अ पीस ऑफ ‘केक’!

सुजाता नेरुरकर
सोमवार, 20 डिसेंबर 2021

फूड पॉइंट

नाताळचा सीझन आला आहे. त्यापाठोपाठ नवीन वर्षाच्या स्वागताचीही तयारी करावी लागेल. यासाठी सर्वांचा आवडता केक पाहिजेच. म्हणूनच केकच्या काही पाककृती इथे देत आहोत. या पाककृतींमध्ये १ कप मैदा असेल तर ६-७ जणांना पुरेल एवढा केक होतो. त्यानुसार आपण प्रमाण घेऊ शकता. 

केक चांगला होण्यासाठी काही टिप्स

  • केक करताना आपल्याला जे साहित्य लागते ते प्रमाणबद्ध, म्हणजे बरोबर मोजून घ्यावे.
  • केक करण्याच्या अगोदर ओव्हन नीट चालतो का ते चालू करून बघावे. केक ओव्हनमध्ये ठेवण्याआधी ओव्हन गरम करून घ्यावा. मगच भांडे आत ठेवावे.
  •  केक करताना मैदा ताजा व चांगल्या प्रतीचा वापरावा.
  • केक करताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधी थोडा वेळ बाजूला काढून ठेवावे. अंडी वापरताना चांगली फेटून घ्यावीत.
  • केकचे मिश्रण तयार करण्याअगोदर भांड्याला लोणी लावून ठेवावे.
  • केक करताना लोणी घरगुती अथवा बाजारातील पांढरे लोणी वापरावे. जर पूर्ण लोणी वापरणे शक्य नसेल, तर अर्धे लोणी व अर्धे डालडा वापरावे. केक करताना साजूक तूप वापरू नये. लोण्याऐवजी मार्गारीन किंवा वनस्पती तूप वापरावे.

केक न फुगण्याची काही महत्त्वाची कारणे

  • केकचे मिश्रण चांगले फेसले गेलेले नसल्यास
  • ओव्हन नीट गरम झाला नसल्यास किंवा व्होल्टेज पुरेसे नसल्यास
  • साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यावर परत चपटा होतो.
  • बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जुना वापरल्यास किंवा दिलेल्या प्रमाणापेक्षा बेकिंग पावडर जास्त झाल्यास

चॉकलेट रम बॉल
साहित्य : दोन कप चॉकलेट केकचा चुरा, अर्धा कप मिल्क पावडर, २५० ग्रॅम चॉकलेट डार्क बेस, २ टेबलस्पून रम किंवा वाईन, २ टेबलस्पून चॉकलेट सॉस, ड्रायफ्रूट्सचे तुकडे. 
कृती : चॉकलेट बेस डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळून घ्यावा. मग एका चमच्याने हलवून ५ मिनिटे थंड करायला बाजूला ठेवावा. मिक्सरच्या भांड्यात चॉकलेट केकचा चुरा, मिल्क पावडर, घेऊन एकदा ब्लेंड करून घ्यावे. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढावे. मग त्यामध्ये रम किंवा वाईन, ड्रायफ्रूट्सचे तुकडे व चॉकलेट सॉस घालून मिक्स करावे. मिश्रणाचे छोटे छोटे लिंबाएवढे गोळे करावेत. मग एक गोळा घेऊन विरघळवलेल्या चॉकलेट बेसमध्ये बुडवून बटर पेपरवर काढून ठेवावा. पाहिजे असेल तर वरून सजवावा. अशा प्रकारे सर्व गोळे चॉकलेट बेसमध्ये बुडवून पेपरवर ठेवावेत. नंतर फ्रीजमध्ये ५-१० मिनिटे सेट करायला ठेवावेत. 

बेसिक केक

साहित्य : आठ टेबलस्पून मैदा, ७ टेबलस्पून पिठीसाखर, ६ टेबलस्पून डालडा अथवा लोणी, दोन अंडी, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव कप दूध.
कृती : प्रथम केक ज्या भांड्यात करायचा आहे, त्या भांड्याला लोणी लावून त्यावर मैदा भुरभुरून ठेवावा. मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. अंडी फोडून काट्याने अथवा एग बिटरने चांगली फेटून घ्यावीत. ओव्हन गरम करायला ठेवावा. लोणी व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावी. लोणी व पिठीसाखर आपण जेवढे फेसू तेवढा केक हलका होतो. लोणी व साखरेच्या फेसलेल्या मिश्रणात हळूहळू मैदा व फेटलेले अंडे घालून चांगले फेसून घ्यावे. मिश्रण चांगले फेसून झाल्यावर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स व दूध घालावे. मिश्रण एकसारखे करून लोणी लावलेल्या केकच्या भांड्यात ओतावे. ओव्हन प्रीहिट करून घ्यावा. प्रीहिट झाला की केकचे भांडे मायक्रोवेव्हनमध्ये ठेवून कनव्हेक्शन मोडवर १८० डिग्रीवर ३५ मिनिटे सेट करून केक बेक करावा. केकचा रंग गोल्डन ब्राऊन आला की विणायची सुई केकमध्ये खोचून बघावी. सुई काढली की कोरडी दिसली पाहिजे, म्हणजे केक झाला असे समजावे. केक झाला की लगेच बाहेर काढावा व थंड झाल्यावर कापावा.
टीप : समजा काही कारणामुळे केक लगेच बेक करता आला नाही, तर मिश्रण बेकिंग पावडर न घालता काही वेळ तसेच ठेवावे. मग ओव्हनमध्ये केक ठेवताना बेकिंग पावडर घालून ठेवावा.

प्लम फ्रूट केक

साहित्य : एक कप संत्र्याचा ज्यूस, दीड कप ड्रायफ्रूट्स (किसमिस, काळे मनुके, काजू, अक्रोड, टुटीफ्रुटी - लाल, हिरवी व पिवळी), पाव कप साखर (कॅरामल शुगर करण्यासाठी), पावणेदोन कप मैदा, दोन टेबलस्पून कोको पावडर, एक टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून जायफळ पावडर, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, पाव टीस्पून लवंग पावडर, अर्धा कप बटर, पाऊण कप दूध, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून व्हिनेगर.
कृती : प्रथम तीन मध्यम आकाराच्या संत्र्याचा ज्यूस काढून घ्यावा. सर्व ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून घ्यावेत. मग संत्र्याच्या ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे दोन तास भिजत ठेवावेत. बेकिंग ट्रेला बटर लावावे. 
एका भांड्यात साखर व अर्धा टेबलस्पून पाणी घ्यावे. ते मंद विस्तवावर साखर विरघळून तिचा रंग ब्राऊन होईपर्यंत गरम करावे. साखरेचा रंग थोडा ब्राऊन झाला की त्यामध्ये पाव कप पाणी हळूहळू घालून मिक्स करावे. थोडे गरम झाले की विस्तव बंद करून कॅरामल थंड करायला ठेवावे.
एका प्लेटमध्ये चाळणी घेऊन त्यामध्ये मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, लवंग पावडर घालून चाळून घेऊन बाजूला ठेवावे. एका बाऊलमध्ये अर्धा कप साखर, दूध, बटर व कॅरामल शुगर घ्यावी. साखर विरघळेपर्यंत हलवावे. मग त्यामध्ये मैदा, ऑरेंज ज्यूस व ड्रायफ्रूट्स घालावे. त्यात व्हिनेगर घालून मिक्स करावे. 
मायक्रोवेव्ह प्रीहिट करून घ्यावा. आता सर्व मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये घालून एकदा टॅप करावे, म्हणजे त्यामध्ये हवा राहणार नाही. वरून राहिलेल्या ड्रायफ्रूट्सने सजवावे. मायक्रोवेव्ह प्रीहिट झाल्यावर कनव्हेक्शन मोडवर ५० मिनिटांसाठी सेट करून बेकिंग ट्रे ठेवावा व केक बेक करावा.

वाईन चेरी केक
साहित्य : दीड कप मैदा, ४ अंडी, अर्धा कप किंवा ४ टेबलस्पून वाईन, १ कप बटर, १ कप साखर, 
१ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, १ चिमूट मीठ, १ मध्यम आकाराचे लिंबू, ७-८ बदाम (चिरून), २ टेबलस्पून किसमिस, ४-५ चेरी (तुकडे करून).
कृती : प्रथम लिंबाची साल किसून घ्यावी. बदाम व चेरी तुकडे करून घ्यावेत. एका बाऊलमध्ये हे सर्व मिक्स करून बाजूला ठेवावे. बेकिंग ट्रेला बटर लावून त्यावर बटर पेपर ठेवावा व परत त्यावर बटर लावून बाजूला ठेवावे. 
मैदा, दालचिनी पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ सपेटीच्या चाळणीने चाळून बाजूला ठेवावे. मिक्सरच्या भांड्यात अंडी व वाईन ब्लेंड करून घ्यावी. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये बटर व साखर घ्यावे. साखर विरघळेपर्यंत मिक्स करावी. मायक्रोवेव्ह प्रीहिट करायला ठेवावा. 
बटर व साखर चांगले विरघळल्यावर त्यामध्ये फेटलेले अंडे घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये चाळलेला मैदा घालून पुन्हा चांगले मिक्स करावे. मग त्यामध्ये चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून परत हलक्या हातांनी मिक्स करावे. हे मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये ओतून टॅप करावे. तुम्हाला हवे असल्यास वरून अजून ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता बेकिंग ट्रे मायक्रोवेव्हमध्ये ३५ मिनिटांसाठी सेट करून केक बेक करायला ठेवावा. ३५ मिनिटांनी केक झाला आहे का ते तपासून पाहावे. झाला असेल तर मायक्रोवेव्ह बंद करावा व केक तसाच १०-१५ मिनिटे मायक्रोवेव्हमध्येच ठेवावा. नंतर टुथपिक घालून बघावी. जर टुथपिकला केक चिकटला तर अजून ५-७ मिनिटे केक बेक करावा. केक थोडासा थंड झाल्यावर बाहेर काढून ठेवावा. केक पूर्ण थंड होऊ द्यावा, मग कट करून सर्व्ह करावा. 

क्रिमी टेस्टी कस्टर्ड व्हॅनिला केक 

साहित्य : एक कप मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, २ अंडी, अर्धा कप साखर, अर्धा कप तेल, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव कप दूध (किंवा अजून लागले तर थोडेसे). 
कस्टर्डकरिता : अर्धा लिटर दूध, ३ टेबलस्पून कस्टर्ड पावडर, २-३ थेंब व्हॅनिला इसेन्स, बदाम व चेरी सजावटी करिता.
कृती : प्रथम मैदा व बेकिंग पावडर चाळून बाजूला ठेवावी. बेकिंग ट्रेला तेल लावून बाजूला ठेवावे. बदाम तुकडे करून घ्यावेत. मायक्रोवेव्ह प्रीहिट करायला ठेवावा किंवा कुकरमध्ये केक करायचा असेल तर कुकर ५-७ मिनिटे गरम करून त्यामध्ये एक स्टँड ठेवावा. कुकरच्या झाकणाची शिटी व रिंग काढून ठेवावी.
एका बाऊलमध्ये अंडी फोडून एग बिटरने चांगली फेटावीत. मग त्यामध्ये साखर घालून साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यामध्ये तेल व व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करावे. आता त्यामध्ये मैदा घालून हळुवारपणे मिक्स करावे. लागेल तसे हळूहळू दूध घालून मिक्स करावे. आता आपले केकचे मिश्रण तयार झाले. तेल लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढावे. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर प्रीहिट करून घेतल्यावर त्यामध्ये ट्रे ठेवून ३५ मिनिटे बेक करावे किंवा कुकरमध्ये भांडे ठेवून ३५ मिनिटे केक बेक करावा. मग ओव्हन बंद करून केक ओव्हनमध्ये १५ मिनिटे तसाच ठेवावा. दार उघडू नये. १५ मिनिटे झाल्यावर केक बाहेर काढून थंड करायला ठेवावा. केक थंड झाल्यावर त्याचा कडा सुरीने सैल कराव्यात. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करावे. त्यामध्ये साखर घालून साखर विरघळेपर्यंत आटवून घ्यावे. एका बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर व थोडे गरम दूध मिक्स करावे. मग २-३ मिनिटे गरम करून थोडेसे घट्ट झाले की विस्तव बंद करावा.
केक थंड झाल्यावर गरम गरम कस्टर्ड केकवर एकसारखे ओतावे. केक वरून बदाम व चेरीने सजवून फ्रीजमध्ये ३-४ तास थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर सर्व्ह करावा.

चॉकलेट केक
साहित्य : एक कप मैदा, १ कप रवा, अर्धा कप दूध, अर्धा कप पाणी, पाव कप तेल, १ चिमूट मीठ, २ टेबलस्पून दही, १ कप साखर, पाव कप चॉकलेट बेस (किसून), २ टेबलस्पून चॉकलेट (छोटे तुकडे करून), १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी, १ टीस्पून तेल कढईला लावण्यासाठी.
कृती : प्रथम एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये पाणी, दूध, तेल, साखर व मीठ घ्यावी. साखर विरघळेपर्यंत चांगले फेटावे. मग त्यामध्ये मैदा घालून मिक्स करावे. नंतर त्यामध्ये रवा घालून मिक्स करावे. त्यावर झाकण ठेवून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
रवा चांगला भिजला की त्यामध्ये किसलेले चॉकलेट, चॉकलेट तुकडे, व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घ्यावे. आता अगदी शेवटी त्यामध्ये बेकिंग पावडर घालून मिक्स करावी. मग त्यामध्ये बेकिंग सोडा घालून सोड्यावर १ चमचा पाणी घालून हळुवारपणे मिक्स करावे.
जाड बुडाची कढई घेऊन त्याला आतून थोडेसे तेल लावावे. त्यावर मध्यभागी बटर पेपर लावावा व त्याला अगदी थोडेसे तेल लावावे. मग त्यामध्ये केकचे मिश्रण ओतावे. वर झाकण ठेवावे व मंद विस्तवावर केक बेक करायला ठेवावा. केक प्रथम १५ मिनिटे बेक करावा. मग झाकण काढून त्यावर ड्रायफ्रूट्सने सजवून परत झाकण ठेवून २०-२५ मिनिटे बेक करावा. केक बेक झाला आहे की नाही ते सुरी खुपसून तपासून पाहावे. केक बेक झाला असेल तर विस्तव बंद करून १० मिनिटे कढई तशीच ठेवावी. १० मिनिटांनी केक उलटा करून बटर पेपर काढून टाकावा व केक कापून सर्व्ह करावा.

डलगोना केक
साहित्य : केकसाठी : एक कप मैदा, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप तेल, अर्धा कप दूध, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून कॉफी, १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून गरम पाणी. 
आयसिंगसाठी : अडीच टेबलस्पून कॉफी, ४ टेबलस्पून पिठीसाखर, २ टेबलस्पून गरम पाणी. 
कृती : प्रथम मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्यावा. एका छोट्या बाऊलमध्ये कॉफी, पिठीसाखर व पाणी चांगले मिक्स करावे. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये तेल व पिठीसाखर चांगले फेटून घ्यावे. मग त्यामध्ये चाळलेला मैदा, मिक्स केलेली कॉफी, व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये हळूहळू दूध घालून मिक्स करावे. एका बाजूला हिंदालियमचे भांडे मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवावी. त्यामध्ये एक छोटा स्टँड ठेवावा. भांडे चांगले गरम होऊ द्यावे. केकच्या भांड्याला तेल लावून मग मैदा लावावा व बाजूला ठेवावे. 
केकचे मिश्रण तयार झाले की केकच्या भांड्यात ओतावे व एकदा हळुवारपणे ओट्यावर आपटावे म्हणजे हवा असेल तर निघून जाईन. आता भांडे गरम करायला ठेवलेल्या भांड्यात ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवावे, बाजूने वाफ जाता कामा नये. मंद विस्तवावर ४०-४५ मिनिटे बेक करायला ठेवावे. ४० मिनिटे झाल्यावर तपासून पाहावे. केक तयार झाला की विस्तव बंद करावा. भांडे तसेच राहू द्यावे. ५-७ मिनिटे झाल्यावर भांडे बाहेर काढावे. केक थंड होऊ द्यावा. मग त्याचा वरचा फुगीर भाग कापून घ्यावा. 
आयसिंग करण्यासाठी कॉफी, पिठीसाखर व गरम पाणी चांगले मिक्स करावे व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवावे. मग फ्रीजमधून काढून केकवर आयसिंग करावे. वरून चॉकलेटने किंवा आवडेल तशी सजावट करावी.  

संबंधित बातम्या