मसाला पुरी, मखाने आणि पराठे

सुजाता नेरुरकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

प्रवास म्हटला की बरोबर काहीतरी खायला हवेच, पण त्याचबरोबर ते टिकणारेही हवे. अशाच टिकाऊ व चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज...

कुरकुरीत मठरी 
साहित्य : दोन कप मैदा, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन, पाव कप बारीक रवा, अर्धा कप तेल, प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा, धने, बडीशेप, अर्धा टीस्पून मिरे, ४ लवंग, १ टीस्पून मीठ, १ चिमूट हिंग, २ टेबलस्पून कसुरी मेथी, तेल. 
कृती : धने, बडीशेप, मिरे व लवंग जाडसर कुटावे. एका बोलमध्ये मैदा, गव्हाचे पीठ, बेसन व रवा एकत्र करावा. मग त्यामध्ये मीठ, कुटलेले धने, बडीशेप, मिरे, लवंग, हिंग, कसुरी मेथी व तेल घालून घट्ट पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करावेत. एकेक गोळा हातात घेऊन दोन्ही हातांनी दाबावा व प्लेटमध्ये ठेवावा. कढईमध्ये तेल गरम करून मध्यम विस्तवावर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत तळावे. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरावे.

झटपट मेथी पालक पराठा रोल 
साहित्य : एक कप पालक पाने (बारीक चिरून), १ कप मेथी पाने (बारीक चिरून), २ कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, १ टीस्पून धने-जिरे पूड, मीठ, तेल, तूप.
कृती : प्रथम मेथी व पालक धुऊन बारीक चिरावा. एका मोठ्या बोलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, चिरलेली मेथी, पालक, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, धने-जिरे पूड, तिखट, हळद, हिंग, मीठ घालून एकत्र करावे. त्यामध्ये पाणी घालून घट्ट पीठ मळावे व झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे. मळलेल्या पिठाचे एकसारखे ८ गोळे करावेत. विस्तवावर तवा गरम करावा. पोळपाटावर गोळे लाटून तव्यावर छान तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग पराठे भाजावेत. गरम गरम पराठा रोल तूप घालून टोमॅटो सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावा.

पोह्याचे पौष्टिक लाडू
साहित्य : अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी सुके खोबरे (किसून), १ टेबलस्पून खसखस, १ टीस्पून तूप,
८-१० बदाम, २ टेबलस्पून काजू, १० खजूर (बारीक चिरून), अर्धी वाटी गूळ (किसून), अर्धा टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ.
कृती : प्रथम खजूर धुऊन बिया काढून चिरावा. सुके खोबरे किसून भाजावे. वेलची व जायफळाची पूड करावी. गूळ किसावा. एका कढईमध्ये पोहे मंद विस्तवावर छान भाजून एका प्लेटमध्ये काढावेत. खसखस भाजावी. पोहे थंड झाल्यावर कुस्करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये काजू व बदाम परतावेत. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटावेत. एका बोलमध्ये पोहे, सुके खोबरे, खसखस, बदाम-काजू एकत्र करावे. मिक्सरच्या भांड्यात गूळ, खजूर, वेलची पूड व जायफळ घालून थोडेसे वाटावे. मग पोह्याच्या मिश्रणात काढून एकसारखे मिश्रण करून त्याचे छोटे छोटे लाडू करावेत.

टेस्टी खाकरा 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून कसुरी मेथी, पाव टीस्पून ओवा, १ चिमूट हिंग, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून तिखट, १ हिरवी मिरची (बारीक चिरून), मीठ चवीनुसार, अर्धा कप दूध. 
कृती : एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, कसुरी मेथी, ओवा, हिंग, हळद, जिरे, तिखट, हिरवी मिरची, मीठ व २ टीस्पून तेल घालून चांगले एकत्र करावे. मग थोडे थोडे दूध घालून चांगले घट्ट पीठ मळावे. गरज असल्यास १-२ चमचे पाणी घालावे. मळलेले पीठ १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. खाकरा करताना हातावर थोडेसे तेल लावून परत पीठ चांगले मळावे. त्याचे छोटे गोळे करावेत. गोळा थोडे पीठ लावून अगदी पातळ लाटावा. तवा गरम करावा. तवा गरम झाला की त्यावर लाटलेला खाकरा टाकावा. खाकरा थोडासा गरम झाला की लगेच उलटावा. दुसऱ्या बाजूने थोडा भाजून झाला की प्लेटमध्ये काढून ठेवावा. तेल लावायचे असेल तर खाकरा भाजताना थोडेसे तेल लावून भाजावा; त्यासाठी कापडाचा वापर करून  भाजावे. 
टीप : खाकरा लाटताना खूप पातळ लाटावा व भाजताना मध्यम विस्तवावर भाजावा, म्हणजे छान कुरकुरीत होईल. खाकरा पूर्ण थंड झाल्यावर मगच एअर टाइट डब्यात भरावा. हे खाकरा ६-७ दिवस चांगले राहतात. 

टिकाऊ पौष्टिक रोट 
साहित्य : एक वाटी बारीक रवा, १ वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी सुके खोबरे (किसून), पाव वाटी साखर (बारीक करून), ५ बदाम, काजू, पिस्ते (बारीक तुकडे करून), १ टेबलस्पून खसखस, दीड टीस्पून बडीशेप (कुटून), २ टेबलस्पून तूप, पाऊण वाटी गूळ, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : एक भांड्यात थोड्याशा पाण्यात गूळ विरघळवून घ्यावा. साखर मिक्सरमध्ये बारीक करावी. बडीशेप जाडसर कुटावी. ड्रायफ्रुट्सचे तुकडे करावेत. (थोडे सुके खोबरे, ड्रायफ्रुट्स व खसखस सजावटीसाठी बाजूला काढावी.) एका बोलमध्ये बारीक रवा, गव्हाचे पीठ, साखर, सुके खोबरे, ड्रायफ्रुट्स, खसखस, बडीशेप व तूप घालून एकत्र करावे. मग त्यामध्ये वेलची पूड व गुळाचे पाणी घालून एकत्र करावे. चांगले मळून बोलवर झाकण ठेवून ४ तास बाजूला ठेवावे, म्हणजे रवा चांगला भिजेल. नंतर त्यामध्ये २ चमचे पाणी घालून चांगले मळावे. मळलेल्या पिठाचे एकसारखे थोडे मोठे गोळे करावेत. पोळपाटावर गोळे जाडसर थापावेत. थापलेल्या गोळ्यावर थोडेसे किसलेले सुके खोबरे, खसखस व ड्रायफ्रुट्स घालून लाटण्याने हलक्या हाताने दाबावे. नॉनस्टिक पॅन गरम करून त्याला तूप लावावे व रोट त्यावर ठेवावेत. बाजूने थोडे तूप सोडावे व ४-५ मिनिटे मध्यम आचेवर भाजावे. मग उलटून बाजूने परत थोडेसे तूप सोडावे. दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढावे. रोट थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावेत.    

बेकरीसारखी नानकटाई 
साहित्य : एक वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, २ टेबलस्पून बारीक रवा, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाऊण वाटी पिठीसाखर, पाव कप तूप, १ टेबलस्पून दूध, एक चिमूट मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, पिस्ते.
कृती : एका बोलमध्ये मैदा, बेसन, रवा, पिठीसाखर व बेकिंग पावडर एकत्र करावी. त्यामध्ये मीठ, वेलची पूड व दूध घालून चांगले मळावे. पिठाचे छोटे गोळे करून हाताने थोडे चपटे करावेत. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यावर चपटे गोळे ठेवून बोटाने मधोमध थोडेसे दाबावे. मग दाबलेल्या ठिकाणी पिस्त्याचे तुकडे घालून पुन्हा थोडेसे दाबावे, म्हणजे पिस्ते चांगले चिकटतील. नॉनस्टिक पॅन चांगला गरम करावा. त्यामध्ये एक चकती ठेवावी (आपण टेबलावर गरम भांडी ठेवण्यासाठी वापरतो ती). त्यावर नानकटाईची स्टीलची प्लेट ठेवावी. पॅनवर झाकण ठेऊन १२ ते १५ मिनिटे मंद विस्तवावर बेक करावे. थंड झाल्यावर डब्यात भरावी.

गूळपापडी लाडू 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, ४ टेबलस्पून तूप, अर्धा कप गूळ, १ टीस्पून वेलची पूड, ड्रायफ्रुट्स.
कृती : प्रथम गूळ किसून घ्यावा. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून ब्राऊन रंग येईपर्यंत मंद विस्तवावर भाजावे. गव्हाचे पीठ भाजून झाले की विस्तव बंद करून कढई खाली उतरवावी. त्यामध्ये वेलची पूड, किसलेला गूळ घालून सारखे हलवावे, म्हणजे गूळ पातळ होऊन मिश्रण थोडेसे सैल होईल. मग त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून मध्यम आकाराचे लाडू वळावेत.

मसाला पुरी 
साहित्य : दोन कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून बेसन, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, दीड टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ टेबलस्पून कोथिंबीर (चिरून), १ हिरवी मिरची, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल (मोहन), तेल (पुरी तळण्यासाठी). 
कृती : एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या (कुटून), मीठ (नेहमीपेक्षा थोडे जास्त) व कडकडीत तेलाचे मोहन घालून एकत्र करावे. पाणी घालून पीठ घट्ट मळून १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. मळलेल्या पिठाचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटाव्यात. तेल चांगले तापले की त्यामध्ये पुऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. 

लाल भोपळ्याचा पराठा 
साहित्य : एक कप लाल भोपळ्याचा कीस, २ कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून बेसन, अर्धा कप गूळ, मीठ चवीनुसार, पीठ भिजविण्यासाठी दूध, तूप.
कृती : लाल भोपळा धुऊन, साले काढून, किसावा. गूळ किसावा. एका कढईमध्ये किसलेला भोपळा वाफवावा. कीस थोडा कोमट झाला, की त्यामध्ये गूळ व चवीला मीठ घालून १० मिनिटे बाजूला ठेवावे. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन व थोडे दूध घालून घट्ट पीठ मळावे व १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. पिठाचे एकसारखे चार गोळे करून पराठा लाटावा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर बाजूने तेल सोडून छान खमंग पराठा भाजावा. गरमागरम पराठा वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावा.

चटपटे मखाने 
मखाने बाजारात किंवा वाण्याच्या दुकानात मिळतात. मखाने कढईमध्ये एक चमचा तूप घालून मंद विस्तवावर २-३ मिनिटे भाजावेत आणि मग आपल्याला आवडेल तो प्रकार करावा. मखाना रोस्ट करताना आपण खालील प्रकारे मसाला वापरून भाजू शकतो. 
१. तिखट, चाट मसाला व मीठ किंवा सर्व्ह करताना वरून लिंबू रस घालता येतो.
२. मखाने रोस्ट करताना पेरी पेरी मसाला वापरू शकतो. 
३. पुदिना पावडर, मीठ व मिरे पावडर वापरता येते. 
४. चॉकलेट बेस डबल बॉइल सिस्टीमने विरघळवून घेऊन त्यामध्ये मखाने घालावेत. मग बाजूला थोडे मोकळे करून ठेवावेत. 
५. कढईमध्ये एक चमचा तूप, किसलेला गूळ घालून त्यामध्ये रोस्ट केलेले मखाने व तीळ घालून चांगले मिक्स करावे.

संबंधित बातम्या