पुरणपोळ्या...

सुजाता नेरुरकर
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

फूड पॉइंट

श्रावण आला की सणवार सुरू होतात आणि त्यानिमित्ताने पंचपक्वान्नांचे जेवणही! सणावाराला पुरणाचे पदार्थ हमखास केले जातात. असेच काही पुरणाचे पारंपरिक आणि नवे पदार्थ...

शाही पुरणपोळी
साहित्य : पुरणासाठी : दोन कप हरभरा डाळ, २ कप गूळ, पाव कप साखर, अर्धा कप खवा, २ टेबलस्पून काजू-बदाम पावडर, १ टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड, मीठ चवीनुसार (आवडत असेल तर).
पोळीसाठी : दोन कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, पोळी लाटायला तांदळाची पिठी.
कृती : हरभरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर २ कप डाळीला ५ कप पाणी घालावे (पाणी थोडे जास्त घातले की आपल्याला डाळीचा कट आमटी करायला काढता येतो). पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्ट्या काढाव्यात व नंतर मंद विस्तवावर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. त्यालाच कट म्हणतात. कट काढल्यामुळे पुरणपोळी हलकी होते. कट काढून शिजलेली डाळ परत कुकरमध्ये घालून गूळ, साखर घालून चांगले घोटावे. गूळ, साखर घातल्यावर पुरण आधी पातळ होईल, मग घट्ट होत जाईल. घट्ट व्हायला लागल्यावर खवा, वेलची पूड, जायफळाची पूड, काजू-बदाम पूड घालून मिक्स करावे. पुरण चांगले घट्ट शिजवावे. झारा मधे उभा करून पाहावे. मग गरम-गरम पुरण, पुरण यंत्रातून वाटून घ्यावे.
गव्हाचे पीठ, मैदा चाळून घ्यावा व त्यामध्ये मीठ, तेल, दूध व पाणी मिक्स करून सैलसर कणीक मळावी व दीड ते दोन तास तशीच बाजूला ठेवावी. मग तेलाचा वापर करून परत चांगली मळून घ्यावी. कणीक जेवढी जास्त मळली जाईल तेवढी पोळी सुंदर होईल. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करावेत. एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटावा व पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन लाटलेल्या पुरीवर ठेवावे व पुरी बंद करून लाटावी. पोळी तांदळाच्या पिठीवर लाटावी. म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही. लाटलेली पोळी मंद विस्तवावर गुलाबी रंग येईपर्यंत भाजावी. गरम-गरम पोळी वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावी.

बटाट्याच्या गोड पोळ्या

साहित्य : सारणासाठी : दोन मोठे बटाटे, पाव वाटी खवा, पाव वाटी साखर, २ टेबलस्पून तूप, १ टेबलस्पून दूध, २-३ काड्या केसर, १ टीस्पून वेलची पूड, थोडे मनुके बारीक तुकडे करून, काजू-बदाम बारीक कुटून.  
आवरणासाठी : दोन कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, १ टेबलस्पून तेल (गरम), मीठ चवीनुसार, दूध पीठ भिजवण्यासाठी. 
कृती : सारणासाठी : बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्यावेत. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावा. दूध घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे. नंतर साखर, वेलची पूड, केसर घालून मंद विस्तवावर थोडावेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावा. सारणाचे एकसारखे चार भाग करावेत. भिजवलेल्या पिठाचे एकसारखे आठ गोळे करावेत. दोन गोळे घेऊन पुरीसारखे लाटावेत व त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा दाबून थोडे लाटावे. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पोळी भाजावी. पोळी सर्व्ह करताना वरून तूप लावावे व मग सर्व्ह करावी.

कटाची आमटी
साहित्य :  दोन कप कट, पाऊण कप शिजलेले पुरण, २ टेबलस्पून चिंच कोळ, अर्धा कप खोवलेला नारळ (मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा), १ टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून गोडा मसाला, कोथिंबीर, मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी : एक टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून मेथी दाणे, पाव टीस्पून धने, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, ७-८ कढीपत्ता पाने.
कृती :  डाळीचा कट, चिंचेचा कोळ, लाल मिरची पूड, गरम मसाला, गोडा मसाला, वाटलेला नारळ, मीठ घालून शिजत ठेवावे. त्यामध्ये शिजलेले पुरण घालून थोडे पाणी घालून परत आमटीला चांगली उकळी आणावी. फोडणीच्या कढईत तेल गरम करून खमंग फोडणी करावी. फोडणी आमटीत घालून मग मिक्स करावी. ही आमटी थोडी पातळच करावी, कारण ती थंड व्हायला लागली की घट्ट होत जाते. कारण यामध्ये पुरण घातले आहे. गरम-गरम आमटी पुरणपोळीबरोबर व भाताबरोबर सर्व्ह करावी.

आंब्याच्या पोळ्या  

साहित्य : सारणासाठी ः दोन कप आंब्याचा घट्ट रस (२-३ मिनिटे शिजवून घ्यावा), १ कप खवा, अर्धा कप पिठीसाखर.
आवरणासाठी :  दोन कप गव्हाचे पीठ, मीठ चवीनुसार.
कृती :  गव्हाचे पीठ, मीठ व थोडे पाणी मिक्स करून पीठ मळावे. पिठाचे गोळे करून बाजूला ठेवावेत.
आंब्याचा रस, खवा व पिठीसाखर एकत्र करून मळून घ्यावी. एक-एक पिठाचा गोळा घेऊन थोडा पुरीसारखा लाटून त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरून गोळा बंद करावा व परत लाटावा. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी मंद विस्तवावर भाजून घ्यावी. गरम-गरम तुपाबरोबर सर्व्ह करावी.

स्ट्रॉबेरीची पोळी  

साहित्य : 
आवरणासाठी : दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
सारणासाठी : दोन कप रवा (बारीक), १०-१२ स्ट्रॉबेरी (तुकडे करून), २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टीस्पून वेलची पूड, साजूक तूप.
कृती :
आवरणासाठी : गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, गरम तेल मिक्स करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. मग त्याचे १५ एकसारखे गोळे करावेत. 
सारणासाठी : कढईमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे एक मिनीट परतून घ्यावेत. मग त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून परत एक मिनीट शिजवावे व बाजूला काढून ठेवावे. कढईमध्ये तूप गरम करावे. त्यावर रवा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढावा. मग कढईमध्ये दूध व पाणी गरम करून त्यामध्ये भाजलेला रवा घालावा व मंद विस्तवावर पाच मिनिटे शिजवावे. नंतर त्यामध्ये साखर, वेलची पूड, शिजवलेल्या स्ट्रॉबेरी घालाव्यात व मिक्स करून पाच मिनिटे शिजवावे. थंड झाल्यावर सारणाचे १५ भाग करावेत.
पोळीसाठी : एक पिठाचा गोळा घेऊन पुरीसारखा लाटावा. त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून पुरी बंद करून लाटावी. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी. स्ट्रॉबेरी पोळी सर्व्ह करताना तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी.

कडबू

साहित्य : 
सारणासाठी : दोन कप हरभरा डाळ, २५० ग्रॅम साखर व गूळ (दोन्ही मिळून), १ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून जायफळ पूड, १० केशर काड्या.
पारीसाठी : एक कप बारीक रवा, १ कप गव्हाचे पीठ, पाव कप मैदा, १ कप तेल, मीठ चवीनुसार, अर्धा कप तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल अथवा तूप.
कृती : प्रथम हरभरा डाळ निवडून स्वच्छ धुऊन मग शिजवावी. शिजताना त्यात १ टीस्पून तेल व पाव टीस्पून हळद घालावी. डाळ चांगली बोटचेपी शिजली की चाळणीमध्ये उपसून पाणी निथळू द्यावे. शिजलेली डाळ भांड्यात घालून त्यामध्ये साखर व गूळ घालावे आणि घट्ट होईपर्यंत शिजवावे. पुरण घट्ट झाले की त्यामध्ये वेलची पूड, केशर, जायफळ पूड घालून चांगले मिक्स करावे. पुरण कोमट असतानाच पाट्यावर किंवा पुरण यंत्रामध्ये वाटून घ्यावे. एका परातीत थोडे पाणी घालून रवा थोडा वेळ भिजवावा. रवा भिजला की त्यामध्ये कणीक, मैदा, मीठ व पाव कप कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पाणी वापरून चांगले घट्ट पीठ मळावे व १ तास तसेच झाकून बाजूला ठेवावे. नंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करावेत.
गोळे पुरीसारखे लाटून त्यामध्ये वाटलेले पुरण भरावे. पुरीला करंजीचा आकार देऊन त्याला छान मुरड घालावी. एका कढईमध्ये तेल अथवा तूप गरम करून पुरणाचे कडबू गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. गरम गरम कडबू वरून तूप सोडून सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या