उपवासाचे पदार्थ

स्मिता दळवी, खारघर
सोमवार, 3 जानेवारी 2022

फूड पॉइंट

कोशिंबीर
साहित्य : तीन काकड्या, पाव वाटी भाजून बारीक केलेली शेंगदाण्याची भरड, ५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून जिरे, चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ. (चारजणांसाठी)
कृती : प्रथम काकडीची साले काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. नंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर व शेंगदाण्याची भरड घालून व्यवस्थित ढवळावे. आता तूप गरम करून त्यात जिरे व मिरच्या टाकून पूर्ण तडतडू द्याव्यात. नंतर हे मोहन काकडीवर ओतावे. वरून कोथिंबीर भुरभुरावी आणि कोशिंबीर खायला घ्यावी.

साबुदाणा-बटाटा पॅटिस
साहित्य : दोन वाट्या साबुदाणा, २ उकडलेले बटाटे, पाव वाटी शेंगदाणे भाजून केलेली भरड, ५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून लिंबू रस, १ टेबलस्पून जिरे पूड, तेल किंवा तूप व २ टेबलस्पून मीठ. (चारजणांसाठी)
कृती : साबुदाणा दोन तास पाण्यात भिजत ठेवावा. नंतर त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यावे. शिजलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. आता त्यात लिंबू रस, शेंगदाणा भरड, जिरे पूड, मिरच्या, कोथिंबीर व मीठ घालून व्यवस्थित एकजीव करावे. नंतर मध्यम आकाराचे गोळे घेऊन हाताने हलकेच दाबून आवडेल तो आकार द्यावा. आता तव्यावर तेल किंवा तूप तापवून मंद आचेवर हे पॅटीस सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत. चटणी किंवा गोड दह्याबरोबर हे पॅटिस छान लागतात.

रताळी-वरी तांदूळ उपमा

साहित्य : एक वाटी वरीचा तांदूळ, २ टेबलस्पून तूप, २ लवंगा, १ टेबलस्पून जिरे, ४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच किसलेले आले, १ टेबलस्पून साखर, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून केलेली भरड, १०-१२ बेदाणे, १ पेला रताळ्याच्या फोडी, ५-६ कढीपत्त्याची पाने, चिरलेली कोथिंबीर, १०-१२ काजूचे तुकडे व मीठ चवीनुसार. (चारजणांसाठी)
कृती : सर्वात आधी वरीचे तांदूळ धुऊन निथळावेत व अर्धा तास ठेवून द्यावेत. मग कढईत तूप गरम करून त्यात मिरच्या, जिरे, लवंगा व कढीपत्ता घालावा आणि चांगले तडतडू द्यावे. आता काजूचे तुकडे, बेदाणे व वरी तांदूळ घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. नंतर रताळ्याच्या फोडी, मीठ व साखर घालून व्यवस्थित ढवळावे. पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. मग चार वाट्या पाणी गरम करून या मिश्रणात ओतावे व पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी. उपवासाला खाण्यासाठी चविष्ट उपमा तयार होतो.

शिंगाडा-साबुदाणा थालीपीठ
साहित्य : एक वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी साबुदाणा पीठ, १ उकडलेला बटाटा, १ टेबलस्पून जिरे पूड, बारीक चिरलेल्या ५-६ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून ओले खोबरे, २ टेबलस्पून शेंगदाणा कूट, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व तूप किंवा लोणी. (चारजणांसाठी)
कृती : तूप सोडून वरील सर्व साहित्य एका परातीत घेऊन चांगले मळावे व एकजीव करावे. मिश्रण पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर या मिश्रणाचा लिंबाएवढा गोळा घेऊन तो गोलाकार थापावा व तापलेल्या तव्यावर तूप किंवा लोणी सोडून खरपूस भाजून घ्यावा. गरमागरम थालीपिठाचा चटणी किंवा दह्यासोबत आस्वाद घ्यावा.

बटाटेवडे

साहित्य : तीन उकडलेले बटाटे, शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप, १ टीस्पून जिरे, १ टेबलस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी राजगिरा पीठ, अर्धी वाटी शिंगाडा पीठ व चवीनुसार मीठ. (चारजणांसाठी)
कृती : आधी बटाटे कुस्करून घ्यावेत. नंतर कढईत तीन टेबलस्पून तेल किंवा तूप तापवून त्यात जिरे, आले-मिरची पेस्ट घालून परतावे. मग हे मोहन, मीठ व कोथिंबीर कुस्करून ठेवलेल्या बटाट्यात मिसळून एकजीव करावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत. आता कढईत तेल किंवा तूप तापवावे.  राजगिरा व शिंगाडा पीठ एकत्र करून त्यात पाव टीस्पून मीठ, पाणी घालून व्यवस्थित ढवळावे. आता एक एक गोळा पिठात बुडवून तो गरम तेलात सोडावा. सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळावेत. खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

घावन
साहित्य : एक वाटी साबुदाणा, १ वाटी वरी तांदूळ, पाव वाटी ओले खोबरे, ३ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून जिरे, १ टेबलस्पून साखर व  चवीनुसार मीठ. (चारजणांसाठी)
कृती : आधी साबुदाणा व वरी तांदूळ धुऊन एक तास भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी निथळून काढून टाकावे. आता मिक्सरमध्ये साबुदाणा, वरी तांदूळ, जिरे, मिरच्या, खोबरे, साखर घालून बारीक वाटून घ्यावे. मग वाटलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ व एक ग्लास पाणी घालून व्यवस्थित ढवळावे.  नंतर नॉनस्टिक पॅनमध्ये एक वाटी मिश्रण पसरवून दोन मिनिटे झाकून ठेवावे. आता घावन अलगद दुमडून काढून घ्यावे व दही किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

गुलाबजाम

साहित्य : शंभर ग्रॅम खवा, १ टेबलस्पून आरारूट पीठ, १ पेला साखर, १ पेला पाणी, चिमूटभर खायचा सोडा, पाव वाटी दूध, पाव टीस्पून वेलची पूड व तळण्यासाठी तूप. (चारजणांसाठी)
कृती : आधी साखर, पाणी, वेलची पूड मिसळून गरम करून मध्यम पाक तयार करावा. मग माव्यामध्ये आरारूटचे पीठ, सोडा व लागेल तसे थोडे थोडे दूध मिसळून चांगले मऊ पीठ मळून घ्यावे. आता मळलेल्या पिठाचे गोल बारीक गोळे करून घ्यावेत. मग कढईत तूप तापवून मंद आचेवर हे गोळे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. तळून झालेले गुलाबजाम तयार पाकात तासभर भिजवून ठेवावे. नंतर पाक व गुलाबजाम वेगवेगळे ठेवून द्यावेत. गुलाबजाम सर्व्ह करताना पाकाबरोबर एकत्र करून द्यावे.

रताळी-साबुदाणा खीर

साहित्य : दोन रताळी, १ वाटी साबुदाणा, अर्धा लिटर दूध (तापवून घेतलेले), ६ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून तूप, पाव चमचा वेलची पूड व २ टेबलस्पून बदामाचे काप. (चारजणांसाठी)
कृती : आधी रताळी धुऊन मग त्याची साले काढून ती किसून घ्यावीत. साबुदाणा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावा व नंतर व्यवस्थित निथळून घ्यावा. मग एका कढईत तूप तापवून त्यात रताळ्याचा कीस गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात दूध, साखर, बदामाचे काप, वेलची पूड व भिजवलेला साबुदाणा घालून मंद आचेवर खीर साधारण वीस मिनिटे शिजवून घ्यावे. थंड करून लज्जतदार मधुर खिरीचा आस्वाद घ्यावा.

संबंधित बातम्या