सीताफळ बासुंदी, जायफळ बिस्किटे

स्मिता दळवी, नवी मुंबई
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

स्नॅक्स म्हणून खाता येतील अशा काही गोड आणि जेवणात करता येतील अशा काही तिखट पदार्थांच्या पाककृती...

नारळाच्या वड्या (चुनकाप)
साहित्य : दोन पेले खवलेले ओले खोबरे, एक पेला साखर, २ चमचे तूप, चिमूटभर वेलची पूड, पाव वाटी दुधात ४-५ केशर काड्या भिजवत ठेवलेले दूध व २ चमचे सजावटीसाठी चारोळी व पिस्त्याचे काप.
कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत तूप तापवून त्यात खोबरे पाच मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे. मग साखर, वेलची पूड व केशरयुक्त दूध मिसळून पुन्हा दहा मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे. नंतर एका पसरट ताटाला तुपाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण पसरावे. वरून चारोळी व पिस्त्याच्या कापांनी सजवून मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर आपल्याला आवडतील त्या आकाराचे काप कापून स्वादिष्ट नारळी वड्या खायला घ्याव्यात.

ज्वारीचे कुरकुरीत डोसे
साहित्य : एक वाटी ज्वारीचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला कांदा, तेल, २ पेले पाणी, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट व १ टेबलस्पून मीठ.
कृती : सर्वप्रथम एक टोपात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट व मीठ हे सुके जिन्नस व्यवस्थित एकत्र करावेत. मग त्यात चिरलेला कांदा व मिरच्या घालून पाणी मिसळावे व दहा मिनिटे झाकून ठेवावे. दहा मिनिटांनी मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे व डोसा पॅन तापत ठेवावा. मग डोसा पॅनला तेल लावून नंतर आच वाढवावी. तव्यावर पळीच्या साहाय्याने पीठ पसरून दोन्ही बाजूंनी डोसे खरपूस भाजून घ्यावेत. हिरवी चटणी किंवा दह्याबरोबर कुरकुरीत डोशांचा आस्वाद घ्यावा.

लग्नपंगतीतील मसालेभात
साहित्य : दोन वाट्या वर्षभर जुना जिरा कोलम किंवा आंबेमोहोर तांदूळ, २ चमचे किसलेला गूळ, १ वाडगाभर मटार दाणे, चिरलेले गाजर, फ्लॉवरचे तुकडे व चिरलेली तोंडली, ६ चमचे तेल, २ चमचे तूप, १ चमचा गरम मसाला, १ चमचा गोडा मसाला, पाव वाटी काजू व शेंगदाणे, चवीनुसार मीठ व पाणी, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेले ओले खोबरे.
फोडणीकरिता : दहा-बारा कढीपत्त्याची पाने, २ तमालपत्रे, ४ लवंगा, ४ हिरवे वेलदोडे, २ दालचिनी तुकडे, १ चक्रफूल व १ इंच आल्याचे काप - ६ हिरव्या मिरच्या - २०-२५ लसूण पाकळ्या - अर्धा चमचा जिरे यांची एकत्रित केलेली बारीक भरड.
कृती : सर्वप्रथम एका मोठ्या कढईत मंद आचेवर तेल तापवून त्यात कढीपत्ता व सर्व खडे गरम मसाले घालावेत. मग आले-लसूण-मिरची-जिरे भरड घालून दोन मिनिटे परतावे. नंतर सर्व भाज्या, धुतलेला तांदूळ, गूळ, काजूगर, शेंगदाणे, गरम मसाला, गोडा मसाला व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतावे. आता वरून दोन चमचे तूप सोडावे व तांदळाच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी तापवून या मिश्रणावर ओतून ढवळावे. झाकण ठेवून अर्धा तास मंद आचेवर भात शिजवावा. नंतर वरून ओले खोबरे, कोथिंबीर घालून स्वादिष्ट मसालेभाताचा आस्वाद घ्यावा.

सीताफळ बासुंदी
साहित्य : एक लिटर फुल क्रिम दूध, ३ मोठी पिकलेली सीताफळे, १ कप साखर, पाव टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून बदाम-पिस्त्याचे काप व पाव टीस्पून जायफळ पूड.
कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत किंवा टोपात दूध मंद आचेवर तापत  
ठेवावे. दुधाला उकळी आली की एका मोठ्या चमच्याने सतत ढवळत राहावे. असे दूध आटून निम्मे होईपर्यंत करीत राहावे व बाजूने जमणारी साय त्या दुधात मिसळत राहावी. मग त्यात साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून अजून दहा मिनिटे दूध आटवावे. नंतर आच घालवून हे दूध थंड होऊ द्यावे. मग सीताफळातील बिया वेगळ्या कराव्यात व आतील सर्व गर काढावा. दुधात मिसळून हे दूध अर्धा तास फ्रीजमध्ये थंड करा. शेवटी वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून सुमधुर चवीची सीताफळाची बासुंदी सर्वांना सर्व्ह करावी.

दुधी भोपळ्याची बर्फी

साहित्य : एक किलो दुधी भोपळा, पाव किलो दुधाचा खवा, २०० ग्रॅम साखर, २ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून काजू-बदाम-पिस्त्याचे काप, १ टीस्पून वेलची पूड.
कृती : प्रथम दुधी भोपळा धुऊन किसून घ्यावा. मग एका जाड बुडाच्या कढईत सर्व कीस ओतून मंद आचेवर तो कीस शिजू द्यावा. दुधीमधील सर्व पाणी आटले की साखर, दुधाचा खवा, वेलची पूड व तूप घालून सतत ढवळत राहावे. आता या मिश्रणाला बाजूने तूप सुटायला लागले की आच घालवा व थंड झाल्यावर त्यामध्ये काजू-बदाम-पिस्त्याचे काप घालावेत. एका ट्रेवर तुपाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण पसरावे व थंड झाल्यावर आपल्या आवडीनुसार काप करून बर्फी सर्व्ह करावी.

बाजरीच्या भाकरीचे पौष्टिक लाडू

साहित्य : दोन भाकऱ्यांची मिक्सरमध्ये केलेली बारीक भरड, २ टेबलस्पून तूप, पाव वाटी 
किसलेला गूळ, २ टेबलस्पून पांढरे तीळ, पाव 
टीस्पून वेलची-जायफळ पूड व सजावटीसाठी काजूगर. 
कृती : प्रथम कढईत मंद आचेवर तूप गरम करावे. नंतर त्यात गूळ, बाजरीच्या भाकरीची भरड, तीळ व वेलची-जायफळ पूड घालून दोन मिनिटे परतावे. मग मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत. वरून एक-एक काजूगर लावून सजवावे. सकाळच्या न्याहारीसाठी पौष्टिक लाडू तयार होतात.

जायफळयुक्त चुलीवरील बिस्किटे

साहित्य : एक वाटी मैदा, १ वाटी पिठीसाखर, १ वाटी तूप, चिमूटभर जायफळ पूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा व बिस्किटे भाजण्यासाठी १ पेला जाडे मीठ.
कृती : प्रथम चुलीवर एक मोठी पसरट कढई ठेवावी व ती तापल्यावर त्यात जाडे मीठ पसरून त्यात स्टॅंड ठेवावा व झाकण ठेवावे. दुसरीकडे एका परातीत मैदा, पिठीसाखर, तूप, जायफळ पूड, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे सर्व जिन्नस हलक्या हाताने एकत्र करावेत. त्याचे लहान चपट्या आकाराचे गोळे करून त्यावर हलक्या हातानेच दाब द्यावा. एका स्टीलच्या ताटाला तुपाचा हात लावून ही बिस्किटे ठरावीक अंतरावर ठेवावीत. नंतर त्यावर काट्याच्या साहाय्याने हलकेच दाब द्यावा. आता तापत ठेवलेल्या कढईत हे बिस्किटांचे ताट ठेवावे. मंद आचेवर जवळपास पन्नास मिनिटे बिस्किटे भाजावीत. नंतर छान खुसखुशीत बिस्किटांचा आस्वाद घ्यावा.

चटपटा दम आलू चाट
साहित्य : अर्धा किलो दम आलू किंवा छोट्या आकाराचे बटाटे (धुऊन साले काढून उभे चार भाग केलेले), चाट मसाला, १ 
टेबलस्पून चिली फ्लेक्स, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी तेल, ३ टेबलस्पून पांढरे तीळ, १ टेबलस्पून जिरे व दोन टीस्पून मीठ व १ लिंबू. 
कृती : प्रथम एका कढईत तेल तापवून जिरे घालावे. जिरे तडतडले की नंतर बटाटे, चिली फ्लेक्स, चाट मसाला, तीळ व मीठ घालून परता आणि पाच मिनिटे झाकण लावून ठेवून द्यावे. नंतर झाकण काढून पुन्हा एकदा परतावे. परत पाच मिनिटे झाकण ठेवावे. नंतर झाकण काढून वरून कोथिंबीर व लिंबू पिळून चटपटीत दम आलू चाट खाण्यासाठी सर्व्ह करावा.

संबंधित बातम्या