पौष्टिक पदार्थ...

सविता माळगे, बार्शी 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

फूड पॉइंट
आजच्या फास्टफूडच्या युगात मुलांना पौष्टिक जेवण खाऊ घालायचे असेल, तर रोजच्या पदार्थांना थोडा आधुनिक टच द्यावाच लागतो... अशा काही निवडक रेसिपीज... 

रव्याचा केक  
साहित्य : दीड वाटी अगदी बारीक रवा, १ वाटी दही, १ वाटी दूध, पाव वाटी साजूक तूप, १ वाटी साखर, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, १ चमचा डालडा. 
कृती : प्रथम मिक्‍सरच्या मोठ्या भांड्यात दही, दूध, तूप घ्यावे व ते चांगले मिक्‍सरमधून एकजीव करावे. नंतर त्यात साखर, भाजलेला रवा, सोडा, बेकिंग पावडर, मीठ घालून पुन्हा सर्व मिश्रण चांगले घुसळावे व ट्रेमध्ये डालडा लावून हे रसरशीत मिश्रण ओतावे. त्याआधी १५ मिनिटे ओव्हन गरम करून घ्यावा व मिश्रण ओतलेला ट्रे गरम ओव्हनमध्ये ठेवावा. वरून घट्ट झाकण बसवावे. अर्ध्या तासाने केक तयार होईल. केक वरून चॉकलेटी झाला, की ओव्हनचे झाकण काढून केक गार झाल्यावर त्याच्या स्लाइस कापाव्यात. या केकमध्ये १ मोठा चमचा मध घालावा. तसेच खजुराचे तुकडे व इतर सुकामेवा घातला तर केक पौष्टिक होतो.

खुबसूरत बटाटा कत्री (कतली)  
साहित्य : चार बटाटे, २-३ वाट्या साखर, १ लहान चमचा दालचिनी पावडर, १ वाटी पिठी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, १ वाटी दूध पावडर, १ लहान वाटी काजू पावडर व चारोळी. 
कृती : थम बटाटे उकडून साल काढून किसून घ्यावेत. त्या किसाच्या दुप्पट साखर घालून त्यात दालचिनीपूड व तूप घालून चांगले परतावे. गोळा पातेल्याच्या कडा सोडून मधे आला, की गॅस बंद करून तसाच ठेवावा. आता त्यात काजू पूड व चारोळी घालून ढवळावे. मिश्रण गार झाल्यावर पिठीसाखर व दूधपावडर घालून चांगले मळावे. गोळा मऊ करावा. ओट्यावर तुपाचा हात फिरवून त्यावर पिठीसाखर भुरभुरावी. त्यावर गोळा पातळ लाटावा. लाटण्याला तूप लावून त्या पोळीचा रोल करून १ इंच जाडीच्या कात्र्या कापाव्यात. ही कतली सुबक दिसते. आपल्या आवडीप्रमाणे केशर, वेलची घातल्यास रंग छान येतो.

ढोनकर डाचना  
साहित्य : एक कप हरभरा डाळ, २ बटाटे, २ कांदे, पाव चमचा जिरे, १ इंच आले, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा जिरे पूड, २ लवंगा, १ वेलदोडा, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ चमचा साखर, तेल 
कृती : हरभरा डाळ रात्रभर भिजत घालून सकाळी बारीक वाटावी. बटाटे सोलून चौकोनी तुकडे करून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. टोमॅटोच्या ४-४ फोडी कराव्यात. १ कांदा बारीक चकत्या करून घ्यावा आणि दुसरा आले आणि मिरचीबरोबर वाटावा. थोड्या पाण्यात हळद, लाल तिखट, जिरे पावडर मिसळून पेस्ट करावी. लवंग, दालचिनी आणि वेलदोडा हे सर्व थोडे पाणी घालून वाटावे. तेल तापवून वाटलेली डाळ, वाटलेला कांदा, आले, जिरे, मिरच्यांचे तुकडे, मीठ घालून कोरडे होईपर्यंत परतावे. राहिलेले तेल तापवावे. बटाट्याचे तुकडे लालसर परतावे. टोमॅटो टाकून शिजवावे. घट्ट झाल्यावर बटाटे, साखर आणि पाणी घालून शिजवावे. वाटलेल्या डाळीच्या मिश्रणाचे गोळे करून ते तळावे. बटाटे शिजल्यावर हे गोळे त्यात घालून वर वेलदोडा, दालचिनीची पेस्ट घालून हलकेच हलवावे. थोड्या वेळाने सर्व्ह करावे.

मटकी धिरडी 
साहित्य : तीन वाट्या मोड आलेली मटकी, ४ ब्रेडचे स्लाइस, ३-४ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ साखर, कोथिंबीर, हळद, कांदा, टोमॅटो. 
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्‍सरमधून काढून घ्यावे. थोडेसे रवाळ वाटावे, त्यात लसूण, कोथिंबीर वाटून हळद व पाणी घालून जाडसर मिश्रण करावे. तव्याला तेल लावून जाडसर मिश्रण तव्यावर पसरवावे. वरून कांदा, टोमॅटो बारीक चिरून पसरावे. टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे. या नव्या स्वरूपात जाड व पातळी धिरडी करता येतात.

लवंग लतिका 
साहित्य : अडीचशे ग्रॅम मैदा, २ टेबलस्पून तूप, १५-२० लवंगा. 
कव्हरचे सारणाचे साहित्य : पन्नास ग्रॅम रवा, १२५ ग्रॅम खवा, ५० ग्रॅम नारळाचा कीस, १०० ग्रॅम पिठी साखर, १०-१५ बदाम, थोड्या चारोळ्या, बेदाणे, पाकासाठी २५० ग्रॅम साखर, केशर, ५-६ वेलदोड्यांची पूड 
कृती : मैदा चाळून घ्यावा. गरम केलेले तूप त्यात घालून चांगले चोळावे. पुऱ्यांना मळतो तसे गरम पाणी घालून मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. एका कढईत रवा कोरडाच भाजून घ्यावा. नंतर खवा, भाजलेला रवा, किसलेला नारळ, पिठीसाखर, सुकामेवा तुकडे करून सर्व एकत्र करावे. नंतर साखरेचा किंचित घट्ट पाक करावा. केशर आणि वेलदोड्याची पूड पाकात घालावी. मैद्याच्या लिंबाएवढ्या गोळ्या करून पुऱ्या लाटाव्यात. प्रत्येक पुरीवर एक टेबलस्पून सारण ठेवावे. कडांना थोडे दूध लावावे व विरुद्ध बाजू एकमेकांवर घ्याव्यात, म्हणजे चौकोनी पुरीसारखा आकार होईल. नंतर त्याच्यावर लवंग टोचावी. कढईत तूप गरम करून त्यात लवंग लतिका सोडाव्यात. चांगल्या तांबूस झाल्यावर पाकात टाकाव्यात. निथळून डिशमध्ये मांडाव्या. बदामाचे काप करून वर टाकावे.

गुळाची गाजर बर्फी  
साहित्य : दीड वाटी चांगला गूळ, १ वाटी गाजर कीस, १ वाटी खवा, १ चहाचा चमचा जायफळपूड, २ मोठे चमचे साजूक तूप, अर्धी वाटी नारळाचा चव, ५० ग्रॅम दूध पावडर, २ मोठे चमचे चारोळी 
कृती : प्रथम खवा भाजून त्याचा शिरा करून घ्यावा. मग तुपावर गाजर कीस व चव परतून घ्यावा. नंतर गुळाचा एकतारी पाक करून त्यात तूप, कीस व खवा घालून चांगले घोटावे. नंतर जायफळपूड व दूध पावडर घालावी. मिश्रण चांगले मळून त्याचा मऊ गोळा झाला, की तूप लावलेल्या ट्रेमध्ये गोळा थापून त्याच्या चौकोनी आकाराच्या वड्या कापाव्यात. त्याआधी वर चारोळी लावावी. 

ज्वार भटाई  
साहित्य : अर्धा किलो ज्वारीचे पीठ, १०० ग्रॅम डाळीचे पीठ, अर्धा खोवलेला नारळ, १ टेबलस्पून लोणी, ३ चमचे तिखट, मीठ, तेल, धने-जिरेपूड 
कृती : दोन्ही पिठे आणि नारळाचा चव एकत्र करावा. लोणी, तिखट, मीठ, धने-जिरेपूड त्यात मिसळावी. पाणी घालून पीठ चांगले मळावे. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन हातावर किंवा पाटावर थापावा. तेल तापवून तळून काढावा. गरम गरम खायला छान लागतो.

सफरचंदाची मसालेदार चटणी  
साहित्य : दहा मध्यम आकाराची सफरचंदे, १ बाटली व्हिनेगर, १ कुडी ठेचलेला लसूण, १ कप ठेचलेले आले, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा चमचा तिखट, अर्धा कप साखर, पाव कप बेदाणे, ४-५ खजुराच्या बिया, मीठ. 
कृती : सर्व सफरचंदांच्या साली काढून त्याचे तुकडे करून एका पातेल्यात घ्यावेत. साखर, बेदाणे आणि खजुराशिवाय इतर सर्व सामान त्यात घालावे. पातेले मंद आचेवर ठेवून शिजू द्यावे. घट्ट झाल्यावर खाली उतरवून त्यात साखर घालावी. तसेच खजूर आणि बेदाणे घालावेत. पुन्हा १५ मिनिटे गॅसवर ठेवावे. हलवत राहावे. खाली उतरून गार झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.

सुदेवन (केरळ)  
साहित्य : दोन मोठी कच्ची केळी, ३ हिरव्या मिरच्या, ४ लाल मिरच्या, अर्धा कप आंबट दही, थोडा गूळ, मोहरी, कढीपत्ता तेल 
कृती : केळी सोलून अर्धा इंचाचे तुकडे करावेत. त्याचे ४ भाग करावेत. कढईत तेल तापवून केळाचे तुकडे कडकडीत तापवून डिशमध्ये ठेवावेत. याच कढईत लाल मिरच्या तडतडून बारीक वाटून दह्यात नीट कालवून ठेवाव्यात. नारळ आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून कढईत घालून सारखे करावे. त्यात दह्याचे मिश्रण घालावे. हे सर्व एक उकळी येईतो गरम करून गॅसवरून उतरवावे. त्यात केळ्याचे तुकडे टाकावेत. त्यावर तेल, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करून घालावी.  

संबंधित बातम्या