सणाचे गोडधोड

सुजाता नेरूरकर
सोमवार, 12 एप्रिल 2021

फूड पॉइंट

गुढीपाडव्यानिमित्त पक्वान्न हवंच! श्रीखंडाबरोबर इतरही काही गोड पदार्थ या सणानिमित्त करता येतील. त्यासाठी काही वेगळ्या रेसिपीज..

गव्हाच्या पिठाची बर्फी
साहित्य : पाऊण वाटी गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून तूप, पाव वाटी मिल्क पावडर, पाव वाटी साखर, पाव टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून काजू, बदाम, पिस्ते (तुकडे बारीक करून).
कृती : नॉनस्टिक पॅन गरम करून त्यामध्ये १ टेबलस्पून तूप घालावे. तूप विरघळले की त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर पीठ भाजावे. छान खमंग सुगंध आला पाहिजे. मग त्यामध्ये अजून एक चमचा तूप घालावे. गव्हाचे पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घालून थोडी गरम करून घ्यावी. मग विस्तव बंद करून भाजलेले पीठ एका प्लेटमध्ये काढावे. नॉनस्टिक पॅनमध्ये पाव वाटी साखर, १ टीस्पून साखर व अर्धी वाटी पाणी घालून मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक थोडा चिकट करावा. मग त्यामध्ये वेलची पूड, भाजलेले पीठ घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे घट्ट झाले पाहिजे. थोडे तूप सुटायला लागले की विस्तव बंद करावा. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून एकसारखे करावे. वरून ड्रायफ्रुट्सने सजवून अर्धा तास बाजूला ठेवावे. थंड झाल्यावर वड्या कापून सर्व्ह करावे.

टरबूज बर्फी
साहित्य : एक कप टरबुजाचा ज्यूस, २ टेबलस्पून पिठीसाखर, ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून वेलची पूड, २ चमचे तूप, ड्रायफ्रुट्स सजावटीसाठी.
कृती : प्रथम टरबूज कापून त्याचे तुकडे मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून घ्यावेत. मग एका भांड्यात टरबूज ज्यूस, पिठीसाखर, कॉर्नफ्लोअर चांगले मिक्स करावे. गुठळी राहता कामा नये. एका जाड बुडाच्या कढईमध्ये मिश्रण घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवावे. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत गरम करावे. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये वेलची पूड व तूप घालून मिक्स करावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावावे. घट्ट झालेले मिश्रण त्यामध्ये ओतून एकसारखे पसरून वरून ड्रायफ्रुट्सच्या तुकड्यांनी सजवून थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर पाहिजे तो आकार देऊन कापावे.

राजभोग श्रीखंड
साहित्य : अडीचशे ग्रॅम चक्का, अर्धा कप पिठीसाखर (चवीनुसार), अर्धा टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स, ५-७ केसर काड्या, २ टेबलस्पून गरम दूध, अंगुरी रसगुल्ले. 
रसगुल्ले करण्यासाठी : अर्धा लिटर गाईचे दूध, १ टेबलस्पून लिंबू रस, ३ टेबलस्पून साखर. 
कृती: गरम दुधामध्ये केसर भिजत ठेवावे. प्रथम अंगुरी रसगुल्ले करावेत. त्यासाठी अर्धा लिटर गाईचे दूध गरम करून त्यामध्ये १ टेबलस्पून लिंबू रस घालावा. दूध फाटले की एका मलमलच्या कापडावर मिश्रण ओतून त्यावर २-३ ग्लास थंड पाणी घालावे. मग त्याची एक पोटली बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावी. पाणी पूर्ण निथळल्यावर एका प्लेटमध्ये काढून मळावे व त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये २-३ कप पाणी व साखर घेऊन गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये तयार केलेले गोळे घालून वर झाकण ठेवून ७-८ मिनिटे उकळावे. विस्तव बंद करून थंड करायला ठेवावे. राजभोग श्रीखंड करण्यासाठी : चक्का चाळणीने चाळून घ्यावा. त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये केसर दूध, वेलची पूड व थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये तयार केलेले श्रीखंड व अंगुरी रसगुल्ले मिक्स करावेत. त्यावर ड्रायफ्रुट्स घालून सजवावे. फ्रीजमध्ये थंड करून मगच सर्व्ह करावे.

घरचा चक्का
साहित्य : एक लिटर म्हशीचे दूध, 
अर्धा टेबलस्पून ताजे दही, १ मलमलचे कापड.
कृती : प्रथम दूध गरम करावे. दूध सारखे हलवावे म्हणजे त्यावर मलई येणार नाही. दूध कोमट झाले की त्यामध्ये दही चांगले मिक्स करावे व भांडे झाकून ठेवावे. दही लागायला साधारणपणे ७-८ तास लागतात. नंतर एका मलमलच्या कापडामध्ये हे दही घालून ते साधारण ४-५ तास टांगून ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. पाच तासांनंतर चक्का तयार होईल. मग त्याचे श्रीखंड करावे. चक्का करताना एक-दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपण जेव्हा दही टांगून ठेवतो तेव्हा त्या कापडावर माशा, चिलटे बसतात, त्यामुळे दह्याला वास येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून चक्का बांधलेल्या कापडावर प्लास्टिक पिशवी बांधावी, म्हणजे त्यावर चिलटे बसणार नाहीत.

चॉकलेट श्रीखंड
साहित्य : अडीचशे ग्रॅम चक्का, अर्धा कप पिठीसाखर (चवीनुसार), अर्धा कप चॉकलेट सिरप, २ टेबलस्पून दूध, २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स, सजावटीसाठी चॉकलेट तुकडे. 
कृती : प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्यावा. त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी. मग त्यामध्ये चॉकलेट सिरप, दूध, ड्रायफ्रुट्स 
घालून मिक्स करावे. (जर चॉकलेट सिरप नसेल तर ड्रिंकिंग चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट विरघळवून त्यामध्ये फ्रेश क्रीम व थोडेसे दूध घालून मिक्स करून वापरू शकता) चॉकलेट श्रीखंड वरून ड्रायफ्रुट्सने सजवून थंड करून मग सर्व्ह करावे.

पान श्रीखंड
साहित्य : एक कप चक्का, ३ टेबलस्पून पिठीसाखर (चवीनुसार), १ टेबलस्पून गुलकंद, १ टेबलस्पून बडीशेप, १ टेबलस्पून बडीशेप गोळ्या, १ टेबलस्पून टुटीफ्रुटी, २ विड्याची पाने, १ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स, एक चिमूट हिरवा रंग. 
कृती : प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्यावा. त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी. विड्याची पाने बारीक चिरावीत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेली विड्याची पाने, बडीशेप, गुलकंद, १ टेबलस्पून दूध घालून पेस्ट करावी. एका बाऊलमध्ये चक्का आणि पेस्ट मिक्स करावे. वरून बडीशेप गोळ्या, टुटीफ्रुटी व ड्रायफ्रुट्स घालून सजवावे व थंड करून मग सर्व्ह करावे.

अंगुरी पेठा
साहित्य : एक किलो कोहळा, १ चमचा खायचा चुना, २ कप साखर, २ कप पाणी, रोझ इसेन्स.
कृती : प्रथम पिकलेला कोहळा धुऊन त्याची साले काढून आतील गर व बिया काढून टाकाव्यात. बाकीच्या भागाचे चौकोनी छोटे तुकडे करून त्याला काट्याने टोचे मारावेत. मग एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेऊन त्यामध्ये खायचा चुना घालावा. त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून झाकून ८-१० तास बाजूला ठेवावे. एका चाळणीमध्ये कोहळ्याचे तुकडे घेऊन नळाखाली स्वच्छ धुवावेत. एका स्टीलच्या जाड बुडाच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेऊन विस्तवावर ठेवावे व साखर घालावी. साखर विरघळली की त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून मोठ्या विस्तवावर २० मिनिटे शिजवावे. पाणी काढून कोहळे चाळणीवर ठेवावे. एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घेऊन साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे. साखर विरघळली की त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून साखरेचा पाक घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. पाक घट्ट म्हणजे चिकट झाला पाहिजे. मग विस्तव बंद करून भांडे झाकून १०-१२ तास बाजूला ठेवावे पाकामध्ये कोहळ्याचे थोडे पाणी सुटेल. नंतर भांडे परत विस्तवावर ठेवून पाक घट्ट होईपर्यंत गरम करावे. पाक घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून कोहळे चाळणीवर काढून घ्यावेत. चाळणी एका भांड्यावर ठेवावी. म्हणजे त्याला खालून हवा लागेल व चाळणीवर जाळीचे झाकण ठेवून पंख्याखाली २-३ तास ठेवावे म्हणजे पेठे छान सुकतील.पेठे जर तुम्हाला एक आठवड्याकरिता ठेवायचे असतील तर ८-१० तास तसेच पंख्याखाली ठेवावेत. पूर्ण सुकल्यावर डब्यात भरून ठेवावेत.

गुढीसाठी गाठी
साहित्य : दीड कप साखर, अर्धा कप पाणी, १-२ थेंब रोझ 
इसेन्स किंवा १ टीस्पून वेलची पूड, २ थेंब पिवळा रंग, १ टीस्पून तूप.
कृती : प्रथम आपण गाठी करण्यासाठी छोट्या छोट्या ताटल्या घेणार असाल तर त्याला तेल किंवा तूप लावावे किंवा जर ताटात करणार असाल तर ताटाला तूप लावावे. सिलिकॉनचे मोल्ड वापरले तरी चालेल. मग त्यामध्ये जाड दोरा U शेपमध्ये ठेवावा.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये साखर व पाणी घेऊन मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक करताना दोन तारी करावा, म्हणजे थोडा चिकट झाला पाहिजे. पाक करून झाल्यावर त्यामध्ये साजूक तूप, पिवळा रंग व रोझ इसेन्स किंवा वेलची पूड मिक्स करावी. पाक झाला की नाही हे बघण्यासाठी एका स्टीलच्या प्लेटवर २-३ थेंब टाकावेत व दोन बोटांमध्ये पाकाची तार आली पाहिजे. असे असेल तर लगेच विस्तव बंद करावा. गाठी घालताना गरम गरमच घालायच्या आहेत म्हणजे छान होतात. कढई खाली उतरवून एका टेबलस्पूनने साखरेचा पाक मधे मधे थोडे अंतर ठेवून थोडा जाडसर दोऱ्‍यावर सोडावा. वरून सजावटीसाठी जेम्सच्या गोळ्या लावून सजवावे. २-३ मिनिटांत गाठी थंड होतील. मग हळुवारपणे गाठी काढाव्यात.

संबंधित बातम्या