गणेशासाठी मोदक हवेतच...

सुजाता नेरुरकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गणपती म्हटले की बाप्पांची आरास, पूजा, आरत्या या गोष्टी असतातच, पण त्याचबरोबर नैवेद्यासाठी त्याला आवडणारे मोदकही हवेतच. मोदकांशिवाय गणेशोत्सवाला मजा नाही. पारंपरिक मोदक तर तुम्ही करालच. पण त्याशिवाय मोदकांच्या काही वेगळ्या रेसिपीज...

अननसाचे मोदक 
साहित्य : सारणासाठी - तीन कप ओला खोवलेला नारळ, १ कप दूध, १ कप साखर, १ कप अननसाचे तुकडे, एक चिमूट पिवळा रंग, २-३ थेंब अननस ईसेन्स, सुका मेव्याचे तुकडे.
आवरणासाठी - दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार.
कृती : खोवलेला नारळ, दूध, साखर, एकत्र करून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये पिवळा रंग, अननसाचे तुकडे, अननसाचा ईसेन्स व सुका मेवा घालून बाजूला ठेवावे.
एका कढईमध्ये २ कप पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून पाण्याला चांगली उकळी आणावी. मग त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून एकत्र करावे. कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर एक वाफ येऊ द्यावी. मग उकड आणलेले पीठ परातीत काढून ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे व त्याचे एकसारखे २१ लिंबाएवढे गोळे करावेत. गोळे हातावर पुरीसारखे थापून त्यामध्ये १ चमचा नारळाचे मिश्रण भरून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा.
मोदक पात्रामध्ये २ ग्लास पाणी घालून चांगले गरम करावे. पाणी गरम झाल्यावर त्यावर चाळणी ठेवून चाळणीवर केळीचे पान ठेवावे. चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवावेत व वरून परत केळीचे पान ठेवावे. मोदक पात्र बंद करून १०-१२ मिनिटे मोदकाला उकड आणावी. गरम-गरम मोदक वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावेत.

काजूचे मोदक
साहित्य : दोन कप खवा, १ कप काजू, दीड कप साखर (पिठीसाखर करून), १ टीस्पून वेलची पूड, पाव कप दूध. 
कृती : काजू दुधामध्ये १ तास भिजत ठेवावेत. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. कढईमध्ये खवा मंद विस्तवावर थोडासा भाजून घ्यावा. मग त्यामध्ये काजू पेस्ट व पिठीसाखर घालून थोडे घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून खव्याचे मिश्रण थंड करायला ठेवावे.
खव्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून एकत्र मळून घ्यावे. मग मिश्रणाचे एकसारखे २० गोळे करून मोदकाचा आकार द्यावा किंवा मोदकाच्या साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा.

गाजराचे मोदक  
साहित्य : सारणासाठी - अडीचशे ग्रॅम केशरी गाजरे (कोवळी), अर्धा कप दूध, पाव कप खवा, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, थोडा सुका मेवा.
आवरणासाठी - एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार.
कृती : सारणासाठी : गाजरे स्वच्छ धुऊन, सोलून, किसून घ्यावीत. एका कढईमध्ये किसलेले गाजर, दूध व साखर एकत्र करून थोडे घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. मग त्यामध्ये खवा घालावा व दोन मिनिटे परत गरम करावे. नंतर त्यामध्ये वेलची पूड व सुका मेव्याचे तुकडे घालून मिश्रण तयार करावे.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून हालवावे. भांड्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ आणावी. 
नंतर शिजलेले पीठ परातीत काढून ओल्या हाताने चांगले मळावे. मग त्याचे लिंबाएवढे गोळे करून हातावर पुरीसारखे थापावे. त्यामध्ये एक चमचा मिश्रण ठेवून पुरी बंद करून मोदकाचा आकार द्यावा. 
मोदक पात्रात पाणी गरम करून घ्यावे. मोदक पात्राच्या चाळणीवर एक केळीचे पान ठेवून त्यावर पाणी शिंपडून सर्व मोदक लावावेत. मोदकांवर एक केळीचे पान ठेवून मोदक पात्राचे झाकण घट्ट लावावे. १५ मिनिटे मोदक उकडावेत. गरम गरम मोदक वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावेत.
 

गुलकंदाचे मोदक 
साहित्य : सारणासाठी : एक मध्यम आकाराचा नारळ, २ कप दूध, पाऊण कप साखर, २ टेबलस्पून गुलकंद, १ टीस्पून वेलची पूड, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून).
पारीसाठी : दोन कप रवा (बारीक), १ टेबलस्पून तूप (मोहनासाठी), मीठ चवीनुसार, अर्धा कप दूध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप.
कृती : नारळ खोवून घ्यावा. त्यामध्ये साखर व दूध एकत्र करून शिजवायला ठेवावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मग त्यामध्ये वेलची पूड, गुलकंद, काजू, बदाम घालावेत. बारीक रवा मिक्सरमध्ये थोडा आणखी बारीक करून घ्यावा. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालावे. दूध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैलसर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील)
रवा भिजवल्यावर १० मिनिटे झाकून बाजूला ठेवावा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबाएवढे गोळे करावेत. एक एक गोळा पुरीसारखा लाटून त्यामध्ये एक टेबलस्पून सारण भरून गोळा बंद करावा. कढईमध्ये तूप गरम करून मोदक गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. वरून पिठीसाखर भुरभुरावी. हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.
टीप : रवा वापरून मोदक करायचे असतील तेव्हा गोळे पुरीसारखे लाटून सारण भरून मोदक बंद केले, की मोदक ओल्या कापडामध्ये ठेवावेत. म्हणजे सुकणार नाहीत व तळताना उघडणार नाहीत. मोदक करताना गोळा लाटून झाला, की सारण भरल्यावर पुरीला कडेने अगदी थोडेसे दूध लावावे. मग मोदक बंद करावेत म्हणजे ते चांगले चिकटून राहतील.

चॉकलेट मोदक 
साहित्य : अडीचशे ग्रॅम डार्क बेस चॉकलेट, २५० ग्रॅम मिल्क बेस अथवा व्हाइट बेस चॉकलेट, सुका मेव्याचे तुकडे, मोदकाच्या आकाराचा मोल्ड.
कृती : डार्क बेस, मिल्क बेस व व्हाइट बेस चॉकलेट वेगवेगळे डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावे. चमच्याने हालवावे. मग त्यामध्ये सुका मेव्याचे तुकडे घालून ५ मिनिटे थंड करायला बाजूला ठेवावे. मग मोदकाच्या मोल्डमध्ये प्रथम डार्क बेस मग व्हाइट बेस्ट असे घालावे. मोल्ड फ्रीजमध्ये पाच मिनिटे ठेवून मग काढावा.

बुंदी मोदक 
साहित्य : दोन कप खोवलेला ओला नारळ, २ बुंदीचे लाडू, १ कप दूध, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून सुका मेवा.
कृती : खोवलेला नारळ, दूध, साखर एकत्र करून घट्ट होईपर्यंत शिजवावे. मग त्यामध्ये बुंदी, वेलची पूड, सुका मेवा घालून एकत्र करावे व २-३ मिनिटे परत शिजवावे. थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे करून त्याला मोदकाचा आकार द्यावा.

मऊ लुसलुशीत रव्याचे मोदक (दोन प्रकारे)
साहित्य : एक वाटी रवा, अडीच वाटी दूध, अर्धी वाटी साखर, ३ टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून टुटी फ्रुटी, अर्धी वाटी खजूर (बिया काढून), २ टेबलस्पून काजू, बदाम (तुकडे करून). 
कृती : खजुराच्या बिया काढून तो मिक्सरमध्ये थोडा वाटून घ्यावा. त्यामध्ये काजू, बदामाचे तुकडे घालून एकत्र करून सारण तयार करावे. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मंद विस्तवावर ४-५ मिनिटे भाजावा. रवा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. कढईमध्ये दूध गरम करावे. मग त्यामध्ये साखर घालून ती विरघळवून घ्यावी. साखर विरघळल्यावर त्यामध्ये वेलची पूड व भाजलेला रवा घालावा. सर्व एकत्र करून थोडे घट्ट होईपर्यंत शिजवावे. मग त्याचे दोन भाग करावेत. 
टुटी फ्रुटी मोदक : पहिल्या भागात २ टेबलस्पून टुटी फ्रुटी घालावी व एकत्र करून त्याचे एकसारखे गोळे करावेत. मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण भरून मोदक तयार करावेत. 
खजूर स्टफ मोदक : दुसऱ्या भागाचे एकसारखे गोळे करून घ्यावेत. खजुराच्या सारणाचेपण तेवढेच गोळे करावेत. मग रव्याच्या गोळ्यामध्ये खजुराचे सारण भरावे व मोदकाच्या मोल्डमध्ये घालून मोदकाचा आकार द्यावा. 

कणीक-गुळाचे मोदक
साहित्य : अर्धी वाटी तूप, १ वाटी गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून काजू, बदाम, पिस्त्याची थोडी जाडसर पूड, १ टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, अर्धा टीस्पून वेलची पूड, थोड्या केसर काड्या, पाऊण वाटी गूळ. 
कृती : प्रथम काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर पूड करून घ्यावी. गूळ किसावा. एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ घ्यावे. पीठ छान खमंग होईपर्यंत भाजावे. मग त्यामध्ये सुका मेव्याची पूड, वेलची पूड,  डेसिकेटेड कोकोनट व केसर घालून एकत्र करावे व विस्तव बंद करावा. मग त्यामध्ये किसलेला गूळ घालून चांगले मळून घ्यावे. आता आपले मोदकाचे मिश्रण तयार झाले. मोदक मोल्ड घेऊन त्याला तुपाचा हात लावावा. त्यामध्ये थोडे थोडे मिश्रण घालून मोदक तयार करावेत. मोदक झाले की गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा.

इन्स्टंट मोदक 
इन्स्टंट मोदक करताना विस्तव वापरावा लागत नाही. त्यासाठी लागणारे कंडेन्स्ड मिल्क बाजारातूनही आणू शकता किंवा घरीसुद्धा करू शकता. 
होम मेड कंडेन्स्ड मिल्क
साहित्य : अर्धा लिटर दूध, पाऊण कप साखर, एक चिमूट खायचा सोडा.
कृती : अर्धा लिटर दूध गरम करून त्यामध्ये पाऊण कप साखर व एक चिमूट खायचा सोडा घालावा. घट्ट होईपर्यंत आटवावे.

गुलकंद रोज कोकोनट मोदक 
साहित्य : एक कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप कंडेन्स्ड मिल्क, १ टेबलस्पून गुलकंद, १ टेबलस्पून रोज सिरप,
२-३ थेंब खायचा लाल रंग.
कृती : एका मोठ्या आकाराच्या बोलमध्ये डेसिकेटेड कोकोनट व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करावे. मग त्याचे दोन एकसारखे भाग करावेत. एक भाग पांढराच ठेवावा व दुसऱ्या भागात गुलकंद, रोज सिरप व लाल रंग घालून चांगले एकत्र करावे. पहिल्या भागाचे व दुसऱ्या भागाचे एकसारखे लहान लहान गोळे करावेत. त्यानंतर एक पांढरा भाग व एक लाल भाग घेऊन त्याचा मोदकाच्या मोल्डमधून मोदक तयार करावा. 

चॉकलेट कोकोनट मोदक
साहित्य : १ कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप कंडेन्स्ड मिल्क, १ टेबलस्पून चॉकलेट सॉस.
कृती : एका मोठ्या आकाराच्या बोलमध्ये डेसिकेटेड कोकोनट व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करावे. मग त्याचे दोन एकसारखे भाग करावेत. एक भाग पांढराच ठेवून दुसऱ्या भागामध्ये चॉकलेट सॉस घालावा व चांगले मिक्स करावे.
पहिल्या भागाचे व दुसऱ्या भागाचे एकसारखे लहान लहान गोळे करावेत. दोन्ही प्रकारचा एक एक गोळा घेऊन मोदकाच्या मोल्डमध्ये मोदक करावा. 
आपले इन्स्टंट चॉकलेट कोकोनट मोदक/रोज गुलकंद कोकोनट मोदक प्रसादासाठी तयार आहेत.

संबंधित बातम्या