लज्जतदार ‘दाल’

सुखदा शहा, गुलबर्गा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

दाळ ढोकळी
साहित्य : दोन वाट्या गव्हाचे पीठ, मीठ, एक मोठा चमचा तेल, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, मोहरी, जीरे, फोडणीसाठी हिंग चवीप्रमाणे, हळद, लाल तिखट २ चमचे, कढीपत्ता, कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर ३-४ चमचे, एक चमचा काळा मसाला, चिंच एक तुकडा, गूळ एक छोटा खडा
कृती : गव्हाचे पीठ तेलाचे मोहन घालून घट्ट बांधून घ्यावे. तुरीची डाळ शिजवून घ्यावी. डाळ, हळद, मीठ घालून घोटून घ्यावी. फोडणीत मेथी, मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता घालावा. मग लाल तिखट, शेंगदाणे व दोन वाट्या पाणी घालावे. चिंच व गूळ घालून डाळ उकळावी. बांधलेल्या कणकेचे छोटे ५-६ उंडे बनवावेत. प्रत्येक उंडा पातळ लाटावा व एक-एक इंचाचे उभे व आडवे छेद द्यावेत. (शंकरपाळ्यासारखे) व वर फोडणी केलेल्या डाळीत ते तुकडे १५-२० मिनीट शिजवावेत. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.


ओनियन सॅंडविच टोस्ट
साहित्य : दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा, एक मोठा चमचा लोणी, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी घट्ट साय, दोन-तीन चमचे मिरपूड (काळी), चवीपुरते मीठ, ब्रेड स्लाईस १०-१२.
कृती : कढईत लोणी गरम करून त्यात कांदा घालावा. थोडे परतावे. रंग बदलल्यावर त्यात कोथिंबीर घालावी. लगेच साय घालून गॅस बंद करावा. या मिश्रणात चिमूटभर मीठ व मिरपूड घालावी. ब्रेडच्या स्लाइसच्या दोन्ही बाजूला थोडेसे पाणी लावून घ्यावे. लोणी लावलेल्या बाजूला सारण पसरावे व स्लाइस एकावर एक ठेवून टोस्ट करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावे.


दडपे पोहे (वेगळा प्रकार)
साहित्य : पातळ पोहे ३-४ वाटी, शेंगदाण्याची चटणी, दूध दीड वाटी अंदाजे, मीठ, साखर, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग, तेल, कैरीचे किंवा थोडे लोणचे.
कृती : छोट्या कढईत तेल फोडणीपुरते घ्यावे. गरम झाल्यावर मोहरी, जीरे, हिंग, कढिपत्ता व कांदा घालून परतावे. ही फोडणी थंड झाल्यावर पोह्यावर घालावी. पोह्यात शेंगाची चटणी शेंगदाणे दूध घालून चांगले मिक्‍स करावे. थोडी साखर, कोथिंबीर, लोणचे किंवा कैरीचे तुकडे घालून चांगले मिसळावे व सर्व्ह करावे.


खाकऱ्याचा चिवडा
साहित्य : पोळीचे खाकरे (ताज्या), तेल, मोहरी, जिरे, हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता, पिठीसाखर, फुटाणे, भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट, हळद
कृती : आदल्या दिवशीच्या पोळीचे तव्यावर दाबून चांगले कडक खाकरे करून घ्यावेत. थंड झाल्यावर हाताने त्याचा चुरा करावा. फार बारीक किंवा फार मोठा नसावा. २-३ मोठे चमचे तेल घेऊन फोडणी करावी. तेलात मोहरी जीरे, हिंग घालावे. मग बारीक चिरलेली कोथिंबीर व कढीपत्ता घालावा. चांगले परतावे. कोथिंबीर कुरकुरीत झाल्यावर शेंगदाणे, फुटाणे, हळद, लाल तिखट घालून गॅस बंद करावा. मग त्यात खाकऱ्याचा चुरा, मीठ व पिठीसाखर चवीप्रमाणे घालून चांगले मिक्‍स करावे. हा चिवडा खूप दिवस टिकतो व दह्याबरोबरही खाऊ शकतो.


ढोबळी मिरची - चीज भात
साहित्य : दीड वाटी बासमती तांदूळ, पाऊण वाटी चीज (किसून), एक कांदा, दोन-तीन ढोबळी मिरच्या उभ्या कापून, अर्धा वाटी साय, एक चमचा मिरी पावडर, मी, २-३ वाटी पाणी, अर्धा वाटी लोणी
कृती : लोणी गरम करून त्यात कांदा गुलाबी परतावा, मग त्यावर धुतलेले तांदूळ परतावेत. भात अर्धवट शिजल्यावर ढोबळी मिरची व चीज पसरून घालावे. थोडी मिरी पावडर घालावी. चांगले मिक्‍स करून भात शिजवून घ्यावा. शिजल्यावर क्रीम घालून मिसळावे (मिक्‍स करावा). परत थोडी मिरी पावडर घालून सर्व्ह करावा.


दाल पक्वान 
साहित्य :  सारण ः हरभऱ्याची दाळ दोन वाटी, तेल एक मोठा चमचा, हिरवी मिरची फुटलेली एक लहान चमचा, कुटलेले एक लहान चमचा आले, दालचिनी दोन तुकडे कुटून, लवंग दोन - तीन कुटून, लाल तिखट एक चमचा, धने जीरे पावडर दोन चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, टोमॅटो दोन बारीक चिरून, मीठ, कोथिंबीर, कांदा एक वाटी बारीक चिरलेला, चिंच गुळाची चटणी दोन मोठे चमचे, बारीक शेव
पुरीसाठी साहित्य ः दोन वाटी मैदा, एक वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, एक मोठा चमचा, पाणी
कृती : दाल कुकरमध्ये थोडे पाणी व हळद घालून बोटचेपी शिजवावी. तेल गरम करून मिरची, आले, लवंग दालचिनी पूड घालावी. थोडे परतून हळद, धनेजीरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला व टोमॅटो घालून परतावे. कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. 
पुरी : सर्व साहित्य मिसळून घट्ट कणीक बांधावी. जरा जाडसर पुऱ्या करून मध्यम आचेवर गुलाबीसर तळून घ्याव्यात. थंड झाल्यावर पुरीवर हरभरा... दाळीचे सारण थोडे पसरावे. त्यावर कांदा, चिंचगुळाचे पाणी व कोथिंबीर व शेव घालून सर्व्ह करावी.


मोतीचुरच्या वड्या
साहित्य : हरभरा पीठ (बारीक) २ वाटी, साखर, वेलची पावडर, पाणी, तेल २ वाट्या साखर, दोन चमचे तूप
कृती : हरभऱ्याचे पीठ तेल घालून अगदी घट्ट बांधून घ्यावे. त्याचे गोळे करावे व पोळ्या लाटाव्या (जाडसर) त्याचे त्रिकोणी मोठे काप करून तळून घ्यावेत. चांगले तळून थंड करून बारीक पावडर मिक्‍सरमध्ये करावी. मग ती पावडर गव्हाच्या चाळणीने चाळून घ्यावी. साखर भिजेपर्यंत पाणी घालून पाक करायला ठेवावा. हा पाक हलवत राहावे. पाकाला चांगली गोळी आली की (वाटीत पाणी घेऊन पाकाचा थेंब टाकावा) त्यात हे मिश्रण पटकन घालून भराभर मिक्‍स करावे. तूप घालावे. पसरट मोठ्या थाळीत घालून थाळी आपटून आपटून पसरावे. ओले असतानाच वड्या पाडाव्यात.


मेलनटाईन मॉकटेल
साहित्य : लहान आकाराचे खरबूज, संत्री सहा, शहाळ्याचे पाणी दोन ग्लास, चिमूटभर पीठ, साखर पाच-सहा चमचे
कृती : खरबुजाचा गर काढून घ्यावा. मिक्‍सरमध्ये शहाळ्याचे पाणी घालून तो गर बारीक करावा. मोठ्या गाळणीने गाळून या मिश्रणात संत्र्याचा रस व मीठ आणि साखर चांगले मिसळावे व सर्व्ह करावे. हे पेय उन्हाळ्यात खूप आरोग्यदायी आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या