थंडगार सरबते...

स्मिता दळवी, मुंबई
सोमवार, 21 मार्च 2022

फूड पॉइंट

करवंदाचे सरबत
साहित्य : अर्धा किलो पिकलेली करवंदे, १ वाटी साखर, अर्धा चमचा सैंधव मीठ व पाणी.
कृती : सर्वप्रथम पिकलेली करवंदे स्वच्छ धुवावीत व दहा मिनिटे पाण्यात भिजत ठेवावीत. त्यामुळे त्यातील डिंक मोकळा होतो. मग मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पाणी आणि थोडी करवंदे घ्यावीत व मिक्सरचे बटण चालू-बंद करत दोन-तीन वेळा फिरवून घ्यावे. फक्त त्यातील बिया बारीक होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व करवंदे पाणी घालून बारीक भरडून घ्यावीत. आता हे मिश्रण मोठ्या गाळणीच्या साहाय्याने पूर्ण गाळावे. नंतर गाळलेल्या मिश्रणात साखर, मीठ मिसळून व गरजेनुसार पाणी घालून मधुर रसाच्या सरबताचा आस्वाद घ्यावा.

ताडगोळे सरबत
साहित्य : सहा कोवळे ताडगोळे, १ वाटी साखर, चिमूटभर वेलची पूड, थंड पाणी किंवा बर्फ.
कृती : सर्व प्रथम चार ताडगोळे साले काढून एका मिक्सरच्या भांड्यात घ्यावेत. त्यात साखर घालून बारीक वाटून घ्यावे व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. सर्व्ह करताना ग्लासात आधी बर्फ घालावा. मग ताडगोळे रस घालावा. वरून उरलेल्या ताडगोळ्यांचे बारीक काप करून घालावेत व थंडगार ताडगोळे सरबताचा आस्वाद घ्यावा.

रातांबे सरबत

साहित्य : दहा-बारा कोकमाची पूर्ण पिकलेली फळे, दीड पेला साखर, १ टेबलस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, १ टीस्पून सैंधव मीठ.
कृती : सर्वप्रथम कोकमाची पिकलेली फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर त्यांचा देठ काढून मधे उभी चीर देऊन प्रत्येकी दोन समान भाग करावे. आता त्याच्या आतील पांढऱ्या बियांवरील आगळ काढून वेगळा ठेवावीत व त्याची साले वेगळी ठेवावीत. नंतर या प्रत्येक गोलाकार सालीमध्ये मावेल एवढी साखर भरावी. आता ही साले एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत अलगद एकावर एक रचून ठेवावीत. वरून काढून ठेवलेला बियांवरील आगळ, शिल्लक राहिलेली साखर, सैंधव मीठ, जिरे पूड व वेलची पूड पसरावी. मग बरणीचे झाकण लावून सलग सात दिवस तसेच ठेवून द्यावे. सात दिवसांत रातांब्यांच्या सालींतील साखर पूर्ण विरघळून सर्व गोड अर्क जमून येतो. तो फोडींमधील अर्क पिळून घेऊन, गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यावा व दुसऱ्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. जेव्हा सरबत प्यावेसे वाटेल तेव्हा एक ग्लास गार पाण्यात दोन टेबलस्पून अर्क मिसळून गारेगार सरबताचा आस्वाद घ्यावा.
टिप : बरणी उन्हात ठेवली तर दोन दिवसांत अमसुलातील साखर वितळते, अन्यथा सात दिवस लागतात. पिळून घेतलेली अमसुले फेकून न देता त्यांची छान आंबटगोड चटणी करता येते.

आले-लिंबू सरबत

साहित्य : दोन लिंबांचा रस, २ चमचे आल्याचा रस, १ वाटी साखर, चिमूटभर मीठ, चिमूटभर जिरे पूड, चिमूटभर काळीमिरी पूड व थंड पाणी.
कृती : सर्व प्रथम एका भांड्यात लिंबाचा रस, आल्याचा रस, साखर, मीठ घालून ढवळून एकजीव करावे. नंतर जिरे पूड, काळीमिरी पूड घालून चांगले ढवळावे. आता आवश्यकतेनुसार थंड पाणी मिसळून थंडगार आले-लिंबाच्या सरबताचा आस्वाद घ्यावा.

संत्रे-लिंबू सरबत

साहित्य : दोन वाट्या संत्र्याचा रस, एका लिंबाचा रस, पाव चमचा सैंधव मीठ, १ चमचा आल्याचा रस, पाव चमचा जिरे-काळीमिरी पूड, १ वाटी साखर व थंड पाणी.
कृती : आधी एका भांड्यात संत्री, आले व लिंबाचा रस एकत्र करावा. मग त्यात साखर, सैंधव मीठ, जिरे-काळीमिरी पूड घालून साखर वितळेपर्यंत ढवळावे. आता आवश्यकतेनुसार थंड पाणी घालून थंडगार आंबटगोड संत्री-लिंबाचे सरबत सर्व्ह करावे.

द्राक्ष सरबत
साहित्य : अर्धा किलो पिकलेली काळी द्राक्षे, चिमूटभर सैंधव मीठ, १ वाटी साखर, चिमूटभर जिरे पूड व थंड पाणी.
कृती : आधी द्राक्षे स्वच्छ धुवावीत. मग मिक्सरमध्ये ती बारीक करावीत. नंतर गाळून घ्यावे व चोथा फेकून द्यावा. आता गाळून घेतलेल्या रसात साखर, मीठ, जिरे पूड व गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळून घ्यावे. द्राक्ष सरबत थंडगार सर्व्ह करावे.

शहाळे-सब्जा सरबत
साहित्य : एक ग्लास शहाळ्याचे पाणी, पाण्यात भिजत घातलेला १ वाटी सब्जा, १ वाटी साखर व चिमूटभर वेलची पूड.
कृती : आधी शहाळ्याच्या पाण्यात साखर व वेलची पूड घालून ढवळून घ्यावे. मग त्यात भिजत घातलेला सब्जा घालून ढवळावे व गारेगार सरबताचा आस्वाद घ्यावा.

स्टार फ्रूट सरबत

साहित्य : दहा-बारा पिकलेले स्टार फ्रूट, १ वाटी खडीसाखरेची भुकटी, चिमूटभर सैंधव मीठ.
कृती : आधी ही फळे स्वच्छ धुऊन, कापून, आतील बियांचा भाग काढून टाकावा. मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यावीत. नंतर हे सर्व गाळून घ्यावे. आता त्यात खडीसाखर भुकटी व सैंधव मीठ घालून ढवळावे व हे मधुर रसाचे सरबत सर्व्ह करावे.

किवी सरबत

साहित्य : सहा किवी फळे, १ वाटी साखर, चिमूटभर मीठ.
कृती : सर्वात आधी ही फळे धुऊन त्याची साले काढावीत. मग मिक्सरमध्ये त्याचे तुकडे, साखर व मीठ घालून बारीक करून घ्यावे. आता गाळणीने गाळून किवीच्या आंबटगोड सरबताचा आस्वाद घ्यावा.

संबंधित बातम्या