टेस्टी केक

सुजाता नेरुरकर
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

फूड पॉइंट

गव्हाच्या पिठाचा केक
साहित्य : एक मोठी वाटी गव्हाचे पीठ (आटा), १ वाटी गूळ, १ वाटी दही, अर्धा कप दूध, १ अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, १ टेबलस्पून चॉकलेट सॉस, ड्रायफ्रूट.
कृती : एका भांड्यात गूळ विरघळून घ्यावा. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, दही, दूध, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करावे. एका ॲल्युमिनिअमच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण व ड्रायफ्रूट घालावेत व वरून चॉकलेट सॉस घालावा. विस्तवावर नॉन-स्टिक भांडे (पॅन) ठेवावे. त्यामध्ये २ वाट्या मीठ घालून १० मिनिटे गरम करायला ठेवावे. भांडे चांगले गरम झाले की त्यावर एक स्टँड ठेवावा. स्टँड (म्हणजे आपण गरम भांडे ठेवतो ती चाकी) ठेवून त्यावर केकचे भांडे ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवून मंद विस्तवावर ४० मिनिटे केक भाजावा. ४० मिनिटे झाल्यावर केक झाला का ते केकमध्ये सुरी खुपसून तपासावे, नाहीतर अजून १० मिनिटे ठेवावा. विस्तव बंद करून १५ मिनिटे तसाच थंड करायला ठेवावा. पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करावा.

फाइव्ह मिनिट्स केक

साहित्य : चार ताजे ब्रेड स्लाईस, १ कप व्हीप क्रीम, २ टेबलस्पून मिक्स फ्रूट जाम, १ टेबलस्पून साखर, ३ टेबलस्पून पाणी, ३-४ थेंब व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून डार्क चॉकलेट, सजवटीकरिता चेरी.
कृती : ब्रेड स्लाईसच्या कडा कापाव्यात. चारी ब्रेड स्लाईस एकसारख्या आकाराचे असावेत. एका वाटीत साखर व पाणी थोडे गरम करावे. साखर विरघळून मिश्रण थंड झाल्यावर व्हॅनिला इसेन्स मिक्स करावा. व्हीप क्रीम एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. डार्क चॉकलेट कंपाउंड किसून घ्यावे. घरी डार्क चॉकलेट कंपाउंड नसेल तर तयार चॉकलेट किसून घ्यावे. फ्रूट जाम एका बाऊलमध्ये काढावा. जाम नसेल तर आपल्याला आवडेल ते मिश्रण करावे (मी जामऐवजी स्ट्रॉबेरी सॉस वापरला आहे). ब्रेड स्लाईसला दोन्ही बाजूंनी शुगर सीरप लावावे. एका ब्रेडच्या स्लाईसला मिक्स फ्रूट जाम लावावा. त्यावर दुसरी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर क्रीम लावावे. त्यावर तिसरी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर परत मिक्स फ्रूट जाम लावावा. त्यावर चौथी ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर क्रीम लावावे. आता चारही बाजूंनी व्हीप क्रीम चांगले लावावे. वरच्या बाजूला किसलेले डार्क चॉकलेट घालून चेरीने सजवावे. ५ मिनिटे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. हा सरप्राईज केक पाच मिनिटांत तयार होतो.

मॅंगो सुजी केक 

साहित्य : एक मोठा हापूस आंबा (रस काढून), दीड कप रवा, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, अर्धा कप तेल, दीड टीस्पून बेकिंग पावडर, सजावटीसाठी ड्रायफ्रूट.
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचा रस काढावा. ज्युसरच्या भांड्यात आंब्याचा रस व साखर घेऊन ग्राइंड करावे. रवा मिक्सरच्या भांड्यात थोडा बारीक करून घ्यावा. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात मिक्सरमधून काढलेला आंब्याचा रस व रवा मिक्स करावे. त्यामध्ये दूध व तेल मिक्स करून बाऊलवर झाकण ठेवावे आणि मिश्रण ३० मिनिटे बाजूला ठेवावे. नॉनस्टिक पॅन गरम करावा. त्यामध्ये एक स्टँड ठेवावा. केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यावर गव्हाचे पीठ शिंपडून भांडे बाजूला ठेवावे.
रव्याच्या मिश्रणावरील झाकण काढून बघावे. रवा चांगला फुलून आला असेल. मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून मिश्रण हलवावे. मग त्यामध्ये बेकिंग पावडर मिक्स करावी. केकच्या भांड्यात मिश्रण घालून त्यावर ड्रायफ्रूट घालून भांडे पॅनमध्ये ठेवावे. पॅनचे झाकण लावून विस्तव मंद ठेवावा व ४० मिनिटे केक बेक करावा. ४० मिनिटे झाली की झाकण काढून केक झाला का ते सुरीने तपासावे. सुरीला मिश्रण चिकटले नसेल तर विस्तव बंद करून पाच मिनिटे भांडे तसेच ठेवावे. नंतर झाकण काढून केकचे भांडे बाहेर काढावे व केक थंड होऊ द्यावा.

चॉको लाव्हा केक

साहित्य : दीड कप मैदा, १ कप पिठीसाखर, ३ टेबलस्पून कोको पावडर, १ टीस्पून बेकिंग पावडर,
अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, ३ टेबलस्पून तेल, १ कप पाणी, १ टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव टीस्पून मीठ, १ टेबलस्पून तेल इडली स्टँडला लावायला.
लाव्हासाठी : पन्नास ग्रॅम डार्क चॉकलेट, ३ टेबलस्पून दूध (अगदी गरम).
कृती :  डार्क चॉकलेटचे बारीक तुकडे करून एका बाऊलमध्ये घ्यावेत. मग त्यामध्ये हळूहळू गरम दूध घालून मिश्रण पातळ करून बाजूला ठेवावे. दुसऱ्या बाऊलमध्ये चाळणी ठेवून मैदा, पिठीसाखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ चाळून घ्यावे. मग त्यामध्ये तेल घालावे. मग पाणी घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण एवढे मिक्स झाले पाहिजे की डावाने वरून सोडल्यावर रिबिनीसारखे पडले पाहिजे. कुकर गरम करायला ठेवावा. कुकर जरा गरम झाला की त्यामध्ये मीठ घालून मंद विस्तवावर चांगला गरम होऊ द्यावा. झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवावी. इडली स्टँडला तेलाचा हात लावावा. तयार मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व लिंबू रस घालून चांगले मिक्स करावे. मग इडली स्टँडमध्ये प्रत्येक साच्यामध्ये १ टेबलस्पून मिश्रण घालावे. त्यावर मधोमध १ टीस्पून लाव्हा घालावा. परत वरून १ टेबलस्पून केकचे मिश्रण घालावे. अशा प्रकारे सर्व मिश्रण इडली स्टँडमध्ये भरून घ्यावे. आता इडली स्टँड कुकरमध्ये ठेवून १५ मिनिटे मंद विस्तवावर बेक करावे. १५ मिनिटांनंतर केक झाला का पाहावे, नसेल झाला तर अजून ५ मिनिटे ठेवावे. मग थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून चॉको लाव्हा केक सर्व्ह करावा.

गहू व गाजराचा केक

साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, १ कप मैदा, १ कप गाजर (किसून), अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, १ चिमूट मीठ, १ कप बटर, पाऊण कप दही, पाव कप दूध, १ कप पिठीसाखर, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, सजावटीसाठी ड्रायफ्रूट.
कृती : गाजर धुऊन, सोलून किसून घ्यावे. प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, दालचिनी पावडर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्यावा. कुकर गरम करायला ठेवावा. कुकर गरम झाला की त्यामध्ये मीठ घालून एक स्टँड ठेवावा. केकच्या भांड्याला थोडे बटर व मैदा लावावा.
एका बाऊलमध्ये बटर, पिठीसाखर, दही, तेल व दूध मिक्स करून एग बीटरनी चांगले फेटावे. मग त्यामध्ये किसलेले गाजर, चाळलेला मैदा घालून हलक्या हाताने मिक्स करावे. मग त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालावा. मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून मिक्स करावे. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात घालून एकदा टॅप करावे व त्यावर ड्रायफ्रूटने सजवावे.
कुकरमध्ये स्टँडवर केकचे भांडे ठेवावे. कुकरच्या झाकणाची शिट्टी व रिंग काढून झाकण लावावे. मिनिटभर विस्तव मोठा करावा मग कमी करावा. मग मंद विस्तवावर ४०-४५ मिनिटे केक बेक करावा. केक बेक झाला की नाही ते झाकण काढून सुरी खुपसून तपासावे. केक झाला असेल तर विस्तव बंद करून १० मिनिटे केक कुकरमध्येच ठेवावा. नंतर कुकरमधून केक बाहेर काढून थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर कापून मग सर्व्ह करावा.

एगलेस स्ट्रॉबेरी केक

साहित्य : अर्धा कप फ्रेश स्ट्रॉबेरी स्लाईस करून, दीड कप मैदा, पाऊण कप साखर, १ कप दूध, अर्धा कप बटर किंवा तेल, १ टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून स्ट्रॉबेरी पल्प, सव्वा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, थोडेसे तेल व मैदा बेकिंग ट्रेला लावण्यासाठी.
कृती : प्रथम स्ट्रॉबेरी धुऊन पुसून त्याचे उभे पातळ स्लाईस करून बाजूला ठेवावेत. केकच्या भांड्याला तेल लावून वरून मैदा भुरभुरावा व भांडे बाजूला ठेवावे. कुकरची रिंग व शिटी काढून बाजूला ठेवून कुकर गरम करायला ठेवावा. मग त्यामध्ये १ मोठी वाटी मीठ घालावे. त्यामध्ये एक स्टँड ठेवावा.
एका बाऊलमध्ये दूध, साखर, तेल किंवा बटर घालून चांगले मिक्स करावे. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. साखर पूर्ण विरघळली की त्यामध्ये मैदा, स्ट्रॉबेरी पल्प, व्हॅनिला इसेन्स, लिंबू रस मिक्स करावा. सर्वात शेवटी बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून हळुवारपणे मिक्स करावे.
स्ट्रॉबेरी केकचे मिश्रण तयार झाले आता ते मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एकसारखे करावे. वरून स्ट्रॉबेरीचे स्लाईस लावून सजवावे. मग भांडे गरम झालेल्या कुकरमधील स्टँडमध्ये ठेवावे. कुकरचे झाकण लावावे. विस्तव प्रथम २-३ मिनिटे मोठा ठेवावा. नंतर लहान करून केक ४० ते ४५ मिनिटे बेक करावा. ४० मिनिटे झाल्यावर केक झाला हे तपासून पाहावे. मग विस्तव बंद करून कुकर ५-७ मिनिटे बंद ठेवावा. मग केकचे भांडे बाहेर काढून थंड करायला ठेवावे. 
स्ट्रॉबेरी केक थंड झाल्यावर सर्व्ह करावा किंवा थोडा गरम असतानासुद्धा सर्व्ह केला तरी मस्त लागतो.

बनाना ओट्स मफिन्स 
साहित्य : तीन मध्यम आकाराची पिकलेली केळी, अर्धा कप दूध, पाव कप तेल (कोणतेही चालेल), २ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव कप ब्राऊन शुगर (किंवा नेहमीची), सव्वा कप मैदा, अर्धा कप ओट, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, चिमूटभर मीठ, १ टेबलस्पून व्हिनेगर किंवा लिंबू रस.
कृती : ओव्हन प्रीहीट करावा. ओट मिक्सरमध्ये जाडसर वाटावेत. एका मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये केळी कुस्करून घ्यावीत, त्यामध्ये दूध, तेल, व्हॅनिला इसेन्स, साखर मिक्स करावी. हवेतर हँड मिक्सर वापरावा, पण अगदी कमी स्पीडवर.
दुसऱ्‍या एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, ओट, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, मीठ चाळून घ्यावे. त्यामध्ये दूध, तेलाचे मिश्रण घालून चांगले मिक्स करावे. मग त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू रस घालून परत हलक्या हाताने मिस्क करावे.
ओव्हन प्रीहीट करावा. छोट्या छोट्या केकच्या साच्यात एक टेबलस्पून मिश्रण घालावे. वरून ओट व ड्रायफ्रूट घालून सजवावे. मफिनचे साचे ओव्हनमध्ये ठेवून मफिन ३०-३५ मिनिटे बेक करावेत. गरम गरम हेल्दी एगलेस शुगरलेस बनाना ओट मफिन चहा/कॉफीबरोबर सर्व्ह करावेत.

टीप - एक कप मैद्याचा केक सहा-सातजणांसाठी पुरतो. 

संबंधित बातम्या