कुळथाच्या शेंगोळ्या, मुळ्याचा चटका

शैला चिणे-कुलकर्णी
सोमवार, 2 ऑगस्ट 2021


फूड पॉइंट

दैनंदिन आहारात आपण काही कडधान्यांचा वापर नेहमीच करतो. पण हुलगा किंवा कुळथाचा वापर फार थोड्या प्रमाणात केला जातो. या कुळथाच्या या काही रेसिपीज, त्याचबरोबर मुळ्याच्याही काही अनोख्या रेसिपीज आहेत. 

कुळथाची शेंगोळी 

साहित्य : दोन वाट्या कुळथाचे (हुलग्याचे) पीठ, अर्धी वाटी कणीक, लाल तिखट, जिरे, लसूण, मीठ, तेल (मोहन) व फोडणीचे साहित्य, पाणी. 
कृती : शेंगोळी करण्यासाठी हुलगे (कुळीथ) न भाजताच गिरणीतून दळून आणावेत. कुळथाच्या पिठात कणीक, तिखट, मीठ, तेलाचे मोहन, जिरे, लसूण वाटून घालावे. हे पीठ हाताने चोळून घ्यावे. मग त्यात पाणी घालून वळता येईल इतपत घट्ट भिजवावे. मग पोळपाटाला तेल लावून त्यावर कडबोळ्याप्रमाणे वळून त्यावर पातळ कापड थोडेसे ओलसर करून घालावे. तेलाची फोडणी करून त्यावर अंदाजे  ५-६ वाट्या पाणी घालावे. त्या पाण्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट घालून पाण्यास उकळी आणावी. नंतर त्यात वळून ठेवलेल्या सर्व शेंगोळ्या हळूहळू सोडाव्यात. उलटण्याच्या मागील दांड्याने अधूनमधून हलवत राहावे. झाकण ठेवून मंद गॅसवर १५ - २० मिनिटांत शेंगोळ्या शिजतात. या शेंगोळ्याचा रसाबरोबर भात खाण्याची पद्धत आहे.  

सुक्या शेंगोळ्या 
साहित्य : दोन वाट्या कुळथाचे पीठ, अर्धी वाटी कणीक, लाल तिखट, जिरे, लसूण, मीठ, तेल (मोहन) व फोडणीचे साहित्य, पाणी. 
कृती : शेंगोळ्यांची कृती आधी सांगितल्याप्रमाणेच. या शेंगोळ्या वाफेवर उकडून भरपूर तेलाच्या फोडणीत परतून घ्याव्यात. सर्व्ह करताना वरून खोबरे कोथिंबीर घालावी. 
टीप : फोडणीत मोहरीबरोबर हिंग व जिऱ्याचा वापर करावा.

कुळथाची उसळ  
साहित्य : कुळीथ, तिखट, मीठ, गूळ, जिरे, खोबरे, लसूण, कढीलिंब, अमसूल, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम कुळीथ बारा तास भिजवून ठेवावेत. नंतर ते निथळत ठेवून फडक्यात घट्ट बांधून ठेवावेत. म्हणजे त्यास मटकीप्रमाणे मोड येतील. मोड आलेले हे कुळीथ कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. कुळीथ शिजायला थोडा अधिक वेळ लागतो, म्हणून तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस लहान करून पाच-सात मिनिटे कुकर तसाच ठेवावा. शिजवताना त्यात थोडेसे तेल घालावे. नंतर कुळीथ फोडणीस टाकून त्यात कढीलिंब, खोबरे, लसूण, जिरे व एक चमचा शिजलेले कुळीथ एकत्रित वाटून घालावेत. चवीप्रमाणे अमसूल, मीठ, गूळ व तिखट घालावे. थोडेसे उकळीचे पाणी घालून उसळीला रस ठेवावा. सर्व्ह करताना वरून खोबरे, कोथिंबीर घालावी. ही उसळ पोळी, भाकरी व भाताबरोबरही छानच लागते.

कुळथाची वाटली डाळ 
साहित्य : दोन वाट्या मोड आलेले कुळीथ, ७-८ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, १ चमचा जिरे, ७ -८ पाने कढीलिंब, एका लिंबाचा रस, मीठ, साखर, खोबरे, कोथिंबीर. 
कृती : मोड आलेले कुळीथ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. वाटलेल्या कुळथामध्ये मिरच्या, जिरे, लसूण, कढीलिंबाची पाने वाटून घालावीत. त्यातच मीठ, साखर व लिंबाचा रस घालून सर्व गोळा एकसारखा करून घ्यावा. जास्त तेलाच्या फोडणीवर हा वाटलेला गोळा घालून परतावे. परतताना अधूनमधून पाण्याचे हबके मारून वाफ आणावी. सर्व्ह करताना खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

मुळ्याचे पराठे
साहित्य : दोन वाट्या मुळ्याचा कीस, अर्धी वाटी अगदी बारीक चिरलेला मुळ्याचा पाला, १ चमचा तीळ, १ चमचा जिरे पूड, तिखट, मीठ, हळद, चिमूटभर हिंग, कणीक, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी डाळीचे पीठ.
कृती : मुळ्याचा कीस हलक्या हाताने पिळून घ्यावा. त्यात मुळ्याचा चिरलेला पाला घालावा. आपल्या आवडीनुसार त्यात तिखट, मीठ, हळद, चिमूटभर हिंग, जिरे पूड व तेलाचे मोहन घालून सर्व एकत्र करून १० मिनिटे ठेवावे. नंतर त्यात डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ व त्यात मावेल तेवढी कणीक व पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. भिजलेल्या पिठाचा गोळा १० मिनिटे तसाच ठेवून मग त्याचे पराठे लाटावेत. शक्य असल्यास बटरवर भाजावेत. सॉसबरोबर पराठे सर्व्ह करावेत. 

चाकवत कुळथाची भाजी 
साहित्य : चाकवताची १ जुडी, अर्धी वाटी मोड आलेले कुळीथ, २-३ हिरव्या मिरच्या, ४ लसूण पाकळ्या, मीठ, साखर, ताक, १ चमचा बेसन व फोडणीचे साहित्य. 
कृती : चाकवताची चिरलेली भाजी, मोड आलेले कुळीथ, लसूण, मिरच्या घालून शिजवून घ्यावी. शिजवून झाल्यावर एक चमचा बेसन घालून चांगले घोटून घ्यावे. त्यात बसेल एवढे ताक घालून फोडणी देऊन भाजी सारखी करावी. चविष्ट लागते. 
टीप - ताक नसल्यास साधे उकळीचे पाणी घालूनही ही भाजी चांगली लागते. पावसाळ्याच्या दिवसात कुळिथाचे पदार्थ खाणे हितावह ठरते, कारण कुळीथ शरीरात ऊर्जा निर्माण करतो.

मुळ्याचा चटका
साहित्य : दोन वाट्या मुळ्याचा कीस, अर्धी वाटी हरभरा डाळ, २-४ मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, दीड वाटी घट्ट दही, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूड, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कढीलिंबाची पाने.
कृती : हरभऱ्याची डाळ दोन-तीन तास भिजत घालून नंतर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात हिरव्या मिरच्या घालाव्यात. वाटलेली डाळ, मुळ्याचा कीस, दही, मीठ, साखर, जिरे पूड घालून हाताने सर्व छान एकत्र करावे. नंतर मोहरी, हिंग, कढीलिंबाची दोन-चार पाने घालून केलेली फोडणी त्यावर घालावी व पुन्हा सर्व मिश्रण डावाने सारखे करावे. वरून कोथिंबीर घालावी.
टीप :  ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही, त्यांनी मुगाची डाळ वापरायला हरकत नाही.

डाळ मुळा
साहित्य : दोन-तीन मध्यम आकाराचे मुळे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, १००-१२५ ग्रॅम मिरच्या, मीठ, साखर, चमचाभर जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, एका लिंबाचा रस, नारळाचा चव व कोथिंबीर. 
कृती : प्रथम मुळे स्वच्छ धुऊन काकडीप्रमाणे चोचवून घ्यावेत. मग तेलाची फोडणी करून (मोहरी, हिंग, हळद) त्यात मिरच्यांचे तुकडे अगदी बारीक चिरून घालावेत. त्यात भिजलेली हरभऱ्याची डाळ घालून त्याला वाफ आणावी. मग त्यात चोचवलेला मुळा घालून सर्व एकत्रित परतावे. त्यावर झाकण ठेवून त्यात पाणी घालावे व मंद आचेवर वाफ आणावी. डाळ बोटचेपी झाल्यावर त्यात मीठ, साखर व जिरे पूड घालून सर्व एकत्रित परतून झाल्यावर गॅस बंद करावा. लिंबू पिळून पुन्हा एकदा हलवावे. आवडत असल्यास त्यावर नारळाचा चव व कोथिंबीर घालून वाढावी. कोशिंबिरीऐवजी तोंडी लावणे म्हणून छान लागते.

कुळथाचे चविष्ट सूप  
साहित्य : दोन वाट्या मोड आलेले कुळीथ, अर्धा इंच आल्याचा तुकडा, १-२ हिरव्या मिरच्या, २-३  लसूण पाकळ्या, दालचिनीचा छोटा तुकडा, ५ वाट्या पाणी, २ वाट्या ताक, कोथिंबीर. 
कृती : मोड आलेल्या कुळथामध्ये अंदाजे पाच-सहा वाट्या पाणी घालून तीन टेबलस्पून तेल घालावे. कुकरमध्ये शिजायला ठेवावे, तीन शिट्ट्या करून पाच-सात मिनिटे गॅस लहान करून ठेवावा, कारण कुळीथ शिजायला जास्त वेळ लागतो. शिजलेले कुळीथ निथळत ठेवून त्यातील पाणी वेगळे करावे. त्यात दोन वाट्या साधारण घट्ट ताक घालावे. आले, लसूण, मिरच्या, जिरे आणि दालचिनीचा छोटा तुकडा एकदम बारीक वाटून घालावे. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून साजूक तुपातील हिंग, जिरे, मोहरीची फोडणी द्यावी. हे सूप गरम करताना सतत हलवत राहावे व  उकळू देऊ नये. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 

संबंधित बातम्या