पालक स्पेशल

सुवर्णा जहागीरदार-सुर्वे, मुंबई
सोमवार, 5 एप्रिल 2021

फूड पॉइंट

पालक आरोग्यासाठी गुणकारी असतो. पालकाच्या भाजीव्यतिरिक्त पालकापासून इतरही चविष्ट पदार्थ करता येतात. अशाच काही रेसिपीज.. 

पालक पनीर भाजी  
साहित्य : दोन मोठ्या वाट्या पालक, ८ ते १० हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १० लसूण कळ्या, १ मध्यम लाल टोमॅटो, १ लहान कांदा, अमूल बटर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, १ चमचा प्रत्येकी हळद व लाल तिखट, १ चमचा कसूरी मेथी, १ तमालपत्र, १ चमचा हिंग, १५० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ चमचे मका पीठ, १ चमचा तांदूळ पीठ, आवश्यक तेवढे पाणी.
कृती : गरम पाण्यात पालक पाने दोन-तीन मिनिटे ठेवावीत. नंतर पाने गरम पाण्यातून काढून लगेच त्यावर थंड पाणी ओतावे. पनीरच्या तुकड्यांना किंचित हळद, मीठ, लाल तिखट लावून २० मिनिटे मुरत ठेवावे. मका पीठ व तांदूळ पीठ एकत्र करून त्या मिश्रणात मुरलेले पनीर घोळवून बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. चार चमचे अमूल बटर गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आले परतावे. थोडे गरम झाले की त्यात उकडलेली पालक पाने घालून मिश्रण एकजीव करून थंड झाल्यावर बारीक पेस्ट करावी. आवडीनुसार अमूल बटर गरम करून त्यात एक तमालपत्र घालावे. एक मिनिटानंतर पालक पेस्ट घालून दोन मिनिटे परतल्यावर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून पनीर तुकडे, हळद, मीठ व कसूरी मेथी हातावर चुरडून घालावी व गॅस बंद करावा. पालक पनीर खाण्यास तयार. 

ताकातील भाजी    
साहित्य : एक पालक जुडी, २ वाट्या आंबट ताक, २ चमचे बेसन, ८ लसूण कळ्या ठेचून, १ इंच आले ठेचून, ८ हिरव्या मिरच्या ठेचून, २ चमचे दाण्याचे जाडसर कूट, २ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, तेल/साजूक तूप, आवडीनुसार कढीपत्ता.
कृती : पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा. तेल/साजूक तूप गरम झाले की त्यात ठेचलेला लसूण घालून बदामी रंगावर परतावा. मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून मिनिटभर परतावे. ठेचलेली हिरवी मिरची व आले घालून परतावे. हळद घालून दोन मिनिटे सर्व मिश्रण परतून चिरलेला पालक घालावा. मिश्रण दोन मिनिटे मंद आचेवर एकजीव करावे. एका भांड्यात ताक घेऊन त्यात दोन चमचे बेसन घालून चांगले एकजीव होईपर्यंत फेटावे. हे ताक भाजीत घालून उकळी येईपर्यंत सतत ढवळावे. दाण्याचे कूट व चवीनुसार मीठ घालून दोन-चार मिनिटे भाजी शिजवावी.
टीप : ही भाजी कोणत्याही भाकरीबरोबर रुचकर लागते.

मुद्दा भाजी   
साहित्य : एक मध्यम पालक जुडी, ३ वाट्या शिजलेली घट्ट तूर डाळ, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, आवडीनुसार दाणे, १० हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १०-१२ कढीपत्ता पाने, १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग, १ वाटी तेल, २ लाल सुक्या मिरच्या, ४ चमचे चिंचेचा कोळ.
कृती : पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा. अर्धी वाटी तेल गरम करून त्यात चिरलेला पालक, शिजलेली डाळ, हळद, मीठ, चिंचेचा कोळ घालून सर्व मिश्रण पाच मिनिटे मंद आचेवर एकजीव करावे. राहिलेले तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, दाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता व हिंग यांची खमंग फोडणी करून भाजी वर घालावी.
टीप : ही भाजी कोणत्याही भाकरीबरोबर रुचकर लागते.

पालक पनीर पराठा
साहित्य : दोन वाट्या वाफवलेल्या पालकाची पेस्ट, १ मोठा उकडलेला बटाटा, १ लहान वाटी कुस्करून पनीर, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, ८ लसूण कळ्या - यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार मीठ, प्रत्येकी १ लहान चमचा हळद व हिंग, २ चमचे पांढरे तीळ, २ वाट्या गव्हाचे पीठ, १ चमचा बेसन, १ चमचा धने पूड, आवश्यकतेनुसार गरम पाणी, अमूल बटर/साजूक तूप.
कृती : गव्हाच्या पिठात बेसन, हळद, हिंग, पांढरे तीळ, धने पूड, मीठ, हिरवी पेस्ट, उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. कुस्करलेले पनीर, पालक पेस्ट, २ चमचे साजूक तूप, गरम पाणी घालून घट्टसर पीठ मळावे व १० मिनिटे मुरत ठेवावे. मग जाडसर पराठे लाटून मंद आचेवर कडेने अमूल बटर सोडून बदामी रंग येईपर्यंत भाजावे.
टीप : हा पराठा दही/टोमॅटो केचपबरोबर खावा. ‌‌ 

कटलेट
साहित्य : एक वाटी वाफवलेल्या पालकाची पेस्ट, १ उकडलेला बटाटा, २ चमचे वाफवलेले मटार, चवीनुसार मीठ, २ चमचे चाट मसाला, १ चमचा लिंबाचा रस, ४ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, ६ लसूण कळ्या, २ चमचे मका पीठ, २ चमचे बारीक रवा, तळण्यासाठी तेल, १ लहान कांदा, १ लहान लाल टोमॅटो.
कृती : दोन चमचे गरम तेलात हिरव्या मिरच्या, लसूण कळ्या, आले दोन-तीन मिनिटे शिजवून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सर्व मिश्रण चार मिनिटे परतावे. थंड झाल्यावर पाणी न घालता मिश्रणाची बारीक पेस्ट करून त्यात बटाटा कुस्करून घालावा. त्यातच मटार, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, मका पीठ घालून मिश्रण एकजीव करावे. शेवटी पालक पेस्ट मिक्स करून मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याचे गोल कटलेट करून ते रव्यात घोळवून पॅनमध्ये मध्यम आचेवर बदामी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करावे. हे कटलेट पुदिना चटणी बरोबर/टोमॅटो सॉसबरोबर रुचकर लागतात.

सूप   
साहित्य : वीस पालक पाने, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, ८ लसूण कळ्या, ४ चमचे अमूल बटर, चवीनुसार मीठ, १ लहान चमचा हळद, आवश्यकतेनुसार पाणी, ४ कढीपत्ता पाने.
कृती : पालक पाने स्वच्छ धुऊन चार मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्यावीत व लगेच ती थंड पाण्यात घालून दोन मिनिटांनी सर्व पाणी बाजूला काढून ठेवावे. पालक पाने, मिरच्या, आले, लसूण सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. अमूल बटर तापत ठेवून त्यात कढीपत्ता पाने दोन मिनिटे परतावीत. त्यात हळद व वाटलेली पालक मिश्रित पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. आपल्या आवडीनुसार पाणी व मीठ घालून दोन मिनिटे उकळून गॅस बंद करावा. आवडीनुसार वरून अमूल बटर घालून गरम गरम सूपचा आस्वाद घ्यावा. 
 

संबंधित बातम्या