उन्हाळ्यासाठी गारेगार

सविता कुर्वे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

फूड पॉइंट
उन्हाळा तापू लागला, की थंडाई, मिल्कशेक, लस्सी यासारख्या पदार्थांची प्रकर्षाने आठवण येते. उन्हाळा सुसह्य करणाऱ्या थंडगार मिल्कशेकच्या रेसिपीज...  

स्पेशल शेक
साहित्य : एक वाटी पोहे, पाव वाटी भाजून साल काढलेले दाणे, एक केळे, दोन कप थंडगार दूध, दोन चमचे रोझ सिरप, ४ चमचे काजू तुकडा, चैरी किंवा टुटीफ्रुटीच तुकडे
कृती : पोहे भाजून थंड करावे. मिक्‍सर जारमध्ये केळ्याचे तुकडे, गार दूध, २ चमचे साखर, दोन चमचे रोझ सिरप घालून चर्न करावे. ग्लासमध्ये टुटीफ्रुटीच तुकडे, एक चमचा भाजके दाणे घालावे. त्यावर तयार दूध घालावे. पुन्हा थोडे काजू दाणे घालावे व दूध घालावे. वरती चेरीचे तुकडे घालावे.

स्पेशल फ्रूट मिल्क
साहित्य : एक वाटी (पातळ जाड कुठलेही), दोन कप दूध, एक ॲपल, दोन केळी, पाव वाटी पायनापल तुकडे, बदाम, काजू, पिस्ता तुकडे, ३ चमचे साखर, चेरी, आइस्क्रीम आवडीचा फ्लेवर किंवा व्हॅनिला
कृती : सर्व फळे फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊ द्यावी. केळ्यांच्या तुकड्यांवर साखर घालून काट्याने मॅश करून घ्यावे. त्यात अर्ध्या ॲपलचे लहान तुकडे, अननसाचे तुकडे घालून मिक्‍स करावे. पोहे कढईत मंद गॅसवर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. चांगले कुरकुरीत झाले पाहिजे. ते थंड होऊ द्यावे. ग्लासमध्ये आधी मिक्‍स फळांचा लेअर द्यावे. दोन चमचे घालावे. त्यावर ड्रायफ्रुटचे तुकडे घालावे. त्यावर ३-४ चमचे पोहे घालावे. नंतर थंडगार दूध आणि वरती आइस्क्रीम स्कूप घालावा. वरती चेरी लावून सर्व्ह करावे.

कोको कूल स्मूदी
साहित्य : अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा ग्लास नारळ पाणी, १ केळे, ५-६ पुदिना पाने, बर्फ व अर्धा ग्लास साधे गार पाणी, बदाम
कृती : मिक्‍सर जारमध्ये नारळाचा चव किंवा कीस, नारळपाणी, केळे, पुदिना पाने, बर्फ व साधे पाणी जरुरीप्रमाणे घालून चर्न करावे. ग्लासमध्ये ओतावे. त्यावर बदामाचे काप घालून सर्व्ह करावे. सर्व जिन्नस फ्रीजमध्ये थंड करून वापरावे.

रोझ कोको
साहित्य : दोन वाट्या गुलाबाच्या पाकळ्या, पाव वाटी साखर, एक चमचा सोप, एक वाटी नारळाची मलई व एक वाटी नारळाचे पाणी, १ चमचा सब्जा
कृती : गुलाब पाकळ्या, साखर, सोप घालून कढईत परतावे. साखर विरघळली की गॅस बंद करावा व थंड होऊ द्यावे. गुलकंद तयार. मग १ वाटी नारळाची मलई व त्याचे पाणी. भिजवलेला सब्जा व तयार १ चमचा गुलकंद व बर्फ घालून चर्न करावे.

ॲपल कोको मिल्क शेक
साहित्य : एक सफरचंद, ३ चमचे मध, १ कप कोकोनट मिल्क, बर्फ, पाव चमचा सुंठ पावडर, चिमूटभर दालचिनी किंवा कलमी पावडर
कृती : एका सफरचंदाची साले व बिया काढून तुकडे करावे. मिक्‍सर जारमध्ये घालावे. त्यात सुंठ पावडर, कलमी पावडर, मध घालून क्रश करावे. मग त्यात कोकोनट मिल्क घालावे व बर्फ घालून क्रश करावे.

बीटरूट लस्सी
साहित्य : एक लहान बिटरुट, २ वाट्या दही, साधे मीठ, काळे मीठ, जिरे व मिरे पावडर चवीप्रमाणे १ चमचा
कृती : बिट वाफवून घ्यावे व साल काढून किसून घ्यावे. त्यातील दोन चमचे किस, दही - मीठ - जिरे व मिरेपूड व लागलेले तसे पाणी घालून ब्लेड करावे. थंडगार सर्व्ह करावे. सुरेख रंगाची व चवीची अशी ही लस्सी आहे.

पायनापल कुलर
साहित्य : दोन स्लाईस पायनापल, ७-८ पुदिना पाने, १ मिरचीचे तुकडे, २ चमचे तुळशीचे बी (सब्जा) ३ चमचे साखर, क्रश केलेला बर्फ
कृती : पायनापल तुकडे, पुदिना पाने, मिरचीचा तुकडे क्रश करून घ्यावे. त्यात तुळशीचे भिजलेली बी घालावे. लिंबाचा रस, साखर व क्रश केलेला बर्फ घालून फिरवून घ्यावे. आवडत असल्यास चिमटीभर काळे मीठ घालावे. मिरची चालत नसल्यास चिमूटभर तिखटपण घालू शकता

आंबा पायना बनाना स्मूदी
साहित्य : अर्धी वाटी पायनापल तुकडे, १ पिकलेला आंबा, १ केळे, ३ चमचे घट्ट दही, २ चमचे मध, बर्फ
कृती : मिक्‍सरमध्ये पायनापल तुकडे चर्न करावे. मग त्यात आंब्याचे तुकडे, केळ्याचे तुकडे, दही व मध घालावा. क्रश केलेला बर्फ घालून चर्न करावे. थंडगार सर्व्ह करावे.

हनी कॅरेट लस्सी 
साहित्य : दोन मध्यम गाजरे, दोन वाट्या दही, दोन चमचे मध, ४ बदाम, ३-४ काजू
कृती : गाजराची साल काढून वाफवून घ्यावे. जारमध्ये दही, बदाम, काजू, मध व गाजर घालून चर्न करावे. केशरी रंगाची व मस्त चवीची लस्सी तयार होते.

जिगर ठंडा 
साहित्य : एक चमचा डिंक पावडर, अर्धा लिटर दूध, व्हॅनिला आइस्क्रीम, तयार जेलीचे तुकडे किंवा चेरीचे तुकडे
कृती : डिंक पावडर २ वाट्या पाण्यात ४ तास भिजवावी. तो चांगला फुलून येईल. दूध जरा आटवून थंड करावे. त्यात आइस्क्रीम घालून चर्न करावे. ग्लासमध्ये १ चमचा फुललेल्या डींकाचे मिश्रण त्यावर दुधाचे मिश्रण घालावे. चेरीने सजवावे.

डेट आल्मंड पंच
साहित्य : पाच - सहा बदाम, एक लहान वाटी खजुराचे सिरप, अर्धी वाटी डाळिंब, १०-१२ किसमीस, १ चमचा रोझ वॉटर, खुपसारा क्रश आईस
कृती : ग्लासमध्ये क्रश आईस घालून त्यावर डेट सिरप, डाळिंबाचे दाणे, रोझ वॉटर, ५-६ किसमीस व डाळिंबाचे दाणे घालावे. बदामाचे काप करावे. वरती ते घालावे. अप्रतिम चवीचे आहे.

बर्न्ट गार्लिक लस्सी
साहित्य : दोन वाट्या दही, २ वाट्या थंड पाणी, दोन लसूण पाकळ्या, मोहरी, जिरे, तेल, २-३ कढीपत्ता पाने, साधे मीठ, काळे मीठ
कृती : दोन चमचे तेलाची फोडणी करावी. त्यात मोहरी - जिरे व लसणाचे तुकडे घालावे. लसूण जरा बदामी रंगाचे झाले की गॅस बंद करावा. त्यात कढीपत्ता घालावा. दह्यात पाणी घालून व मीठ घालून घुसळून घ्यावे. फोडणीतील लसूण पाकळ्या काढून घ्याव्यात. व तयार फोडणी ताकात घालावा व झाकण ठेवावे.
 

संबंधित बातम्या