद आणि मीठ घालावे. पुरणपोळीप्रमाणे भाजी घालून उंडा करावा आणि अलगद लाटावा. तेल किंवा तूप सोडून हे पराठे भाजावेत. लोणी किंवा लोणच्याबरोबर गरमागरम खाण्यास द्यावे.

रताळ्याचा कीस
साहित्य : अर्धा किलो रताळी, मिरची, मीठ, साखर, कोथिंबीर, शेंगदाण्याचे कूट, तूप, जिरे.
कृती : रताळी स्वच्छ धुवावीत, पुढील भाग थोडासा कापून किसणीवर किसावी. कीस पाण्यात घालावा म्हणजे काळा होत नाही. तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यात कीस घालावा व गॅस मध्यम आचेवर ठेवून वाफ आणावी. नंतर त्यात मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट, मिरची घालावी. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रताळयाचे पॅटीस
साहित्य : पाच-सहा बटाटे, ५-६ रताळी, २ मिरच्या, मीठ, साखर, ओले खोबरे, कोथिंबीर, २ चमचे साबुदाणा पीठ.
कृती : पाच-सहा बटाटे उकडून घ्यावेत. त्यात साधारण मोठे २ चमचे साबुदाणा पीठ मिसळावे, थोडे चवीनुसार मीठ घालावे. ५-६ छोटी रताळी किसावीत. तो कीस पाण्यात घालावा म्हणजे काळा पडणार नाही. थोड्याशा तुपावर थोडेसे जिरे घालून त्यात कीस, मीठ, साखर, दोन मिरच्या, ओले खोबरे घालावे. कीस सुटसुटीत झाला पाहिजे. बटाट्याची पारी करावी. त्यात कीस घालून उंडा करावा. परत एकदा साबुदाणा पिठात घोळवून गुलाबी रंग येईपर्यंत तळावा. चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.

रोटी कॉर्न समोसा
साहित्य : पाच ते सहा मक्याची कणसे, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, मीठ, साखर, शिळ्या चपात्या किंवा ब्रेड, सॉस, पुदीना चटणी.
कृती : मक्याची कणसे किसून त्यात साधारण मूठभर कोथिंबीर, चार-पाच मिरच्या, बोटभर आले बारीक करून त्यात घालावे. हे सर्व घालून मिश्रण सरसरीत करावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. ब्रेडला सॉस, पुदीना चटणीचा थर द्यावा, त्यावर हे मिश्रण घालावे. तव्यावर साजूक तूप घालून ब्रेड भाजावा किंवा टोस्टरमध्ये घालून गरमागरम खावा. पोळी असेल तर कापून लांबट पट्या कराव्यात. असेच थर लावून सामोशाप्रमाणे घडी घालून गरमागरम खाण्यास हरकत नाही.

रताळ्याची फेणी

साहित्य : रताळी, तूप आणि साखर.
कृती : रताळी किसून घ्यावीत. नॉनस्टिक तव्याला तुपाचा हात लावावा नंतर रताळ्याचा कीस त्यावर भुरभुरावा. हाताला पाणी लावून थालीपिठासारखा एकसारखा आकार येईल असे पसरावे. त्यावर १ चमचा साखर सगळीकडे पसरावी. मंद आच ठेवावी व पॅनवर ताटली ठेवावी. या फेण्या गुलाबी होईपर्यंत भाजाव्यात. पटकन होणारा हा खरपूस पदार्थ सर्वांना आवडेल. गोडसर असल्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात.पंचरत्न डोसा
साहित्य : प्रत्येकी १ छोटी वाटी तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि २ वाट्या तांदूळ.
कृती : दुसऱ्या दिवशी करायचे असेल, तर आदल्या दिवशी सकाळी सर्व डाळी आणि तांदूळ भिजत घालावे आणि रात्री मिक्सरवर वाटावे. वाटत असताना त्यामध्ये बेताने पाणी घालावे. साधारण पळीवाढे असे सैलसर पीठ करावे. सकाळी त्या पिठात थोडे मीठ घालून गरमागरम डोसे करावेत. बटाटा भाजीबरोबर सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या