कोथिंबीर स्पेशल
फूड पॉइंट
बहुतांश वेळा एखाद्या पदार्थावर सजावट म्हणून कोथिंबीर वापरली जाते. पण कोथिंबिरीपासून काही स्वादिष्ट पदार्थही होऊ शकतात...
पराठा
साहित्य : दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १ मध्यम उकडलेल्या बटाट्याच्या कीस, चवीनुसार मीठ, ६ हिरव्या मिरच्या - १ इंच आले - ८ ते १० लसूण कळ्या - याची एकत्रित पेस्ट, १ चमचा हळद, ४ चमचे चिली फ्लेक्स, १ चमचा हिंग, ४ मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ, आवश्यकतेनुसार तेल व कोमट पाणी, साजूक तूप.
कृती : साजूक तूप सोडून सर्व साहित्य एकत्र करून पिठाचा घट्टसर गोळा मळून घेऊन ५ मिनिटे मुरत ठेवावा. नंतर तेलाचा हात लावून थोडा मोठा उंडा घ्यावा. त्याचा जाडसर पराठा लाटून तव्यावर मंद आचेवर भाजावा. कडेने व वर साजूक तूप सोडून पराठा बदामी रंग येईपर्यंत भाजावा. अशा प्रकारे सर्व पराठे करून घ्यावेत. हे पराठे फोडणी मिश्रित दह्याबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर अतिशय रुचकर लागतात.
टिप - आवश्यक वाटले तरच पीठ मळताना पाणी घालावे. कारण उकडलेल्या बटाट्यामुळे पीठ चांगले मळले जाते.
वडी
साहित्य : चार मोठ्या वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, २ मोठ्या वाट्या बेसन, २ चमचे तांदूळ पीठ, १ लहान चमचा हळद, चवीनुसार मीठ, ४ हिरव्या मिरच्या - १ इंच आले - ८-१० लसूण कळ्या - याची एकत्रित पेस्ट, २ चमचे लाल तिखट, प्रत्येकी २ चमचे पांढरे तीळ व ओवा, आवश्यकतेनुसार कोमट पाणी, २ चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन, १ लहान चमचा हिंग.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे कोमट पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. मिश्रण मध्यमसर पातळ करावे. ५ मिनिटांनी एका खोलगट भांड्याला आतून तेलाचा हात लावावा. त्यात २ पळ्या मिश्रण ओतून वरून झाकण ठेवावे. १० मिनिटे वाफवून गॅस बंद करावा. थंड झाल्यावर सुरीला तेल लावून चौकोनी तुकडे कापावेत व शॅलो किंवा डिप फ्राय करावेत.
झुणका
साहित्य : चार वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ वाट्या बेसन पीठ ,२ हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, आवडीनुसार कढीपत्ता पाने, अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे, ४ लसूण कळ्यांचे बारीक तुकडे, १ लहान चमचा हळद, चवीनुसार मीठ, १ लहान चमचा लाल तिखट, प्रत्येकी २ लहान चमचे भाजलेले पांढरे तीळ व ओवा, प्रत्येकी १ लहान चमचा मोहरी, जिरे, हिंग व साखर, आवडीनुसार ओले खोबरे, आवश्यकतेनुसार तेल, १ लहान कांदा बारीक चिरून.
कृती : प्रथम मंद आचेवर बेसन पीठ कोरडेच किंचित बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर मंद आचेवरच तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, आल्याचे तुकडे, लसूण तुकडे, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता पाने, कांदा घालून मिश्रण परतावे. २ मिनिटे परतल्यावर सर्व कोथिंबीर, भाजलेले बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, साखर घालून मिश्रण परतावे. भाजीला ५ मिनिटे वाफ द्यावी. शेवटी वरून भाजलेले पांढरे तीळ, ओवा व ओले खोबरे भुरभुरावे. हा वेगळा झुणका भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा चविष्ट लागतो.
मुठके
साहित्य : चार मोठ्या वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, १ लहान वाटी बेसन पीठ, १ लहान वाटी भिजवलेले जाड पोहे, २ चमचे तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा हिंग, १ चमचा धणे पूड, ८ लसूण कळ्यांचे बारीक तुकडे, १ इंच आल्याचे बारीक तुकडे, २ चमचे पांढरे तीळ, २ चमचे लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून मिश्रणाचा घट्टसर गोळा करावा. हाताला तेल लावून मुठीच्या साहाय्याने थोडे लांबट आकाराचे गोळे करावेत. हे गोळे मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावेत. कोथिंबीर मुठके खाण्यास तयार. हे मुठके टोमॅटो सॉस, फेटलेले दही, पुदिना चटणीबरोबर रुचकर लागतात.
ठेचा
साहित्य : दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, १० हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १०-१२ लसूण कळ्या, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, १ लहान चमचा जिरे, २ मोठे चमचे शेंगदाण्याचा भरड कूट, ५-६ कढीपत्ता पाने, किंचित लिंबाचा रस, २ चमचे गोडे तेल.
कृती : प्रथम मंद आचेवर गरम तेलात हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता पाने व जिरे २ ते ३ मिनिटे परतून घ्यावे. मिश्रणाचा हिरवा रंग बदलू नये म्हणून साखर घालावी. मिश्रण थंड झाल्यावर त्यात मीठ घालून अजिबात पाणी न घालता भरड चटणी करावी. शेवटी त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. थोडासा लिंबाचा रस घालावा. हा ठेचा कोणत्याही भाकरीबरोबर रुचकर लागतो.
टिप : आवडीनुसार वरून मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी द्यावी.
कडबोळी
साहित्य : १ वाटी ज्वारी पीठ, २ चमचे बारीक रवा, २ चमचे चणा डाळीचे पीठ, १ चमचा तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, ४ चमचे कोथिंबीर - ४ लसूण कळ्या - अर्धा इंच आले - ४ हिरव्या मिरच्या - यांची एकत्रित पेस्ट, १ चमचा हिंग, १ चमचा हळद, १ चमचा पांढरे तीळ, आवश्यकतेनुसार तेल व कोमट पाणी.
कृती : ज्वारी पीठ, रवा, चणा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ एकत्र करून त्यात थंड तेल न घालता वरील सर्व जिन्नस एकत्र करून घालावेत. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालून कोमट पाण्याने घट्ट पीठ मळावे व ते १५ मिनिटे मुरत ठेवावे. नंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. पोळपाटावर थोडे तेल लावून गोळा हाताने लांब करावा व दोन्ही टोके एकत्र करून बंद करावीत. अशा प्रकारे सर्व कडबोळी करून मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावे. चहाबरोबर ही आगळीवेगळी कडबोळी चविष्ट लागतात.
पुरी
साहित्य : एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, १ चमचा मका पीठ, १ वाटी कोथिंबीर - ८-१० हिरव्या मिरच्या - १ इंच आले - १० लसूण कळ्या यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार मीठ व साखर, प्रत्येकी १ लहान चमचा हळद, पांढरे तीळ व हिंग, १ चमचा चाट मसाला, १ लहान चमचा कसूरी मेथी, आवश्यकतेनुसार तेल व कोमट पाणी.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात २ चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. आवश्यकतेनुसार थोडे थोडे कोमट पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. पीठ अर्धा ते पाऊण तास मुरत ठेवावे आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावे. या पुऱ्या टोमॅटो सॉसबरोबर, दह्याबरोबर रुचकर लागतात.
शंकरपाळे
साहित्य : एक वाटी मैदा, १ चमचा बारीक रवा, पाव चमचा खसखस, २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर - ४ हिरव्या मिरच्या - १ इंच आले - ६-८ लसूण कळ्या यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल व कोमट पाणी, प्रत्येकी १ चमचा हळद, हिंग, पांढरे तीळ.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून २ चमचे गरम तेलाचे मोहन घालावे व घट्ट पीठ मळून १० मिनिटे मुरत ठेवावे. नंतर थोडी जाडसर पोळी लाटावी व सुरीने चौकोनी आकाराचे तुकडे करावेत. हे तुकडे मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावेत. हे वेगळे शंकरपाळे खुसखुशीत होतात आणि चहाबरोबर अप्रतिम लागतात.