संक्रांतीचा गोडवा

साहित्य :
गुरुवार, 17 जानेवारी 2019

फूड पॉइंट
पौष महिन्यात म्हणजेच उत्तरायणाच्या सुरवातीला हवेत थंडी असते. शरीराला उष्ण तसेच स्निग्ध पदार्थांची गरज असते. थंडीत त्वचा कोरडी पडते. यासाठी संक्रांतीच्या काळात तीळ आणि गूळ या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांचा वापर केला जातो. अशाच काही तिळगुळाच्या तिखट व गोड पाककृती.

तिळगुळाच्या वड्या
साहित्य : एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे, पाव वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, दीड वाटी चिरलेला गूळ, दोन चमचे साजूक तूप, चिमूटभर तुरटीची पूड, वेलदोडा पूड
कृती : तीळ खमंग भाजून घेऊन बारीक कुटावेत. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा. वेलदोड्याची पूड तिळाच्या कुटात मिसळावी. नंतर गुळाचा पाक करावयास ठेवावा. पाकाला फेस येऊ लागताच भांडे खाली उतरावे आणि त्यात तूप व तुरटीची पूड मिसळावी. नंतर त्यात तिळाचे व दाण्याचे कूट घालून ढवळावे. आणि त्याचा गोळा करावा. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा पसरून लाटावा. त्यावर खोबरे पसरून थापावे आणि गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

तीळ पापडी
साहित्य : दोन वाट्या कणीक, पाव वाटी तीळ, अर्धी वाटी पिठीसाखर, तांदळाची पिठी, अर्धी वाटी दूध, वनस्पती तूप तळणासाठी
कृती : मैद्याच्या चाळणीने कणीक चाळून त्यात चार चमचे वनस्पती तूप गरम करून घालावे. नंतर त्यात पिठीसाखर, तीळ घालून जरुरीनुसार दूध घालून कणीक घट्ट मळून घ्यावी. कणीक तासभर झाकून ठेवावी. नंतर कणकेच्या लाट्या करून पोळपाटावर तांदळाची पिठी पसरून पापडाप्रमाणे पातळ पुऱ्या लाटून त्या पसरून ठेवाव्यात. चार तासानंतर वनस्पती तुपातून गुलाबी रंगावर पुऱ्या तळून काढाव्या. या पुऱ्या चवदार लागतात.

तिळाचा म्हैसूर
साहित्य : दीड वाटी पांढरे पॉलिश केलेले तीळ, दीड वाटी साखर, अडीच ते तीन वाट्या तूप, अर्धी वाटी दाण्याचा कूट, केशरी रंग.
कृती : तीळ भाजून घेऊन कुटावेत. त्यात दाण्याचे कूट मिसळावे. साखरेचा दोनतारी पाक करावा. त्याचबरोबर एका भांड्यात तूप कडकडीत तापवण्यासाठी ठेवावे. पाक होत आल्यावर त्यात तीळ व दाण्याच्या कुटाचे मिश्रण घालावे. पाक गॅसवर असतानाच त्यात पळी पळी कडकडीत तूप घालत जावे. याप्रमाणे सर्व तूप घालावे. मिश्रण हलके होऊन त्याला जाळी पडू लागेल. जाळी पडू लागली, की लगेच ते मिश्रण एका थाळीत ओतावे. नंतर वड्या कापाव्यात व थाळी तिरकी करून ठेवावी. म्हणजे जास्तीचे तूप निथळून येईल व ते काढून घेता येईल.

तीळ बेसन लाडू
साहित्य : एक वाटी पॉलिश केलेल्या तिळाचा जाडसर कूट, एक वाटी हरभरा डाळीचे किंचीत जाडसर पीठ, दीड वाटी पिठीसाखर, एक वाटी तूप, पाव वाटी दूध, वेलदोडे पूड, बदाम व बेदाणे.
कृती : अर्धी वाटी तुपावर बेसन पीठ बदामी रंगावर भाजून घ्यावे. उरलेल्या तुपावर तिळाचे कूट परतून घ्यावे. बेसन पीठ व तिळाचे कूट एकत्र करून त्यावर दूध शिंपडून चांगले हलवावे. मिश्रण कोमट असतानाच त्यात साखर मिसळावी. मिश्रण थंड झाल्यावर खूप मळावे. मळून मऊ झालेल्या मिश्रणात वेलदोडा पूड, बदाम काम व बेदाणे घालून लाडू करावेत. हे लाडू स्निग्ध व पौष्टिक असून वात, पित्त व कफनाशक आहेत.

तीळ पाक
साहित्य : एक वाटी पॉलिश केलेले तीळ, एक वाटी दूध, दोन वाट्या साखर, एक चमचा लिंबाचा रस, एक टेबल स्पून पिठीसाखर, केशरी रंग, मीठ, सात ते आठ थेंब व्हॅनिला, एक चमचा तूप.
कृती : तीळ सात-आठ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर पाण्यातून काढून बारीक वाटावेत. वाटत असताना ते थोडे थोडे दूध घालून वाटावेत. नंतर वाटलेले तीळ, साखर व राहिलेले दूध घालून मंद आचेवर मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे शिजत ठेवावे. या वेळी मिश्रण सतत ढवळत राहावे. नंतर मिश्रणात पिठीसाखर, रंग, तूप, लिंबाचा रस, व्हॅनिला व चवीला थोडेसे मीठ घालून मिश्रण एकजीव घोटावे. मिश्रण थाळ्यात ओतून थापावे. कोमट असताना वड्या कापाव्यात.

तिळाची बर्फी
साहित्य : साखर ४०० ग्रॅम, २०० ग्रॅम पांढरे पॉलिश केलेले तीळ, २०० ग्रॅम काजूचे तुकडे, दीड वाटी सायीसकट दूध, अर्धा चमचा रोस इसेन्स. 
कृती : तीळ जरा कमी भाजून त्याची पूड करून घ्यावी. काजूचीही न भाजता पूड करावी. जाड बुडाच्या पातेल्यात साखरेत सायीसकट दूध घालून पाक करावा. गोळीबंद पाक झाल्यावर त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे व लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे. हवा असल्यास गरम गरम आहे तोवरच वर्खाचा कागद थापावा व नंतर वड्या पाडाव्यात.

गुळाची पोळी
साहित्य : चार वाट्या किसलेला गुळ, सहा वाट्या कणीक, अर्धी वाटी खसखस, १०-१५ वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी डाळीचे पीठ (चण्याच्या डाळीचे) एक वाटी तेल, तांदळाची पिठी गरजेनुसार.
कृती : कणकेमध्ये चवीपुरते मीठ व अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. कणीक घट्ट भिजवावी. गूळ किसणीने बारीक किसून अगर खलबत्त्यात चांगला कुटून घ्यावा. कुटून घेतल्यास कुटताना त्यात दोन चमचे तेल घालावे म्हणजे गूळ चिकटून राहत नाही. खसखस भाजून त्याची पूड करावी. डाळीचे पीठ तेलावर चांगले बदामी रंगावर भाजून घ्यावे. गुळामध्ये डाळीचे पीठ, कुटलेली खसखस व वेलदोडा पूड घालून गूळ चांगला मळून घ्यावा. पोळीकरीता कणकेच्या दोन गोळ्या कराव्या व त्यापैकी १ गोळीपेक्षा थोडी मोठी गुळाची गोळी करावी. कणकेच्या दोन गोळ्यामध्ये गुळाचे सारण ठेवून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात व भाजाव्यात. गूळ कडेपर्यंत पसरला जाईल असे पाहावे.

टोमॅटो-तीळ चटणी
साहित्य : पाव किलो कच्चे टोमॅटो, ७-८ हिरव्या मिरच्या, २-४ चमचे तीळ, चवीनुसार मीठ, साखर, मूठभर चिरलेली कोथिंबीर, तेल व फोडणीचे साहित्य.
कृती : टोमॅटो उभे पातळ चिरून घ्यावे. तीळ भाजून घ्यावेत. तव्यावर थोडे तेल टाकावे. त्यावर चिरलेले टोमॅटो परतावेत. हिरव्या मिरच्या थोड्या परतून घ्याव्यात. परतलेले टोमॅटो, मिरच्या, तीळ, कोथिंबीर घालून चटणी वाटावी. वरून तेलाची फोडणी मोहरी, हळद, हिंग घालून द्यावी.

तिळाचा भात
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, एक वाटी पांढरे तीळ, ७-८ लाल मिरच्या, थोडे काजूचे तुकडे, अर्धी वाटी दाणे, एक चमचा हरभरा डाळ, एक चमचा उडीद डाळ, हिंग, एक लिंबू, कढीलिंब, फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम मीठ घालून नेहमीप्रमाणे भात करून घ्यावा व वाफ जिरल्यावर परातीत उपसून टाकावा. थोड्या तुपावर काजू, कढीलिंब, दाणे तळून घ्यावे. त्याच पातेल्यात तीळ घालून तेही परतून घ्यावेत. खमंग वास आला, की उतरवावे. परातीमधील भातावर तळलेले काजू, दाणे, कडीपत्ता, तिळाची पूड करून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. नंतर एका लहान कढईत तुपाची फोडणी करावी. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली, की त्यात उडदाची डाळ, लाल मिरच्या हरभरा डाळ घालावी. नंतर परातीतील भातावर ही फोडणी थोडासा हिंग घालून घालावी. नंतर भात सारखा करून गरम किंवा गार कसाही वाढावा. छान लागतो.

मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य : दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, तिखट मीठ, थोडा काळा मसाला, ३-४ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक चमचा जिरे, थोडे सुके खोबरे, एक टेबल स्पून दही, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवावे. एका पातेल्यात नंतर तेलाची हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. त्यात धुतलेले डाळ तांदूळ घालून जरा परतावे. नंतर डाळ व तांदूळ यांच्या दुप्पट गरम पाणी, मीठ, तिखट, काळा मसाला घालावा. लवंग, दालचिनी, जिरे व सुके खोबरे वाटून घ्यावे व ते खिचडीत घालावे. दही घालावे.
    थोड्या वेळाने खिचडी ढवळून झाकण ठेवावे व मंदाआचेवर खिचडी शिजू द्यावी. वाढताना वर ओले खोबरे, कोथिंबीर घालावी.

तिळाची सुकी चटणी
साहित्य : एक वाटी तीळ, अर्धी वाटी भाजलेले दाणे, सुके खोबरे पाव वाटीचा तुकडा,... कढीलिंब साधारण वाटीभर पाने, १०-१५ सुक्‍या लाल मिरच्या, मीठ, हिंग, तेल.
कृती : प्रथम तीळ भाजून घ्यावे. हिंगाचा खडा तळून घ्यावा. त्याच तेलाच खोबरे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्येच कढीलिंब, मिरच्या परतून घ्याव्यात. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून चांगले कुटावेत.

टिप्स :

  • गुळाच्या पोळीचा गूळ जर मोकळा झाला नसेल तर त्यामध्ये केळ्याचा बारीक साधारण १ इंच तुकडा कुस्करून घालावा म्हणजे सारण मऊ होऊन गूळ पोळीच्या कडेपर्यंत जाऊ शकतो.
  • तिळाचा हलवा करताना तो निर्लेप- नॉन स्टिकच्या पॅनमध्ये करावा. पाक पॅनला चिकटत नाही व हलवा लवकर होतो.
  • हलव्यासाठी पाक करताना पाक पूर्ण थंड झाल्यावर थोडे लिंबू पिळावे. म्हणजे हलव्याला चमक येऊन तो चवीला छान लागतो.
  • मुगाची खिचडी करताना डाळीऐवजी मोड आलेले सबंध मूग वापरले तर खिचडी चविष्ट होऊन पौष्टिकता वाढते.
  • मिक्‍स भाजी करताना त्यात नुसते दाण्याचे कूट न घालता दाणे व तीळ मिक्‍सरमध्ये थोडे पाणी घालून वाटावे व ते घालावे. त्यामुळे रस्सा दाट होतो व चवही चांगली येते.

संबंधित बातम्या