उपवास स्पेशल

सुजाता नेरुरकर
सोमवार, 8 मार्च 2021

महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेकजण उपवास करतात. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कधीकधी कंटाळा येतो. म्हणूनच या काही खास उपवास स्पेशल रेसिपीज...

उपवासाचा बटाटे वडा
साहित्य : सारणासाठी : सहा मध्यम आकाराचे बटाटे, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले तुकडा, १ टीस्पून लिंबू रस, पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ व साखर चवीनुसार.
आवरणासाठी : एक कप वरईचे पीठ, १ कप शिंगाडा पीठ, १ टीस्पून लाल मिरची पूड, १ टेबलस्पून तेल (गरम करून), चवीनुसार मीठ, तेल किंवा तूप बटाटे वडा तळण्यासाठी.
कृती : बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्यावेत. हिरवी मिरची व आले पेस्ट करून घ्यावी. उकडलेल्या बटाट्यामध्ये आले-हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, लिंबू रस, मीठ घालून मिक्स करून त्याचे ८-१० चपट्या आकाराचे गोळे करावेत. वरईचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, गरम तेल, लाल मिरची पूड, मीठ घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. कढईमध्ये तेल अथवा तूप गरम करावे. बटाट्याचा एक गोळा घेऊन पिठामध्ये घोळवून गरम तेलात सोडावा व छान खरपूस वडे तळावेत. गरम गरम बटाटे वडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

शेंगदाण्याची काजू कतली
साहित्य : एक कप शेंगदाणे, १२-१५ काजू, १ कप साखर, १ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टीस्पून वेलची पूड किंवा ४-५ ड्रॉप रोझ इसेन्स, १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून तूप पेपरला लावायला.
कृती : प्रथम शेंगदाणे मंद विस्तवावर भाजावेत. पण भाजताना काळजी घ्यावी, ते जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजू नयेत, त्यावर डाग येता कामा नयेत. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची साले काढून टाकावी. मग मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे व काजू बारीक वाटून घ्यावेत. कढईमध्ये एक कप साखर व अर्धा कप पाणी घेऊन मंद विस्तवावर एक तारी पाक करावा. मग साखरेच्या पाकात ग्राइंड केलेले शेंगदाणे व काजू घालून मंद विस्तवावर परत थोडे घट्ट होईपर्यंत ठेवावे. थोडे घट्ट व्हायला आले की मिल्क पावडर, वेलची पूड घालून मिक्स करून मिश्रण थोडे घट्ट झाले की विस्तव बंद करावा. जर मिश्रण थोडे सैल वाटले तर एक टीस्पून पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. एका प्लॅस्टिकच्या पेपरला तुपाचा हात लावून तयार झालेले मिश्रण त्यावर घालावे व लाटण्याने थोडे जाडसर लाटावे. मग त्याच्या शंकरपाळीसारख्या वड्या कापाव्यात व थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.

स्पेशल थंडाई
साहित्य : एक कप दूध, दीड कप साखर, २ टेबलस्पून गुलकंद, दीड लिटर पाणी, १ टेबलस्पून बदाम, १ टेबलस्पून कलिंगडाचे बी, १ टीस्पून मिरे, अर्धा टेबलस्पून खसखस, अर्धा टेबलस्पून बडीशेप, १ टीस्पून वेलचीपूड.
कृती : साखर व अर्धा कप पाणी मिक्स करून बाजूला ठेवावे. एका भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यामध्ये बदाम, कलिंगडाचे बी, मिरे, खसखस, बडीशेप दीड ते दोन तास भिजत ठेवावे व मग मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गरज असेल तर अजून थोडे पाणी घालून वाटावे. मग वस्त्रगाळ करावे, म्हणजे गाळल्यावर फक्त अर्क भांड्यात जमा होईल. नंतर भांड्यातील अर्कात दूध, साखर, रोझ वॉटर घालून मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्यावर वेलची पूड घालून फ्रीजमध्ये १-२ तास छान थंड करायला ठेवावे व थंड थंडाई सर्व्ह करावी.

रताळ्याचे गुलाबजाम
साहित्य : गुलाबजामसाठी : एक मध्यम आकाराचे रताळे, पाव कप पनीर (किसून) दीड टेबलस्पून साबुदाणा पीठ, थोडे मनुके, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप.
पाकासाठी : एक कप साखर, अर्धा कप पाणी, १ टीस्पून वेलदोड्याची पूड.
कृती : प्रथम रताळी उकडून सोलून अगदी मऊ कुस्करावी. त्यामध्ये किसलेले पनीर व टणकपणा येण्यासाठी साबुदाणा पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून प्रत्येक गोळ्यामध्ये एक-एक मनुका ठेवून परत गोळा बंद करावा. साखर, पाणी व वेलची पूड एकत्र करून पाक करायला ठेवावा. पाक फार घट्ट नसावा. एका कढईमध्ये तूप गरम करून गोळे गुलाबी रंग येईपर्यंत मंद विस्तवावर तळावेत. मग तळलेले गोळे पाकामध्ये घालावेत. हा पदार्थ चवीला खूप छान लागतो.

मखाने खीर
साहित्य : म्हशीचे एक लिटर दूध, दीड कप मखाने, १ टीस्पून साजूक तूप, १५ बदाम, १ टीस्पून वेलची पूड, पाव कप साखर, २ टेबलस्पून बेदाणे.
कृती : दूध गरम करून बाजूला ठेवावे. मखान्याचे मोठे तुकडे करून घ्यावेत. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. बदाम थोडे जाडसर कुटावेत. एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप थोडे गरम करून जाडसर वाटलेले मखाने थोडेसे परतून घ्यावेत. मखाने परतून झाल्यावर त्यामध्ये दूध घालून मिक्स करावे. तीन चतुर्थांश होईपर्यंत दूध आटवावे, म्हणजे मखाने पण चांगले शिजतील. त्यामध्ये बदामाची पूड घालून चांगली उकळी आणावी. त्यामध्ये साखर घालून २-३ मिनिटे दूध मंद विस्तवावर ठेवावे. भांडे विस्तवावरून उतरवून त्यामध्ये वेलची पूड व बेदाणे घालून मिक्स करून बाजूला ठेवावे. गार झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करून मग थंड थंड मखाने खीर सर्व्ह करावी.

रताळ्याची टॉफी
साहित्य : दोन मध्यम आकाराची रताळी, १ कप साखर, १ टीस्पून वेलची पूड, अर्धा कप तूप तळण्यासाठी.
कृती : रताळी चांगली धुऊन उकडून घ्यावीत. उकडताना थोडी कच्चट ठेवावीत. रताळी थंड झाल्यावर त्याची साले काढून त्याच्या गोल गोल चकत्या कराव्यात. एका मध्यम आकाराच्या भांड्यात साखर व दोन टेबलस्पून पाणी घालून मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक थोडा घट्ट झाला पाहिजे. एका कढईमध्ये तूप गरम करून रताळ्याचे काप गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. नंतर तळलेले काप साखरेच्या पाकात घालावेत व दोन-तीन मिनिटे मंद विस्तवावर शिजवून घ्यावेत. रताळ्याची टॉफी गरम किंवा गार दोन्ही प्रकारे चांगली लागते.
टीप : १) रताळी शक्यतो लहान आकाराची घ्यावीत म्हणजे चकत्या पण लहान छान दिसतात. २) रताळी जास्त उकडू नयेत, नाहीतर त्याच्या चकत्या करताना व तळताना ती तुटतील.

कवठाची बर्फी
साहित्य : एक कप कवठाचा गर, दीड कप साखर, १ टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून पिठीसाखर, १ टीस्पून तूप.
कृती : कवठ फोडून त्यातील गर काढून त्यातील जाड बिया काढून घ्याव्यात. बिया मिक्सरमध्ये बारीक कराव्यात. एका कढईमध्ये कवठाचा गर, साखर मिक्स करून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद विस्तवावर परतावे. मिश्रण थोडे कोरडे व्हायला आले की पिठीसाखर घालून मिक्स करावे. स्टीलच्या प्लेटला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये ओतावे व एकसारखे थापावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

बटाट्याचा शाही शिरा
साहित्य : चार मोठे बटाटे, अर्धी वाटी खवा, अर्धी वाटी साखर, ३ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून दूध, २-३ काड्या केशर, १ टीस्पून वेलची पूड, थोडे मनुके, काजू-बदाम तुकडे.
कृती : बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून एक-दोन मिनिटे भाजावे. दूध घालून पुन्हा एक-दोन मिनिटे भाजावे. नंतर साखर, वेलची पूड, केशर घालून मंद विस्तवावर थोडावेळ ठेवावे व मोकळा झाला की उतरवावा.

चटपटीत दाणे
साहित्य : दोन कप शेंगदाणे, २ टीस्पून लाल मिरची पूड, चवीनुसार मीठ, पाव कप खोबरे (ओला नारळ खोवून), पाव कप कोथिंबीर (चिरून), १ लिंबू (रस काढून). फोडणी करिता १ टेबलस्पून तूप, १ टीस्पून जिरे.
कृती : शेंगदाणे भाजून त्याची साले काढून पाखडून घ्यावे. शेंगदाण्याला पाण्याचा हबका मारून लाल मिरची पूड, मीठ लावावे व १०-१२ मिनिटे बाजूला ठेवावे. कढईमध्ये तूप गरम करून जिऱ्याची फोडणी करावी. त्यात तिखट-मीठ लावलेले शेंगदाणे घालून चांगले परतून घ्यावे. गरम गरम सर्व्ह करावे. खोवलेले खोबरे, कोथिंबीर, लिंबू रस घालून मिक्स करून सर्व्ह करावे.

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू
साहित्य : एक कप शिंगाड्याचे पीठ, १ कप साखर, अर्धा कप तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृती : कढईमध्ये थोडे तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ घालावे व तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. मधून मधून उरलेले तूप घालावे. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर व वेलची पूड मिसळून चांगले कालवून लाडू वळावेत

रताळ्याची भाजी
साहित्य : दोन मोठी रताळी, २ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), अर्धा चमचा जिरे, २ चमचे तूप, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी नारळाचा कीस, कोथिंबीर, मीठ. 
कृती : रताळी उकडून सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत. कढईमध्ये तूप तापवून त्यात जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. त्यात रताळ्याचे तुकडे घालून परतावे. मधून मधून झाकण ठेवावे. तुकडे गुलाबी  झाल्यावर शेंगदाण्याचे कूट, मीठ घालावी व वरून कोथिंबिरीने सजवावे.

संबंधित बातम्या