टेस्टी, डिलिशियस 

सुजाता नेरुरकर
बुधवार, 1 जुलै 2020

चॉकलेट म्हटले की लहान-मोठे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र बाजारातील चॉकलेट्स रोजरोज विकत घेणे परवडणारे नसते आणि हे लहान मुलांना समजावून सांगणेही अशक्य असते. अशावेळी घरच्या घरीच विविध प्रकारची, वेगवेगळ्या आकारांची आणि चवीची चॉकलेट्स करणे केव्हाही चांगले. शिवाय ही चॉकलेट्स करत असताना घरातील लहान मुलांनाही मदतीला घेता येईल... 

होममेड व्हाइट चॉकलेट
साहित्य : दोन टेबलस्पून डालडा (वनस्पती तूप), पाव कप आयसिंग  शुगर  किंवा पिठीसाखर, ३ टेबलस्पून दूध पावडर, अर्धा टीस्पून डालडा (वनस्पती तूप), पाव टीस्पून बटर. 
कृती : गॅसवर  एक भांडे गरम करायला ठेवावे. भांड्यात २  ग्लास पाणी गरम करून त्यावर एक थोडे मोठे भांडे ठेवावे. त्यामध्ये डालडा घालून विरळवून घ्यावा. नंतर  त्यामध्ये  आयसिंग शुगरकिंवा पिठीसाखर घालून मिक्स करून दूध पावडर घालावी आणि  चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर  त्यामध्ये अर्धा टी स्पून  डालडा व पाव टी स्पून बटर घालून मिक्स करून घ्यावे. नंतर  सिलिकॉन मोल्डमध्ये मिश्रण ओतून फ्रिजमध्ये १५ मिनिटे  सेट करायला ठेवावे. चॉकलेट चांगले सेट झाल्यावर सिलिकॉन मोल्ड  काढून घ्यावा.

होममेड चॉकलेट (प्रकार १)
साहित्य : डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट हे बेसचे प्रकार आहेत. या तीनही बेसने आपण घरी वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स तयार करू शकतो. हे बेस बाजारात सहज मिळतात. एक बेस ५०० ग्रॅमचा असतो. एका बेसमध्ये ३५ मध्यम आकाराची चॉकलेट्स करता येतात. वेगवेगळी चॉकलेट्स करण्यासाठी ड्रायफ्रूट्स, डेसिकेटेड कोकनट, बिस्किटे, मावा, चीज, चॉकलेट मोल्ड, बटर पेपर, पॅकिंगसाठी डिझाईनचा पेपर इत्यादी साहित्य लागते. 
कृती : आपल्याला जेवढी चॉकलेट्स करायची आहेत, तेवढाच चॉकलेट बेस घ्यावा. चॉकलेट करताना डबल बॉयलिंग पद्धतीने बेस विरघळवून घ्यावा. (डबल बॉयलिंग पद्धतीने म्हणजे एक मोठ्या आकाराचे जाड बुडाचे भांडे व अजून एक लहान आकाराचे भांडे घेऊन मोठ्या भांड्यात १ ग्लास पाणी गरम करायला ठेवावे. आता बेसचे तुकडे करून लहान आकाराच्या भांड्यात ठेवून ते भांडे गरम पाण्याच्या भांड्यात ठेवून मंद विस्तवावर बेस विरघळवून घ्यावा. बेस विरघळण्यासाठी १०-१२ मिनिटे लागतात.) बेस विरघळल्यावर चमच्याने चांगले हलवून घेऊन ५ मिनिटे थंड करायला ठेवावा. थंड झाल्यानंतर मोल्डमध्ये चमच्याने बेस घालून मोल्ड फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. नंतर बाहेर काढून मोल्डमधील तयार चॉकलेट्स काढून बटर पेपरवर ठेवावीत व डिझाइनच्या पेपरमध्ये पॅक करावीत. 

होममेड चॉकलेट (प्रकार २)
साहित्य : पाऊण कप  नारळाचे तेल किंवा कोको  बटर, १ कप  साखर, पाऊण कप  कोको  पावडर, पाव कप  दूध पावडर, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : गॅस सुरू करून  त्यावर गरम करायला  एक भांडे ठेवावे. त्या भांड्यात २ ग्लास पाणी गरम करून त्यावर एक थोडे मोठे भांडे ठेवून त्यामध्ये नारळाचे तेल किंवा कोको बटर घालावे. नंतर त्यामध्ये  साखर घालावी. आता त्यामध्ये कोको पावडर व मिल्क पावडर घालून मिक्स करून व्हॅनिला इसेन्स  घालून मिक्स करून घ्यावे.  त्याची छान स्मूध सिल्की पेस्ट तयार होईल.  आता  आपल्याला आवडेल तो  सिलिकॉन मोल्ड  घेऊन त्यामध्ये मिश्रण ओतून घ्यावे. (जर  सिलिकॉन मोल्ड नसेल,  तर आईस-ट्रे वापरला तरी चालेल.)  आता  सिलिकॉन मोल्ड  फ्रिजमध्ये  २  तास सेट होण्यासाठी  ठेवावा.  चॉकलेट चांगले सेट झाल्यावर  सिलिकॉन मोल्ड काढून घ्यावा.

फ्रूट अँड नट  
साहित्य : डार्क चॉकलेट बेस, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, मोल्ड.
कृती : चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. आता एका चमच्याने हालवून घेऊन त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून पुन्हा हालवून ५ मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावा. आता मोल्ड घेऊन त्यामध्ये चमच्याने बेस घालून मोल्ड सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. ५ मिनिटे झाल्यानंतर मोल्ड फ्रिजमधून बाहेर काढून त्यातील चॉकलेट्स बटर पेपरवर काढून ठेवावीत. आता ही चॉकलेट्स पेपरमध्ये रॅप करून घ्यावेत. 

किटकॅट  
साहित्य : मिल्क चॉकलेट बेस, वेफर बिस्किट्स, मोल्ड.  
कृती : चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. नंतर एका चमच्याने हलवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावा. आता मोल्ड घेऊन त्यामध्ये चमच्याने अगोदर थोडा बेस घालून त्यावर मोल्डच्या आकाराचे वेफर बिस्कीट ठेवून परत त्यावर तयार बेस घालावा. नंतर मोल्ड सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. ५ मिनिटांनी मोल्ड फ्रिजमधून बाहेर काढून त्यातील चॉकलेट्स बटर पेपरवर काढून घ्यावीत. आता ही चॉकलेट्स पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत. या चॉकलेटमध्ये वेफर बिस्किट्स असल्याने खाताना कुरकुरीत अशी छान चव येते. 

डेअरी मिल्क
साहित्य : डार्क चॉकलेट बेस किंवा मिल्क चॉकलेट बेस (आवश्यकतेनुसार बेस घ्यावा.) व मोल्ड. 
कृती : आवडता चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. नंतर एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावा. नंतर मोल्ड घेऊन त्यामध्ये चमच्याने हा बेस घालून, मोल्ड सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. ५ मिनिटे झाल्यावर मोल्ड फ्रिजमधून काढून त्यातील चॉकलेट्स बटर पेपरवर काढून ठेवावीत. नंतर पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत.

मावा बॉल किंवा चीज बॉल 
साहित्य : पाचशे ग्रॅम डार्क चॉकलेट बेस, २०० ग्रॅम मावा किंवा चीज आणि चॉकलेट सॉस. 
कृती : प्रथम चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. आता एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावा. नंतर माव्याचे गोल गोल गोळे करून ते विरघळवलेल्या बेसमध्ये डीप करून बटर पेपरवर ठेवावेत. आता त्यावर वरून थोडासा चॉकलेट सॉस घालून नंतर फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावे. या चॉकलेट्समध्ये मावा वापरल्यामुळे चॉकलेटची चव अगदी शाही लागते.   

मिल्की बार
साहित्य : पाचशे ग्रॅम व्हाइट चॉकलेट बेस आणि मोल्ड. 
कृती : प्रथम चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. नंतर एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावा. आता मोल्ड घेऊन त्यामध्ये चमच्याने बेस घालून घ्यावा व मोल्ड सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. ५ मिनिटे झाल्यावर मोल्ड फ्रिजमधून बाहेर काढून त्यातील चॉकलेट्स बटर पेपरवर काढून ठेवावीत. आता ही चॉकलेट्स पेपरमध्ये रॅप करून घ्यावीत.

बदाम/काजू/पिस्ता/किसमिस चॉकलेट
साहित्य : डार्क चॉकलेट बेस, मिल्क बेस व व्हाइट बेस, बदाम, काजू, पिस्ता, किसमिस. 
कृती : प्रथम डार्क चॉकलेट बेस, मिल्क बेस व व्हाइट बेस घेऊन हे तीनही बेस वेगवेगळे डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावेत. नंतर एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावेत. बदाम थोडे गरम करून गार करून घ्यावेत. नंतर विरघळवलेल्या बेसमध्ये घालून नंतर बटर पेपरवर ठेवून फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावे. लहान मुले ड्रायफ्रूट्स खाताना टाळाटाळ करतात, अशाप्रकारची चॉकलेट करून दिल्यास ड्रायफ्रुट्सही खाल्ले जातील. ही चॉकलेट्स चवीलाही अप्रतिम लागतात.  

मोदक चॉकलेट   
साहित्य : अडीचशे ग्रॅम डार्क चॉकलेट बेस, २५० ग्रॅम मिल्क बेस अथवा व्हाइट बेस, मोदकाच्या आकाराचा मोल्ड. 
कृती : प्रथम डार्क, मिल्क आणि व्हाइट चॉकलेटचे बेस घ्यावेत. हे तीनही बेस वेगवेगळे डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावेत. आता एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवावेत. आता मोदकाचा मोल्ड घेऊन त्या मोल्डमध्ये प्रथम डार्क बेस, नंतर व्हाइट बेस आणि शेवटी मिल्क बेस घालून घ्यावा. आता हा मोल्ड फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवून नंतर बाहेर काढावा आणि त्यातील चॉकलेट्स बटर पेपरवर काढून घ्यावेत. चॉकलेट मोदक हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. हे चॉकलेट मोदक दिसायलाही खूप छान दिसतात.

संबंधित बातम्या