गाजर आणि पालक स्पेशल

सुप्रिया खासनीस
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

फूड पॉइंट

गाजर भात

साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, २५० ग्रॅम मोठी लाल गाजरे, १ मोठा कांदा, २-४ लवंगा, २-४ दालचिनी काड्या, ३ ते ४ टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ.
कृती : तांदूळ धुऊन दोन ते तीन तास निथळत ठेवावेत. गाजरे स्वच्छ धुऊन जाड किसणीवर किसून घ्यावीत. कांदा बारीक, पण उभा चिरून घ्यावा. तुपावर लवंग, दालचिनीची फोडणी करून त्यावर कांदा बदामी रंग येईपर्यंत परतावा. नंतर त्यात किसलेले गाजर घालून जरा परतावे. परतल्यावर त्यात तांदूळ घालून पुन्हा एकसारखे परतावे. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी व चवीनुसार मीठ घालून भात मंदाग्नीवर शिजू द्यावा. कुठल्याही करीबरोबर हा भात छान लागतो. दिलेल्या प्रमाणात ३-४ जणांना पुरेसा होतो.

गाजराचे वडे
साहित्य : एक वाटी गाजराचा कीस, दीड वाटी हरभरा डाळ, ५-६ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ, तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती : हरभरा डाळ तीन ते चार तास भिजत घालावी. नंतर त्यात आले, लसूण, मिरच्या घालून सर्व एकत्र करून वड्यासाठी पीठ तयार करावे. पीठ फार सैल किंवा फार घट्ट नसावे. छोटे छोटे वडे करून मंदाग्नीवर तेलात तळावेत. हे वडे छान लागतात. दिलेल्या प्रमाणात चार व्यक्तींसाठी पुरेसे वडे होतील.

गाजराच्या वड्या
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस (शक्यतो लाल रंगाची गाजरे घ्यावीत), दीड वाट्या साखर, पाऊण वाटी मावा/खवा, पाव वाटी तूप, १०-१२ वेलदोडे, पिस्ते.
कृती : गाजराचा कीस तुपावर वाफवून घ्यावा. नंतर तो कीस व साखर एकत्र करून शिजत ठेवावे. शिजत आल्यावर त्यात पुन्हा मावा घालून शिजवावे. गोळा चांगला घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर तो गोळा आपल्याला पाहिजे त्या जाडीनुसार थापावा. पिस्त्याचे काप वर थापून हलकेच लाटणे फिरवावे व वड्या पाडाव्यात. 

गाजराची चटणी
साहित्य : पाव किलो लाल गाजरे, चवीनुसार मीठ, तिखट, १ मोठा चमचा दाण्याचे कूट, ५-७ लसूण पाकळ्या, फोडणीचे साहित्य, तेल, कोथिंबीर (ऐच्छिक).
कृती : गाजरे स्वच्छ धुऊन जाड किसणीवर किसून घ्यावीत. नंतर तिखट, लसूण पाकळ्या, दाण्याचे कूट मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे. किसलेले गाजर मिक्सरमधून भरडसर काढावे. सगळे एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून वर गार झालेली फोडणी घालावी. कोथिंबीर हवी असेल तर वर बारीक चिरून घालावी. ही चटणी रोजच्या जेवणात चार पाच माणसांना सहज 
पुरते.

गाजराचे लाडू
साहित्य : तीन वाट्या गाजराचा कीस, २ वाट्या ओले खोवलेले खोबरे, दीड वाटी चिरलेला गूळ, ४ चमचे तूप, वेलदोडा दाणे जरुरीनुसार.
कृती : लाल रंगाची गाजरे घ्यावीत. ती धुऊन, पुसून बारीक किसणीने किसावीत. कीस शक्यतो बारीक असावा. कीस, खोबरे, गूळ, तूप एकत्र करून मिश्रण मंदाग्नीवर शिजवायला ठेवावे. मिश्रण लाडू वळण्याइतपत शिजवावे. नंतर त्यात वेलदोड्याचे दाणे घालावेत आणि लहान लहान लाडू वळावेत. हे लाडू चवीला अळिवाच्या लाडवासारखे लागतात, पौष्टिक आहेत.

पालक कबाब
साहित्य : एक मोठी पालकची जुडी, दीड वाटी मुगाची डाळ, ३-४ ब्रेडचे स्लाइस, १ कांदा, ५-६ लसूण पाकळ्या, ८-१० हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, १ इंच आले, तेल.
कृती : प्रथम मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत घालावी. पालक बारीक चिरून स्वच्छ धुऊन घ्यावा. नंतर अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावा. चाळणीवर ओतून सर्व पाणी काढून टाकावे.  मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. ब्रेडचे स्लाइस थोड्या पाण्यात टाकून पिळून घ्यावेत. मिरच्या, आले, लसूण यांचे एकत्रित बारीक वाटण करून घ्यावे. नंतर ब्रेडसह सर्व एकत्र करून मळून घ्यावे. गुलाबजामप्रमाणे लांबट आकार देऊन छान तळावेत. कबाब सॉसबरोबर खायला द्यावेत. दिलेल्या प्रमाणात ४-५ माणसांना पुरेसे कबाब होतात.

गाजर पालक पराठे
साहित्य :  गाजराचा १ वाटी अगदी बारीक चिरलेला कीस, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, १ वाटी बारीक चिरलेला पालक, चवीनुसार मीठ, साखर, १ चमचा जिरे पूड, ७-८ हिरव्या मिरच्या बारीक वाटून, २ ते ३ वाट्या कणीक, तेल.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. कणकेमध्ये दोन ते तीन चमचे गरम तेलाचे मोहन घालावे व कणीक चांगली भिजवावी. अर्ध्या तास बाजूला ठेवावी. नंतर पराठे लाटून तव्यावर तेल सोडून भाजावेत. लोणच्याबरोबर खावयास  द्यावेत. ५ ते ६ जणांना नाश्त्यासाठी पुरेसे पराठे होऊ शकतात. एक दिवसाच्या प्रवासासाठी मधल्या वेळीही खाता येतात.

पालक भजी
साहित्य : एक जुडी पालक, २ वाट्या डाळीचे पीठ, चवीनुसार मीठ, तिखट, पाव चमचा हळद, १ चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, तळण्यासाठी तेल.
कृती : पालक धुऊन बारीक चिरावा. चिरलेल्या पालकामध्ये डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद, ओवा व दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ कालवावे. पीठ फार पातळ करू नये. नंतर गोल भजी करून तळावीत. छान लागतात. दिलेल्या प्रमाणात ४-५ माणसांना पुरेशी भजी होतात.

संबंधित बातम्या