चटपटीत चायनीज

सुवर्णा जाहगिरदार सुर्वे, मुंबई
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

फूड पॉइंट

हल्ली अनेकजण चायनीज पदार्थ खूप आवडीनं खातात. पण चायनीज खायला दरवेळी हॉटेलमध्ये जाणं शक्य होत नाही. म्हणूनच घरच्या घरी करता येतील अशा पदार्थांच्या रेसिपीज..

पनीर चिली

साहित्य : अडीचशे ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, २ कांदे (१ चौकोनी तुकडे करून, १ बारीक चिरून), १ मोठी हिरवी सिमला मिरची चौकोनी तुकडे करून, १ लहान चमचा चिरलेली कांद्याची पात, पाव वाटी मैदा, पाव वाटी मका पीठ, २ लहान चमचे लाल तिखट, १ लहान चमचा काळी मिरी पूड, लसणाचे १०-१२ बारीक तुकडे, १ इंच आल्याचे बारीक तुकडे, चवीनुसार मीठ, प्रत्येकी १ मध्यम चमचा सोया सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, २ मोठ्या वाट्या तेल, आवश्यकतेनुसार पाणी, १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस.
कृती : प्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यांना लाल तिखट, काळी मिरी पूड, किंचित मीठ लावून १० ते १५ मिनिटे मुरत ठेवावे. मका पीठ व मैदा समप्रमाणात मिक्स करून मध्यमसर पातळ मिश्रण तयार करावे. मुरत ठेवलेले पनीरचे तुकडे मका पीठ व मैद्याच्या मिश्रणात घोळवून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊन बाजूला ठेवावे. मध्यम आचेवर ४ चमचे तेलात प्रथम लसूण तुकडे, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक कापलेला कांदा घालून परतावे. सिमला मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे घालून २ मिनिटेच परतावे. मीठ घालून अनुक्रमे शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस व सोया सॉस घालून मिश्रण हलकेच एकत्र करून टॉस करावे. २-३ चमचे मका पिठाची पातळ पेस्ट करून घालावी. मिश्रण एकत्र करून त्यात १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून परतावे. शेवटी तळलेले पनीरचे तुकडे घालून मिक्स करावे. वरून चिरलेली कांद्याची पात भुरभुरावी. पनीर चिली तयार. 
टिप : सिमला मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे जास्त वेळ शिजवू नये. सर्व सॉस घालताना सोया सॉस शेवटी घालावा.

 

चटपटे स्वीट कॉर्न

साहित्य :  दोनशे ग्रॅम वाफवलेले स्वीट कॉर्न, अर्धी वाटी हिरव्या सिमला मिरचीचे उभे पातळ काप, पाव वाटी गाजराचे उभे पातळ काप, पातीचे २ कांदे- उभे पातळ काप, २ चमचे कांद्याची हिरवी पात बारीक चिरलेली, १ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा शेजवान सॉस, १ चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, चवीनुसार मीठ, १ चमचा लाल तिखट, आवश्यकतेनुसार अमूल बटर, २ चीज क्यूब, ८ ते १० लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, १ इंच आले बारीक चिरलेले, १ चमचा टोमॅटो केचप.
कृती : अमूल बटर गरम झाले की लसूण तुकडे, आल्याचे तुकडे १ मिनिट परतावे. हिरव्या सिमला मिरचीचे काप, गाजराचे काप, पातीच्या कांद्याचे काप घालून मोठ्या आचेवर मऊ न करता १ मिनिटभर परतावे. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट घालून मिश्रण एकजीव करावे. वाफवलेले स्वीट कॉर्न, शेजवान सॉस, टोमॅटो केचप घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करून शेवटी लिंबाचा रस घालावा. २ मिनिटांनी गॅस बंद करावा व सर्व्ह करताना बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात वरून भुरभुरावी.      

   

व्हेज मंचुरियन
साहित्य : एक वाटी पातळ उभा चिरलेला कोबी, १ वाटी पातळ उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची, १ वाटी किसलेले गाजर, १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १२ ते १५ लसूण पाकळ्यांचे बारीक चिरलेले तुकडे, १ ते दीड इंच आल्याचे बारीक चिरलेले तुकडे, १ चमचा काळी मिरी पावडर, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, १ लहान कांदा उभा बारीक चिरलेला, २ वाटी मका पीठ, २ वाटी मैदा, चवीनुसार मीठ, ४ चमचे सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, ४ चमचे टोमॅटो केचप, ४ चमचे रेड चिली सॉस, आवश्यकतेनुसार तेल व कोमट पाणी.
कृती : प्रथम कोबी, सिमला मिरची, गाजर, कांद्याची पात एकत्र करून त्यात मावेल एवढे मका पीठ, मैदा, चवीनुसार मीठ व काळी मिरी पावडर घालून अजिबात पाणी न घालता सर्व मिश्रण चांगले एकत्रित करून त्याचा घट्ट गोळा करावा. त्याचे लहान गोलाकार गोळे करून बदामी रंगावर तळून घ्यावे. नंतर नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालून तेल तापले की मंद आचेवर प्रथम लसूण, आले घालून २ मिनिटे चांगले परतावे. चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून २ मिनिटे सर्व मिश्रण चांगले एकत्रित परतल्यावर त्यात तळलेले गोळे घालावेत. १ मिनिटभर हलक्या हाताने ढवळावे. त्यात अनुक्रमे चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगर व सोया सॉस घालून सर्व चांगले एकत्रित करावे. आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ/दाट हवी त्यानुसार मका पिठाची पाणी मिश्रित पेस्ट करून घालावी व २ मिनिटांनी गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कांद्याची पात भुरभुरावी. गरमागरम व्हेज मंचुरियन खाण्यास तयार.        

शेजवान नूडल्स (व्हेज)

साहित्य : दीडशे ग्रॅम शेजवान नूडल्स, पाव वाटी उभा बारीक चिरलेला कोबी, पाव वाटी गाजराचे बारीक उभे काप, पाव वाटी हिरवी सिमला मिरची बारीक उभे काप, २ मोठे पातीचे कांदे बारीक उभे काप व पात बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या उभे काप, १०-१२ लसूण पाकळ्या बारीक चिरून, दीड इंच आले बारीक चिरून, १ चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, पाव वाटी तेल, प्रत्येकी २ चमचे शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, प्रत्येकी एक चमचा सोया सॉस आणि व्हिनेगर, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : गरम पाण्यात १ मिनिट नूडल्स वाफवून काढल्यावर नूडल्स चाळणीत ओतून लगेच त्यावर थंड पाणी ओतावे. नूडल्सवर २ चमचे तेल घालून हलक्या हाताने चोळावे, जेणेकरून नूडल्स मोकळे होतील. गरम तेलात लसूण, आल्याचे तुकडे व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून अर्धा मिनिट परतावे. मग अनुक्रमे गाजर, पातीचा कांदा, कोबी, सिमला मिरची, कांद्याची पात, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, वाफवलेले नूडल्स, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस व सोया सॉस, व्हिनेगर घालून हलक्या हाताने सर्व मिश्रण मिनिटभर परतून, वरून बारीक चिरलेली कांद्याची पात भुरभुरावी व गॅस बंद करावा. व्हेज शेजवान नूडल्स खाण्यासाठी तयार. 
टिप : हा पदार्थ गॅसची आच मोठी ठेवून करावा, पण नूडल्स व त्यातील भाज्या जास्त शिजवू नयेत. 

पनीर ६५
साहित्य : अडीचशे ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, अर्धी वाटी मका पीठ, २ चमचे मैदा, चवीनुसार मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात, २ लहान पातीचे कांदे उभे चिरून, १०-१२ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, १ ते दीड इंच आले बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या, ८-१० कढीपत्ता पाने, १ लहान चमचा मोहरी, आवश्यकतेनुसार तेल व पाणी, ४ चमचे टोमॅटो केचप, ४ चमचे शेजवान सॉस, २ चमचे रेड चिली सॉस, १ चमचा लिंबाचा रस, २ चमचे लाल तिखट, २ चमचे काळी मिरी पावडर, २ चमचे चाट मसाला.
कृती : प्रथम पनीरच्या चौकोनी तुकड्यांना मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस लावून मिश्रण चांगले एकत्रित करावे. त्यात पाव वाटी मका पीठ व १ चमचा मैदा घालून सर्व पनीर तुकडे त्यात घोळवून घ्यावेत, जेणेकरून त्यावर दोन्हींचे आवरण नीट लागेल आणि तळल्यावर ते कुरकुरीत होतील. हे मिश्रण १५ मिनिटे मुरत ठेवावे. राहिलेले मका पीठ व मैदा एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर काळी मिरी पावडर, २ चमचे शेजवान सॉस, १ चमचा रेड चिली सॉस व २ चमचे पाणी घालून मिश्रण एकजीव करून मध्यमसर पेस्ट करावी. तेल तापले की मध्यम आचेवर पनीर तुकडे पेस्टमध्ये घोळवून तळून घ्यावेत. पॅनमध्ये आवश्यक तेवढे तेल तापवून त्यात मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर लसूण, आले घालून २ मिनिटे परतावे. त्यात अनुक्रमे पातीचा कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून २ मिनिटे परतावे. तळलेले पनीर तुकडे, २ चमचे शेजवान सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, ४ चमचे टोमॅटो केचप, चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने एकत्र करावे. २ चमचे मका पिठाची मध्यम पेस्ट करून ती मिश्रणात घालावी. मिश्रण ढवळावे. गॅस बंद करून सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कांद्याची पात भुरभुरावी. गरमागरम आंबटगोड, तिखट असे घरगुती पनीर ६५ खाण्यास तयार. 

फ्राइड राइस

साहित्य : एक वाटी लांबडा तांदूळ, २ चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, १ लहान वाटी बारीक चिरलेली फरसबी, १ लहान वाटी किसलेले गाजर, २ पातीचे कांदे बारीक चिरलेले, ४ चमचे हिरवी कांद्याची पात बारीक चिरलेली, २ हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, ६ लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ इंच आल्याचे बारीक तुकडे, ५-६ वाट्या पाणी, २ चमचे रेड चिली सॉस, २ चमचे ग्रीन चिली सॉस, १ चमचा सोया सॉस, २ चमचे शिजलेले स्वीट कॉर्न दाणे, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन २० मिनिटे भिजत ठेवावा. एका खोलगट पातेल्यात ५-६ वाट्या पाणी तापत ठेवावे. पाणी उकळायला लागले की १ चमचा मीठ, २ चमचे लिंबाचा रस घालून चांगले ढवळावे व मग फक्त भिजलेला तांदूळ घालावा. ५ मिनिटांनी दाणा शिजल्यावर चाळणीत भात ओतून सर्व पाणी काढून टाकावे. पसरट भांड्यात तेल गरम झाल्यावर प्रथम मिरचीचे तुकडे, लसूण तुकडे, आल्याचे तुकडे घालून २ मिनिटे परतल्यावर पातीचा कांदा, फरसबी, गाजर कीस, स्वीट कॉर्न दाणे, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर घालून मिनिटभर परतावे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस घालून सर्व मिश्रण एकत्र करावे. पाच मिनिटांनंतर शिजलेला भात घालून मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून वरून बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात भुरभुरावी.
टिप : हा भात मोठ्या आचेवर करावा. पाण्यात लिंबाचा रस घातल्याने भात मोकळा होतो.

संबंधित बातम्या