संक्रांतीचा खाऊ 

सुमन याडकीकर, मुंबई
गुरुवार, 23 जानेवारी 2020

फूड पॉइंट
तिळगुळाचे लाडू हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ! मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू आणि वड्यांचा बेत ठरलेला असतो. यात तिळगुळाची पोळी विसरून कसे चालेल... चला तर मग पाहू तिळापासून केलेल्या अशाच काही संक्रांतीच्या गोडधोड खाऊच्या रेसिपीज... 

पाकातील लाडू आणि वड्या  
साहित्य : एक किलो पॉलिश तीळ, पाव किलो शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, अर्धा किलो चिकीचा गूळ, ५-६ वेलदोडे, चिवड्यासाठी डाळ. 
कृती : तीळ मंद गॅसवर भाजून घ्यावेत. खोबरे, शेंगदाणे भाजून अर्धवट कुटावेत. डाळे व सर्व मिश्रण एकत्र करावे. कढईत अंदाजाने २-३ चमचे पाणी घालावे. त्यात गूळ घालून सारखे हालवत राहावे. गूळ किसून घेतला तर लवकर विरघळतो. गुळाचा एकतारी कडक पाक करावा. खाली उतरवून त्यात जायफळ व सर्व मिश्रण घालावे. चांगले हालवून मिक्‍स झाले, की हाताला तूप लावून सुपारी एवढे लाडू वळावेत. 
तिळाच्या वड्या : पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद ठेवून त्यावर दुसरा कागद घालून लाटण्याने लाटावे. पाहिजे तेवढे जाड ठेवावे व लगेच सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. अशा प्रकारे लाडू व वड्या दोन्हीही तयार होतात. 
टीप : हे लाडू कडक असतात. त्यामुळे दात चांगले असणाऱ्यांनी खावेत. 


शेंगदाणे, तिळाचे लाडू आणि वड्या  
साहित्य : एक किलो पॉलिश तीळ, पाव किलो शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, अर्धा किलो साधा गूळ, ५-६ वेलदोडे, चिवड्यासाठी डाळ. 
कृती : तीळ, शेंगदाणे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये गूळ, तीळ, शेंगदाणे घालून बारीक करून मिक्‍स करून घ्यावे. गोळा हाताने चांगला मळून घ्यावा. एका ताटाला तूप लावून त्यावर सर्व मिश्रण काढून घ्यावे. आता त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. 
वरील मिश्रणाचा काही भाग एका ताटाला तूप लावून त्यावर गोळा थापावा व त्याच्या वड्या पाडाव्यात. थापलेल्या भागावर वरून खोबऱ्याचा कीस घालावा. वड्या छान तर दिसतातच, पण चवदार होतात.  


तीळगूळ पोळी    
साहित्य : चार वाट्या गव्हाचे पीठ, २ वाट्या चिरलेला गूळ, अर्धी वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी पांढरे तीळ, १ चमचा खसखस, अर्धा चमचा जायफळ पावडर, २ चमचे तूप किंवा तेल, किंचित मीठ, अर्धी वाटी रवा. 
कृती : गव्हाच्या पिठात रवा मिसळून मीठ व तेल घालून कणीक घट्ट मळून दोन तास ठेवावी. तीळ व खसखस गुलाबी रंगावर कोरडे भाजून ठेवावेत. डाळीचे पीठ मंद गॅसवर खमंग भाजावे. थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेला गूळ, जायफळ, तिळाचा कूट, खसखस घालून मिक्‍सरमधून काढावे. म्हणजे गुठळ्या होणार नाही व सर्व एकजीव होईल. नेहमीच्या पुरीएवढ्या दोन पुऱ्या लाटून एका पुरीवर गुळाचे सारण घालून त्यावर दुसरी पुरी ठेवावी व कडा दाबून घ्याव्यात. पिठावर पुरी ठेवून पुरीवर थोडेसे अखंड तीळ पसरावेत व हलक्‍या हाताने पोळी लाटावी. पोळीची दुसरी बाजू घेऊन त्यावरही थोडे तीळ पसरावेत. पोळी लाटून झाल्यावर मंद गॅसवर गुलाबी रंगावर सर्व बाजूने भाजून घ्यावी. वरून तीळ टाकल्याने पोळी सुशोभित होते. गरम गरम तुपाबरोबर खावयास द्यावी. 
टीप : या पोळ्या २-३ दिवस टिकतात.  


तीळकूट
साहित्य : एक वाटी बारीक पांढरे तीळ, तिखट, मीठ आणि आवडीनुसार कांदा, लसूण.
कृती : तीळ मंद गॅसवर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये मीठ, तिखट घालून बारीक करावे. हे तीळकूट ७ ते ८
दिवस टिकते. भाकरीबरोबर तेल घालून किंवा दही घालून खावयास द्यावी.


पंचामृत  
साहित्य : अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ तुकडे, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी पांढरे तीळ, मीठ, हळद, काजूचे तुकडे, जिरे व फोडणीचे साहित्य, मेथीचे दाणे, हिंग. 
कृती : फोडणी करून फोडणीत मेथीचे दाणे घालावेत. फोडणीत हळद घालून बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. खोबऱ्याचे तुकडे, काजू तुकडे घालून चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, खोबऱ्याचा कीस, तिळाचा कूट, अर्धी वाटी पाणी घालून चांगले शिजू द्यावे. बेताचे घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. सणावाराला पंचामृत अवश्य करतात. 


बाजरीची भाकरी  
साहित्य : बाजरीचे पीठ, पांढरे तीळ आणि गरजेनुसार पाणी 
कृती : नेहमीप्रमाणे भाकरीचे पीठ करून भाकरी थापावी. थापताना भाकरीवर तीळ पसरावेत व परत थापून तीळ घट्ट बसवावेत. तव्यावर तिळाची बाजू तव्याकडे करावी. वरती परत भाकरीवर तीळ पसरून भाकरीला पाणी लावावे व नेहमीप्रमाणे भाकरी भाजावी. तीळ खमंग भाजले जातात व भाकरी चविष्ट लागते. तिळाच्याच चटणीबरोबर खावी.

संबंधित बातम्या