उपासाचे गोड पदार्थ

सुनीता मिरासदार
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

फूड पॉइंट
 

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू
साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, एक वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धा चमचा वेलदोडे पूड, काजू तुकडा, बेदाणे.
कृती : पीठ, तूप घालून चांगले तांबूस रंगावर भाजावे. खाली उतरून थोडे थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलदोडे पूड घालून मिसळावे. लाडू वळावेत. लाडूवर काजू तुकडा, बेदाणे दाबून बसवावेत. लागल्यास दूध वापरावे. शिंगाड्याच्या पिठाचा शिरा करता येतो. तूप घालून पीठ भाजावे. दूध, पाणी एकत्र करून पिठात घालावे, परतावे. दोन चमचे दाण्याचा (बारीक) कूट, साखर घालून शिजवावे. पीठ मोकळे होईपर्यंत परतावे. वेलदोडे, केशर घालून मिसळावे. काजू तुकडा वाटीत घालून शिऱ्याची मूद पाडावी. उपवासाला वेगळा पदार्थ करावा.

राजगिऱ्याच्या वड्या
साहित्य : चार वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या, एक वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, वेलदोडे पूड, बेदाणे.
कृती : कढईत एक चमचा तूप, गूळ, दोन चमचे दूध घालून पाक करण्यास ठेवावे. पाकास बुडबुडे येऊन गूळ विरघळला की पाकात लाह्या, शेंगदाणे, वेलदोडे पूड घालून मिसळावे. ताटाला तूप लावून मिश्रण थापावे. वरून बेदाणे दाबावेत. थोडे थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापाव्यात. राजगिऱ्याचे लाडू करता येतात. गूळ, दोन चमचे दूध, एक चमचा तूप घालून पाक करावा. पाकात लाह्या, शेंगदाणे, वेलची पूड, दोन चमचे सुक्‍या खोबऱ्याचा कीस घालून मिसळावे. गरम असतानाच लाडू वळावेत. छान लागतात. बरेच दिवस चांगले राहतात. 

वरई तांदळाचा नारळी भात
साहित्य : एक वाटी वरई तांदूळ, एक वाटी नारळ चव, एक वाटी साखर किंवा गूळ, चार लवंगा, एक चमचा वेलदोडे पूड, तूप, बेदाणे, काजू.
कृती : वरई निवडून धुवून ठेवावी. पातेलीत एक चमचा तूप, लवंगा घालून फोडणी करावी. वरई तांदूळ घालून दोन मिनिटे परतावे. नारळ चव घालून थोडे परतावे. दीड वाटी गरम पाणी घालून शिजवावे. वरई फार मऊ शिजवू नये. साखर/गूळ, पाव चमचा केशरी रंग दुधात कालवून वरईमध्ये घालावा. हलके मिसळून झाकण टाकून एक वाफ येऊ द्यावी. साखर विरघळली, की कडेने तूप सोडावे. वेलदोडे पूड घालावी. काजू, बेदाणे तुपावर परतून घ्यावेत. वाटीत थोडे काजू, बेदाणे घालून वरई नारळीभात घालून मूद पाडावी. उपवासाच्या दिवशी वरई नारळीभात पक्वान्न करावे.

शेंगदाणे कुटाचा म्हैसूर पाक
साहित्य : दोन वाट्या शेंगदाण्याचा कूट, तीन वाट्या साखर, 
चार वाट्या तूप.
कृती : दाणे भाजून सोलून त्याचा बारीक कूट करावा. साखर भिजेल एवढे पाणी घालून एकतारी पाक करावा. पातेलीत तूप घालून गरम करण्यास ठेवावे. तूप चांगले कडकडीत तापवावे. तयार पाकात दाण्याचे कूट घालून ढवळावे. कुटावर एक वाटी कडकडीत तूप घालावे. ढवळावे. गॅस मंद ठेवावा. खाली लागू नये म्हणून सारखे झाऱ्याने हलवावे. मिश्रण कडेने सुटून सच्छिद्र होऊ लागते. बाकी तूप घालून हलवून ताटात मिश्रण ओतावे. साधारण एक इंच जाडीचा थर होईल असे जाड मिश्रण ओतावे. गरम असतानाच चौकोनी वड्या पाडाव्यात. ताट तिरके करून ठेवावे. म्हणजे जास्तीचे तूप निथळून येते. खमंग, जाळीदार म्हैसूर पाक उपवासाला चालतो.

रताळ्याचे गोड वडे
साहित्य : अर्धा किलो रताळी, एक वाटी गूळ (आवडीप्रमाणे कमीजास्त घालावा) एक वाटी नारळ चव, एक वाटी वरई पीठ, वनस्पती तूप, वेलची पूड.
कृती : रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्यावीत. थंड झाल्यावर साल काढून कुस्करून घ्यावीत. त्यात नारळ चव, गूळ, वेलची पूड घालून गोळा तयार करावा. लागल्यास दूध वापरावे. नारळ चव, गुळामुळे पटकन गोळा तयार होतो. शक्‍यतो दूध लागत नाही. वरई पीठ, एक चमचा गरम तूप, चिमूटभर मीठ घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवावे. रताळ्याच्या गोळ्याचे लहान लहान चपटे वडे करून वरई पिठात बुडवून गरम तेलात लालसर तळून काढावेत. तेल गरम झाले, की गॅस बारीक करून मंद आचेवर वडे तळावेत. नारळ चटणी (उपवासाची) गरम वडे याची डिश तयार करून खायला द्यावी. वडे मात्र गरम असतानाच खावेत.

रताळ्याचा केक
साहित्य : तीन रताळी, एक वाटी भिजवून मोकळा साबुदाणा, एक वाटी नारळ चव, एक वाटी साखर, तूप, काजू तुकडा.
कृती : रताळी स्वच्छ धुवून उकडावीत. साल काढून किसावी. रताळी किसात नारळ चव, साबुदाणा, साखर, वेलची पूड घालून मिसळून गोळा तयार करावा. सपाट तव्याला पातळ तुपाचा हात लावून गोळा जाडसर थापावा. काजू तुकडा दाबून बसवावा. मैदा अग्नीवर ठेवून भाजावा. दोन मिनिटांनी कडेने उचलून तूप सोडावे. खालचा भाग तांबूस भाजला की उलटावा. वरची बाजू खाली करावी. तांबूस रंग आला, की खाली उतरवून थंड झाल्यावर वड्या (केकच्या आकाराच्या) कापाव्यात. रताळी, साखर असल्यामुळे करपण्याचा संभव असतो. म्हणून सावकाश शांतपणे भाजावा.

खोबऱ्याचे अनारसे
साहित्य : दोन वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, पाऊण वाटी पिठी साखर, अर्धी वाटी खसखस, तूप.
कृती : खोबरे कीस थोडा गरम करून चुरुन घ्यावा किंवा मिस्करमधून एकदा फिरवावा. बारीक करू नये. खसखस भाजून घ्यावी. चार चमचे साजूक तूप परातीत घालून चांगले फेसावे. तुपात खोबरे कीस, खसखस, पिठीसाखर घालून मिसळून गोळा तयार करावा. छोटा गोळा घेऊन त्याचा अनारसा (थापून) बनवावा. असे सर्व छोटे छोटे अनारसे तयार करून सपाट तव्यावर गोलाकार ठेवावेत. मंद गॅसवर झाकण टाकून भाजावेत. अनारश्‍याची दुसरी बाजू उलटून थोडी शेकावी. गरम अनारसे खुसखुशीत छान लागतात. थंड अनारसे सुद्धा चवदार लागतात. ७-८ दिवस चांगले राहतात.

राजगिऱ्याच्या पुऱ्या
साहित्य : दोन वाट्या राजगिरा पीठ, एक वाटी दूध, एक वाटी साखर, चार चमचे गरम वनस्पती तूप, एक चमचा वेलदोडे पूड, तळण्यासाठी तूप.
कृती : दूध कोमट करून त्यात साखर घालून विरघळून घ्यावी. दुधात वेलदोडे पूड घालून मिसळावी. राजगिरा पिठात तूप गरम करून घालावे. दूध साखरेमध्ये पीठ घट्ट भिजवून ठेवावे. तुपाचा हात लावून छोट्या थोड्या जाडसर पुऱ्या लाटाव्यात गरम तुपात मंद आचेवर पुऱ्या तळून काढाव्यात. खजूर चटणी किंवा नारळ चटणीबरोबर चवदार लागतात.

खजूर शेंगदाणे लाडू
साहित्य : पाव किलो बिया काढलेला खजूर, दोन वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, एक वाटी दाण्याचे कूट, अर्धी वाटी गूळ चिरून, एक चमचा वेलची पूड.
कृती : खोबरे कीस भाजून घ्यावे. खजूर, खोबरे कीस, शेंगदाणे कूट, गूळ, वेलदोडे पूड सर्व एकत्र करावे. खजूर, खोबरे कीस मिक्‍सरमधून थोडे बारीक करावे. नंतर सर्व मिसळून त्याचे लाडू वळावेत. गूळ, खजुरामुळे पुरेसा ओलसरपणा येतो. त्यामुळे लाडू वळता येतात. लाडू पौष्टिक असल्यामुळे एरवीसुद्धा जरूर करावेत. उपवासाच्या दिवशी हा लाडू खाल्याने भूक लागत नाही. शक्तिवर्धक आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या