श्रीखंड, पनीर खुबानी...

सुजाता नेरुरकर
सोमवार, 28 मार्च 2022

फूड पॉइंट

अननसाचा भात

साहित्य : दोन कप बासमती तांदूळ, ३ कप साखर, २ टेबलस्पून साजूक तूप, १ मध्यम आकाराचा अननस किंवा पाइनॲपल टीन, ४ थेंब पिवळा रंग.
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून साजूक तूप, २ तुकडे दालचिनी, २ तमालपत्र.
कृती : अननस सोलून त्याचे लहान तुकडे करावेत. त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालून २-३ मिनिटे शिजवून घ्यावे. तांदूळ धुऊन १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये दालचिनी, तमालपत्र व धुतलेले तांदूळ घालून २-३ मिनिटे परतून घ्यावे. मग त्यामध्ये ४ कप गरम पाणी घालून भात शिजवून घ्यावा. भात शिजल्यावर परातीत थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर पिवळा रंग, पाइनॲपल इसेन्स व साखर घालून मिक्स करावे. भांड्यात एक भाताचा थर मग अननसाचे तुकडे, परत भात, त्यावर अननसाचे तुकडे असे लावून वरून साजूक तूप घालून भांड्यावर झाकण ठेवावे व दोन वाफा आणाव्यात. वाफ आल्यावर भात १५-२० मिनिटे तसाच झाकून ठेवावा मग सर्व्ह करावा.

केशर-इलायची श्रीखंड
साहित्य : एक कप दही, पाऊण कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, १५ केशर काड्या, १ टेबलस्पून काजू/ बदाम/पिस्ते तुकडे करून. 
कृती : प्रथम दही एका मलमलच्या कापडात ठेवून त्याची एक पुरचुंडी बांधून ३-४ तास टांगून ठेवावी. मग थंड करायला ठेवावी. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर काड्या भिजत ठेवाव्यात. काजू-बदाम-पिस्ते तुकडे करून घ्यावेत. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका बाऊलमध्ये पुरचुंडी बांधून ठेवलेले दही काढून घ्यावे. मग त्यामध्ये साखर, दुधात भिजवलेले केशर, वेलची पूड घालून मिक्स करावे. (पिठीसाखर वापरली तर ती लगेच विरघळते) मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. थंडगार केशर-इलायची श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे. सर्व्ह करताना ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करावे.

राजभोग श्रीखंड
साहित्य : अडीचशे ग्रॅम चक्का, अर्धा कप पिठीसाखर (चवीनुसार), अर्धा टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून ड्रायफ्रूट, ५-७ केशर काड्या, २ टेबलस्पून गरम दूध, अंगुरी रसगुल्ले. 
अंगुरी रसगुल्ले करण्यासाठी : अर्धा लिटर गाईचे दूध, १ टेबलस्पून लिंबू रस, ३ टेबलस्पून साखर. 
कृती : गरम दुधामध्ये केशर भिजत ठेवावे. प्रथम अंगुरी रसगुल्ले करावेत. त्यासाठी अर्धा लिटर गाईचे दूध गरम करून त्यामध्ये १ टेबलस्पून लिंबू रस घालावा. दूध फाटले की एका मलमलच्या कापडावर मिश्रण ओतून त्यावर २-३ ग्लास थंड पाणी घालावे. मग त्याची एक पोटली बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे. पाणी पूर्ण निथळल्यावर एका प्लेटमध्ये काढून मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये २-३ कप पाणी व साखर घेऊन गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये केलेले गोळे घालावेत. वर झाकण ठेवून ७-८ मिनिटे उकळू द्यावे. मग विस्तव बंद करून थंड करायला ठेवावे. 
राजभोग श्रीखंडासाठी : चक्का चाळणीने चाळून घेऊन त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी. मग त्यामध्ये केशर दूध, वेलची पूड व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करावे. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये श्रीखंड व अंगुरी रसगुल्ले मिक्स करावेत. त्यावर ड्रायफ्रूट घालून सजवावे आणि फ्रीजमध्ये थंड करून मगच सर्व्ह करावे.

घरचा चक्का 

साहित्य : एक लिटर दूध (म्हशीचे), अर्धा टेबलस्पून दही (ताजे), १ मलमलचे कापड.
कृती : प्रथम दूध गरम करून घ्यावे. दूध सारखे हलवावे म्हणजे त्यावर मलई येणार नाही. दूध कोमट झाले की त्यामध्ये दही चांगले मिक्स करून भांडे झाकून ठेवावे. दही जमायला साधारणपणे ७-८ तास लागतात. नंतर एका मलमलच्या कापडामध्ये हे दही घालून ते टांगून ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. साधारणपणे दही ४-५ तास तरी टांगून ठेवावे. पाच तासांनंतर चक्का तयार होईल. मग त्याचे श्रीखंड करायचे. चक्का तयार करताना एक-दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपण जेव्हा चक्का करण्यासाठी दही ४-५ तास टांगून ठेवतो, तेव्हा त्या कापडावर माश्या, चिलटे बसतात त्यामुळे दह्याला वास येऊ शकतो. तो येऊ नये म्हणून चक्का बांधलेल्या कापडावर प्लॅस्टिक पिशवी बांधावी.

चॉकलेट श्रीखंड 

साहित्य : अडीचशे ग्रॅम चक्का, अर्धा कप पिठीसाखर (चवीनुसार), अर्धा कप चॉकलेट सिरप, २ टेबलस्पून दूध, २ टेबलस्पून ड्रायफ्रूट, सजावटीसाठी चॉकलेट तुकडे. 
कृती : प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्यावा. मग त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करावे. त्यामध्ये चॉकलेट सिरप, दूध, ड्रायफ्रूट घालून मिक्स करावे. (चॉकलेट सिरप नसेल, तर ड्रिंकिंग चॉकलेट किंवा विरघळलेले डार्क चॉकलेट घ्यावे. त्यामध्ये फ्रेश क्रीम व थोडेसे दूध घालून मिक्स करून वापरू शकता). चॉकलेट श्रीखंड ड्रायफ्रूटने सजवून थंड करावे व सर्व्ह करावे.

पनीर खुबानी
साहित्य : आवरणासाठी : अडीचशे ग्रॅम पनीर, २ मोठे बटाटे (उकडून लगदा करून) पाऊण कप आरारूट पावडर, तूप तळण्यासाठी. 
पाकासाठी : अर्धा टीस्पून विलायची पावडर, १ चिमूट केशरी रंग, अर्धा किलो साखर, १ थेंब केवडा इसेन्स.
सारणासाठी : पाच-सहा जर्दाळू, थोडे काजूचे तुकडे, थोडे वेलदोड्याचे दाणे.
कृती : दोन कप पाण्यामध्ये जर्दाळू ५ मिनिटे उकडावेत. बिया काढून त्याचे तुकडे करावेत. मग त्याच पाण्यात साखर घालून एकतारी पाक करावा. त्यामध्ये केशरी रंग, इसेन्स घालावा. बटाटे उकडून सोलून त्याचा लगदा करावा. त्यामध्ये किसलेले पनीर व आरारूट पावडर घालून मळावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत. त्यामध्ये जर्दाळू, काजू व वेलदोड्याचा तुकडा ठेवून बंद करावे. असे सर्व पनीर बटाट्याचे गोळे तयार करावेत. कढईमध्ये तूप गरम करून एक एक पनीर बटाट्याचे गोळे गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. तळून झाल्यावर पाकामध्ये ३० मिनिटे मुरत ठेवावे. सर्व्ह करताना वरून पिठीसाखर भुरभुरावी.  

बदाम सफरचंद खीर
साहित्य : एक लिटर दूध, ५० ग्रॅम खवा, १०० ग्रॅम साखर, अर्धा टीस्पून विलायची पावडर, २-३ केशर काड्या, १ कप सफरचंदाचा घट्ट ज्यूस, ५० ग्रॅम फ्रेश क्रीम, ५० ग्रॅम बदाम आणि ५० ग्रॅम खोवलेला नारळाची पेस्ट. 
कृती : बदामाची साले काढून तिरके तुकडे करावेत. अर्धा लिटर दुधामध्ये खवा, बदाम-नारळ पेस्ट घालून ५-७ मिनिटे गरम करावे. साखर, सफरचंद ज्यूस, विलायची पावडर, केशर घालून ५-७ मिनिटे गरम करावे. नंतर त्यामध्ये अर्धा लिटर दूध, फ्रेश क्रीम व विलायची पावडर घालून ५ मिनिटे गरम करावे. ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे चांगली लागते. 
टीप : सफरचंदाची साले काढून मग मिक्सरमधून बारीक करावे. नारळसुद्धा मिक्सरमधून काढावा, म्हणजे खीर चांगली मिळून येते व चविष्ट लागते.

पान श्रीखंड
साहित्य : एक कप चक्का, ३ टेबलस्पून पिठीसाखर (चवीनुसार), १ टेबलस्पून गुलकंद, १ टेबलस्पून बडीशेप, १ टेबलस्पून बडीशेप गोळ्या, १ टेबलस्पून टुटीफ्रुटी, २ विड्याची पाने, १ टेबलस्पून ड्रायफ्रूट, १ चिमूट हिरवा रंग. 
कृती : प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्यावा. मग त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी. विड्याची पाने बारीक चिरावीत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेली विड्याची पाने, बडीशेप, गुलकंद, १ टेबलस्पून दूध घालून पेस्ट करावी. एका बाऊलमध्ये चक्का, पेस्ट घालून मिक्स करावे. वरून बडीशेप गोळ्या, टुटीफ्रुटी व ड्रायफ्रूट घालून सजवावे. थंड करून मग सर्व्ह करावे. 

संबंधित बातम्या