उपवास स्पेशल

सुवर्णा जहागिरदार सुर्वे, मुंबई
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

फूड पॉइंट

श्रावण आला की जसे सणवार सुरू होतात, तसेच उपवाससुद्धा सुरू होतात. म्हणून या काही खास उपवास स्पेशल रेसिपीज...

स्टफ्ड पुरी
साहित्य ः 
सारणासाठी ः चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे कुस्करून, ८-१० हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १ चमचा जिरे, १ चमचा मीठ, चवीनुसार लिंबाचा रस - यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार साखर, ४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
पारीसाठी ः पाव वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, २ चमचे उकडलेल्या रताळ्याचा कीस, आवश्यकतेनुसार साजूक तूप/तेल, चवीनुसार मीठ.
कृती ः कुस्करलेल्या बटाट्यात केलेली हिरवी पेस्ट, चवीनुसार मीठ व साखर, चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकत्र करावे व छोटे छोटे गोळे करावेत. शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, रताळ्याचा कीस, चवीनुसार मीठ घालून घट्ट गोळा करावा. त्याची पारी करून बटाट्याचा एक गोळा (केलेले सारण) आत भरावा. हलक्या हाताने तोंड बंद करून हातानेच हलकेच दाबून चपट्या आकाराची गोल पुरी करावी. मग ही पुरी एकत्र केलेल्या सुक्या शिंगाडा व साबुदाणा पिठात घोळवून तेलात मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावी. 
टिप ः दही फेटून त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावे. वरून जिरे, कढीपत्ता पाने (ऐच्छिक) यांची फोडणी देऊन किंचित लाल तिखट (आवडीनुसार),  चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.

कचोरी

साहित्य ः एका उकडलेल्या बटाट्याचा कीस, एका उकडलेल्या रताळ्याचा कीस, चवीनुसार मीठ, २ चमचे वरीचे पीठ, २ चमचे साबुदाणा पीठ, आवश्यकतेनुसार साजूक तूप.
सारणासाठी - एक वाटी ओले खोबरे, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार काजूचे बारीक तुकडे व किसमिस, चवीनुसार मीठ, २ चमचे साखर, आवडीनुसार लिंबाचा रस.
कृती ः सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करावे. पारीसाठी बटाटा कीस, रताळ्याचा कीस चवीनुसार मीठ, दोन्ही पिठे असे सर्व मिश्रण चांगले एकत्रित करून त्याचा गोळा करावा. गोळ्याची छोटी गोल पारी करून एक चमचा सारण भरून हलक्या हाताने कचोरीचा गोल आकार द्यावा. तयार कचोऱ्या एकत्र केलेल्या सुक्या साबुदाणा पिठात व वरीच्या पिठात हलकेसे घोळवून साजूक तुपात मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या. या कचोऱ्या गोड दह्याबरोबर अप्रतिम व रुचकर लागतात.

साबुदाणा रोल

साहित्य ः दोन वाट्या भिजवलेला साबुदाणा, १ उकडलेला बटाटा, चवीनुसार मीठ व साखर, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, अर्धा चमचा जिरे यांची एकत्रित बारीक पेस्ट, ४ चमचे शेंगदाणा कूट, ४-६ कढीपत्ता पाने (ऐच्छिक), आवश्यकतेनुसार साजूक तूप, आवश्यकतेनुसार शिंगाडा पीठ/साबुदाणा पीठ.
कृती ः भिजलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा किसून घालावा. चवीनुसार मीठ व साखर, हिरवी मिरची, आले, जिरे यांची एकत्रित केलेली पेस्ट, कोथिंबीर, शेंगदाणा कूट, कढीपत्ता पाने (कढीपत्ता ऐच्छिक) सर्व घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. हाताला थोडे साजूक तूप लावून लांबट आकाराचे रोल करावेत. शिंगाडा पीठ किंवा साबुदाणा पिठात हलकेसे घोळवून मंद आचेवर साजूक तुपात बदामी रंग येईपर्यंत रोल तळावेत. हे गरमागरम रोल दह्याबरोबर, हिरव्या चटणीबरोबर अप्रतिम लागतात.

सॅँडविच
साहित्य ः प्रत्येकी १ वाटी साबुदाणा पीठ व शिंगाडा पीठ, अर्धी वाटी वरीचे पीठ, आवश्यकतेनुसार साजूक तूप, एका उकडलेल्या बटाट्याचा कीस, एका उकडलेल्या रताळ्याचा कीस, ८ हिरव्या मिरच्या - १ इंच आले - चवीनुसार मीठ - कोथिंबीर - लिंबाचा रस यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार मीठ, १ चमचा जिरे, २ चमचे जिरे पूड, २ काकड्यांचे पातळ गोल काप, चवीनुसार सैंधव मीठ. 
कृती ः  साबुदाणा पीठ, शिंगाडा पीठ, वरी पीठ, निम्मा उकडलेल्या बटाट्याचा कीस व निम्मा रताळ्याचा कीस, चवीनुसार मीठ, जिरे, हिरवी पेस्ट एकत्र करून घट्ट गोळा करावा. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून सुरीने चौकोनी आकार द्यावा. मंद आचेवर कडेने साजूक तूप सोडत बदामी रंग येईपर्यंत ते भाजून घ्यावेत. त्यातील एक चौकोनी पोळी घेऊन तिला परत थोडे साजूक तूप लावावे. सैंधव मीठ, आवडीनुसार हिरवी चटणी लावावी. वर राहिलेला बटाट्याचा कीस, रताळ्याचा कीस, काकडीचे काप रचावेत. आवडत असेल तर बटाटा चिवडा घालावा. वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करावी. आगळे वेगळे फराळी सॅँडविच खाण्यास तयार.

रताळ्याचा शिरा
साहित्य ः चार उकडलेली रताळी, २ चमचे वेलची पूड, २ चमचे साजूक तूप, पाव वाटी साखर किंवा गूळ, आवडीनुसार सुक्या मेव्याचे तुकडे.
कृती ः उकडलेल्या रताळ्याच्या गोल चकत्या करून गरम झालेल्या साजूक तुपात दोन मिनिटे परतावे. मग त्यात साखर किंवा गूळ घालून मिश्रण चांगले एकत्रित करावे व परत ढवळावे. मिश्रण थोडेसे दाटसर होत आल्यावर वेलची पूड, सुक्या मेव्याचे तुकडे घालून गॅस बंद करावा. हा आगळावेगळा उपवासाचा रताळ्याचा शिरा रुचकर लागतो. 

संबंधित बातम्या